March 5, 2024
Meghna who is dedicated to social enlightenment
Home » समाज प्रबोधन कार्यास वाहून घेतलेली मेघना…
मुक्त संवाद

समाज प्रबोधन कार्यास वाहून घेतलेली मेघना…

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज मेघना झुझम (भिंबर पाटील) यांच्या कार्याचा परिचय…

ॲड. शैलजा मोळक
लेखक-संपादक-समुपदेशक-व्याखाता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे.
मो. 9823627244

जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..१०

‘ओळखलं का गं पोरींनो मला’ म्हणत सावित्रीच्या वेशात स्टेजवर एंट्री घेत तास दीड तास सावित्रीचे कार्यकर्तृत्व नाट्यरूपाने सादर करत महाराष्ट्रभर फिरणारी ही सावित्रीची लेक आपल्यापैकी बरेच जण ओळखत असाल. प्रेरणा कधी ? कोणाला ? कशातून मिळेल ? हे सांगणे कठीणच. पण प्रेरणा आपले जीवनच बदलून टाकतात. आपले विश्व बदलून टाकतात अशीच कहाणी आहे मेघनाताईंची..!

पुण्यात प्रभातरोडवर एका छोट्याशा खोलीत ५ भावंडात वाढलेली मेघना. ‘आईवडीलांनी मुलगा मुलगी भेद कधीही केला नाही त्यामुळे घडण्याची प्रक्रिया छान झाली. घरात टीव्ही नसल्याने घरासमोरच्या अपार्टमेंटमधे टीव्हीचा आवाज आला की आंब्याच्या झाडावर चढून पहायचा किंवा ऐकायचा प्रयत्न करत एक दिवस आपणही असेच टीव्हीत दिसायला हवे किंवा असे आपल्याला बोलतां यायला हवे हे स्वप्न तेव्हा उराशी बाळगले. तेलाचा पत्र्याच्या डब्यात काठी घालायची व त्याला तांब्या किंवा ग्लास अडकवला की झाला माईक. मग आजूबाजूच्या चिल्यापिल्यांना बोलवायचे व सांगायची एखादी गोष्ट. असे माईकचे नाते लहानपणापासूनच.’ मेघनाताई सांगत होत्या.

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ याप्रमाणे ताईंची वाटचाल सुरू झाली. कॅालेजात पुरूषोत्तम करंडकमधे भाग घेताना नाटक, सिनेमात काम करायचे, टीव्ही, आकाशवाणीवर निवेदक, मुलाखतकार व्हायचं हे स्वप्न पाहिलं. कॅालेजच्या दुसऱ्या वर्षात असताना आकाशवाणीची परीक्षा पास होऊन ताईंचे सिलेक्शन झाले. पण तेव्हाच त्यांचे वडील आजारी होऊन कोमात गेले. भावंडे लहान. आकाशवाणीची नोकरी स्वीकारली तर दर तीन महिन्यांनी ब्रेक मिळणार होता. स्वप्न तुटलं होतं. दुसरी नोकरी धरली. घर-नोकरी करत स्वतःचे व सर्व भावंडांचे शिक्षण पूर्ण केले. Post graduation of IT पूर्ण केलं आणि एका IT कंपनीत IT head म्हणून नोकरी मिळाली. शनिवार-रविवार सुट्टीचा उपयोग आपल्या आवडीसाठी व सामाजिक कामासाठी द्यायचे ठरवले. पथनाट्य, व्याख्याने, शेतकऱ्यांना प्रबोधन व ट्रेनिंग असे सुरू केले.

‘लग्न, नोकरी, संसार सुरू झाला. मुलगा लहान असतानाच ताईंना पॅरालिसिस झाला. उठता येत नव्हते. मुलगा रात्रभर उशाशी बसून रडायचा. सारी स्वप्न धुळीला मिळाली असे वाटायचे.’ ताई सांगत होत्या. ‘पण मुलासाठी उठायचे अशी हिंमत धरली. एका आयुर्वेदिक डॅाक्टरांच्या मदतीने हातपाय हालू लागले. माझी इच्छाशक्ती दांडगी होती.’ सावित्रीबाईंची जयंतीनिमित्ताने वारजे येथे शांता नेवसे यांचेमुळे सावित्रीबाईंवर व्याख्यान देण्याची ताईंना संधी मिळाली. नीट चालता येत नसतानाही त्यांच्या आग्रहामुळे फक्त ५ मि. बोलायचे ठरवूनही केवळ सावित्रीबाईंमुळे ताईंनी दीड तास प्रयोग केला. आणि तो ताईंच्या आयुष्यातील टर्निंग पॅाईंट ठरला. तेव्हा कामवाल्या मावशीच्या आजीची नऊवार साडी व नेवसे ताईंनी काढलेली कपाळावरील चिरी ही प्रेरणा ठरली आणि ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ या एकपात्रीचा जन्म झाला.

टेंभुर्णी येथे प्रयोग झाल्यावर एक विधवा महिला भेटली व तिने तिची व्यथा सांगितली. दोन महिन्यांचा मुलगा असताना पतीचे निधन झाले. आज मुलगा इंजिनिअर होऊन त्याचे लग्न झाले पण त्याला मला औक्षण करून दिले नाही. या प्रसंगाने ताई पिळवटून गेल्या. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. समाजातील महिला भगिनींना माझी गरज आहे. त्यांचे समस्या समजून घेऊन प्रबोधन करणे गरजेचे आहे. तेव्हा आता पुढील आयुष्य फक्त सावित्री-जिजाऊ व महानायिकांचा विचार मांडत प्रबोधनाचा वसा स्वीकारला.

विधवा प्रश्नाला घेऊन ताई महाराष्ट्रभर फिरत काही ठिकाणी प्रत्यक्ष विरोध करत, प्रबोधन करत महिलांना बळ देऊ लागल्या. लोकांचे, महिलांचे मन परिवर्तन होऊ लागले. यातून करूया जागर स्त्रीशक्तीचा, होम मिनिस्टर, खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमातून कॅन्सरमुक्ती, बेटी बचाओ, विधवा प्रथा मुक्ती, व्यसनमुक्ती, शिक्षणाचा प्रचार प्रसार असे विषय घेऊन ही आधुनिक सावित्रीची लेक महाराष्ट्रभर फिरते आहे.

सन २००६ ला सुरू झालेला ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ या एकपात्री प्रयोगाने आज १००० चा टप्पा गाठलाय. यातून ‘सावित्रीबाई फुले दत्तक योजना’ सुरू करून गरीब व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी ताई मदत करत आहेत. तृतीय पंथीय लोकांना समाजमान्यता मिळावी यासाठी कार्यरत, शेतकरी महिला, विद्यार्थ्यांसाठी यूट्यूबवर वेबसिरीज, व्याख्याने, मान्यवरांच्या मुलाखतींचे आयोजन केले जाते. देहदान, अवयवदान जागृती, विधवांसाठी हळदी कुंकू अशा कार्यक्रमाचे आयोजन ताईंनी महात्मा फुले वाड्यात करून महिलांची ओटी भरून मंगळसूत्र व जोडवी घातली. कोरोना काळात ताईंनी ७५ प्रयोग ताईंनी घरातून केले. त्यांचा मुलगा आज BE करत आहे व त्यांचे पती खाजगी नोकरीत आहेत. घरातून त्यांना प्रचंड पाठिंबा असल्याने ताई महाराष्ट्रभर कार्यक्रम करतात. नुकतेच त्यांनी स्त्री संतांवर आधारित २ तासांची नाटिका चाळीसगाव येथील साहित्य संमेलनात सादर करून एका नव्या प्रयोगाला सुरूवात केली आहे. लेखन, दिग्दर्शन, संगीत, निवेदन, सूत्रसंचालन, संवादक या सर्व विषयांची त्यांना उत्तम जाण आहे.

सावित्रीबाईंचे कार्य व विचारांचा प्रचार प्रसार करताना आज १७ वर्ष लोटली. आज त्यांचे जगणे ‘सावित्रीमय’ झाले आहे. प्रचंड इच्छाशक्तीने काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मेघनाताई..! अशा या सामाजिक जाण व भान असणाऱ्या कर्तृत्ववान जिजाऊ-सावित्रीच्या लेकीला मानाचा मुजरा..!!!

Related posts

गहू किंवा मेसलिन पिठाच्या निर्यात धोरणात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

बेल (ओळख औषधी वनस्पतीची)

Saloni Arts : असे रेखाटा बुडबुड्याचे छायाचित्र…

Leave a Comment