October 4, 2023
shailaja-molak-comment-on-aruna-sabane-book
Home » सूर्य गिळणारी मी…
मुक्त संवाद

सूर्य गिळणारी मी…

ज्या महिलांना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही समस्यांतून मार्ग काढायचा आहे त्यांनी अरूणाताईंचे ‘सूर्य गिळणारी मी..’ हे आत्मकथन जरूर वाचावे.

ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, संपादक, प्रकाशक व समुपदेशक
अध्यक्ष, शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन पुणे
9823627244

गेले वर्षभर विदर्भातील अरुणा सबाने या लेखिकेचे ‘सूर्य गिळणारी मी’ हे आत्मकथन गाजते आहे. २३ एप्रिल २०२३ रोजी पुस्तक दिनादिवशी हे माझ्या हातात पडले. काय आणि किती लिहावे ? याविषयी अशी माझी अवस्था आज झालीय. अरूणाताईंविषयी एका वाक्यात लिहायचे झाले तर- ‘दि ग्रेट मॅन.. अरूणाताई..’

आश्चर्य वाटले ना..? हो, मॅनच… त्या एक लेखक, संपादक, प्रकाशक, समुपदेशक आहेत. पुरूषवाचक शब्द वापरणाऱ्या.. यासाठीसुध्दा त्यांचेवर अनेकांना आक्षेप घेतले. पण मीही त्यांपैकीच एक .. पुरूषवाचक वापरणारी.. म्हणून तर त्या मला जास्त जवळच्या वाटल्या..!! इंदिरा गांधींना पोलादी पुरूष म्हणत. आज अशा काही महिला पुरूषी बाण्याने, धाडसाने काही करत आहेत. ताई त्यांपैकीच एक..!

सूर्य गिळणारी मी.. वाचताना.. कित्येकदा डोळे तर पाणवतातच.. अशा वेळी ताईंनी किती व कसं सोसलं असेल याची कल्पनाच केलेली बरी..! असं वाटून जातं. एक चळवळीतील सामाजिक कार्यकर्ती, उत्तम लेखक, वक्ता हे का सहन करते ? असा विचारही क्षणभर मनात आला. पण त्याच वेळी अशा अनेकींची आत्मकथन पहाताना हे लक्षात आले की, ज्यांना विचार आहे, ज्या महापुरूषांचे विचार समजून घेतात, ज्या मुलांचा व कुटुंबाचा विचार करतात त्या आजच्या पिढीसारखा झटपट ‘घटस्फोट’ घेत नाहीत. त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाल्यावर त्या हा नवरा सोडायचा निर्णय घेतात.

पण जो शिव- फुले- शाहू- आंबेडकरांचा अभ्यासक आहे, ज्याचे नाव विचारवंत व वक्त्याच्या यादीत फार वरचे आहे अशा माणसाने असे सारे का केले असेल..? अर्थात अरूणाताईंना सुध्दा याचे उत्तर सापडले नाही तर वाचकांना कसे सापडेल.? वाचताना हा अभ्यासू विचारवंत कोण ? याचे नाव समजताच.. वाटलं..सर तुम्ही सुध्दा??

इतके असामान्य समजले जाणारे तुम्ही इतके सामान्य का झालात ? असो.. हा एक वाचकाचा प्रश्न..! पण त्याला उत्तर नाहीच..!

श्रीमंतीत जन्म व बालपण, उत्तम शिक्षण, कॅालेजमधे असताना घरच्यांना पसंत नसतानाही झालेला चळवळीतील तरूणाशी प्रेमविवाह, नोकरीची धडपड, श्रीमंतीतून एकदम गरीबीत संसार, त्यातून होणारी चीडचीड, लग्नानंतर नव्याचे नऊ दिवस संपताच पतीची संशयी नजर, त्यातून प्रचंड मानसिक व शारीरिक छळ, त्यातच एक मुलगा.. दोन जुळ्या मुली.. त्यांचे संगोपन, शिक्षण, लग्न.. त्यासाठी अरूणाताईंनी केलेली धडपड, १७ वर्षांनी झालेला घटस्फोट, मुलांचे प्रचंड मानसिक हाल, छोटे छोटे केलेले व्यवसाय, बदललेली घर, मुलींचे वसतिगृह, वृत्तपत्रासाठी केलेले कष्ट, लेखनातून संपादन व प्रकाशन व्यवसाय, आकांक्षा प्रकाशनाचा जन्म, स्त्री प्रश्न व चळवळीला वाहिलेले आकांक्षा मासिकाचे गेल्या २५ वर्षाचे सातत्य, फ्लॅट, बंगला, चारचाकी गाडीचा अनुभव, पहिला विमान प्रवास, पेपर वाचनासाठी परदेशी जायची संधी, माहेर संस्थेचे अवघड काम, वेश्यांचे प्रश्न, अनेक महिलांना अत्यंत अवघड परिस्थितीतून बाहेर काढून एक नवे आयुष्य देतानाची धडपड, त्यासाठी केलेला संघर्ष, जलसाहित्य संमेलनाची नवी ओळख, विविध साहित्यिकांचे संघटन, सामाजिक व साहित्यिक प्रचंड काम..

स्वतःस्वतःच्या प्रश्नात असताना इतरांचे प्रश्न सोडवण्याचे धाडस व मानसिक धैर्य निर्माण करणे इतकी सोपी गोष्ट नाही पण या जिद्दी बाईने कुठून एवढं बळ निर्माण केलं असेल?

आज त्या म्हणतात- ‘आयुष्यातून एक माणूस वजा झाला म्हणून आज मी हे सारं करू शकले.’ या वाक्यात त्यांच्या यशस्वी जीवनाचे सारं दडलंय असं मला वाटलं. आज अनेक पुरस्कार ताईंच्या नावावर जमा आहेत. मुलांचे भवितव्य मार्गी लागून ते आपापल्या आयुष्यात सुखी आहेत. यापेक्षा आईला काय हवे ?

पुस्तकाचे नावः सूर्य गिळणारी मी…
लेखिकाः अरुणा सबाने
प्रकाशकः मनोविकास प्रकाशन
किंमतः 600 रुपये

Related posts

लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज ?

अग्निदिव्यः एका स्त्रीचा लढा

Neettu Talks : घरातच तयार करा कोरड्या त्वचेसाठी क्लिन्सर…(व्हिडिओ)

Leave a Comment