June 18, 2024
Impact of increased ocean warming period on monsoon research report
Home » सागरी उष्णता कालावधी वाढल्याचा मान्सूनवर परिणाम
संशोधन आणि तंत्रज्ञान

सागरी उष्णता कालावधी वाढल्याचा मान्सूनवर परिणाम

हिंदी महासागरात सागरी उष्णता कालावधी वाढल्याचा मान्सूनवर परिणाम: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील अभ्यासाचा निष्कर्ष

हिंद महासागरात सागरी उष्णता कालावधीचे प्रमाण  वाढत असून  त्याचा भारतातील  मान्सूनवर परिणाम होत आहे, असे पुणे स्थित भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या (IITM) रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे.

‘जेजीआर ओशन्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात, संशोधकांनी सागरी उष्णता  घटनांमध्ये लक्षणीय वाढ नोंदवली आहे.  हिंदी महासागराच्या तापमानात  वेगाने झालेली  वाढ आणि प्रबळ अल  निनो यांचा  हा परिणाम आहे. अभ्यासात असे आढळून आले की सुमुद्राचे तापमान वाढण्याच्या घटना या  मध्य भारतीय उपखंडातील पाऊसमान कमी तर दक्षिण द्वीपकल्पातील  पाऊसमान  वाढवतात .

सागरी उष्णता  प्रसंग / कालावधी म्हणजे काय?

सागरी सागरी उष्णता  घटना / प्रसंग हा समुद्रातील अत्यंत उच्च तापमानाचा कालावधी (90 पर्सेन्टाइल पेक्षा अधिक ) असतो.  या घटनांमुळे प्रवाळांच्या रंग बदलतो, सागरी गवत नष्ट होते आणि समुद्रातील शैवालवनांचा नाश झाल्यामुळे अधिवास उध्वस्त होतो, ज्याचा मत्स्यपालन क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होतो. पाण्याखाली केलेल्या  सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मे 2020 मधील सागरी उष्णतेच्या घटनेनंतर तामिळनाडू किनार्‍याजवळील मन्नारच्या आखातातील 85 टक्के प्रवाळाचा  रंग बदलला आहे. मात्र  अलीकडील अभ्यासांमधून जागतिक महासागरांमध्ये सागरी उष्णतेच्या वाढत्या घटना आणि त्याचे परिणाम नोंदवले असले तरी, उष्णकटिबंधीय हिंदी महासागर प्रदेशात त्या कमी आढळतात. अशा प्रकारच्या उष्णतेच्या घटना उष्णकटिबंधीय हिंदी महासागरात दुर्मिळ होत्या, मात्र आता दरवर्षी आढळून येतात. पश्चिम हिंदी महासागर प्रदेशात प्रत्येक दशकात सुमारे 1.5 घटना या  दराने सागरी उष्णतेच्या प्रसंगांमध्ये  सर्वाधिक वाढ झाली आहे, त्याखालोखाल  बंगालच्या उत्तरेकडील उपसागरात प्रत्येक  दशकात 0.5  दराने ही वाढ झाली आहे. 1982-2018 दरम्यान, पश्चिम हिंदी महासागरात एकूण 66 तर बंगालच्या उपसागरात 94 वेळा असे घडले आहे.

मान्सूनवर परिणाम

पश्चिम हिंद महासागर आणि बंगालच्या उपसागरातील सागरी उष्णतेच्या घटनांमुळे मध्य भारतीय उपखंडात कोरडेपणा जाणवतो. त्याच वेळी, बंगालच्या उत्तरेकडील  उपसागरातील उष्णतेच्या घटनांमुळे दक्षिण द्वीपकल्पीय भागात पावसाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. हे बदल उष्णतेच्या प्रसंगाद्वारे बदललेल्या मान्सूनच्या वाऱ्यांचा परिणाम आहेत. सागरी उष्णतेच्या लाटा आणि वातावरणीय  परिसंचार  आणि पर्जन्यमान यांच्यात जवळचा संबंध असल्याचे  प्रथमच एका अभ्यासाने दाखवले आहे.

भविष्यातील आव्हान

“भविष्यात हिंद महासागरात आणखी तापमानवाढीची शक्यता हवामान मॉडेलच्या अंदाजात दिली आहे. यामुळे सागरी उष्णतेच्या घटना आणि मान्सूनच्या पावसावर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे.” असे कोल म्हणाले.

“समुद्री उष्णतेच्या प्रसंगांची ची वारंवारता, तीव्रता आणि त्याचे क्षेत्र वाढत असल्यामुळे, या घटनांचे अचूक निरीक्षण करण्यासाठी आपल्याला महासागर निरीक्षण व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे, तसेच तापमानवाढीबाबत  जगाने मांडलेल्या आव्हानांचा कुशलतेने अंदाज लावण्यासाठी आपली हवामानविषयक  मॉडेल अद्ययावत करणे आवश्यक आहे” असे ते म्हणाले.

कोल यांनी सरन्या जे. एस. (केरळ कृषी विद्यापीठ), पाणिनी दासगुप्ता (आयआयटीएम ), आणि अजय आनंद (कोचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ) या  शास्त्रज्ञांच्या सहकार्याने हे  संशोधन केले आहे.

संदर्भ: सरन्या, जे. एस., रॉक्सी, एम. के., दासगुप्ता, पी., आणि आनंद, ए. (2022). उष्णकटिबंधीय हिंदी महासागरावरील सागरी उष्णतेच्या घटनांची उत्पत्ती आणि कल  आणि भारतीय उन्हाळी मान्सूनशी त्यांचा परस्परसंबंध. जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च: ओशन, 127, e2021JC017427.

Related posts

ज्ञानेश्वरीत अध्यात्मबरोबरच विज्ञान विचारांचेही प्रबोधन

भू संपादन कायद्यातील दुरुस्ती शेतकरी हिताची ?

जगातील सर्वात उंचीवरचे टपाल कार्यालय

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406