November 21, 2024
Nandkumar Kakirde article on Chat GPT Hacking
Home » हॅकिंगच्या विळख्यात “चॅट-जीपीटी” चे वापरकर्ते
संशोधन आणि तंत्रज्ञान

हॅकिंगच्या विळख्यात “चॅट-जीपीटी” चे वापरकर्ते

कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधरित “चॅट जीपीटी” सारख्या सुविधा तुम्ही वापरत असाल तर तुमचे अकाउंट हॅक होऊन त्यातून सर्व गोपनीय माहिती विकली जात असल्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. भारतासह जगभरातील किमान १ लाख व्यक्तींची खाती “हॅक ” झाल्याची धक्कादायक माहिती आहे. जागतिक हॅकर्सने “चॅट जीपी टी ” द्वारे घातलेल्या गोंधळाचा घेतलेला हा आढावा. त्याच्या वापरकर्त्यांसाठी हा सावधगिरीचा इशारा ठरावा.

प्रा. नंदकुमार काकिर्डे,
ज्येष्ठ अर्थविषयक पत्रकार, पुणे

गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातील संगणक आणि इंटरनेट यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असलेल्या सारख्या “चॅट जीपीटी” सारख्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. जी मंडळी या चॅट जीपीटी चा राजरोसपणे किंवा बिनधास्तपणे वापर करत आहेत त्यांची संगणकातील गोपनीय, व्यक्तिगत माहिती चोरून अन्य कोणाला विकली जात असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.

नोव्हेंबर 2022 मध्ये संपूर्ण जगाला आश्चर्याच्या धक्का देणारी घटना घडली. ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून “ओपन ए आय” कंपनीने चॅटबॉट सुविधा विकसित करून “चॅट जीपीटी” तंत्रज्ञान व्यापारी तत्वावरील वापरासाठी बाजारात सादर केले. या चॅट जीपीटीचे वैशिष्ट्य असे आहे की त्याचा वापर करणाऱ्याला कोणत्याही विषयावरील माहिती संभाषण केल्यासारखी उपलब्ध होते. त्याला कोणतीही मर्यादा नाही, जगातील कोणत्याही विषयाचे वावडे नाही. तसेच त्यात उपलब्ध होणारे तपशील, त्याची पद्धती, भाषा याचे कोणतेही बंधन नाही. कोणत्याही विषयावरील लेख, संवाद, काव्यरुप तेथे उपलब्ध होते. मानवी बुद्धिला विचार किंवा आपल्या सर्जन शीलतेला मागे टाकणाऱ्या कोणत्याही गोष्टी या कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून विनाविलंब सहजगत्या उपलब्ध होतात. अभ्यासातील अवघड गणिते, कोडी, त्यांची उत्तरे, निबंध, लेख या सुविधा यात मिळतात.

अगदी संगणक प्रणाली म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगही येथे क्षणार्धात मिळते. त्यामुळे जानेवारी 2023 मध्ये चॅट जीपीटी ही जगभरातील ग्राहकांनी सर्वाधिक वापरलेले, सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले ‘सॉफ्टवेअर’ ठरले होते. यावेळी जगातील किमान १० कोटी व्यक्ति त्याचा दररोज मुक्तपणे वापर करीत होते. तर दररोज किमान वीस लाख व्यक्ति त्यास भेट देत होते. त्याच्या विक्रीमुळे ओपन एआय चे बाजारमूल्य तब्बल 29 बिलीयन डॉलर्सवर गेले. हे अभूतपूर्व यश पाहिल्यावर त्याला अनेक स्पर्धकही बाजासत आले. त्यात गुगल, मेटाव्हर्स यांनी त्यांच्या स्पर्धक सुविधा बाजारात आणल्या. फेब्रुवारी 2023 मध्ये दरमहा केवळ वीस डॉलर इतकी रक्कम देऊन ( म्हणने आपले 1700 रुपये ) खर्च करून त्याचा सुलभ वापर करता येऊ लागला. त्यात सतत विविध मूल्यवर्धित भर पडत गेली. अनेक भाषात ही सुविधा उपलब्ध झाली.

हे तंत्रज्ञान नवीन असल्यामुळे ग्राहकांना नादास लावण्यासाठी प्रारंभी मोफत सेवा देण्यास प्रारंभ केला. नंतर थोडे शुल्क घेऊन त्याचे ग्राहक जगभर भराभर वाढत राहिले, त्यामुळे आज जगात अक्षरशः कित्येक लाख लोक या चॅट जीपीटी चॅट बॉट चा मनसोक्त वापर करत आहेत. ग्रुप आयबीने याबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे की एशिया पॅसिफिक, मध्यपूर्व आफ्रिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये चॅट जीपीटीची सुविधा वापरली जात आहे. मात्र संगणकावरील वापरकर्त्यांची संगणकावरील माहिती चोरण्यात आली असून ती डार्क वेब वर विकण्यासारखी उपलब्ध करण्यात आली. यामध्ये चॅट जीपीटी वापरणाऱ्या व्यक्तींचे ईमेल, वेब ब्राउझर , मेसेजेस गेमिंग सर्विसेस, क्रिप्टो करन्सी बॅलन्स व अन्य माहिती चोरण्यात आलेली आहे. या माहितीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान किंवा फटका बसण्याची शक्यता वाढली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून जी मंडळी व्यवसायातील अत्यंत गोपनीय माहिती बँकांची खाती किंवा पैशांचे व्यवहार याबाबत माहिती( विदा) (डेटा) ठेवत असतील त्यांना याचा नक्की मोठा धोका निर्माण झालेला आहे.

सिंगापूर मधील “ग्रुप आयबी” या संस्थेने अलीकडेच या हॅकिंग बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जागतिक पातळीवर “चॅट जीपीटी ” सुविधेचा वापर करणाऱ्या एक लाख पेक्षा जास्त व्यक्तींची खाती हॅक करण्यात आली असून त्यांची सर्व माहिती व्यक्तिगत माहिती, तपशील चोरून त्याची विक्री करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये भारतातील किमान 12 हजार पेक्षा जास्त व्यक्तिंची खाती हॅक करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भारता खालोखाल पाकिस्तान मधील 9 हजार खाती हॅक करण्यात आली. या हॅकिंग साठी रॅकून ( Raccoon), विदार ( Vidar) आणि रेड लाईन (Red line) अशी चोऱ्या करणारी मालवेअर म्हणजे संगणक प्रणाली प्रामुख्याने वापरण्यात आली आहेत. साधारणपणे जून 2022 ते मार्च 2023 दरम्यान हे हॅकिंग राजरोसपणे झाले. मात्र चॅट जीपीटीचा वापर करणाऱ्या कोणालाही याची कल्पना आली नाही . भारतीयांनाच या चोरीचा मोठा फटका बसलेला आहे. अन्य देशांचा विचार करता पाकिस्तानात 6 हजार 500; इजिप्त 4 हजार 500; अमेरिका जवळपास 3 हजार; फ्रान्स 2 हजार 900; इंडोनेशिया 2 हजार 555; बांगला देश 2 हजार 463 इतकी खाती हॅक करण्यात आली. मध्यपूर्व, आफ्रिका व युरोपातील हजारो व्यक्तींची खाती हॅक करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे चेक पॉईंट रिसर्च
( सीपीआर) या संस्थेनेही या हॅकिंग बाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येऊन त्यात हॅकिंग ची महिती देण्यान आती

एका ज्येष्ठ संगणक तज्ञाने याबाबत आणखी माहिती देताना असे सांगितले की चॅट जीपीटी बरोबर संवादातून माहिती गोळा करत असतानाच हॅकर्सनी अनेक व्यक्तींची किंवा त्यांच्या कंपनीची गोपनीय संवेदनशीत माहिती चोरली असून त्याची विक्री केली आहे. चॅट बॉट द्वारे दिली जाणारी माहिती अचूक नाही व नसते. मात्र कोणतेही निर्बंध या प्रणालीवर नाहीत. एकंदरीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्याच्या विविध सुविधा वापरणे हे जास्तीत जास्त धोकादायक बनत चालले आहे. त्यामुळेच त्याचा वापर करणे हे सुरक्षित राहीलेले नाही याची गंभीर नोंद सर्व वापरकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading