October 4, 2023
KingsRule and characteristic of Indian culture rajendra ghorpade article
Home » राजेशाही अन् भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट
विश्वाचे आर्त

राजेशाही अन् भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट

राजाची दहशत काय असते, हे यातून स्पष्ट होते. राजा ज्या वाटेने जातो त्या वाटेवर जायलाही चोर घाबरतो. चोराचे धाडसही होत नसते, इतकी दहशत त्यांच्यामध्ये होती.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडंव होये।
कां राक्षसां दिवाो पाहे । राति होऊनी ।। ७२४।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ : आणि राजा ज्या वाटेनें जातो ती वाट चोराला अडचणीचे ठिकाण होते अथवा राक्षसांना दिवस उजाडला असता ते रात्र आहे असे वाटते.

सध्या लोकशाही आहे. राजेशाही पूर्वी होती. राजेशाहीत राजा तसे लोकशाहीत लोकप्रतिनिधी आहेत. राजेशाहीत भ्रष्टाचारी राजाचे शासन जनता उलथून पाडत असे. जनतेने राजाच्या विरोधात विद्रोह केल्याच्या अनेक घटना इतिहासात घडल्या आहेत. लोकशाहीत भ्रष्ट लोकप्रतिनिधींचा पराभव करण्याचा अधिकार जनतेला दिला आहे. सध्याचे लोकप्रतिनिधी हे आजचे सरदार व मंत्री आहेत, असे म्हणायला काहीच हरकत नसावी; पण विचार केला तर राजेशाहीत जनता जितकी सुखी होती तितकी लोकशाहीत निश्चितच नाही.

लोकशाहीची गरज आहे. लोकशाहीत स्वातंत्र्य आहे. सर्वांचा विचार यामध्ये आहे, पण लोकप्रतिनिधींनी सामर्थ्यवान राजाच्या गुणांचा, आदर्शांचा वारसा जपायला हवा. केवळ सत्ता आली की ऐश्वर्य, स्वतःचे घर भरायचे. उलट राजेशाहीत राजांनी काय केले ? त्यांनी सत्तेचा भोग घेतला, स्वतःचे राजवाडे भरले, असे सांगून त्यांचाच हा आदर्श आहे हे पटवून देण्यातही हे लोकप्रतिनिधी मागे नाहीत; पण प्रत्यक्षात राजेशाहीचा अर्थ तसा नाही. सामर्थ्यवान राजाचा प्रभाव काय होता, हे ज्ञानेश्वरांनी एका ओवीतच सांगितले आहे.

राजाची दहशत काय असते, हे यातून स्पष्ट होते. राजा ज्या वाटेने जातो त्या वाटेवर जायलाही चोर घाबरतो. चोराचे धाडसही होत नसते, इतकी दहशत त्यांच्यामध्ये होती. मग सध्याच्या लोकप्रतिनिधींची अशी दहशत आहे का ? ती का नाही ? उलट लोकप्रतिनिधीच चोरांना सोडवायला पोलिस ठाण्यात दाखल होतात, असे आजचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींच्या सभेतच चोरीच्या अनेक घटना घडतात. लोकप्रतिनिधींच्या वाटेवर जायला आजची जनताच घाबरते आहे. यामुळेच सभेला पैसे देऊन जनता गोळा करावी लागते.

चोरावर धाक असणाऱ्या राजाचा रुबाब काय असेल, याची कल्पनाही या लोकप्रतिनिधींना करवत नाही. लोकप्रतिनिधींनी नुसता राजाच्या रुबाबाचा जरी आदर्श घेतला तरी जनता धन्य होईल. देशातील भ्रष्टाचार नष्ट होईल. लोकप्रतिनिधींनी राजेशाहीच्या व्याख्याच बदलून टाकल्या आहेत, पण व्याख्या बदलून तो आदर्श नष्ट करता येत नाही. तो विचार कधीही नष्ट होत नाही. राजेशाही ही श्रेष्ठच आहे. अशा श्रेष्ठ राजांचा आदर्श हा जपायलाच हवा. त्यांचे गुण हे अंगी बाणवायलाच हवेत.

भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. सध्या परदेशातही राजेशाही नाही. पण तेथे थेट अधिकार राज्यकर्त्यांना नाहीत. राजाचा अधिकार अंतिम आहे. आजही तेथे राजाला अधिकार दिले आहेत. भारतात मात्र तसे नाही याचा विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवा. घटनेत राजेशाहीला दिलेला अधिकार अभ्यासायला हवा. भारतीय संस्कृती का श्रेष्ठ आहे याची प्रचितीही येथे येऊ शकेल. भारतीय राजाची वैशिष्ट्ये सुद्धा समजून घ्यायला हवे. त्याच्या मागचे अध्यात्मिक अधिष्ठान विचारात घ्यायला हवे. कारण त्या अधिष्ठानात न्याय मिळत होता. जनतेला न्याय देण्यासाठी लढणे हा राजाचा परमधर्म होता. त्याच्या वाटेवर न्याय ओसंडून वाहात होता. साहजिकच यामुळे चोरांना, गुन्हेगारांना याची दहशत होती. म्हणूनच अशा राजाच्या सत्तेत जनता सुखी होती.

Related posts

वड-पिंपळाच्या वृक्षासारखाच हा संसारवृक्ष

विरक्ती म्हणजे काय ?

स्व च्या ओळखीनंतर भय कसले ?

Leave a Comment