अविचारी विकास व जोशीमठ
कलियुगात जोशीमठ दिसणार नाही, असा उल्लेख एका पुराणात असल्याचे सांगण्यात येते. आज जोशीमठची ही अवस्था निसर्गापेक्षा मानवी विकासाच्या अविचारी संकल्पनामुळे झाली आहे. निसर्गातील अमानवी हस्तक्षेपामुळे झाली आहे. महाराष्ट्रातील कोकणाबाबतही हा एक इशाराच आहे, हे ओळखून विकासकामे व्हायला हवीत.
डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
जोशीमठ. उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील एक गाव. हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये समुद्रसपाटीपासून ६१०० फुट उंचीवर वसलेले निसर्गसंपन्न गाव. ते पूर्वी कात्युरी राजघराण्याच्या राजधानीचे गाव होते. येथून बद्रीनाथ मंदीर केवळ ३२ किलोमीटरवर. याच गावात आद्य शंकराचार्यानी चार मठांपैकी जोतिर्मठाची स्थापना केली. त्यामुळे जोशीमठचे धार्मिक महत्त्व वाढले. गावात साधारण ४००० कुटुंबे राहतात. गावाची लोकसंख्या सोळा हजारच्या आसपास. चढउतारावर वसलेले गाव सुखाने जगत होते. या गावाला पुराणकाळापासून मोठे महत्त्व लाभले आहे. शंकराचार्यानी येथे तप केले. हनुमान या ठिकाणी संजीवनी बुटीच्या शोधात आला होता, असेही मानतात. भगवान नरसिंहानी याच ठिकाण तपश्चर्या केली, अशही धारणा आहे. अज्ञातवासानंतर स्वर्गाकडे जाताना पांडव या ठिकाणी आल्याचे मानतात. शीखांचे पवित्र हेमकुंड हे धर्मस्थळही जोशीमठपासून जवळच आहे. नरसिंह, शंकराचार्य मठ, गडी भवानीदेवी मंदीर, अशा अनेक मंदिरामुळे आणि अन्य धर्मस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यावर वसलेल्या गावाला मोठे महत्त्व लाभले.
जोशीमठला हिमालयाचे प्रवेशद्वार अशीही ओळख आहे. संरक्षणदृष्ट्याही गावाला मोठे महत्त्व आहे. भारत चीन सीमेवरील हे महत्त्वाचे गाव. येथे सैन्याचा मोठा तळ आहे. इंडो-तिबेटीयन बॉर्डर फोर्ससाठीही हे महत्त्वाचे गाव आहे. तोपर्यंत केवळ पर्यटकांच्यादृष्टीने हे महत्त्वाचे गाव होते. याठिकाणी हिवाळ्यानंतर दऱ्याखोऱ्यात फुलणाऱ्या फुलांमुळे, या भागाला ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ अशी ओळख मिळाली आहे. या गावाबद्दल सर्वसामान्यांना प्रथम माहिती झाली २०२१मध्ये. त्यावेळी बर्फाचे कडे तुटून नद्यांना मोठा पूर आला. या पूरामध्ये आाजूबाजूच्या भागात असणारे तलावही फुटले आणि जोशीमठ गावालाही तडाखा बसला.
आज जोशीमठ केवळ देशात नव्हे; तर, जागतिक पातळीवर चर्चेत आले आहे. चार हजारच्या आसपास घरे असणाऱ्या गावातील सहाशेपेक्षा जास्त घरांना तडे गेले आहेत. या घरांमध्ये राहणे म्हणजे, मृत्यूला कुशीत घेऊन झोपण्यासारखे आहे. याचे गांभिर्य ओळखून लेख लिहिताना ६०५ घरातील लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. निव्वळ घरांनाच तडे गेलेले नाहीत, तर रस्त्यावरही मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यातून पाणी येत आहे. २०२१पासून जोशीमठ आणि आजूबाजूच्या परिसरात दरडी कोसळत आहेत. आज अनेकांची घरे राहण्यायोग्य राहिली नाहीत. त्यांनी शेजाऱ्यांकडे तात्पुरता आसरा घेतला. मात्र पर्यटकांचा यात्रेतील शेवटचा किंवा यात्रेनंतरचा पहिला टप्पा असलेल्या गावात मूळनिवासींनाच राहण्यायोग्य परिस्थिती राहिली नाही.
ही परिस्थिती उदभवण्यामागे अनेक कारणे आहेत. सर्व खंड उत्तरेकडे कसे सरकत आहेत, हे सर्व संशोधकही मान्य करतात. त्यामुळे हिमालयाच्या पर्वतरांगावर त्याचा परिणाम जाणवणार, हे निश्चित. मात्र हा परिणाम इतक्या तीव्रतेने जाणवू लागला आहे, त्याचे कारण मानवी आहे. मानवाने या भागामध्ये जी विकास कामे हाती घेतली, ती निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात ढवळाढवळ करणारी आहेत. त्यामुळे परिणाम कितीतरी पटीने वाढला आहे. या भागात प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या संशोधकांनी यासाठी तीन कारणे दिली आहेत.
यातील पहिले आणि प्रमुख कारण म्हणजे अलकनंदा नदीमुळे होत असलेली जमिनीची धूप हे आहे. अलकनंदा नदीच्या तीरावरील टेकड्यावर जोशीमठ हे गाव वसलेले आहे. या ठिकाणच्या टेकड्या मातीच्या आहेत. या टेकड्या खाली होत असलेल्या जमिनीच्या धूपीमुळे हळूहळू खाली सरकत आहेत. त्याचा परिणाम रस्ते आणि घरांना भेगा पडण्यामध्ये दिसून येत होता. संशोधकानी शोधलेले दुसरे कारण आहे, या शहरातील ड्रेनेजची व्यवस्था. सांडपाणी व्यवस्थीत खाली जात नाही. ते तेथील मातीमध्ये मोठ्या प्रमाणात मुरते. पावसाच्या आणि सांडपाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने मातीमध्ये बीळ तयार होते. ते मोठे होत जाते आणि एक दिवस तेथे जमीन खचते. अखेरीस दरडी कोसळायला सुरुवात होते. तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे जोशीमठ गावात होत असलेली अनियंत्रीत बांधकामे हे आहे. या गावाचे असणारे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व मोठे असल्याने या गावामध्ये अविचारी पद्धतीने मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत.
या भागात पहिली भूस्खलनाची घटना १९७६ मध्ये नोंदवण्यात आली. तेव्हाच याचे गांभिर्य लक्षात आले होते. उत्तर प्रदेश सरकारने मिश्रा समितीचे गठण केले. या समितीने त्याचवेळी डोंगराना भेगा पडत असल्याचे निदर्शनास आणले होते. जोशीमठ आणि आजूबाजूच्या परिसरातील झाडाची तोड मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती. झाडे तोडून रस्ते बांधण्यात येत होते. बांधकामे करण्यात येत होती. मात्र मिश्रा समितीच्या अहवालातील वृक्षतोड पूर्णपणे थांबवणे आणि विकास काळजीपूर्वक करणे आवश्यक असल्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जोशीमठ परिसरातील टेकड्यांच्या पायथ्याशी कोणताही बदल न करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र आजही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि रस्ते, घरांच्या बांधकामात खंड पडलेला नाही. या रस्त्यावर अवजड वाहने धावतात. त्यामुळेही डोंगरांची हानी होते.
त्यातही कामाचा उरक व्हावा या हेतूने अवजड पोकलँडसारख्या यंत्राचा वापर करण्यात येतो. अशा यंत्रांच्या हादऱ्याने मूळातच मातीमिश्रीत टेकड्या खिळखिळ्या होतात. भेगा रूंद होत जातात. त्यात सांडपाणी आणि पावसाचे पाणी या भेगांना आणखी रूंदावतात. परिणामी टेकड्या, कडे कोसळत राहतात. जोशीमठ भागातच ५२० मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत मोठा बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. या बोगद्याच्या कामामध्ये टीबीएम (टनेल बोअरिंग मशीन) तंत्राचा वापर करण्यात येत आहे. या तंत्रामध्ये स्फोटकांचा वापर करण्यात येत नसल्याने जोशीमठवर परिणाम होणार नाही, असा तंत्रज्ञांचा दावा होता. मात्र २००९ मध्ये ११ किलोमीटर काम झाल्यावर प्रथम हे मशीन पहिल्यांदा बोगद्यात अडकले. आजपर्यंत अनेकदा हे यंत्र बोगद्यात अडकले. याचाच अर्थ वरचा डोंगर स्थीर नाही. तरीही २०२० पर्यंत बोगद्याचे काम सुरूच ठेवण्यात आले होते. त्याचप्रमाणे हेलांग मारवाडी बायपास रस्त्याचे बांधकामही सुरू होते. स्थानिकांचा या प्रकल्पांना विरोध आहे. आज, हे काम तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुन्हा नवी समिती गठीत करण्यात आली आहे.
मात्र आता वेळ निघून गेली आहे. कलियुगात जोशीमठ दिसणार नाही, असा उल्लेख एका पुराणात असल्याचे सांगण्यात येते. आज जोशीमठची ही अवस्था निसर्गापेक्षा मानवी विकासाच्या अविचारी संकल्पनामुळे झाली आहे. निसर्गातील अमानवी हस्तक्षेपामुळे झाली आहे. महाराष्ट्रातील कोकणाबाबतही हा एक इशाराच आहे, हे ओळखून विकासकामे व्हायला हवीत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.