October 15, 2024
Importace of Tree in Zhadora book review by Deepak Suryavanshi
Home » Privacy Policy » वृक्षांच्या उपयुक्ततेची गाथा : झाडोरा
मुक्त संवाद

वृक्षांच्या उपयुक्ततेची गाथा : झाडोरा

‘ झाडोरा ‘ बाल कवितासंग्रहात कदंब, कवट, पळस, शतावरी, वाघाटी, उंबर, वड, पिंपळ, आपटा, कडूनिंब, आवळा, पेरू, बोरं, चिंचबन, चिकू, संत्रे, रामफळ, नारळ, मोसंबी व आंब्याचा मोहर अशा पन्नासपेक्षा जास्त वनस्पतींचे महत्त्व तसेच गोरखचिंच, अंकोल, वाघाटी, पांढरा साग, टाकळी, बेहडा, हिवरा, रान घेवडा, सदाफुली, काटेसावर, भुईरिंगणी, रानपांगरा , नागचाफा या वनस्पतींचे अत्यंत बहुगुणी महत्त्व बाल कवितासंग्रहामधून सांगितले आहे.

प्रा. डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी (सहयोगी प्राध्यापक)
शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब जि. धाराशिव

डॉ. श्रीकांत पाटील यांचा ‘झाडोरा’ बाल कवितासंग्रह भिवंडी, जि. ठाणे येथील रंगतदार प्रकाशनने प्रकाशित केला आहे. डॉ. पाटील हे घुणकी (ता. हातकणंगले जि.कोल्हापूर ) येथील असून त्यांच्या ‘सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल’ या बाल कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा बाल वाड्मय पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या लॉकडाऊन, ऊसकोंडी व पाणीफेरा या लोकप्रिय कादंबऱ्या आहेत. मानवी जीवनासाठी निसर्गातील प्रत्येक वृक्ष अत्यंत उपयुक्त आहेत, याविषयीचे काव्यातून मुक्त चिंतन झाडोरामध्ये केले आहे.

खरे तर कवी हा मुका कलावंत असतो. सुप्त अंतर्मनातील भाव शब्दांच्या माध्यमातून सृजनात्मक कलाकृतीचा आविष्कार होत असतात. त्यांच्या कविता एकाच वेळी मानवी जीवनाबरोबरच निसर्गातील वृक्षावर प्रेम करणाऱ्या वास्तवाशी नाते सांगणाऱ्या आहेत. बालकुमारांच्या जगात पर्यावरण मूल्य रुजवणारे जिज्ञासू, अभ्यासू व गरजूंसाठी वृक्ष-लता- वेलीगवतापासून वटवृक्षापर्यंत विविध झाडाझुडपांचे-वनौषधींची माहिती देणारा जणू आजीबाईचा बटवाचा आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. वृक्षांच्या सान्नीध्यात राहून केलेले निरीक्षण वृक्षतोड होताना पाहून त्यांचे हळवे मन आपल्या कवितेतून शब्दबद्ध केले आहे. ग. ह. पाटील, ग. ल. ठोकळ, बालकवी तसेच अग्रगण्य अशा ना. धों. महानोर, डॉ. सुरेश सावंत, डॉ. सूर्यकांत मालुसरे, समाधान शिकेतोड, बालाजी इंगळे या कवींच्या वळणावर जाणारी आहे. आज जागतिकीकरण, वाढती लोकसंख्या, शहरीकरण, कारखानदारीमुळे हजारो हेक्टर जमिनीवरील जंगल तोड होऊन सिमेंटचे जाळे उभारले जात आहे, हीच धरतीची गंभीर समस्या पाहून…

पवित्र धरती आहे
आम्हा साऱ्यांची माय
तीच आमच्यासाठी
असे दुधावरची साय
बालमनावर वृक्षांची महती, पर्यावरण मूल्य विशद करणारी कविता आहे. तसेच या वृक्षांच्या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे काम होणार आहे. निश्चितच हा त्यांचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्यातून सामाजिक बांधिलकीचे तत्व निर्माण होणार आहे.

झाडे लावू या झाडे जगवू या
मैत्री झाडांशी, निसर्ग सजवू
या लहानात लहान वृक्ष वेलींपासून ते महाकाय वट वृक्षापर्यंतची झाडे लावू असा ध्यास घेतला आहे. आपला देश हा कृषिप्रधान असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा, सुमारे ७० टक्के जनता ही आजही शेतीमध्येच राबवताना दिसते, परंतु आधुनिक शेतीच्या नावाखाली वृक्षतोड करतांना दिसतात, अनेक प्रक्रिया उद्योग हे शेतीमालावर आधारीत चालतात. त्याला सुसंगत अशा प्रकारच्या वृक्षांची लागवड केली पाहिजे,

शेताच्या बांधावरती लिंब आहे उभा
वाढवत आहे तो शिवाराची शोभा
सर्वाधिक निरोगी आणि दीर्घकाळ टिकणारा कडूनिंब आहे. त्यामुळे कवी सर्वांना शेताच्या बांधावर, मोकळ्या जागेत तो लावण्याचे मनापासून आवाहन करत आहे. कवीने निसर्गातील वनस्पतींचे मानवी जीवन, अन्य सजीवांवर होणारा सदुपयोग अधोरेखित केला आहे, वृक्षांचे जतन आणि संवर्धन करावे असा उपदेश, प्राचीन काळापासून संतांनी वेळोवेळी केला आहे, तेराव्या शतकात सांगितलेले मोठेपण आजही २१ व्या शतकामध्ये यथार्थता पटत आहे.

संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात,
जे वृक्ष लाविती सर्वकाळ तयावरी छत्रांचे छल्लाळ l
जे ईश्वरी अर्पती फळ l नानाविध निर्मळ
याच अनुषंगाने जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केले, ही बाब खरोखरच अत्यंत महत्त्वाची आहे. पशुपक्षी प्राणी, नदी-नाले, पर्वतराई इत्यादीचे संरक्षण करण्याची प्रेरणा माणूस म्हणून आपल्याला दिली आहे.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी l पक्षीही सुस्वरे आळविती’
‘ झाडोरा ‘ बाल कवितासंग्रहात कदंब, कवट, पळस, शतावरी, वाघाटी, उंबर, वड, पिंपळ, आपटा, कडूनिंब, आवळा, पेरू, बोरं, चिंचबन, चिकू, संत्रे, रामफळ, नारळ, मोसंबी व आंब्याचा मोहर अशा पन्नासपेक्षा जास्त वनस्पतींचे महत्त्व तसेच गोरखचिंच, अंकोल, वाघाटी, पांढरा साग, टाकळी, बेहडा, हिवरा, रान घेवडा, सदाफुली, काटेसावर, भुईरिंगणी, रानपांगरा , नागचाफा या वनस्पतींचे अत्यंत बहुगुणी महत्त्व बाल कवितासंग्रहामधून सांगितले आहे.

टीबी रोगाचे औषध
वाघाटीला मानतात
एकादशीला त्याची भाजी
मस्त आनंदाने खातात.
कवितेच्या शीर्षकानुसार तेथे वनस्पतीचे मूळ छायाचित्र असल्यामुळे आकलन सुलभ होते. वृक्ष फक्त कार्बनडाय ऑक्साइड शोषून, ऑक्सिजन सोडतात, एवढेच नसून येथे प्राचीन काळात अनेक रोगावरती वृक्ष – वनौषधीचे ज्ञान लोकांना होतं म्हणूनच ते निरोगी आणि दीर्घायुष्य होते, असा संदर्भ समजतो.

आपण आपल्या अवतीभोवतीच्या वृक्षांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणारी तोड थांबवली नाही, तर येणाऱ्या पिढ्यांना निसर्गातील वृक्षांची माहिती चित्रकाराच्या चित्राद्वारे सांगावी लागेल, कारण ते वृक्षच नाही राहिले तर त्याचे मोठेपण सांगता येणार नाही. परंतु मानवाचा होणारा हस्तक्षेप त्यामुळे जंगलातील प्राणी हे मानवी वस्त्यांमध्ये येऊन होणारे जीवघेणे हल्ले दिसत आहेत. भविष्यात ही स्थिती अशीच वाढत राहिली तर मानवाच्या अस्तित्वालाच धोका पोहचणार आहे.

रक्षण करूया भूमातेचे
झाडझुडपांचे लता वेलींचे
पानाफुलांचे फळ मुलांचे
हिरव्या पिकांचे पालेभाज्यांचे
एवढेच नाही तर निसर्ग हा जैवविविधतेने नटलेला विस्तृतपणे सर्वदूर पसरलेला आहे.
रक्षण करूया शेती-मातीचे
हवा पाणी अन् ध्वनींचे
जपू जैवविविधतेला, भूमातेला
लावून झाडे -वाचूया निसर्गाला
याचं अनुषंगाने आमचे मार्गदर्शक शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर म्हणतात, अवतभोवती निसर्गातील वृक्ष ही आपल्या सजीवांसाठी ऑक्सीजन निर्माण करणारे कारखाने आहेत. याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आज देशाची राजधानी दिल्ली येथे प्रदूषणाची भयंकर समस्या निर्माण झाली आहे. ऑक्सीजन पुरवठा असंख्य अशा वृक्षवेली मानवी सजीवांचे जीवन उपयुक्त अशा आहेत. प्रस्तुत बाल कवितासंग्रह वाचत असताना ज्येष्ठ पर्यावरतज्ज्ञ मारूती चित्तमपल्ली यांची आठवण येते. वायू, जल व ध्वनी हे वाढते प्रदूषण पाहिले तर त्याला आळा घालण्याचे सर्वाधिक महत्वाचे काम वृक्षच करत असतात. निसर्ग हा मानवाचा गुरु आहे, माणूस हा निसर्गातील घटक असून माणूस आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते आहे. केंद्र आणि राज्य सरकार पर्यावरण जतन व संवर्धन जनजागृतीसाठी लाखो रुपयांचा खर्च करून प्रबोधन करत आहे. वैश्विक तापमान वाढ, पर्यावरणाचा संतुलन सध्या ढासळत असल्याने अनेक पशु-पक्षी-प्राणी -मानव या सबंध सजीवांच्या परिसंस्थेचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. परिणामी त्यावर एकमेव उपाय म्हणजे जास्तीत जास्त वृक्षांची लागवड आणि त्यांची जोपासना करणे आहे. तरी त्यातून जवळून पाहिलेले, अनुभवलेले वास्तव किती वेगळे आणि भयानक असू शकते.

‘झाडोरा’ काव्यसंग्रहातील कविताना विशिष्ट अशी निसर्गाशी जोडणारी लय असून वृक्षाविषयीची महती विशद करणारा एक अभिनव प्रयोग असून वाचकांना एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाण्याची ताकद यात आहे, हळव्या कविमनाला वृक्षांचे संवर्धन लागलेली ओढ, सभोवतीचे वास्तव त्यातून अंतःकरणात निर्माण झालेली द्विधा अवस्था चित्रित केली आहे. ही कविता प्रतिमा आणि प्रतीकांव्दारे सजलेली आहे. वास्तवात वृक्षतोड कवीला अस्वस्थ करणारी आहे. ती अस्वस्थता वैयक्तिक नसून समष्टी बाबतची आहे, मग जीव टांगणीला लागून ही उदासीनता अधिकच मनात घर करून राहते. तेव्हा जणू जीवाची सखी झालेली ही कविताच कवीचे प्रारब्ध होऊन जाते आणि शब्दांमधून विविधरंगी छटा अभिव्यक्त होतात. तेव्हा कवीच्या अंतर्मनातील कोलाहल टिपताना ओळी ओठावर येऊ लागतात. आपल्या प्राणप्रिय नारळ वृक्षांच्या सहवासातून वाट्याला आलेला स्वर प्रकटतो,
देवाची करणी
नारळात पाणी
नारळाच्या झाडांची
गावू या मधूर गाणी
वैश्विक तापमान वाढ, बेसुमार वृक्षतोड ज्वलंत विषय असल्याने पर्यावरण जतन आणि संवर्धनाकडे डॉ. श्रीकांत पाटील हे ध्येय वेडे, संवेदनशील कवी असल्याने ‘झाडोरा’ या बाल कवितासंग्रहातून त्यांना सामान्य लोकांचं लक्ष वेधून घ्यावे वाटले. त्याच चिंतनातून शब्दांची आरास साकारली आहे. मनोरंजनातून प्रबोधन तसेच वृक्षांचे गुणधर्म त्यांची उपयुक्तता बालकुमारांच्या जाणीव जणू स्वाती नक्षत्राचे काव्य लेणे कोरल्यासारखी होणार आहे.

साहित्यिक मापदंडातून कवितेचा आशय, विषय स्वतंत्र मांडणी, सृजनात्मक आविष्कार असून विविधरंगी नाजूक हळव्या लयबद्ध, भाषेतून संवाद साधला आहे.
असा झाडोरा झाडोरा
पानाफुलांचा झाडोरा
असा झाडावर झाडोरा
औषधी गुणांचा झाडोरा
उत्कृष्ट छपाई, मजबूत बाइंडिंग असे सारे काही निर्मितीमूल्य दर्जेदार असून कायमस्वरूपी संग्रही ठेवावा असा आहे, हा बाल कवितासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरेल तसेच निश्चितच पर्यावरण प्रेमींना मार्गदर्शन करणारा एक दस्तऐवज ठरेल यात शंका नाही. एकूणच त्यांच्या साहित्यिक कार्यास खूप खूप शुभेच्छा ll

बालकवितासंग्रहः झाडोरा
कवीः डॉ. श्रीकांत पाटील (मो.९८३४३ ४२१२४)
प्रकाशकः रंगतदार प्रकाशन, भिवंडी जि. ठाणे
पृष्ठे -: ६४ मूल्य -:२००/- रु.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading