May 26, 2024
Home » पाऊस पाऊस वेडा हा पाऊस
मुक्त संवाद

पाऊस पाऊस वेडा हा पाऊस

कवी – राम बेनके, दऱ्याचे वडगाव, कोल्हापूर
 पाऊस पाऊस वेडा हा पाऊस

 आभाळी ढगांचा मांडव पाऊस,
 तेजाळ विजेचा तांडव पाऊस.
 धारा-धारातून सांडतो पाऊस,
 भुईचा संसास मांडतो पाऊस…

 पाऊस पाऊस वेडा हा पाऊस

 शेता-शेतातून धावतो पाऊस,
 ओढ्या-ओढ्यातून वाहतो पाऊस,
 पाना-पानातून खेळतो पाऊस,
 इवल्या तृणात लोळतो पाऊस…

 पाऊस पाऊस वेडा हा पाऊस

 अंगणी थेंबांचा धिंगाणा पाऊस,
 थेंबात पोरांचं रिंगण पाऊस,
 आनंद तरुला डोलवी पाऊस,
 आतल्या फुलाला फुलवी पाऊस…

 पाऊस पाऊस वेडा हा पाऊस

 माती-मातीतून पेरितो पाऊस,
 मातीच्या मनात शिरतो पाऊस,
 पिवळा पिवळा अंकुर पाऊस,
 पोटाच्या धगीवर फुंकर पाऊस…

 पाऊस पाऊस वेडा हा पाऊस

 शिवा-शिवारातून डोलतो पाऊस,
 पिकात हळूच फुलतो पाऊस,
 लोंबात पाऊस, दाण्यात पाऊस,
 भाबड्या आईच्या गाण्यात पाऊस…

 पाऊस पाऊस वेडा हा पाऊस

 कापणी-खुडणी मळ्यात पाऊस,
 विठोबा सारखा खळ्यात पाऊस,
 खळ्यात धान्यांची आरास पाऊस,
 रांगड्या राजाच्या उरात पाऊस…

 पाऊस पाऊस वेडा हा पाऊस

कवी - राम बेनके, दऱ्याचे वडगाव, कोल्हापूर

Related posts

चावट भुंगा

तू…आणि….मी

मानवतेचे पुजारी बापू गुरूजी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406