साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असल्याने भारतीय संस्कृतीच्या विचारांना निश्चितच उजाळा मिळेल. आंतरभारतीची संकल्पना विचारात घेऊन या संमेलनात अन्य भाषेतील साहित्यालाही प्राधान्य दिले जावे. भाषांतरीत साहित्य अन् अनुवाद या साहित्याला विशेष महत्त्व देऊन राष्ट्रीय एकात्मता वाढावी यादृष्टीने या संमेलनात प्रयत्न व्हायला हवा. विश्वभारतीच्या दृष्टीने वाटचाल करून संत ज्ञानेश्वर माऊलीच्या विश्वची माझे घर या विचाराला प्रोत्साहन मिळावे. संमेलनामध्ये तसे ठराव करण्यात यावेत.
इये मराठीचिये नगरी
आगामी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे आयोजित करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे संमेलनाचे स्थळ निश्चिती करण्यासाठी समिती गठीत केली होती. स्थळ निवड समितीमध्ये साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, उपाध्यक्ष रमेश बंसकर तसेच प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक यांचा समावेश होता.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी (ता. २३) पुण्यात झालेल्या बैठकीत निमंत्रण आलेल्या चार स्थळांमधून अमळनेर या स्थळाची निवड करण्यात आली. त्यामुळे आता सुमारे ७० वर्षांनंतर परमपूज्य साने गुरुजी यांच्या या कर्मभूमीत सारस्वतांचा मेळा भरणार आहे.
वर्धा येथील ९६ वे संमेलन संपून अवघे दोन महिने झाले असताना आगामी संमेलनाचे स्थळही निश्चित झाले आहे. ९७ व्या संमेलनासाठी महामंडळाला चार निमंत्रणे प्राप्त झाली होती. यामध्ये सातारा, औदुंबर, अंमळनेर आणि जालना या चार स्थळांचा समावेश होता. संमेलनाच्या स्थळ निवड समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली, तर सातारा येथील संस्थेचे दृकश्राव्य सादरीकरण पाहिले. तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी व कार्यक्षमता यांचा विचार करून समितीने सर्वानुमते मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि महामंडळाने त्याला मान्यता दिली.
पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. याप्रसंगी प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के. आकरे व प्रकाश गर्गे हे सदस्य उपस्थित होते.