December 12, 2024
Footprints of Gadhinglaj Subhash Ghume book
Home » गडहिंग्लजच्या पाऊलखुणा…
मुक्त संवाद

गडहिंग्लजच्या पाऊलखुणा…

Footprints of Gadhinglaj Subhash Ghume book
Footprints of Gadhinglaj Subhash Ghume book

सुभाष धुमे गडहिंग्लज मधील एक मनस्वी व्यक्तिमत्व. सजगपणे जगलेले आणि संवेदनशीलपणे भवताल टिपणारे. त्यांनी आयुष्यभर निष्ठेने पत्रकारिता केली. कुठल्याही कार्यक्रमात कागद, पेन न घेता बसणारा हा एकमेव पत्रकार. तीक्ष्ण बुद्धीमत्ता आणि प्रचंड स्मरण या नैसर्गिक देणगीमुळे अख्खा ऐवज जसाचा तसा मनात ठेऊन कागदावर उतरण्यात त्यांचा हातखंडा. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक बातमीत डोळस समाजभान दिसायचे. याचे प्रत्यंतर त्यांच्या पाऊलखुणा या पुस्तकात पानोपानी येते. त्यामुळे त्यांची कुठलीच बातमी वादग्रस्त झाल्याचे मला तर आठवत नाही. गडहिंग्लज, आजरा, चंदगड भागाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास होता. त्यामुळेच तिथल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांबाबत ते सततच सडेतोड लिहित गेले. बिनदिक्कतपणे कोणावरही टीका करत गेले पण त्या टिकेत तालुक्याचा विवेक असल्यामुळे ती झोंबली गेली असेल पण जहरी कुणाला वाटली नाही. त्यामुळे त्या त्या काळातील आमदार, खासदार ते अगदी चिल्लर नेत्यापर्यंत त्यांचा मैत्रभाव होता. पण हा मैत्रभाव त्यांच्या लेखणीच्या आड कधीच आला नाही. गेल्या चाळीस वर्षात या विविध मैत्रभावातून त्यांना स्वतःचे उखळ पांढरे करून घेता आले असते. पण शेवटपर्यंत पत्रकारितेच्या मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावरच आपला उदरनिर्वाह चालविला. गांधी आणि मार्क्स यांच्या विचारांचे एकत्रीकरण म्हणजेच सुभाष धुमे यांचे व्यक्तिमत्व. मार्क्सवादी चळवळीत काही काळ त्यांनी घालविला. त्यामुळे ते विचाराने मार्क्सिष्ट आहेत असे बरेच लोक सांगतील पण जगण्यात ते गांधी विचाराचे सच्चे अनुयायी आहेत याचे प्रत्यंतर सर्वांनाच येते. कमीत कमी गरजा, भौतिक चंगळवादापासून दूर आणि जगण्यातील प्रामाणिकपणा त्यांच्या असण्याला सततच उन्नत करत गेला.

सुभाष धुमे यांनी पत्रकारिता सुरू केली तो काळ हा माझ्या महाविद्यालयीन जगण्याचा काळ होता. त्याकाळात दादा सबनीस आणि लाटकर हे दोनच वार्ताहर विविध वृत्तपत्रांना बातम्या पुरवत असत. अशा काळात धुमे यांनी आपली पत्रकारिता सुरू केली. उत्तूर हे गाव आजरा तालुक्यात समाविष्ट केले गेले असले तरी सर्वस्वी गडहिंग्लजलाच जोडले गेलेले. त्यामुळे धुमे यांना गडहिंग्लज अपरिचित असण्याचे कारणच नव्हते. त्याकाळी आजरा, चंदगड, गडहिंग्लज या विभागातील विद्यार्थ्यांना एकमेव महाविद्यालय होते ते म्हणजे शिवराज महाविद्यालय. माझी आणि आधीच्या साऱ्या पिढ्या या महाविद्यालयानेच घडविल्या. हे महाविद्यालय मौनी विद्यापीठाशी जोडलेले होते. त्याकाळातील आम्ही पाहिलेले शेवटचे प्राचार्य म्हणजे अंबादास माडगुळकर. माडगुळकरांच्या लालित्यपूर्ण अमोघ वक्तृत्वाचा स्वर अजुनही त्याकाळातल्या कोणाच्याही कानात तसाच रुंजी घालत असतो. या महाविद्यालयाच्या सावलीत आलेल्या प्रत्येकानेच उंच झेप घेण्याची आकांक्षा सातत्याने बाळगली. या महाविद्यालयात आम्ही प्रवेश घेतला तेव्हा सुभाष धुमे नुकतेच बातमीदारीत बस्तान बसवत होते. गडहिंग्लजच्या रस्त्यावरून कोणाचेही लक्ष वेधून घेणारे, दाढीधारी, घाऱ्या डोळ्याचे उंच गोरेपान त्यांचे व्यक्तिमत्व कोणाचेही लक्ष वेधून घेणारेच. त्यांनी आपले उभे आयुष्य या पत्रकारितेला दान केले. अशी कोणती ईच्छाशक्ती त्यांच्यात कार्यरत होती कोणास ठाऊक. पण त्यांनी पत्रकारिता हेच आपले आयुष्य मानले. त्याकाळाच्या पिढीत जग बदलायचे स्वप्न प्रत्येकजण पाहत होता. कदाचित धुमेंच्या डोळ्यातसुद्धा हेच स्वप्न तरळत असावे. त्यामुळेच त्याकाळापासून आजतागयत ते पत्रकारितेच्या दुनियेतच वावरताना दिसताहेत. या प्रदीर्घ काळात त्यांनी घेतलेले विविध अनुभव आणि जगलेली पत्रकारिता तालुक्याचे बदलत गेलेले सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वरूप त्यांनी आपल्या ‘पाऊलखुणा’ या पुस्तकात नोंदले आहे.

गडहिंग्लज तालुक्याची संरचना व्यामिश्र स्वरूपाची होती, आहे. हा तालुका समजून घेणे तितके सहज सोपे नाही. चंदगड, आजरा तालुका तशा अर्थी समजून घेणे सहज सोपे होते. चंदगड तालुक्यातील ७८ गावे हेरे संस्थांनात होती तर काही गावे कुरूंदवाड संस्थांनात, सांगली संस्थांनात होती. उरलेल्या गावांचा कारभार इब्राहिमपुरचे देसाई आणि अडकुरचे देसाई स्वतंत्रपणे पाहत होते. आजरा तालुका बहुंशी इचलकरंजी संस्थांनात होता. इचलकरंजी संस्थांनाचा कारभार लाटगाव आणि कडगांव येथूनच चाललेला असायचा. उत्तूर गावाबाबत इचलकरंजीकरांच्या मनात कायमची अढी होती. चंदगड, आजरा तालुक्यात संस्थांनीकांचा वरचष्मा असल्यामुळे तिथली संबंध जनता सतत दबून गेलेली आणि दारिद्रयाने पिचलेली अशी होती पण गडहिंग्लज सामानगडशी जोडलेले असल्यामुळे तिथला मानवी स्वभाव अन्य तालुक्यापेक्षा खूपच गुंतागुंतीचा आणि वेगळा असल्याचे आपल्याला दिसते. कधी काळी सामानगडावरूनच सर्व कारभार चालत होता आणि गडकऱ्यांचा संपूर्ण व्यवस्थेत दबदबा होता. इतिहासकाळात या गडाला विशेष महत्व होते. गडकऱ्यांचे बंड जेव्हा झाले. तेव्हा सामानगडचे गडकरीही त्यात सामील होते. १८५७ च्या उठावात सामानगडच्या गडकऱ्यांनी विशेष भूमिका निभावली होती. त्यामुळे या बंडाचा इतिहास वाचत असताना सामानगडावरची सात कमानीची विहीर आपल्या मनात घर करून जाते. गडाशेजारीच टेकडीवरची गुड्डाई ही गडहिंग्लज शहराच्या धमनीत वसलेली. सामानगड आणि भवतालचा सारा प्रदेश कोल्हापूर संस्थांनात असल्यामुळे कोल्हापूर संस्थांनातील दरबाऱ्यांचे वावरणे या भागाने सतत बघितले आहे.

पुणे, बंगळूर रस्त्यावरची एक शाखा गोव्याकडे जात असताना गडहिंग्लजमधून मार्ग आखला गेला. संकेश्वर-गडहिंग्लज-आजरा- आंबोली-सावंतवाडी-पणजी ही रेषा ठळक झाली आणि गडहिंग्लजचे महत्व अधिकच अधोरेखित झाले. हे गाव काळानुरूप वेगवेगळे आकार धारण करत गेले. आपोआपच येथे पेठ निर्माण झाली आणि पेठकऱ्यांनी या गावाचा ताबा घेतला. कधी काळ संस्थांन काळात महत्वाची असणारी कडगांव, कौलगे, महागांव, नूल, हलकर्णी या गावांचे ऐतिहासिक महत्व कमी होत जाऊन ते गडहिंग्लज मध्ये एकवटले. कडगांव, इचलकरंजीकर घोरपडे सरकारांच्या अधिपत्याखाली कारभाराचे केंद्र होते. तेथील यंत्रणाही गडहिंग्लजकडे सरकल्या. ती गोष्ट महागांव, नूल, हलकर्णी आणि अन्य गावांची झाली आणि गडहिंग्लज सर्वार्थाने महत्वाचे केंद्र बनले. एक महामार्ग काय किमया करू शकतो याचे प्रत्यंतर या गावातून मिळते. हे गाव समजून घ्यायलाही तितकेच कठीण आणि जटील, गुंतागुंतीचे आहे. हे गाव मुळातच मिश्र जाती-जमातीचे. इथे सर्व जातीचे, धर्माचे लोक आपल्या पुर्वापार वस्ती करून असलेले दिसतील.

गडहिंग्लज तालुक्याचे वैशिष्ट्यच सांगायचे झाल्यास हा तालुका मिश्र जाती-जमातींचा आणि त्यांच्या वर्चस्वाचा तालुका आहे असे आपणास म्हणावे लागेल. बारा बलुतेदार तर या तालुक्यातील प्रत्येक गावात आहेतच. पण या तालुक्यात वर्चस्व गाजविणाऱ्या जाती आपल्याला आढळतील. सरंजामी मराठे याबरोबरच लिंगायत समाजातील वर्चस्व गाजविणारी विविध घराणी इथे आहेत. जैन समाजाचे नजरेत भरणारे अस्तित्व तसेच मुसलमान समाजालाही या तालुक्यात नगण्य म्हणता येणार नाही. ख्रिश्चनांची असणारी लोकसंख्याही नजरेत भरणारी आहे. त्यामुळे येथे एक नैसर्गिक सहानुभाव पूर्वापार चालत आलेला आपल्याला दिसतो. या तालुक्यातील किरकोळ गावांचा अपवाद वगळल्यास प्रत्येक गावात लिंगायत समाज, मराठा समाज व इतर आलुते बलुते, फिरस्ते यांचे सहजीवन कितीतरी शतकापासून गुण्यागोविंदाने नांदत आलेले दिसते.

या तालुक्यात एकच एक भाषा अधिपत्य गाजविताना दिसत नाही. इथल्या मराठी बोलणाऱ्याला कन्नडचा पुरेपूर परिचय असतो तर कन्नड बोलणाऱ्याला मराठी तितक्याच सहजपणे अवगत असते. त्यामुळे द्विभाषिकत्व ह्या तालुक्याचा आत्मा आहे. भाषिक कारणावरून इथे कुणाला हिणवणे जमले नाही. इथले सामाजिक व्यवहार मिश्र संस्कृतीने व्यापलेले असल्यामुळे धार्मिक सहजीवनही नितळ स्वरूपाचे राहिलेले दिसते. मुळात या तालुक्यात दैवत व्यवस्था ही विविधतेने नटलेली दिसते. प्रत्येक गावात ग्रामदैवत लक्ष्मी, बसवाण्णा, जोतीबा किंवा कोणतेही असो. त्यागावातील सर्व समाज त्या दैवतापुढे नतमस्तक होतो. या दैवतांच्या यात्रा कुठे दहा वर्षाने, कुठे पाच वर्षाने तर कुठे सात वर्षाने आजवर होत आल्या आहेत. पण यात साऱ्यांचाच सहभाग सवतासुभा कोणाचाच नाही हे या तालुक्याचे वैशिष्ट्य. गडहिंग्लजला भरणारा ऊरूस हे सर्वांचेच आकर्षण केंद्र असायचे. भिन्न भाषा, भिन्न आचार धर्म तरीही असणारा आस्था भाव विशेष उल्लेखनीय आहे. कधीच कुणाला अनादराने वागवणे या तालुक्यातील कोणत्याच माणसाला जमले नाही. काळ बदलत गेला तरी हा आस्था धर्म आजतागायत तसाच वर्धिष्णू आहे.

गडहिंग्लज तालुक्यात एकमेव वाहणारी नदी हिरण्यकेशी. या नदीकाठचा प्रदेश तेवढाच सुपीक. बाकी सर्व भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य ठरलेले. सगळे कोरडवाह शेतकरी त्यांची मुख्य बाजारपेट गडहिंग्लज, मिरची, जोंधळा, नाचणे, भुईमुग ही इथली पारंपारिक पिक बदलत्या काळानुसार ऊस सर्वत्र पसरण्याआधीच या तालुक्यात पूर्वापार ठाण मांडून होता. त्यामुळे गुऱ्हाळ संस्कृती हेरे या तालुक्याचे वैशिष्ट्य. तालुक्यात शिक्षणाचा प्रसार फार वेगाने झाला असे मात्र म्हणता येत नाही. पण यात गडहिंग्लजच्या शिवाजी बोडिंगने निभावलेली भूमिका महत्वाची मानली पाहिजे. नंतरच्या काळात शिवराज महाविद्यालयाने केलेले सांस्कृतिक परिवर्तन विशेष नोंद घेण्यासारखे आहे. या तालुक्याच्या सीमा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर नव्याने बांधल्या गेल्या आणि या तालुक्याला राजकीय महत्वही प्राप्त होत गेले. गडहिंग्लज नगरपरिषदेचा इतिहास कितीतरी जुना आहे.

या तालुक्याचा मूळ स्वभाव शेतीसंस्कृतीचा असला तरी गडहिंग्लजच्या व्यापार पेठेने व्यापार ही संकल्पना सर्वच क्षेत्रात रुजविण्याचे केलेले काम दुर्लक्षिता येत नाही. त्यामुळेच क्षेत्र कोणतेही असो दृष्टिकोन व्यापारी असण्याची शक्यताच या तालुक्यात अधिक. त्यामुळे शेतीतही व्यापारानुकूल पिकपद्धती आपोआपच पसरत गेली. मिरची, भुईमुग ही व्यापारानुकूल पिके प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात असणारच. त्यामुळे गडहिंग्लजची बाजारपेठ मिरचीची बाजारपेठ म्हणून ख्यातकिर्त झाली. मिरची, गुळाची घाऊक बाजारपेठ यातूनच भव्य मार्केटयार्डचा जन्म झाला. नदीकाठच्या गावातून ऊस आणि कोरडवाहू शेतकऱ्यांची मिरची हे समीकरणच बनत गेले. नंतरच्या काळात प्रयोगशील शेतकऱ्यांनी व्यापार योग्य पिकांचाच या तालुक्यात प्रचार आणि प्रसार केला. भात पिक स्पर्धेत या तालुक्यातील कितीतरी शेतकऱ्यांनी आजरा, चंदगड पेक्षाही अधिक बक्षिसे मिळविली याला कारण ही व्यापारी दृष्टीच होय. या व्यापारी दृष्टीमुळे तालुक्याचे भलेही झाले आणि नुकसानही झाले.

गडहिंग्लज शहरात पूर्वीपासून रुग्णसेवेची भक्कम परंपरा डॉ. गुणे, डॉ. मोळदी यांच्यासारख्या निष्णांत डॉक्टरांनी तालुक्यातील रुग्णांची निरपेक्ष भावनेने सेवा केली. पण नंतरच्या काळात व्यापारी वृत्तीने डॉक्टरी व्यवसायास विळखा घातला. कैक डॉक्टर गडहिंग्लजमध्ये मालामाल झाले. सेवा हा शब्द कधीच हद्दपार झाला आणि रुग्णांच्या कापाकापीला ऊत आला. आज काही मोजके डॉक्टर वगळता बाकी सगळे पैशाच्या मागे लागल्यामुळे गडहिंग्लजचा वैद्यकीय व्यवसाय धोक्याच्या पातळीवर उभा आहे. हा व्यापारी दृष्टीकोन रूजल्याचा तोटाच म्हणायला हवा. दुसरा व्यापारी दृष्टीकोनाचा तोटा शिक्षण क्षेत्राला सहन करावा लागत आहे. गडहिंग्लज शहरात व अवती भवती शिक्षणाची दुकानदारी प्रचंड वेगाने फैलावत गेली. बघावे तिथे इंग्रजी माध्यमाचे दुकान या इंग्रजी माध्यमाच्या दुकानदारीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मोडकळीस आणल्या. काळू मास्तर, दिनकर मास्तरांचा तालुका तो हाच का ? असा प्रश्न निर्माण व्हावा इतकी बजबजपुरी या व्यापारी दृष्टीकोनाने निर्माण केली आहे. प्रत्येक क्षेत्रात घुसलेला हा व्यापार गडहिंग्लज तालुक्यात भव्य दिव्य काही घडू देत नाही एवढे मात्र निश्चित !

गडहिंग्लजच्या व्यापारी प्रवृत्तीने तालुक्यातील जनसामान्यांचा अर्थकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. पण हवा तो विवेक जागा असला पाहिजे याची शिकवण मात्र फारशी दिली गेली नाही. यामुळे येथे संस्थांचे उदंड पिक आहे. पण मुलभूत कार्याची वाणवा आहे. यामुळे भव्य दिव्य काही घडावे अशी अपेक्षाच धरणे चुक आहे. तालुक्यात सर्वकाही आहे. सुबत्ता आहे, पैसा आहे, मनुष्यबळ आहे, उत्साह आहे पण घडत मात्र काहीच नाही. यामुळे तालुक्याचे सळसळतेपण दिसावे असे मात्र काही घडत नाही. अनेक शिक्षणसंस्था आहेत. पण मुलभूत संशोधन नाही. प्रचंड क्रीडांगण आणि कीडास्पर्धा आहेत. पण एकही उत्तम खेळाडू शक्यता जवळपासही दिसत नाही. प्रगतशील शेतकरी आहेत पण शेतीत काही नवे घडताना दिसत नाही असे का व्हावे ? हा मुलभूत प्रश्न आहे.

तालुक्यात प्राचीन कालखंडातील मंदिरे आहेत. सामानगडसारखा ऐतिहासिक किल्ला आहे. काळभैरव सारखे जाणून देवस्थान आहे. पूर्व भागात मठ, मठाधिपती आहेत. या सर्वांनी या तालुक्याला सहिष्णुतेची देणगी मात्र उपजतच दिली आहे. या तालुक्यात कन्नड-मराठी, लिंगायत-मराठा असे वाद पेरण्याच अन्वयक प्रयत्न झाले. हिंदू-मुस्लीम दंगली घडाव्यात म्हणूनही प्रयत्न अनेक पण इथला जनसामान्य या कशालाच बळी पडला नाही. सहानुभाव, समुहभाव आणि सहिष्णुता त्यांनी कधी सोडली नाही. त्यामुळे अनेकांना गपगुमान परतीचे रस्ते धरावे लागले. याला कारण व्यापारी वृत्तीत रूजलेला चांगुलपणाच म्हणावा लागेल.

या तालुक्यात विविध राजकीय पक्षांचे नेतृत्व तयार झाले. धनाढ्य लोकांपासून सर्वजणच निवडणुकीच्या रिंगणात राजकारणाचे पट खेळत गेले. काहींनी तालुक्याच्या विकासाचे प्रश्न ऐरणीवर घेतले तर काहींनी फक्त नाममात्र प्रतिनिधित्व केले. असे असले तरी इथल्या राजकीय नेतृत्वात असलेला समंजसपणा अधिक उल्लेखनीय आणि दुर्मिळ स्वरूपाचा आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेने तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर इतिहास घडविला आहे. सामान्य मिरची विकणारा व्यापारी, निर्धन असणारा कष्टकरी इथला नगराध्यक्ष होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण या नगरपालिकेने महाराष्ट्रासमोर ठेवले असा हा राजकीय समंजसपणा आपल्याला दिसत असला तरी ईर्ष्येखोर माणूस म्हणून याच तालुक्यातील माणसाकडे बघावे लागते. कधीकाळी या तालुक्याला गुन्हेगारीची परंपरा होती. त्याचे तालुक्याला विशेष वाटत नव्हते. पण ती प्रवृत्ती, राग, द्वेष, रंग कोठून येत होती कोणास ठाऊक. अलीकडच्या दहा- वीस वर्षात ही परंपरा खंडीत झाली आहे हे विशेष म्हणावे लागते हा असा अजब, गजब तालुका आहे. याच तालुक्यात सरळ समुद्राकडे वाहणारी नदी आणि नाले आहेत तर येथेच उलटे वाहणारे ओढे आहेत. असा तालुक्याचा पाऊलखुणामध्ये सुभाष धुमे यांनी घेतलेला शोध व्यासंग पूर्ण आहे.

या ‘पाऊलखुणा’ पुस्तकात सुभाष धुमे यांनी या तालुक्यातील सर्व अंगोपांगांचा समग्र वेध घेतलेला आहे. हा वेध घेत असताना त्यांनी पत्रकार म्हणून जे जे प्रश्न हाताळले, ज्याविषयी आवाज उठविला. त्या सर्वांचे प्रतिबिंब या पुस्तकात पडलेले आहे. धुमे यांना सर्वच क्षेत्रात रूची असल्यामुळे त्यांनी कोणतेच क्षेत्र वर्ज्य मानलेले नाही. क्रीडा विषयक घडामोडींवर त्यांचे जितके बारीक लक्ष आहे. तितकेच या तालुक्यातील संगीताच्या क्षेत्रात काय घडते आहे याकडेही ते सुक्ष्मपणे पाहतात. शेतीच्या प्रश्नांत त्यांना जितका रस आहे. तितकाच तालुकाभर पसरलेल्या रस्त्यातही त्यांचा जीव अडकलेला आहे. अमुक मंदिराचा जिर्णोद्धार तर तमुक मंदिरासमोर पडलेले विरगळ हेही त्यांच्या आस्थेचे विषय आहेत. तालुक्याच्या पाणीप्रश्नांत धुमे सतत आग्रही राहिलेले आहेत. या तालुक्यातील हिरण्यकेशी काठची गावे वगळता इतरत्र पाण्याचे दुर्भिक्षच होते. या प्रत्येक गावच्या पाणीप्रश्नांसाठी चाललेल्या बारीकसारीक हालचालीत धुमे यांनी बारीक लक्ष दिलेले दिसते. तालुक्याच्या निसर्गात जेवढा त्यांचा जीव गुंतलेला होता. तेवढ्याच तिथल्या पशुपक्षी, प्राण्यातही त्यांना रस होता.

इथे घडणाऱ्या चळवळी हा तर त्यांच्या अंतरिक आकर्षणाचाच भाग होता. त्यामुळे त्या सगळ्या चळवळींना बळ पुरविणे हे त्यांनी पत्करलेले व्रत होते. सतत पायाला भिंगरी बांधून फिरणारा हा पत्रकार सर्वांचाच जीवाभावाचा मित्र होता. उदारता आणि भल्याबुऱ्यासह माणसांना जवळ करण्याचा त्यांचा स्वभाव. त्यांच्या आयुष्यात त्यांना खूप काही देऊन गेला. सुभाष धुमे यांनी व्यक्तिगत पातळीवर कोणाचा द्वेष केला असे मी कधीच पाहिले नाही याचा अर्थ व्यक्तिचे दोष त्यांना दिसत नव्हते अशातला भाग नाही पण दोष वगळून मैत्रभाव वाढविण्याची त्यांची वृत्ती अफलातूनच म्हणायला हवी. या त्यांच्या स्वभावामुळेच ते प्रत्येक गोष्टीकडे आत्मीय भावाने बघत गेले. याचे प्रत्यंतर या त्यांच्या ‘पाऊलखुणा’ या ग्रंथात आपल्याला पानोपानी दिसते. हा ग्रंथ उद्या गडहिंग्लज परिसराचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक अभ्यासकाला उपयुक्त ठरणारा ग्रंथ आहे.

सुभाष धुमे यांनी या ग्रंथात केलेले सर्व लेखन त्यांच्या अनुभवावर आधारित असे आहे. त्यासाठी त्यांनी कोणतेही संदर्भग्रंथ चाळलेले नाहीत किंवा माहिती जमवा, टिपणे काढा अशी यातायातही केलेली नाही. मी प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे त्यांना लाभलेला स्मरणशक्तीचा नैसर्गिक ठेवा त्यांनी उपयोगात आणला आहे. त्याआधारेच भेटलेली माणसं, घडलेल्या हकीकती, झालेल्या चळवळी, उभे राहिलेले प्रकल्प, वेगवेगळ्या क्षेत्रातील घडामोडी याचा आलेख सहृदयतेने काढलेला आहे. यात रिकाम्या जागा भरपूर आहेत. त्या कोणीतरी उद्याचा अभ्यासक निश्चित भरेल.

फक्त एका गोष्टीची खंत या पुस्तकाबाबत नोंदवाविशी वाटते ती ही की गडहिंग्लज हा विधानसभेचा स्वतंत्र मतदारसंघ होता. पुनर्रचनेच्या काळात हा मतदारसंघ संपुष्टात येईल असे कोणासही वाटत नव्हते. अशा काळात हा तालुकाच वेगवेगळ्या मतदारसंघात विभागला. तेव्हा इथले राजकीय नेतृत्व नेमके काय करत होते की त्यांना हा मतदारसंघ संपुष्टात येणे गरजेचे वाटत होते याबाबत काहीच उल्लेख येत नाही हे कसे काय घडले याचे उत्तर मात्र मिळत नाही. निपाणी मतदारसंघ धोक्यात आहे असे दिसताच तिथल्या तत्कालिन आमदार काका पाटील यांनी चळवळ उभी करून प्रचंड रेटा निर्माण केला आणि आपल्या मतदारसंघाचे अस्तित्व टिकविले. गडहिंग्लज ही तर अनेक चळवळींची जन्मभूमी. लोकाधार असणारे अनेक दिग्गज नेते येथे अस्तित्वात असताना हा मतदारसंघ सुरक्षित रहावा म्हणून कोणी कुठली चळवळ केली नाही की आपले वजन खर्च करून मतदारसंघाच्या अस्तित्वासाठी शासन दरबारी प्रयत्न केल्याचेही ऐकिवात नाही. इतका समृद्ध परंपरा असणारा तालुका कोणाचा तरी आश्रित व्हावा हे तालुक्याच्या पदरी आलेले वर्तमान वास्तव कशाचे द्योतक मानायचे ? अर्थात याविषयी सुभाष धुमे कधीतरी सविस्तर लिहितीलच पण यामुळे तालुक्याचा विकास खोळंबला. तालुक्याचे असणारे ठसठसीत अस्तित्व अचानक धुसर बनले याचे शल्य इथल्या प्रत्येक नागरिकाला असणारच आहे. परंपरा आणि इतिहास दैदिप्यमान आहे. क्रांतीकारकांचा वसा आणि वारसा आहे. शेती क्षेत्रात, विद्येच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणारे अनेक जाणते आहेत. पण आता तालुक्याला चेहराच उरला नाही अशा बिनचेहऱ्याच्या तालुक्यात पाऊलखुणा हा ग्रंथ अस्तित्वात येतो आहे. आनंद आहेच पण याबरोबरच इथल्या चेहऱ्याचा शोध घेणाऱ्या नव्या ऊर्मीचा, अंकुराचा या पाऊलवाटांना ध्यास आहे. त्यामुळे वाचक या ग्रंथांचे स्वागत करतील याची खात्री वाटते.

डॉ. राजन गवस
ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत.

पुस्तकाचे नाव – पाऊलखुणा
लेखक – सुभाष धुमे
प्रकाशक – व्हिजन प्रकाशन, गडहिंग्लज मोबाईल – 9273376660
पृष्ठे – २४४ किंमत – ३०० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading