April 24, 2024
Navratra Ghatsthapana article by Pushpa Varkhedkar
Home » जगाचे उत्पत्ती स्थान म्हणजेच आदिशक्ती
मुक्त संवाद

जगाचे उत्पत्ती स्थान म्हणजेच आदिशक्ती

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते |
आज नवरात्रीस प्रारंभ.
या नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना केली जाते.

सौ. पुष्पा सुनीलराव वरखेडकर
माजी पर्यवेक्षिका ,पी. डी. कन्या शाळा, वरूड

शक्तीची अनेक रूपे आपल्याला पहावयास मिळतात. जगदंबा, काली, दुर्गा, लक्ष्मी, भवानी, अंबा, शारदा, सरस्वती, इत्यादी जेव्हा जेव्हा समाजामध्ये दुष्ट प्रवृत्तीचे लोक राक्षसी, आसुरी स्वभावांच्या लोकांचे प्राबल्य वाढते, तेव्हा तेव्हा या शक्तींनी त्यांचा संहार केला. या शक्तींनी त्यांचा संहार करून सामान्य जीवांना निर्भय केले. जगाची उत्पत्ती स्थान म्हणजे शक्ती हिला आदिशक्ती म्हणतात.

ही शक्ती जगाचे पालन करणारी, दुःख, शोक, भय व क्लेशाचा नाश करणारी आहे. जीवनातील कलह, दारिद्र्य, दैन्य दूर करणारी आहे. ही ब्रह्माचे रूप आहे. जगाला धारण करणारी आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ती बुद्धि प्रदान करते. जीवनाला प्रकाश देणारी, गती देणारी शक्ती आहे. सतत प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्यास ती एक सरस्वतीची साधना होईल.

तिचं कार्य काय आहे?

हा आढावा आपण घेतला आहे. तिचा हातामध्ये असणारी आयुध व वाहन आणि तिची मांडलेली आरास याचा अर्थ आपल्या जीवनाशी निगडित आहे. त्यातून आपल्याला काय सुचवते? याबद्दल थोडक्यात विचार करूया. हिच्या हातामध्ये पुस्तक आहे, चार वेदाला प्रसवणारी आहे, विद्यादात्री आहे. विद्येची उपासना केल्यास मनुष्य ज्ञानमय होतो हे त्यावरून सुचित करण्यात येते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हिनेच निर्माण केले आहे. एका हातामध्ये विना आहे. याला नादब्रह्म म्हणतात. अंगावरील श्वेत वस्त्र शांततेचे प्रतीक आहे. तिचे वाहन हंस आहे. या शारदा देवीचे ध्यान केल्यास आनंदाची निर्मिती होते. गायत्री देवीचे आगमन झाल्यास सर्वत्र मांगल्याचे, पावित्र्याचे वातावरण निर्माण होते.

भावभक्तीचा फुलोरा फुलून येतो. ती अमृताचा वर्षाव करणारी आहे. तिची काया सुवर्णासम आहे व ही वायुमंडलामध्ये विहार करणारी आहे. हिला कामधेनु सुद्धा म्हणतात. हिची आराधना केल्यास इच्छित फळ देणारी आहे. परंतु त्या साधनेकरिता भक्ताला विधीयुक्त, परिश्रमयुक्त, भावपूर्ण, श्रद्धापूर्ण, विश्वासयुक्त ही साधना केल्यासच फल देणारी आहे. जर श्रद्धा नसेल तर ती फलदायक ठरणार नाही. बुद्धीच्या कसोटीवर प्राप्त होणार दैवत नाही. तर प्रेमपूर्ण, भक्तीपूर्ण आराधना केल्यास त्याची फलप्राप्ती होईल. आपल्याला ज्या क्षेत्रात नैपुण्य मिळवायचे आहे त्यासाठी अथक परिश्रम करणे आवश्यक आहे. शिव व शक्ती यावर सर्व ब्रम्हांडाचा खेळ आहे. फक्त बुद्धीच्या भरवशावर आपलं ऐहिक जीवन संपन्न होणार नाही. तर शक्तीचीही आवश्यकता आहे.

घटस्थापना का करावी ?

घट म्हणजे आपले शरीर. पाणी, दिवा, याचा आपल्या शरीराशी संबंध आहे. आपले शरीर पाच तत्त्वांनी बनले आहे. त्या सर्वांच स्मरण करणे म्हणजे घटस्थापना होय. दिवा हे तेजाच प्रतीक आहे व ज्ञानाच प्रतीक आहे. घट्ट मृत्तीके पासून बनला आहे. म्हणजे शरीरात पृथ्वी तत्व आहे. त्यातील पोकळी म्हणजे आकाश व पाणी आप तत्व, वायु तत्व आपल्या शरीरात आहे. घटाभोवती असणारी हिरवळ समृद्धीचे प्रतीक आहे. तिच्या हातामध्ये असणारी जपमाळ म्हणजे ध्यास. जीवनात आपल्याला कोणतेही उद्दिष्ट गाठायचे असेल तर निरंतर ध्यासाची आवश्यकता आहे ते जपमाळ सुचित करते. कमळाचे फुल म्हणजे ज्ञानाचा सुगंध समाजात वाहून नेण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे किंवा ज्ञान संपादन करायचे संकेत देत आहे.

अशा या गायत्री देवीचे ध्यान केल्यास सुखाची निर्मिती होते. तिचे स्वरूप सत-चित-आनंद असे आहे. तिचे ध्यान केल्यास दुःख नाहीशे होते व सुखाची निर्मिती होते. आळस, पाप, अविद्या नाहीशी होते. ती सृष्टीचे बीज आहे. जगाची जननी सर्वांचे कल्याण करणारी आहे. तिचे ध्यान ब्रम्हा, विष्णू, महेश करतात. शरीरातील कुंडलिनी जागृत करण्याचे काम ती करते. या नवरात्रीमध्ये जर उपासना केली तर गायत्री देवी आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, दैन्य कलह, अज्ञान, विकार नष्ट करून सुख, आनंद, वैभव निर्माण होईल व आपले जीवन प्रकाशमय, ज्ञानमय, सुखमय होईल.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात
आता अभिनव वाग्विलासीनी|
जे चातुर्यार्थ कलाकामिनी|
ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया|

चौदा विद्यांच्या व चौसष्ट कलांच्या क्षेत्रात विहार करणारी अशी शारदा विश्वाला मोहून टाकणारी आहे.

Related posts

बावधन यात्रेतील बगाड…(व्हिडिओ)

सक्युलंटची काळजी कशी घ्यायची ?

मानवता धर्माची गरज

Leave a Comment