July 27, 2024
Kateri Paywat Book Review by Suhaskumar Bobde
Home » सुसंस्कृत तरुणाची गळचेपी उलगडणारे आत्मनिवेदन:काटेरी पायवाट
मुक्त संवाद

सुसंस्कृत तरुणाची गळचेपी उलगडणारे आत्मनिवेदन:काटेरी पायवाट

चरित्र, आत्मचरित्र आणि कादंबरी हे तीन वाङ्मय प्रकार एकमेकांसारखे वाङ्मय प्रकार नसले तरी एकमेकांमध्ये गुंतलेले वाङ्मययप्रकार आहेत. त्यातही आत्मचरित्र या वाङ्मय प्रकारातही आत्मकथन, आत्मनिवेदन असेही काही उपप्रकार आहेत. आत्मचरित्र हा वाङ्मयप्रकार हाताळत असताना आत्मचरित्रकाराला पहिल्यांदा आत्मविस्मृती यावी लागते तरच त्याला चांगले आत्मचरित्र लिहिता येते. डॉ. अनंता सूर यांची अल्पवयातील वाङ्मयीन व व्यावसायिक वाटचाल पाहता खडतड व्यावसायिक वाटचाल करता करता त्यांच्याकडून विविध वाङ्मय प्रकारात विपुल वाङ्मय निर्मिती झाली आहे. हा लेखक एकारलेला लेखक नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम आहेत. त्यामुळे ते कवी आहेत, कादंबरीकार आहेत, समीक्षक आहेत, कथाकार आहेत, नाटककार आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे आत्मकथनकार आहेत. त्यांची ही सारी वाटचाल त्यांनी म्हटल्याप्रमाणे ‘काटेरी पायवाटे’वरून झाली आहे. त्यांच्या ‘काटेरी पायवाट’या आत्मकथनाला महाराष्ट्रातील महत्त्वाचा भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कारासह महाराष्ट्रातील अनेक वाङ्मयीन संस्थांचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यावरून या आत्मकथनाच्या उच्च वाङ्मयीन गुणवत्तेची कल्पना आपल्याला येते.

लेखकाला आपली व्यावसायिक व शैक्षणिक वाटचाल करीत असताना पदोपदी ज्या संघर्षाला सामोरे जावे लागले याचे दाखले या आत्मकथनाच्या पानापानांवर आपल्याला पाहायला मिळतात. इथून तिथून ज्याच्या वाट्याला नकार आणि नकारच आलेला आहे तरीही ही काटेरी पायवाट तुडवत राहणारा आणि उमेद न हारणारा हा तरुण आहे. तसे पाहिले तर आत्मचरित्र आणि आत्मचरित्राच्या अंगाने लिहिले जाणारे आत्मकथन व आत्मनिवेदन हे सर्वच वाङ्मय प्रकार हाताळायला अवघड असतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बहुतांशी आत्मचरित्रे ही आत्मचरित्रकारांनी आपल्या उतारवयात म्हणजेच जीवन पूर्ण जगून झाल्यावर लिहिलेली आहेत. जरी ही आत्मचरित्रे जीवन पूर्ण जगून झाल्यावर लिहिलेली असली तरी देखील आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार असा आहे आहे की, ते कितीही प्रांजळपणाने लिहायचे ठरवले तरी त्यात काही अंशी का होईना आत्मगौरवाचा भाग येण्याची दाट शक्यता असते.

‘काटेरी पायवाट’ ही शीर्षकाप्रमाणेच ‘काटेरी पायवाट’ आहे. हे आत्मकथन म्हणा किंवा आत्मनिवेदन म्हणा सध्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील पिढीच्या समस्यांचे प्रातिनिधिक चित्रण आहे. अलीकडच्या काळात आत्मपर लेखन विपुल प्रमाणात झाले आहे. ही आत्मपर लेखनाची मालिका वेगवेगळ्या क्षेत्रातील लेखकांची आहे. ‘काटेरी पायवाट’ हे आत्मकथन १ जुलै २०२० मध्ये प्रसिद्ध झाले असून त्याला अनेक पारितोषिकेही मिळाली आहे. या आत्मकथनामध्ये लेखकाने जे निवेदन केले आहे त्यात कुठेही आणि कसलाही सत्याचा अपलोप होऊ दिला नाही हे ह्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. अनंताने ह्या लेखनामधून आपल्या गतजीवनाचा यथोचित आत्मशोध घेतला आहे. हा आत्मशोध घेण्यात लेखक खऱ्या अर्थाने यशस्वीही झाला आहे. कारण जे चांगले आत्मनिवेदन लेखन असते ते लेखन समाजातील सामाजिक समस्यांचे अधिकाधिक प्रतिनिधित्व करीत असते. त्यामुळे साहजिकच ‘काटेरी पायवाट’वरील पानापानांवर समाजातील वृत्ती प्रवृत्तीचे दर्शन घडते.

एखादे चांगले आत्मचरित्र किंवा आत्मकथन तेच असते जे एका व्यक्तीच्या जीवनापुरते मर्यादित असले तरी ते सामाजिक जीवनाशी समरसलेले असते. आत्मकथन हा वाङ्मयप्रकार हाताळायला तसा अवघड आहे याचे कारण म्हणजे आत्मनिवेदनातील किंवा आत्मकथनातील जो ‘मी’ असतो त्या ‘मी’ला स्वतःकडे तटस्थपणे पाहात पाहात स्वतः बद्दल जे काही घडले ते सांगावे लागत असते. हे ज्याला चांगल्या पद्धतीने जमते त्याच्याकडून यथायोग्य किंवा अधिक चांगले आत्मनिवेदन किंवा आत्मकथन लिहिले जाते. आनंद यादव यांच्या म्हणण्याप्रमाणे,”आत्मचरित्रात लेखक आपल्या जीवनाकडे मागे वळून पाहात असताना त्या लेखकाच्या संवेदनशील मनाची जी एक भावस्थिती निर्माण होते ती भावस्थिती वाचकांपर्यंत नेऊन पोचविण्याचा तो प्रयत्न करत असतो. ही भावस्थिती नीटपणे पोचावी म्हणून तो भावस्थितीला अनुकूल, पूरक, पोषक वाटतील अशाच आपल्या जीवनातील घटना, प्रसंग, अनुभव, यश-अपयश वातावरण निवडतो आणि त्याद्वारे ते साहित्यरूपात आत्मचरित्र उभे करीत असतो.” आनंद यादवानी आत्मचरित्र या वाङ्मय प्रकाराला लावलेले निकष हे त्यांनी आपल्या स्वानुभवातून केलेल्या लेखनाच्या अनुषंगानेच लावलेले आहेत. त्या निकषांच्या पातळीवर अनंता सूर यांची ‘काटेरी पायवाट’ बरोबर उतरते. आनंद यादवांचीही ‘झोंबी’ ते ‘काचवेल’ ही आत्मपर लेखनाची मालिका आहे. अनंता सूर यांनी देखील ‘ काटेरी पायवाट’ ने आपल्या आत्मपर लेखनास सुरुवात केली असून ते इतके यशस्वी झाले आहे की ते देखील आनंद यादवांप्रमाणेच आपल्या आत्मपर लेखनाचे पुढचे भाग लिहू शकतील.

अनंता सूर यांचे व्यक्तिमत्त्वच मुळात परिवर्तनशील विचारांचे आहे हे त्यांनी आपले लेखन ज्या परिवर्तनवादी विचारांच्या व्यक्तींना अर्पण केले आहे त्यावरून आपल्या ध्यानात येते. आपला देश हा मुखवटे पांघरून ढोंगाच्या मागे जाणारा आहे आणि सूर हे ह्या ढोंगाच्या विरोधी आहेत. ह्या समाजात जे समाजकंटक आहेत त्या समाजकंटकांना ह्या समाजातील परिवर्तनवादी विचार रुचले नाहीत. परिणामी परिवर्तनवादी विचारसरणीची माणसेही रुचली नाहीत.म्हणूनच आपल्या समाजात अद्यापही पुरोगामी चळवळ म्हणावी तशी पुढे गेलेली नाही. ज्यावेळी प्रतिगामी लोकांना पुरोगामी लोकांचा विचार खोडून काढता येत नाही तेव्हा अशी माणसे पुरोगामी माणसांनाच संपवतात. परंतु प्रतिगामी लोकांनी पुरोगामी लोकांना जरी संपवले तरी त्यांनी समाजात पेरलेले जे परिवर्तनवादी विचार असतात ते परिवर्तनवादी विचार त्यांना खोडून काढता येत नाही. याचे प्रत्यंतर ‘काटेरी पायवाटे’च्या अर्पणपत्रिकेत येते. म्हणूनच त्यांनी आपले हे आत्मपर लेखन पुरोगामी विचारांच्या नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे,डॉ. एम.एम.कलबुर्गी आणि गौरी लंकेश या समाजवादी विचारवंतांना अर्पण केले आहे.

लेखकाने आपल्या शैक्षणिक प्रवासात वेळोवेळी त्यांच्या नशिबी जी नकारघंटा आली त्या नकारघंटेतूनच आपण आपल्या काटेरी पायवाटेवरील पुढचा प्रवास कसा केला यांचे साध्यंत विवेचन केले आहे. लेखकाच्या वाट्याला जो वेळोवेळी नकार आणि अडचणी आल्या त्या नकारातून व अडचणीतून लेखकाने पुढच्या वाटा धुंडाळल्या आहेत.’काटेरी पायवाट’च्या आरंभीच ‘आणखी काय सांगावे?’हे प्रस्तावनावजा दीड पानांचे टिपण लेखकाने लिहिले आहे. त्यातूनच त्याने बरेच काही सांगितले आहे. लेखक जसा दहावीतच दोनदा नापास झाला तेव्हाच त्याची शिक्षणापासून नाळ तुटते की काय अशी शंका निर्माण झाली.कारण ह्या मुलाला पुढे शिक्षणाबद्दल प्रोत्साहन देणारे त्याच्या कुटुंबात कोणीच नाही अशी परिस्थिती. बापाची जी थोडीफार शेती त्या थोड्याफार शेतीत कष्ट करणारा तो स्वतःच आहे. त्याला त्याचं आयुष्य पुरात वाहात जाणाऱ्या ओंडक्यासारखं वाटतं.

योगायोगाने तो राजुऱ्याला रामदास भाऊकडे जातो आणि तिथे त्याची प्रा.श्यामकुमार डहाळे सरांची भेट झाल्यामुळे पुढच्या शिक्षणाचा आणि जगण्याचा मार्ग सापडतो. लेखकाने आपल्या लेखनाच्या आरंभीच दहाडे सरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्याचे बी.ए.पर्यंतचे शिक्षण हे राजुऱ्याच्या शिवाजी महाविद्यालयात झाल्यावर तो पुढे एम.ए करण्यासाठी नागपूर विद्यापीठात आला. नागपूर विद्यापीठात येत असताना त्यानं आपल्या मनात जी जिद्द बाळगली ती जरी सहजासहजी तडीस नेता आली नाही तरी उशिरा का होईना त्यानं ती तडीस नेली हे त्याचं यश आहे. आयुष्यात चांगले शिक्षक मिळणं हे भाग्याचं असतं.त्यानुसार त्याला डॉ. यशवंत मनोहर, डॉ.अक्षयकुमार काळे, कवी ग्रेस, डॉ.मदन कुलकर्णी, डॉ. श्रीधर शनवारे आणि डॉ.आशा सावदेकरांसारखी मराठी साहित्यातील तोलामोलाची दिग्गज मंडळी शिकवायला मिळाली हे त्याचं भाग्य. त्यामुळे त्याची जी वैचारिक जडणघडण आहे ही वैचारिक जडणघडण समृद्ध झाली हे लेखकाने अत्यंत नम्रपणे नमूद केले आहे.

लेखकाने केलेल्या आरंभीच्या निवेदनापासून ते ह्या आत्मनिवेदनाच्या शेवटच्या पृष्ठापर्यंतच्या सर्व घटना त्याच्या संदर्भात जशा घडल्या तशा त्याने सांगितलेल्या आहेत.त्यामुळे हे आत्मनिवेदन आणि आत्मनिवेदनच आहे. ह्या लेखनास आपण आत्मचरित्र मात्र म्हणू शकत नाही कारण आत्मचरित्र आणि आत्मकथन किंवा आत्मनिवेदन हे दोन्ही वाङ्मय प्रकार एकमेकांमध्ये मिसळणारे असले तरी त्यांच्यामध्ये सूक्ष्म भेद आहे.आत्मचरित्रात असतो तो ‘मी’ आपल्या गतजीवनाकडे जीवनाचा परिपूर्ण अनुभव घेतल्यावर मागे वळून पाहून वस्तुनिष्ठ आणि सत्यनिष्ठ पद्धतीने लिहावयाचा वाङ्मयप्रकार आहे.पण असे असले तरी आत्मचरित्र ह्या वाङ्मय प्रकारात लेखकाकडून प्रांजळपणा येईलच याची खात्री मात्र नसते. अनेक आत्मचरित्रकारांनी लिहिलेली आत्मचरित्रे लेखक म्हणतो म्हणून वाचकांना लेखकाच्या शब्दावर हवाला ठेवून वाचावी लागतात.

सामान्यातील सामान्य माणसाचे जीवन आत्मचरित्र लिहिण्यासारखे असतेच असे नाही. मात्र ज्या व्यक्तीने आपल्या जीवनाच्या अगदी अल्पकाळात कमालीचा संघर्ष अनुभवलेला असतो त्या व्यक्तीकडून अगदी तरुण वयात आत्मकथन किंवा आत्मनिवेदन लिहिले जाऊ शकते. काही लेखक आपले आत्मिक अनुभव व्यक्त करण्यासाठी आत्मपर कादंबरीसारख्या वाङ्मय प्रकाराचा वापर करतात. परंतु “कादंबरी ही वस्तू मुळात प्रातिभ आणि काल्पनिक असते. तो काल निश्चित स्वरूपाचा किंवा विशिष्ट नसतो.त्याला तारखा, साल यांचे अपरिहार्य संदर्भ नसतात. सर्वसाधारणपणे ती कालाचा संदर्भ देत असते.तिच्यातील घटना,प्रसंग, पात्रे, कथानक काल्पनिक असतात. प्रातिभ निर्मितीतून जन्माला आलेल्या असतात.”२ त्यामुळे आत्मचरित्रात्मक कादंबरी,आत्मकथन किंवा आत्मनिवेदन आणि आत्मचरित्र ह्या तीन वाङ्मय प्रकारांमध्ये आत्मकथन किंवा आत्मनिवेदन ह्या वाङ्मय प्रकाराचे लेखन करणाऱ्याला हे लेखन करण्यापूर्वी बऱ्यापैकी कौटुंबिक, सामाजिक,आर्थिक,सामाजिक संघर्षाला सामोरे जावे लागत असते व हा सत्याधिष्ठित वाङ्मय प्रकार असल्याने त्याचे संदर्भही अशा लेखनात येतात. त्यामुळे बऱ्याच वेळा हा लेखनप्रकार हाताळताना लेखकाला तो अत्यंत जबाबदारीने हाताळावा लागतो.

अनंता सूर यांचे हे लेखन आत्मकथनात मोडत असून त्यांनी हे लेखन अत्यंत जबाबदारीने केले आहे. लेखकाने आरंभीचे निवेदन केल्यावर ह्या लेखनाची सुरुवातच मुळी आपल्या मातृकुळापासून केली आहे.या लेखनाची वैदर्भीय भाषा आणि उपमा,प्रतिमादेखील अस्सल ग्रामीण शैलीत आहे.उदा. येलाबाईशी लग्न केलेला मामा त्याची बायको त्याच्याशी उठसुठ झगडा करायला लागते तेव्हा ‘तेलभरल्या मशाली’सारखा पेटून उठतो आणि मामीला मायबापाच्या घरून घेऊन येतो.(काटेरी पायवाट -पृ.७)या लेखनात लेखकाच्या सानिध्यात आलेल्या काही व्यक्तिरेखांचा उल्लेख अगदी त्यांच्या जन्मसालासह आला आहे. ज्या घुलाराम पाटलानं इंग्रजांच्या आमदानीत गोठ्यामध्ये मुलांना शिकवण्याचं काम केलं त्यांच्या जन्माची नोंद इ.स.१९०१ सालची आहे.ही सारी लेखकाची ऐकीव माहिती असली तरी ह्या ना त्या प्रकारे लेखकाचा या व्यक्तींची संबंध आहे.

लेखकाच्या जन्माबद्दलही लेखकाला त्याच्या जन्मानंतर कळलेली माहिती लेखकाने दिलेली आहे.लेखकाची आई ऐलूबाईला अनंता धरून एकूण अकरा मुलं झाली. त्यातही काही मेली.अनंता पोटात असतानाच आपल्याला जास्त पोरं आहेत.आता आणखी पोरं नकोत म्हणून अनंताच्या आईने गावातल्याच धुरपताकडे जाऊन गर्भ पाडायच्या गोळ्या आणल्या आणि त्या घेतल्या. तरीदेखील तो जन्मायचा तो जन्मलाच.( काटेरी पायवाट- पृ.१०)असा जन्मापासूनच ज्याच्या वाट्याला नकार आणि नकाराच आला असा हा अनंता सगळ्या बहिणभावाने उष्ट केलेलं दूध मनसोक्त पीत मोठा झाला.तसं हे शेंडेफळ पण ह्या शेंडेफळाच्या वाट्याला त्याच्या घरातही वेळोवेळी आली ती केवळ अवहेलनाच.

या आत्मनिवेदनामध्ये लेखकाने बरेचसे स्थळसंदर्भ आणि काळसंदर्भ जागोजागी दिले असल्यामुळे घटनांमधील प्रांजलपणाचा प्रत्यय येत राहतो. आपल्या मायच्या सहनशील स्वभावाबद्दल लेखकाला विशेष कौतुक आहे. हे त्यांनी आपल्या आईबद्दल जे काही म्हटलं आहे त्यामुळे आपल्या ध्यानात येतं.अनंता म्हणतो,” बापाला मायंवर रागावण्यासाठी कारणं कमी पडायची. माय मात्र मुक्यानं सारं सहन करून संसाराचा गाडा पुढं ढकलायची. सहनशक्तीचा एवढा डोंगर तिच्या शरीरात कोणत्या रक्तातून आलेला असेल. इतरांना आपल्या गुणांनं, कर्तुत्त्वाने आकर्षित करण्याचं कसब तिनं कोणत्या शाळेच्या विद्यापीठातून शिक्षण घेऊन मिळवलं असेल हे आता सांगता येणार नाही.”३ लेखकाच्या ह्या वक्तव्यातून त्याचा आपल्या मायबद्दलचा विलक्षण जिव्हाळा तर प्रत्ययाला येतोच येतो पण मायला जीवन जगत असताना पदोपदी जो संघर्ष करावा लागला त्याचे प्रत्यंतरही अनेक प्रसंगातून येते.

बापाचा स्वभाव जरी तापट असला तरी त्यांच्याकडून गरिबाची छळणूक मात्र कधीही व्हायची नाही. अनंताचं सगळंच प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत असंतसंच झालेलं आहे.विशेष म्हणजे त्याचं लक्ष शिक्षणापेक्षाही मस्ती करण्याकडेच जास्त असायचं हे त्याने अत्यंत प्रांजळपणे नमूद केलं आहे.त्याचं शिक्षणाकडे जरी लक्ष नसायचं तरी शाळेत जी सुंदर सुंदर म्हणीवजा वचनं लिहिलेली असायची त्यात मात्र त्याचं मन रमायचं.(पृ.१९) यावरून लेखकाजवळ अगदी बालवयापासून असणाऱ्या वाङ्मयीन अभिरुचीचा प्रत्यय येतो.या आत्मनिवेदनामध्ये लेखकाच्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध नसणारे काही राजकीय संदर्भही आलेले आहेत. उदा.भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधींचा त्यांच्याच अंगरक्षकानी केलेल्या खुनाची घटना.(पृ.२०) तसे पाहिले तर ह्या घटनेचा आणि लेखकाच्या जीवनाचा तसा काहीच संबंध नाही. फक्त ही घटना घडली तेव्हा संपूर्ण देशातील वातावरण सुन्न झाले होते. तसेच त्यांच्याही गावातील वातावरण सुन्न झाले होते. या लेखनात लेखकाच्या आयुष्यात आलेले काही संदर्भ लेखकाने काळसंदर्भासह दिले आहेत. लेखकाने निवेदनाच्या ओघात आपल्या बऱ्याच नातेवाईकांच्या संदर्भात घडलेल्या बऱ्या-वाईट घटनांचीही आपल्या लेखनात दखल घेतली आहे. त्यात लेखकाची सरस्वती आत्या आणि तिचा मुलगा हास्यकुमार यांच्या व्यक्तिरेखांची झलक जरी थोडीच असली तरी ह्या व्यक्तिरेखा वाचकाच्या जीवाला चटका लावून जातात.कारण सरस्वती आत्याचा डॉक्टर असणारा मुलगा हास्यकुमार हा मेहनत करून डॉक्टर होतो.लवकरच तो माजरीच्या बसस्टँडवरच दवाखाना टाकून पाच सात वर्षातच आपल्या व्यवसायात चांगला जमही बसवतो. पण लवकरच पोटाच्या आजारानं डॉ. हास्यकुमार हे जग सोडून गेल्यामुळे आत्या पुरती शारीरिक, मानसिकरित्या कोसळते.कालांतराने त्याचे महागडे शर्ट लेखकाला बसू लागल्यामुळे ते जाळून टाकण्यापेक्षा लेखक मोठ्या अविर्भावात वापरतो.( पृ.५४)

आपल्या किशोरवयात आपल्या मनाला कळत नकळत स्पर्श करून गेलेल्या प्रेमभावनांचे चित्रणही लेखकाने प्रांजळपणे केले आहे. तो नववीत असताना राजूराच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये त्याच्या मागच्या वर्गात असणारी एक आकर्षक चेहऱ्याची सीमा नावाची मुलगी त्याला आवडते. सीमाच्या अनुषंगाने तो स्वप्नरंजन करीत राहतो की आयुष्यात आपल्याला अशी गोरीपान, सुंदर, आखुड केसाची बायको मिळावी.पण आपल्याला ती मिळणार नाही ही जाणिवही त्याला पुरेपूर होती. कारण जातीचा आणि परिस्थितीचा फरक त्या दोघांमध्ये होता.(पृ.५९)त्याच्या दृष्टीने ती स्वप्नातली परी होती. दरम्यानच्या काळात तो नववीतून दहावीत गेला. परीक्षेचा अभ्यास करूनही तो मात्र नापास झाला. तेव्हा घरी जाऊन आपलं तोंड कसं दाखवायचं हे त्याला कळेनासं झालं. सीमाच्या एकतर्फी प्रेमपसाऱ्यात त्याला हे दहावीत नापास होण्याचं अपयश वाचवावं लागलं.(पृ.६४) त्यामुळे साहजिकच त्याला त्या सिमानं त्याच्या भविष्यातील जगण्याच्या साऱ्या सीमाच गोठवून टाकल्या. त्यानं हिवाळी परीक्षेसाठी पुन्हा फार्म भरला.पण पुन्हा बीजगणित आणि भूमितीत तो चार मार्कांनी घसरल्याने थंड पडला. एकूण दहावीच्या परीक्षेत त्याला सलग दोन वेळा अपयशाला सामोरं जावं लागलं. तरीही उमेद न सोडता त्यानं पुन्हा उन्हाळी परीक्षेचा फॉर्म भरला. दरम्यानच्या काळात त्याच्या आयुष्यात दहाडे सर आले आणि त्याला त्याच्या दुखण्यावर खरं औषध सापडलं.त्यांनी त्याची चांगली तयारी करून घेतल्यामुळे तो दहावीतून सुटला. थोडक्यात एका मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडून आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष आपण घालवण्याची जाणीव त्याला झाली. पण दहाडे सरांच्या रूपानं तो पुन्हा मार्गावर आला.

एकंदरीत त्याच्या जन्मापासून ते तो दहावी पास होईपर्यंत एक प्रकारची भरकटच त्याच्या वाट्याला आली आणि ही भरकट नंतरही होत राहिली. म्हणून तर ह्या आत्मनिवेदनास लेखकाने ‘काटेरी पायवाट’असे शीर्षक दिले आहे. पुढचं उच्च शिक्षण त्यानं राजुऱ्याच्या शिवाजी महाविद्यालयातून पूर्ण केलं.दरम्यानच्या काळातही त्याला अनेक अडीअडचणी येत राहिल्या पण त्यानं त्या निभावून नेल्या. त्याचं शिक्षण सुरू असताना मायला गर्भाशयाचा कॅन्सर झाला. सगळ्यांनी त्यांच्या परीनं तिच्यावर उपचारही केले पण त्या उपचारांना यश आलं नाही. त्याची माय अखेर अनंता बारावीत असतांना सगळ्यांना कायमचं सोडून गेली. याच मातृविरहाच्या अनुभवातून लेखकातील कवी जागृत झाला.त्यानं आपल्या मायंच्या आठवणीवर ‘आया’ नावाची पहिली कविता लिहिली. साहित्यक्षेत्रातील ही त्याची पहिलीच काव्यनिर्मिती.या पहिल्या निर्मितीला प्राचार्य राम शेवाळकर यांच्या श्रीवत्स या दिवाळी अंकातील काव्यस्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिकही मिळालं. पण अंक मात्र निघाला नाही.

बारावी पास झाल्यावर इतर मित्रांबरोबर नोकरीसाठी आपणही डी.एड करावं या विचाराने त्यानं डी. एडचा फॉर्म भरला.पण सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवाने म्हणा त्याचा डी.एडला नंबर लागला नाही म्हणून त्यानं शिवाजी महाविद्यालयातच बी.ए साठी फॉर्म भरला. बी .ए च्या पहिल्या वर्षापासून त्याला लेखनाचा छंद लागला. लेखनाचे संस्कार त्याच्यावर बी.ए च्या वर्गातच झाल्यामुळे ज्या ज्या वेळी निबंध स्पर्धा व्हायच्या त्या त्या वेळी त्याचा पहिला किंवा दुसरा क्रमांक यायचा. त्याचदरम्यान त्यानं व्यंकटेश माडगुळकरांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी वाचून ‘पारधी’नावाची कादंबरी लिहिली. पण तिचं पुढे काय करायचं हे मात्र त्याला कळेना. एके दिवशी योगायोगाने तहसील कार्यालयात ऑडिट करण्यासाठी नागपूरवरून आलेले कवी उल्हास मनोहर आणि त्यांचे मित्र तहसीलदार श्री.आरगुंडे साहेबांना भेटले. त्यांनी “तुमच्या परिसरात लेखनाची आवड असणारं कुणी आहे का?”असं सहज विचारलं असता तहसीलदार आरगुंडे साहेबांनी अनंताचं नाव सुचवलं.त्यानुसार दुसऱ्या दिवशी ते जिथे उतरले होते तिथं कवितांची डायरी व निबंधाची प्रमाणपत्र घेऊन तो गेला. तेव्हा त्यांनी त्याच्या कविता चाळता चाळता काय काय वाचलं?असा प्रश्न विचारला.पण त्यानं अभ्यासाव्यतिरिक्त काहीच वाचलेलं नसल्यामुळे ‘आपण काहीच वाचलं नाही. पण बी.ए.नंतर एम.ए.मराठीत नागपूरला करायचा विचार असल्याचं सांगितलं.’तेव्हा त्यांनी काही कवींच्या कवितासंग्रहांची नावं डायरीत लिहून देऊन ते काव्यसंग्रह वाचण्याचा सल्ला दिला.त्यांनी त्यांचा नागपूरमधील पत्ता दिला. दुसऱ्या दिवशी दूरदर्शनच्या पत्त्यावर कविताही पाठवायला सांगितल्या. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्याने यशवंत मनोहर यांचा ‘उत्थानगुंफा’,कवी ग्रेसांचे ‘संध्याकाळच्या कविता’ हे कवितासंग्रह वाचून काढले.पण त्याच्या डोक्यात मात्र काहीच शिरत नव्हतं. दरम्यान उल्हास मनोहर सरांच्या सांगण्यानुसार दूरदर्शनला पाठविलेल्या कवितांना काहीच उत्तर आलं नाही. त्यामुळे तो आपल्या कवितांविषयी जे काही समजायचं ते समजून गेला.

अनंताच्या आयुष्यात आलेल्या बऱ्याच माणसांची स्वभाववर्णने ह्या आत्मनिवेदनात आलेली आहेत. उदा. अनिल, त्याची बहीण चंदा,अनिलची आई वगैरे. दरम्यान त्याचा मित्र अनिलचं लग्न झाल्यावर चंदा अनंताला सहज लग्नाविषयी विचारते. परंतु अनंता नोकरी शोधत असतो. दरम्यान पंधरा-सोळा वर्षे अनिलच्या आणि चंदाच्या कुटुंबाशी त्याचा संबंध येत नाही.त्याच्या ओढाताणीत तो गुंतलेला असतो.१५-१६ वर्षांनी तो जेव्हा पुतण्याच्या लग्नाच्या निमित्ताने राजुराला येतो तेव्हा चंद्रासारख्या शितल चंदाच्या आयुष्याचं वाटोळं झाल्याचं त्याला समजतं. याचं कारण आरंभी चांगला वाटणारा जावई पुढं जाऊन नालायक निघतो.

अनंता बी.ए.होतो तेव्हा त्याच्या शंभर-सव्वाशे कविता लिहून होतात. पण चांगली कविता कशाला म्हणतात हे मात्र त्याला कळत नसतं. दरम्यानच्या काळात त्याच्या काव्यरचनांची लातूरच्या जिल्ह्यातील रावणगावच्या काव्यज्योत,कविरत्न आणि साहित्यज्योत अशा तीन पुरस्कारासाठी निवड झाली. हे त्याचं विद्यार्थी दशेतील काव्यक्षेत्रातील पहिलं यश. या यशावर त्याचा अक्षरशः विश्वासच बसत नसतो पण हे खरं असतं. प्रत्येक पुरस्कारात भाग घेण्यासाठी ७१ रुपये प्रवेश शुल्क असल्याने त्यानं फक्त एकाच पुरस्कारासाठी पैसे पाठवले. त्याला जून १९९७ मध्ये काव्यज्योत पुरस्कार मिळणार असल्याचे समजलंही पण पुन्हा काव्यपुरस्कार स्वीकारायला उदगीरला जाणं म्हणजे चारशे रुपये खर्च येणार असतो. त्याच्याजवळ फक्त दहा रुपये होते. त्यामुळे तो प्रा.संतोष देठे सरांच्या ओळखीने संजय गंधारेकडून त्याला प्रवासासाठी ५०० रुपये मिळतातही.

एकंदरीत काय लेखकाचे साहित्य क्षेत्रातील योगदान जरी उस्फूर्त असले तरी प्रवास मात्र खडतड आहे याची जाणीव या आत्मनिवेदनात पदोपदी येत राहते. बी .ए.नंतर पुढे एम.ए. मराठीतून करण्यासाठी तो नागपूरला येतो. त्याला एम. ए.ला डॉ. यशवंत मनोहर,डॉ.आशा सावदेकर,डॉ. मदन कुलकर्णी, डॉ. अक्षयकुमार काळे यांच्यासारखी मातब्बर मंडळी शिकविण्यासाठी लाभल्याने अर्थातच त्याची वैचारिक उंचीदेखील वाढली. अत्यंत खडतड परिस्थिती आणि सामाजिक संघर्षाला तोंड देत त्याला वस्तीगृहात राहावे लागले. एक तर आर्थिक संघर्ष स्वतःपुरता असल्यामुळे पोट आणि मन मारून तो सोडवता येऊ शकतो पण सामाजिक संघर्षाला सामोरे जाणे अवघड असते.

रॅगिंगमुळे त्यांना बऱ्यापैकी त्रास झाला पण त्याने तो निभावून नेला. एम. ए.च्या पहिल्या वर्षात त्याला फर्स्ट क्लास थोडक्यात चुकला. तेव्हा त्याने दुसऱ्या वर्षी चांगले गुण मिळवून चुकलेला फर्स्ट क्लास मिळवण्याचा मनोमन पक्का निर्धार केला. नागपुरात पोटाचे हाल होतात म्हणून ही मुलं लग्नकार्यामध्ये जाऊन फुकट जेवण येत. पण एका ठिकाणी मात्र त्याची चांगली फजिती होते. अक्षरशः त्याला ताटावरून उठावं लागतं. इतकी मानहानी त्यांना पोटासाठी करावी लागते.
एम.ए.झाल्यावर त्यानं नागपूरच्या नामांकित तीन-चार महाविद्यालयात तासिकेनुसार शिकवण्याचं काम सुरू केलं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सायकलने जावं लागायचं. चार महाविद्यालयात सलग वर्षभर शिकवण्याचं काम केल्यानंतरच अठरा-वीस हजार हातात यायचे.आणि त्यातच वर्ष काढावं लागायचं. दरम्यानच्या काळात मानलेली लहान बहिण आशुचं रवी नामक बेरोजगार मुलांवर असणारं प्रेमप्रकरण आशुच्या आईच्या मृत्यूला कसं कारणीभूत ठरतं आणि तेही त्यालाच निभावून न्यावं लागतं.

ह्या लेखनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने अनेक प्रसंगी केलेले प्रांजळ निवेदन होय. त्याच्याकडे दोन पॅंट आणि दोनच शर्ट असल्यामुळे एखादा शर्टपीस घ्यावा म्हणून तो रमेशसोबत कपड्याच्या दुकानात जातो. त्याला आवडलेला शर्टपीस सत्तर रुपयाला असतो आणि त्याच्याजवळ फक्त पन्नास रुपयेच असतात.म्हणून तो शर्टपीस पॅन्टच्या आत चड्डीमध्ये खोचतो.चौकीदार त्याला तपासतोही पण ते चौकीदारालाही कळू शकत नाही. हा प्रसंग लेखकाने प्रांजळपणे नमूद केला आहे.( पृ.१०७)यावरून चार महाविद्यालयात तासिका तत्त्वावर शिकवणाऱ्या शिक्षकाची आर्थिक परिस्थिती किती हलाखीची आहे हे आपल्या ध्यानात येते.त्याचे हे कृत्य चांगले की वाईट याची शहानिशा करण्यात येथे काहीच अर्थ नाही. पण विशिष्ट परिस्थिती माणसाला काय करायला लावते याचे प्रत्यंतर येथे येते. आणि ते लेखकाने येथे लपवून ठेवले नाही हेही महत्त्वाचे आह.

नागपूरच्या पदव्युत्तर विभागातून १९९९ ला मराठीमध्ये प्रथम श्रेणीत एम.ए. केल्यावर त्यानं लगेच एम.फीलला प्रवेश घेतला. उपयुक्त असणारी जुनी पुस्तके मिळतील त्या भावात, मिळतील तशी,मिळतील तिथे तो घ्यायचा. त्याचा निर्धार प्राध्यापक होणं हाच असल्यामुळे त्याचे मित्र दरम्यानच्या काळात महिन्याला दहा हजार कमावू लागले पण त्याला मात्र दोन-तीन हजाराचीही नोकरी मिळेना. याच दरम्यान त्याला समीक्षा, कथा, कादंबरी आणि काव्यलेखनाची सवय लागली. त्याच्या कवितांना पुरस्काराही मिळू लागले. याचवेळी डॉ. यशवंत मनोहर सरांनी प्रा. प्रभंजन चव्हाण, अक्रम पठाण आणि त्याच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम दूरदर्शनवर घडवून आणला. आणि त्याचं चारशे रुपये मानधनही मिळालं. त्यानंतर अधूनमधून नागपूर आकाशवाणीवर काव्यवाचन आणि भाषणांचे कार्यक्रम होत राहिले.

सध्याच्या काळात शिक्षण क्षेत्रात वावरत असताना ज्या भ्रष्टाचाराला सध्याच्या पिढीला सामोरे जावे लागते त्याचेही मार्मिक व मर्मभेदी दर्शन लेखकाने घडवले आहे.ऑरेंज सिटी कॉलेज ऑफ सोशल वर्क या नागपुरातील समाजकार्य महाविद्यालयात मराठी अधिव्याख्याता म्हणून जागा भरायची असताना एजंट लोक कसे पैसे खातात हे त्याने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यासाठी एजंटला द्यावे लागलेले पाच हजार रुपये तसेच त्याच्याकडे नोकरीसाठी मागणी केलेले साठ हजार रुपये ते प्रकाशभाऊला मागतात. प्रकाशभाऊ व्याजाने काढून पैशाची सोय करतो. तुलनेत मिळणारा एक हजार रुपयाचा मोबदला. हे उघड सत्य त्यानं मांडलं आहे. एकंदरीत काय तर शिक्षण क्षेत्रात अनेक आकांक्षा घेऊन येण्याची स्वप्नं त्याची आरंभीच भंगली.दरम्यान त्याची साहित्य क्षेत्रातील वाटचाल मात्र सुरूच होती.शासनाकडं ‘सूर्यकुलाच्या कविता’ संग्रहाला अनुदान देण्यासाठी अर्ज करूनही ते नामंजूर झालं. तशाच हताश झालेल्या मनस्थितीत त्यांनं नेटची परीक्षाही दिली. यश येवो अगर न येवो धडपडणं हा लेखकाचा स्वभाव आहे.

आरंभी प्राध्यापक करण्याचं आमिष दाखवून आपली फसवणूक झाली आहे हे ध्यानात येताच त्यानं त्या संस्था अध्यक्षाला दिलेले पैसे मागू लागतो.अध्यक्ष मात्र पैसे द्यायला टाळाटाळ करीत असतानाही तो ते पैसे वसूल करतो. दरम्यान त्याच्या पहिल्या ‘सूर्यकुलाची कविता’ह्या संग्रहाला जरी अनुदान मिळालं नसलं तरी त्यानं नवलेखक अनुदान योजनेखाली पुन्हा ‘निषेधनामा’ह्या साठ कवितांची वही अनुदानासाठी पाठवली.(पृ.११७) थोडक्यात काय तर हा लेखक कुठेही अपयशाने खचलेला नाही आणि यशाने भारावून गेलेला नाही हे स्पष्ट होते.

याचवेळी त्याचं एम.फीलचं शोधप्रबंधाचं काम सुरू असताना तो नेटची म्हणजे प्राध्यापक पात्रतेची परीक्षा पास झाल्याची बातमी त्याला त्याच्या खोलीतील मित्र सुधाकरकडून समजते. ही बातमी तो मनोहर सरांना सांगतो तेव्हा सरही खुश होतात. पात्रता असूनही हवं तसं काम मिळत नाही म्हणून तो मिळेल ती काम करत राहतो. विद्यापीठ परीक्षेत पर्यवेक्षकाचं दीड दमडीचं काम करतानाही ही व्यवस्था काही बाबी त्याच्या अंगलट आणते. मराठी बरोबरच तो समाजशास्त्रातही एम. ए. करतो. जिथे संधी मिळेल आणि जे काम मिळेल ते तो करत राहतो. जेव्हा नवं शैक्षणिक सत्र सुरू होतं तेव्हा वाडीच्या जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात तो बी.ए.ला समाजशास्त्र विषयाच्या तासिका तत्त्वावर काम करू लागतो. त्याचप्रमाणे ज्या मॉरिस कॉलेजात वि. भि. कोलते, शरच्चंद्र मुक्तिबोध, कवी ग्रेस आणि डॉ. यशवंत मनोहर यांच्यासारख्या दिग्गजांनी अध्यापन केलं होतं तिथेही त्यानं अर्ज टाकून ठेवला होता. तिथेही तो नगण्य मानधनावर तासिका तत्वावर अध्यापनासाठी सायकलने जाऊ लागला. तसेच डॉ.आंबेडकर महाविद्यालय, अण्णासाहेब गुंडेवार कॉलेज आणि हिस्लाप कॉलेजमध्येही तो सायकलने जाऊन तासिका घेऊ लागला. या साऱ्या कॉलेजमध्ये सायकलवरून फिरता फिरता त्याची अगदीच दमच्याक व्हायची. त्याची ही जी भ्रमंती आहे ती वास्तव आहे आणि हे वास्तव ते अनुभवले असून कल्पितापेक्षाही भयंकर आहे. त्याच्यापुढे एकच प्रश्न दत्त म्हणून उभा होता तो म्हणजे “मराठी एम.ए., एम. फील आणि नेटची परीक्षा पास होऊनसुद्धा मला नोकरी कधी लागेल?या प्रश्नाने मन गांगावून जायचे.”४ साहजिकच आपला दिवस कधी निघणार? ह्या केवळ आशेवर तो दिवस कंठत होता.जी कामं करावी लागत होती ती कामं करत होता.

दरम्यान सक्करदरा चौकातील सेवादल महिला महाविद्यालयात मराठीच्या अधिव्याख्याता पदाची जाहिरात निघाल्यावर त्यानं तिथं अर्ज केला.पंधरा दिवसात मुलाखतीसाठी बोलावणं आलं.पण ती जागा आधीच संस्थेचे अध्यक्ष शेंडे साहेबांच्या जावयासाठी राखीव होती.हे शेंडे साहेबांच्या जावयानेच मुलाखत झाल्यानंतर त्याला सांगितलं असता तो थंडगारच पडला. शिक्षण क्षेत्रातलं हे सारं उघड सत्य त्यानं कोणाचाही मुलाहीजा न बाळगता नोंदवलं आहे. बेकारीच्या काळात आचार्य पदवीसाठी सिनॉक्सिस टाईप करण्यापासून ते सादर करण्यापर्यंत त्याला जी दमछाक करावी लागते ती दमछाकही विलक्षण आहे.यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जीवनात त्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी तर मिळाली नाहीच नाही पण संघर्ष हेच त्याचे जीवन आहे.

समाजात जी महाविद्यालयं आहेत त्या महाविद्यालयामधील जागांची भरती देखील कशी जातीयवादी दृष्टिकोनातून होते याचा अनुभव त्याला उमरखेडच्या कॉलेजच्या मुलाखतीत आल्याचं त्यानं नोंदवलं आहे. तिथे चालणारा जोशी-जोशी पॅटर्न अगदी स्पष्टपणे नोंदवला असून त्याचे हे सारे अनुभव जिवंत आणि बोलके आहेत. नोकरी नसताना त्यानं विविध महाविद्यालयातून तासिका तत्त्वावर काम तर केली पण विद्यापीठाच्या पेपर तपासणी काळात स्क्रुटीनेचीही कामं केली. याचवेळी त्याच्या ‘निषेधनामा’ काव्यसंग्रहाला नवलेखक अनुदान योजनेखाली शासनाचं अनुदानही मिळालं. त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला पण दुसऱ्यांदा मात्र यश आलं.

एका बाजूला नेट आणि एम. फील.होऊन पीएच.डी.चा अभ्यास करत करत नोकरी शोधण्याचा लेखकाचा प्रयत्न चालू असताना त्याला अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. त्याला एकाच ठिकाणी पूर्णवेळ अधिव्याख्याताची नोकरी मिळण्यात अनंत अडचणी येतात. कितीही तयारी केली तरी कुठे ना कुठे माशी जिंकतेच. ओळखीच्या लोकांची चिठ्ठीचपाटी नेऊनदेखील त्याचं काम होत नाही हे त्याने अगदी प्रांजळपणे नमूद केलं आहे.दरम्यानच्या काळात अनेक जण त्याच्या लग्नाचाही विचार करू लागले पण त्याच्याकडे शिक्षण असूनही पैसे भरून एखाद्या महाविद्यालयात लागण्याची ऐपत नव्हती. योगायोगाने त्याच्या नोकरीसाठी लागेल तेवढा पैसा भरून लग्न करणार असाल तर करा अशी स्पष्ट भूमिका रामदासभाऊनी घेतली. तेव्हा तो क्षणार्धात मोकळा श्वास सोडतो.

योग्यता असूनही आपल्या योग्यतेचं काम मिळत नाही अशी आपली समाजरचना आहे.’ काटेरी पायवाटे’तून एक अनंता बोलला म्हणून तो किती संघर्षातून आणि पदोपदी त्याला मिळालेल्या नकारातून वाट शोधीत पुढे आला याची जाणीव आपल्याला होते. आपला समाजच मुळात असंस्कृत समाज असल्यामुळे इथे सुसंस्कृत व्यक्तीची गडचेपीच होते याचे उदाहरण म्हणजे ‘काटेरी पायवाट’ आहे.

तो नागपुरात ज्या गुंडेवार कॉलेजात तासिका तत्वावर काम करत असतो तिथून त्याला पूर्णवेळ जागेवर घेण्याचं आश्वासन मिळतं. पण ती जागा निघायला वेळ असतो. त्यानं आपल्या सासऱ्याने आपल्या मुलीसाठी जावई म्हणून आपल्याला का पसंत केलं हे एकाच वाक्यात लिहिलं असून ते विचार करण्यासारखं आहे. तो म्हणतो,” शिक्षण आणि गुणांशिवाय पसंत करण्यासारखी दुसरी सुंदरता आपल्याजवळ काहीच नाही ही सल मनाला बोचत होती.”५ शेवटी जिथे लग्न ठरलेलं होतं तिथल्या ओळखीनं आणि पैशाची जुळवाजुळव करून अत्यंत मोठ्या प्रयासानं त्याचं यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबनच्या महाविद्यालयात मराठीचं पूर्णवेळ प्राध्यापकाचं काम होतं आणि त्याचं आयुष्य मार्गी लागतं.नोकरीनंतर त्याचं लग्नही होतं.

शिक्षण व्यवस्थेतील पोखरलेल्या आणि किडलेल्या व्यवस्थेचे अत्यंत पारदर्शक चित्रण या आत्मनिवेदनात आले आहे.लग्नानंतर आणि नोकरीनंतरही त्याला काही अंशी संघर्षाला सामोरे जावेच लागते.हे अत्यंत समर्पक असे आत्मनिवेदन असून अनंताच्या जन्मापासून ते नोकरी शोधून लग्नापर्यंतच्या बिकट संघर्षाचा काळ आला आहे. एकूण १८० पृष्ठांच्या ह्या आत्मनिवेदनात लेखकाने आयुष्यात जो संघर्ष अनुभवला तो संघर्ष कुणाचाही मुलाहिचा न ठेवता मांडला आहे. हे अत्यंत धाडसाचे काम लेखकाने केले आहे. खरे तर आत्मचरित्रात ज्या व्यक्तींचे संदर्भ येतात आणि त्या व्यक्ती जर हयात असतील तर त्यांना तोंड देणे लेखकाला अवघड जाते. परंतु लेखकाचे अनुभवच इतके विचित्र आहेत की शिक्षण क्षेत्रात कोणत्या संस्थेत कसा जातिवाद चालतो आणि कसे पैशाचे व्यवहार होतात हे उघड सत्य त्याने मांडले आहे.एका अर्थाने कादंबरी लिहिणे आत्मचरित्रापेक्षा किंवा आत्मचरित्रपर कादंबरीपेक्षा सोपे असते.कारण ” कादंबरी हा असा वाङ्मय प्रकार आहे,की साहित्यिकाच्या प्रत्यक्ष जीवनातील अनुभव, व्यक्ती, घटना या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या त्यात उमटल्याखेरीज राहात नाही. अनेक चांगल्या कादंबऱ्या आत्मचरित्रात्मक असतात असे दिसते.”६ असे दस्तयेवस्कीचे दस्तऐवस्ती म्हणणे आहे आणि ते खरेही आहे. त्यामुळे लेखकाने आत्मचरित्रात्मक कादंबरी आत्मानुभवातून लिहिली असली तरी त्यातील स्थल, काळ, व्यक्तीसंदर्भ तो बदलू शकत असल्यामुळे कादंबरी हा वाङ्मयप्रकार फारसा सामाजिकदृष्ट्या आक्षेपार्ह असू शकत नाही. पण आत्मचरित्र किंवा आत्मनिवेदन हे फार जबाबदारीने लिहावे लागते. कारण आत्मचरित्रात लेखक आपल्या जीवनाकडे मागे वळून पाहात असताना त्या लेखकाच्या संवेदनशील मनाचा आविष्कार तेथे घडलेला असतो.” विशेषतः आत्मचरित्रकार ज्या वर्तमानात स्थिर होऊन आत्मचरित्र लिहीत असतो तिथपर्यंत तो आत्मचरित्रातील काळ आणून शक्यतो भिडवत असतो. पण आत्मचरित्रात हा काळ मृत्यूच्या किती जवळपर्यंतचा आहे हे महत्त्वाचे नसून तेथपर्यंतच्या काळात आत्मचरित्रातील नायक ‘मी’ ने केलेले जीवनसंघर्षाचे, जीवनविकासाचे नाट्यपूर्ण व चैतन्यपूर्ण दर्शन घडवलेले असते.”७ या विधानाच्या अनुषंगाने विचार करता ‘काटेरी पायवाट’ हे एक उत्कृष्ट आत्मनिवेदन ठरते.

अनंताने ह्या आत्मनिवेदनात अचूक असे स्थलकाल संदर्भ दिले आहे. हे त्यांनी वैयक्तिक भावी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत धाडसाचे काम केले आहे. आनंद यादवांनी आत्मचरित्राला जीवघेणा साहित्यप्रकार म्हटले आहे ते या पार्श्वभूमीवर खरेच आहे. म्हणून तर त्यांनी’ झोंबी’, ‘नांगरणी’,’ घरभिंती’ आणि ‘काचवेल’अशी आपल्या आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांची मालिका लिहिली. अनंताने मात्र हा जरी जीवघेणा साहित्यप्रकार असला तरी तो अत्यंत धाडसाने हाताळून शिक्षण क्षेत्रातील ही अनुभवलेली,किडलेली व्यवस्था ‘काटेरी पायवाट’ या आत्मकथनाच्या माध्यमातून पुढे आणलेली आणलेली आहे.

संदर्भ टिपा-

१) आनंद यादव-“आत्मचरित्रमीमांसा”, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे,१९९८,पृ.४१( ‘आत्मचरित्राचे प्रकार’या प्रकरणातून)
२) तत्त्रैव,पृ.१०३(‘आत्मचरित्र आणि कादंबरी’ ह्या प्रकरणामधून)
३)अनंता सूर-” काटेरी पायवाट”, अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव, एक जुलै २०२०, पृ.११
४)तत्रैव,पृ.१२२
५)तत्रैव,पृ.१६४
६)अनिरुद्ध कुलकर्णी-” दस्तयेवस्की कादंबऱ्यांतील जीवनप्रक्षेपण”, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे,१९८५,पृ.१७
७) आनंद यादव-” आत्मचरित्रमीमांसा”, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे,१९९८,पृ.१४ (‘आत्मचरित्र: एक जीवघेणा साहित्यप्रकार)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

घर घर चलो अभियान…

नदी प्रदुषणाकडे गांभिर्याने पाहण्याची गरज

जूनचा शेवटचा आठवडा पावसाचा

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading