March 30, 2023
Actor Bhalchandra Kulkarni memory
Home » आमचा अशोक इकडे आलाय का ?
मुक्त संवाद

आमचा अशोक इकडे आलाय का ?

आमचा अशोक इकडे आलाय का ?

या एका डायलॉग ने त्याकाळी धूम धडाका चित्रपटात खऱ्या अर्थाने रंगत आणली होती अर्थात हा डायलॉग ज्यांच्या तोंडून बाहेर पडला ते होते ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी सर. आज सकाळी त्यांचे निधन झाले आणि काही क्षणातच धुमधडाका चित्रपटातील त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहीली.

– युवराज पाटील,
शिवाजीपेठ, कोल्हापूर

स्पष्टवक्तेपणा, डायलॉग इतक्याच ताकतीने म्हणण्याची असलेले हातोटी ही कुलकर्णी सरांची वैशिष्ट्ये होती. मध्यंतरी दैनिक सकाळ कार्यालयात ते आले असता त्यांना पाहताच मी अशोक इकडे आला होता का हा डायलॉग म्हटला आणि सर म्हणाले अजून तुझ्या लक्षात आहे का हा डायलॉग ? 

अधून मधून आयडीबीआय बँकेत त्यांची भेट व्हायची. जयप्रभा स्टुडिओच्या विरोधातील आंदोलन असो अथवा छत्रपती शिवाजी चौकातील सुशोभीकरणाचा विषय असो त्यांचा सक्रिय सहभाग यात दिसून यायचा. लता मंगेशकर या महान आहेत याबाबत आपले दुमत नाही पण जयप्रभा स्टुडिओ बाबत जी भूमिका घेतली त्याविरोधात कुलकर्णी सर ठाम राहिले. धूम धडाका चित्रपटातील आमचा अशोक इकडे आलाय का अथवा या चित्रपटाच्या शेवटी तुम्ही जरा गप्प बसा ओ हा डायलॉग ही तितकाच लोकप्रिय ठरला. 

थरथराट चित्रपटात संपादकांची छोटेखानी भूमिका ही चर्चेची ठरली. लक्ष्मीकांत बेर्डे वार्ताहर आणि कुलकर्णी सर संपादक असा हा गमतीचा खेळ होता. या चित्रपटाने लोकांना पोट धरून हसवण्यास भाग पाडले. विनोदी भूमिका असो अथवा एखाद्या चित्रपटातील भावनिक क्षण त्याला न्याय देण्याचे काम कुलकर्णी सरांनी केले. माहेरची साडी या चित्रपटात अलका कुबल यांच्या सासऱ्याची भूमिका त्यांनी तितक्याच ताकतीने पार पडली. एखाद्या सासऱ्याचे मन किती हळवं असतं ते त्यांनी भूमिकेतून दाखवून दिलं. पडद्यावरची भूमिका असो अथवा खऱ्या आयुष्यातील जगणं असो यामध्ये भेदाभेद न करता नेहमी प्रॅक्टिकल राहण्याच तत्व त्यांनी कायम जपलं. अनेक चित्रपटातून ते लोकप्रिय झाले तरीही एक माणूस म्हणून ते सदैव स्मरणात राहील. आमचा अशोक इकडे आलाय का ? या डायलॉग चे ही असेच आहे. 

Related posts

भुरा: तत्वचिंतनाचं अस्तर असलेलं आत्मचरित्र

माझ्या जगण्याचे पुस्तक – प्रांजळ आत्मकथन

‘मायबाप’ मध्ये ग्रामीण जीवनाचं समृद्ध चित्रण

Leave a Comment