📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 29, 2026
मुक्त संवाद

एकाकी मनाला शब्दांची सोबत; ‘किमया घडली शब्दांची’चा भावस्पर्शी काव्यप्रवास!

सायली गिरीश कुलकर्णी यांच्या ‘किमया घडली शब्दांची’ या काव्यसंग्रहातून निसर्ग, प्रेम, नाती, अध्यात्म, स्त्रीमन आणि सामाजिक वास्तवाचे भावस्पर्शी दर्शन घडते. ८२ कवितांचा हा संग्रह वाचकांशी साधतो अदृश्य संवाद.

एकांताला सोबत देणारे शब्द, नात्यांना भावनेची ऊब देणाऱ्या कविता आणि सामाजिक वास्तवाला भिडणारे संवेदनशील विचार… कवयित्री सायली गिरीश कुलकर्णी यांच्या ‘किमया घडली शब्दांची’ या काव्यसंग्रहातून भावविश्वाचे अनेक रंग उलगडतात. निसर्ग, प्रेम, नाती, अध्यात्म, स्त्रीजीवन आणि सामाजिक प्रश्न अशा विविध विषयांना कवितेच्या लयीत गुंफणारा हा संग्रह म्हणजे मनातील अनामिक भावनांना शब्दरूप देणारा आणि वाचकाशी अदृश्य संवाद साधणारा काव्यानुभव आहे.

-सौ. मानसी म्हसकर, वडोदरा, गुजरात

एक संवाद शब्दांशी…!!

‘विराण माझ्या जीवनामधे
उधळण झाली रंगाची,
एकलकोंड्या मनास माझ्या
संगत घडली शब्दांची’

कविता ही केवळ शब्दांची कलात्मक मांडणी नसते तर ती अंतर्मनाच्या गाभाऱ्यात दडलेल्या अनामिक भाव कल्लोळातून घडलेली किमया असते. कधी ती सुखाच्या क्षणांवर चांदण्यांची पखरण करते तर कधी दुःखाने पेटलेल्या अग्नीला एखादी ठिणगी देते.कधी नात्यांना अलगद गोंजारते, तर कधी समाजाच्या विवेकाला अस्वस्थ करणारा प्रश्न विचारते. शब्दांना जेव्हा अनुभवाची ऊब आणि संवेदनशीलतेची धार लाभते, तेव्हा त्या शब्दांतून ‘कविता’ जन्माला येते. आणि मग जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलत जाते आणि किमया घडते, साहित्याच्या एका आगळ्यावेगळ्या प्रवासाची…

कवयित्री सायली गिरीश कुलकर्णी यांच्या ‘किमया घडली शब्दांची’ या काव्यसंग्रहाचा आस्वाद घेताना नेमकी हीच अनुभूती येते. मूळच्या पुण्याच्या आणि सध्या बडोद्यास वास्तव्यास असलेल्या सायली कुलकर्णी यांच्या या काव्यसंग्रहाचे प्रकाशन चपराक प्रकाशनाने केले असून, बडोद्याच्या ज्येष्ठ कवयित्री अंजली मराठे यांच्या प्रस्तावनेने संग्रहाला वैचारिक आणि साहित्यिक संदर्भाची सुंदर चौकट लाभली आहे. ८२ कवितांचा हा संग्रह म्हणजे कवयित्रीच्या भावविश्वातील विविध रंगछटांनी सजलेला एक काव्यमय ठेवा आहे. खरंतर फार्मसिस्ट असलेल्या सायली कुलकर्णी यांचा हा दुसरा काव्यसंग्रह आहे.

कविता नुसती भावकल्लोळातूनच बहरते असं नाही..तर त्यामागे असते अनुभवांची शिदोरी, माणसांचे ऋण, नात्यांची ऊब, प्रसंगांची शिकवण आणि काळाने दिलेली जखम. ऋणनिर्देशातून व्यक्त होणारी कृतज्ञता ही कवयित्रीच्या व्यक्तिमत्त्वातील नम्रतेची खूण आहे.

पुस्तक हातात घेतल्यावर सर्वप्रथम जाणवते ती त्याची देखणी आणि नेटकी बांधणी. चपराक प्रकाशनाची निर्मितीशैली या संग्रहाला उठाव देते. पुस्तकाची छपाई स्वच्छ असून अक्षररचना वाचनीय आहे. काही काही ठिकाणी कवितेच्या बरोबर दिलेली चित्रेसुद्धा वाचक आणि साहित्यकृती यांच्यातील पहिला संवाद सुलभ करतात.

‘किमया घडली शब्दांची’ हे शीर्षक केवळ आकर्षकच नाही, तर संग्रहाच्या प्रत्येक रचनेचा मागोवा घेणारे आहे. शब्दांनी विराणपणाला रंग दिला, एकाकीपणाला सोबत दिली आणि मनातील अबोल भावनांना अभिव्यक्ती दिली. म्हणूनच संग्रहाची पहिलीच कविता ‘किमया घडली शब्दांची’ ही या संपूर्ण काव्य प्रवासात वाचकाला कवयित्रीच्या मनाचा ठाव घेणारी वाटते.

हा संग्रह एखाद्या एकाच भावछटेभोवती घुटमळत नाही. त्याची वाटचाल अनेक दिशांनी होते. ‘माय मराठी माझी’ पासून ‘चंद्रयान तीन’ पर्यंत आणि ‘पांडुरंग’ पासून ‘दूर फेक दोर फास ‘ म्हणत प्रत्येक कवितेशी ‘अदृश्य संवाद ‘ साधत कवयित्रीने विषयांचे विस्तीर्ण आकाश आपल्या कवितेत सामावून घेतले आहे. याचमुळे हा संग्रह केवळ भावकवितांचा संग्रह राहत नाही. त्यात व्यक्ती आहे, समाज आहे, निसर्ग आहे, अध्यात्म आहे, विज्ञान आहे, नाती आहेत, स्त्रीमन आहे आणि बदलत्या काळाचे भानही आहे. ही विषय वैविध्यपूर्णता कवयित्रीच्या जिज्ञासू आणि संवेदनशील मनाची साक्ष देते.

‘पहाट’, ‘पाऊस आला’, ‘श्रावणमास’, ‘शरदाचं चांदणं’, ‘झुळूक’, ‘धुके’, ‘जगावेगळे नाते’ या कविता वाचताना निसर्गाच्या प्रतिमा मनाभोवती अलगद फेर धरतात. परंतु या निसर्गकवितांचे वैशिष्ट्य केवळ निसर्गवर्णनात नाही. निसर्ग हा त्यांच्या अंतर्मनाचा आरसा बनतो. पहाट म्हणजे केवळ दिवसाची सुरुवात राहत नाही तर ती आशेची चाहूल ठरते. पाऊस केवळ नभातून कोसळत नाही तर तो आठवणींच्या कप्प्यांतही बरसतो. चांदणे बाहेरच्या आकाशात असते, तसेच ते मनाच्या गाभाऱ्यातही उतरते.. धुके या कवितेत त्या वर्णन करताना वाऱ्याला बेभान कलंदर म्हणतात.. तर झुळूक कवितेमध्ये त्यांनी जीवनाच्या एखाद्या ऊर्जा देणाऱ्या क्षणाला झुळूक म्हटले आहे…हीच निसर्ग आणि अंतर्मन यांची सांगड कवितेला भावनात्मक उंची देते..

सायली यांच्या कवितेचा सर्वांत नाजूक कोपरा म्हणजे नातेसंबंध. ‘आई’ , ‘बाप’, ‘आईची माया’, ‘बहिण भाऊ’, ‘आपलं माणूस’, ‘सोबती’, ‘सखी जरा थांब’, ‘गोड बातमी’, ‘मुला येशील घरात’, ‘अशी राखी सुरेख बाई’ ही शीर्षकेच वाचकाला भावनिक वाटेवर घेऊन जातात. आजच्या काळात संवादाची साधने वाढली, पण संवाद कमी झाला… माणसे जवळ आली, पण मनांमधील अंतर वाढले.अशा वेळी ‘आपलं माणूस’ या संकल्पनेला कवयित्रीने दिलेले महत्त्व लक्षणीय ठरते. आईच्या आठवणीने कासावीस झालेले कवयित्रीचे मन आपल्या माणसांत प्रेमाची ऊब शोधते.. त्यांच्या नात्यांविषयीच्या कवितांत कृत्रिम भावुकता नसून जपून ठेवलेल्या आठवणींची ऊब आहे. आईच्या पदराचा गंध, वडिलांच्या सावलीची जाणीव, भावंडांच्या नात्याची खुमारी आणि सोबतीच्या अस्तित्वाची गरज या सगळ्या भावना शब्दांतून व्यक्त होतात..

‘बांकेबिहारी, ‘पांडुरंग’, ‘हेचि दान देगा देवा’, ‘आम्ही वारकरी’, ‘आई चंडिके’, ‘स्वप्नातला बाप्पा’ या कवितांमधून कवयित्रीच्या आध्यात्मिक विश्वाचा परिचय होतो. त्यांच्या भक्तिकवितांमध्ये देव हा दूरच्या आकाशात विराजमान असलेला केवळ पूजनीय घटक नाही तर तो मनाला आधार देणारा, दुःखात हात धरून उभा राहणारा आणि आत्मिक समाधानाची वाट दाखवणारा सहचर आहे. भक्तीच्या या कवितांमुळे संग्रहाला आध्यात्मिकतेची एक निर्मळ किनार लाभते. हेचि दान देगा देवा या कवितेत कवयित्री म्हणते,

‘असा आदर्श समाज | कलियुगी निपजावा |
हेचि दान देगा देवा | पामरास या अजाण ||’

किती सुंदर भाव आहेत हे ! ही रचना ह्या काव्यसंग्रहाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरते..

या संग्रहातील सामाजिक कवितांचा विचार करताना स्त्रीविषयक कवितांची विशेषरुपाने नोंद घ्यावी वाटते. ‘गौरव स्त्रीत्वाचा’, ‘सखी जरा थांब’, ‘पोटातली लेक’, ‘इवली छोटी परी’, ‘हुंडाबळी’, ‘हुंडा’ या कवितांतून स्त्रीच्या अस्तित्वाभोवतीचे प्रश्न पुढे येतात. कवयित्री म्हणते,

‘कशास एका दिवसासाठी गजर भाषणांचा…
कशास एका दिवसा पुरता गौरव स्त्रीत्वाचा..’
तर ‘हुंडा’, ‘हुंडाबळी’ या कवितांमधून त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथांचा विरोध केलेला आहे.. स्त्रीकडे केवळ माया, त्याग आणि सहनशीलतेच्या चौकटीतून पाहण्याऐवजी तिच्या स्वत्वाचा, जन्माधिकाराचा आणि सन्मानाचा विचार या कवितांमधून पुढे येतो.तर ‘पोटातली लेक’ ही रचना अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. अजून जिने जग पाहिलं नाही अशा एका पोटात असलेल्या लेकीची आर्त विनंती त्यांनी अष्टाक्षरीत खूप सुंदर रित्या मांडली आहे. ‘हुंडाबळी’ ‘ हुंडा’आणि ‘दूर फेक दोर फास’ या कविता सामाजिक वास्तवावर बोट ठेवतात. कवयित्री येथे केवळ करुणा व्यक्त करत नाही तर ती समाजाला प्रश्न विचारते. हीच सामाजिक परिवर्तनाची खरी सुरुवात आहे.

‘मात्र तुला ते कळले नाही’, ‘दुरावा’, ‘ये ना सखया’, ‘जीव वेडावला’, ‘तुझ्या सोबती’, ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’, ‘प्रिये’, ‘चांदण्याची राख’, ‘उत्तर काही गवसत नाही’ या कवितांतून प्रेमाच्या अनेक छटा उमटतात. चांदण्याची राख या कवितेत कवयित्री म्हणते,

‘कशी एकटीने चालू
उभ्या आयुष्याची वाट
कसे सावरू स्वतःला
आहे अवघड घाट’

या रचनेद्वारे त्यांच्या मनात होणारी चलबिचल त्यांनी खूप सुंदर रित्या अष्टाक्षरीत मांडलेली आहे..‘चांदण्याची राख’ हे शीर्षक काव्यमय आहे. चांदणे म्हणजे उजेड आणि राख म्हणजे जळून उरलेले अवशेष ..या दोन परस्परविरोधी बाजूंची सांगडच एखाद्या नात्याची भावनिक बाजू स्पष्ट करते..अशा शीर्षकांमधून कवयित्रीच्या प्रतिमासृष्टीची क्षमता जाणवते…

‘बालपण ‘ ,’अजूनसुद्धा स्मरते आहे’, ‘गावाकडले घरकुल’, ‘चिमणी’, ‘पक्षी व्हावे’ या कविता वाचताना स्मृतीमंजुषेची झाकणं अलगद उघडल्यासारखं वाटतं. बालपण मागे राहते, पण मनातून कधीच निघून जात नाही. गावाकडचे घरकुल, अंगण, मोकळेपण, चिमणी आणि पक्ष्यांच्या उडण्याची आस या प्रतिमांतून हरवलेल्या निरागसतेचा शोध घेत कवयित्री अलगद स्वतःला समाजाच्या एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते.

‘अनाथांची माय ‘ , ‘तेजोनिधी स्वामी विवेकानंद’ व ‘ स्वर सम्राज्ञी लता ‘ यांसारख्या कविता वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांना अभिवादन करत असल्या, तरी त्यांच्या केंद्रस्थानी एक समान मूल्यदृष्टी आहे ती म्हणजे विचारांची ज्योत, कलेची साधना आणि माणुसकीची ऊब. त्यामुळे या कविता केवळ व्यक्तिगौरव करणाऱ्या न राहता, वाचकाला त्या व्यक्तिमत्त्वांच्या कार्यामागील मूल्यांकडे पाहण्यास प्रवृत्त करतात.

‘डोंबारी’, ‘अनाथांची माय’, ‘युद्ध’, ‘व्यसन’, ‘अदृश्य संवाद’, ‘बिन भिंतीची शाळा’, ‘साफसफाई’ अशा कविता संग्रहाला सामाजिक संदर्भ देतात.

‘किमया घडली शब्दांची’ म्हणत सुरू झालेला हा काव्यप्रवास शेवटी ‘अदृश्य संवाद’ या कवितेपर्यंत येऊन थांबतो. पण इथे खरा तर शेवट नाहीच.. कारण शब्द संपले तरी संवाद संपत नाही.. तो वाचकाच्या मनात सुरू होतो. कवयित्रीने कागदावर उमटवलेले शब्द आता वाचकाच्या अंतर्मनात उतरतात आणि तिथे एक नवा, अदृश्य संवाद जन्म घेतो. कदाचित यालाच कवितेची खरी किमया म्हणायला हवी..

‘किमया घडली शब्दांची’ हा काव्यसंग्रह हातात घेतला आणि एक एक कविता वाचत गेले, तसा हा केवळ कवितांचा संग्रह नसून कवयित्रीच्या मनातून वाहत आलेल्या भावनांचा एक प्रदीर्घ प्रवाह आहे, असे जाणवत गेले..मात्र वाचक म्हणून मला या संग्रहाची आणखी एक गोष्ट भावली ती म्हणजे कवयित्रीने आपल्या भावविश्वाला एका चौकटीत बंदिस्त केलेले नाही. एकाच संग्रहात बालपणापासून अध्यात्मापर्यंत, प्रेमापासून दुराव्यापर्यंत, निसर्गापासून सामाजिक वास्तवापर्यंत आणि व्यक्तिविशेषांपासून स्त्रीजीवनापर्यंत अनेक अनुभवांना शब्द दिले आहेत. संग्रहाचे आणखी एक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे वृत्तबद्ध कवितांची केलेली रचना आणि त्याखाली दिलेली वृत्ताची नावे व लगावली.भावनेच्या सहज प्रवाहाला वृत्ताच्या शिस्तीची जोड देण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे…त्या त्यामुळे संग्रह वाचताना मनही एका भावनेत अडकून राहत नाही आणि एक लयबद्ध वाचन रसिक मनाला सुखावतं… सायली कुलकर्णी यांच्या कवितेची भाषा सहज आहे. त्यांच्या एकांताला शब्दांनी सोबत केली आणि त्या शब्दांनी त्यांच्या भावनांना आकार दिला.. आणि आता त्याच शब्दांची किमया रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झालेली आहे..

काव्यसंग्रह : किमया घडली शब्दांची
कवयित्री: सायली गिरीश कुलकर्णी
प्रकाशक : चपराक प्रकाशन पुणे
मूल्य : दीडशे रुपये
पृष्ठे : १००

पुस्तक खरेदीसाठी करा लिंकवर क्लिक
चपराक प्रकाशन – https://www.chaprak.com/product-page/kimaya-ghadali-shabdanchi?srsltid=AYCX9vJOuCh2CfiLxWTd64XhjJvanuJ3yaoi3YWvLHICGD8Q_oBaEXVD
बुकगंगा – https://www.bookganga.com/eBooks/B/9CK50

Related posts

गडहिंग्लजच्या पाऊलखुणा…

ओढ पंढरीची.. भाग १ : आषाढी वारी.. आत्मिक उर्जा

शूरा मी वंदिले

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406