March 28, 2024
Conservation of Marathi Boli Language aricle by Laxman Khobragade
Home » बोली टिकली तरच भाषा समृद्ध
काय चाललयं अवतीभवती

बोली टिकली तरच भाषा समृद्ध

मराठी ही अनेक बोलीपासून संस्कारित असल्याने, अनेक बोलींनी मराठीला समृद्ध केलेले दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणूनच स्वतःचा राज्यव्यवहारकोश तयार करून बोलींना टिकवण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले होते. प्रदेशानुसार बोलल्या जाणाऱ्या बोली संस्कृती टिकवून आहेत. महाराष्ट्राची संस्कृती अधिक वैभवशाली करायची असेल तर, बोलीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. बोली टिकली तरच भाषेची समृद्धी वाढत जाईल.

लक्ष्मण खोब्रागडे

जुनासुर्ला, ता. मूल, जि. चंद्रपूर

भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे भाषा. भाषेतून विचाराचे आदान – प्रदान केले जाते. समाजजीवनाच्या एकोप्याचे सूत्र म्हणून भाषेकडे बघितले जाते. एका पिढीकडुन दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचे संवहन करण्याचे काम भाषेने केलेले दिसते. त्यासाठी मानवाने चिन्हांकित लिपी शोधली, ही उत्क्रांती अन्य जीवात घडलेली दिसत नाही. हावभाव, खुण आणि ध्वनीला अंकित करून मानवाने प्रगतीला गती दिली. त्यामुळे मानवी जीवन अधिक समृद्ध झाल्याचे दिसते. एका पिढीचे ज्ञान दुसऱ्या पिढीला विकासाकडे नेऊ लागले, यासाठी भाषेने महत्वाची भूमिका बजावलेली आढळून येईल. भाषा आणि लिपीचा शोध नसता तर, मानवाच्या मृत्यूबरोबर उमगलेले ज्ञान कालौघात नष्ट झाले असते. म्हणून भाषा हे मानवाने संस्कारित केलेले अमूल्य वरदान आहे.

स्थानिक परिस्थितीनुसार मनातील प्रेम, राग, लोभ, भीती, आनंद, दुःख, किळस, उत्साह अशासारख्या अनेक भावना हावभाव, खूण आणि चित्रातून प्रकट करता करता निसर्गाच्या सानिध्यात ध्वनीचा आविष्कार भाषेला अधिक प्रगल्भ करून गेला. मानवाच्या वैचारिक क्रांतीबरोबर भौतिक क्रांती वेगाने घडून आली. भौगोलिक परिस्थिती आणि संस्कृती भाषेवर परिणाम करणारे घटक असल्याने, भाषेच्या लकबीत, उच्चारात आणि शब्दात वैविध्यपूर्ण फरक जाणवतात. त्यामुळे भाषा म्हणून बोलल्या जाणारी, प्रदेशनिहाय बोली स्वतंत्र वैशिष्ट्य घेऊन समृद्ध होत गेली. प्रत्येक बोलीचा स्वतंत्र इतिहास आहे. बोलीची अस्मिता आहे. प्रत्येक बोली भाषा म्हणून परिणामकारक भूमिका बजावत असते.

महाराष्ट्र राज्याचा विचार करता भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेमुळे काही अंतरावर भाषेचे स्वरूप बदलत जाते. व्यवसाय व परंपरा भाषेचा ढब संपन्न करीत असतात. त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास ५२ किंवा त्यापेक्षा अधिक बोलीभाषा बोलल्या जातात आणि या सर्व देशी बोली व अन्य भाषेतील संयोगातून मराठी भाषेचा व्यवहारात उपयोग होतो. आधुनिकीकरणाच्या बदलत्या प्रवाहप्रमाणे भाषेतही बदल घडत गेले, पण भावना संवहनाचा उद्देश हाच भाषेचा गाभा नाकारता येत नाही. भाषा कोणतीही असली तरी मूळ उद्देश अर्थाची बोधप्राप्ती होऊन संदेशाची भूमिका पार पाडणे. अर्थप्राप्तीसाठी भाषेच्या लिपी चिन्हाचा लिखित व मौखिक उच्चार प्रभावी माध्यम आहे.

मराठी ही अनेक बोलीपासून संस्कारित असल्याने, अनेक बोलींनी मराठीला समृद्ध केलेले दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणूनच स्वतःचा राज्यव्यवहारकोश तयार करून बोलींना टिकवण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले होते. प्रदेशानुसार बोलल्या जाणाऱ्या बोली संस्कृती टिकवून आहेत. महाराष्ट्राची संस्कृती अधिक वैभवशाली करायची असेल तर, बोलीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. बोली टिकली तरच भाषेची समृद्धी वाढत जाईल. मराठीत आलेले देशी शब्द आणि त्यामागील परंपरा बोलीच्या गर्भात दडलेली आहे. परंतु आजकाल मराठीत परकीय भाषेचे उदात्तीकरण केले जात असून, बोलीला तुच्छतेचा फटकारा लावणारी मानसिकता बळावताना दिसत आहे.

शास्त्र आणि तंत्र भाषेला वैभव प्राप्त करून देतात. हे अगदी खरे असले तरी भावनेला विशिष्ट चाकोरीत बांधण्याचा अट्टाहास, हास्यास्पद म्हणावा लागेल. व्याकरण भाषेला सौंदर्यात सजवते, पण प्रकटीकरणाला चाकोरीचे बंधन मानसिक दमन करते. हे विसरून चालणार नाही. स्वाभाविक प्रवृत्तीचे दर्शन बोलीच्या सामर्थ्यातून अधिक पारदर्शक होते. भाषेला शास्त्र असावे याबाबत दुमत अजिबात नाही. परंतु या पुळक्यात प्रमाणीकरणाच्या नावाखाली भाषेतील नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होता कामा नये. कित्येक देशात जागतिकीकरणाच्या नावाखाली इंग्रजीसारख्या भाषेला महत्व न देता, प्रादेशिक भाषेतून मनुष्यबळाचा आत्मविश्वास वृंद्धीगत करून सर्जनाची गंगा प्रवाहित केली आहे. मातृभाषा विकासाची गंगोत्री असताना, त्यातील प्रवाहिपणा नाकारून कसे चालेल.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तंत्राचा अडथळा होत असेल तर कोणती भाषा समृद्ध होते ? हा संशोधनाचा विषय आहे. भाषा ज्ञानाच्या आदानप्रदानाचे माध्यम असेल तर बोलीला डावलून संस्कृतीची कुचंबणा होत जाते. साहित्यच नव्हे तर सारा व्यवहार हा विशिष्ट वर्गाची मक्तेतदारी बनत, इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला गदा येते. भाषेच्या फोफावणाऱ्या शिष्टाचाराच्या नावाखाली कित्येक सर्जन न्यूनगंडात ढकलल्या जातात.

भाषा वैशिष्ट्यपूर्ण असल्याने तिची गरीमा टिकली पाहिजे. मग प्रमाणाच्या नावाखाली जसे व्याकरणशास्त्र आणि तंत्र अभ्यासले जातात, तसाच मापदंड बोलीच्या बाबतीत लावून तिला प्रकाशात का आणल्या जात नाही ? याचे चिंतन प्रत्येकांनी करायला हवे. बोलीवर गावंढळपणाचा ठपका लावून, गावखेड्यातील सांस्कृतिक वारसे कालबाह्य होण्याला जबाबदार कोण ? माझा प्रांत , माझी संस्कृती, माझे वैभव दुसऱ्या परक्यांनी जोपासणे अशक्य. माझ्या अस्तित्वासाठी मलाच सज्ज झाले पाहिजे. माझ्या बोलीने मला जगवले, तिच्या संवर्धनासाठी मी माझ्या बोलीच्या तंत्राचे, शास्त्राचे पैलू जगासमोर आणून बोली टिकवणे काळाची गरज आहे. मराठीत अनेक बोली व भाषेची सरमिसळ झालेली असल्याने, एखादा वाक्य नजरेसमोर पडला रे पडला की आपल्यातील तज्ज्ञ खोट शोधायला सुरुवात करते. मायेचा लुगडा फाडून नग्न करण्याची जडलेली वात्रट सवय कधी सुटायची ?

शिवकाळात बोलीला राजाश्रय असल्याने बोली अधिक विकसित झाल्या. त्यातही संतपरंपरेने बोलीला सोन्याचे दिन आणले होते. प्राकृतग्रंथातून बोलीचे वैभव टिकून होते. पण आज बोलीला आलेली अवकळा बघता भाषेचे भविष्य धोक्यात येईल, ही काळ्या दगडावरची रेषा मानायला हरकत नाही. भाषेला समृद्ध करणारी बोलीच संपली तर, कृत्रिम श्वास किती पुरणार ?

आधुनिकिकरणात घुसमटलेली मानसिकता, नैसर्गिकतेच्या सावलीत विसावा घेण्याची धावपळ करते. परंतु प्राकृतिक बोलीकडे कानाडोळा करते, किती मोठी विसंगती, विचारांचे, भावनेचे सहज वहन करण्यासाठी बोली पूरक असताना तिच्या हत्येचे पातक कोणाच्या माथी फोडावे, हा यक्षप्रश्न येणारी पिढीच सोडवेल.

Related posts

सोनसरी, पंद अन् सह्याद्री…

जाणून घ्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस बद्दल…

काम वासनेचा नाश केल्यास क्रोधावर नियंत्रण शक्य

Leave a Comment