धर्माची बैठक ही अहिंसेवर आधारित आहे; पण सध्या धर्मातच हिंसा सांगितली जात आहे, असे सांगून माणसांची मने भ्रमित केली जात आहेत. यासाठी संतांच्या विचारांचे चिंतन, मनन, अभ्यास करायला हवा. धर्मात कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत, हे जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञानी संतांचे यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार ।
कुचंबैल केंसर । इया शंका ।। २४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – अथवा भ्रमर जसे कमळावर, कमळांतील बारीक तंतु चुरगळतील या शंकेने नाजूक रितीने पाय ठेवतात.
माणसांच्या मनातील राग, द्वेषातून हिंसा घडते. स्वार्थ, लोभामुळे मन अस्थिर होते. या अस्थिरतेतूनच मन भरकटते. नव्या पिढीत अस्थिर मनामुळे हिंसेचे प्रमाण वाढत आहे. दहशतवाद, नक्षलवाद यांसारख्या हिंसक प्रवृत्ती वाढत चालल्या आहेत. समाजातील असमानताही यासाठी तितकीच कारणीभूत आहे. असमानतेतून होणाऱ्या शोषणाने हिंसक वृत्ती बळावत आहे, पण या हिंसेवर अहिंसेच्या मार्गानेच मात करता येते. सात्त्विक विचारांची बैठक मनातील हिंसक प्रवृत्ती शांत करू शकते. यासाठी समाजात सात्त्विक वृत्ती वाढविण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे.
धर्माची बैठक ही अहिंसेवर आधारित आहे; पण सध्या धर्मातच हिंसा सांगितली जात आहे, असे सांगून माणसांची मने भ्रमित केली जात आहेत. यासाठी संतांच्या विचारांचे चिंतन, मनन, अभ्यास करायला हवा. धर्मात कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत, हे जाणून घ्यायला हवे. आत्मज्ञानी संतांचे यासाठी मार्गदर्शन आवश्यक आहे.
रस शोषताना भुंगा सुद्धा कमळाला इजा होणार नाही, इतक्या हळुवारपणे त्यावर पाय ठेवतो. इतकी सात्त्विक वृत्ती त्याच्यामध्ये असते. मग माणसामध्ये ही वृत्ती का वाढू नये ? यासाठी प्रयत्नच केला नाही, तर कसे शक्य होईल? भरकटलेली मने बदलायला हवीत. मने बदलूनच हिंसेवर विजय मिळवता येईल. भ्रष्टाचारी, गुंड वृत्तीच्या लोकांना शासन हे व्हायलाच हवे, पण त्याबरोबर त्यांच्यातील दुष्ट प्रवृत्तीही नष्ट करायला हवी. मनातील दुष्ट विचार नाहीसे झाले, तर हिंसक घटना निश्चितच कमी होतील. समाजात सुख-शांती नांदेल.
साधनेसाठीही मन स्थिर असणे आवश्यक असते. अस्थिर मनाला अहिंसेच्या विचारांनी स्थिर करायला हवे. अहिंसेच्या विचार संस्कारामुळे मनातील हिंसकवृत्ती कमी होऊन मनातील राग, द्वेष दूर होतात. साधना करताना अनेक विचार मनात घोळत राहातात. अनेक शारीरिक अडचणी होत राहातात. त्रासाने मन अस्थिर होते. यावर अहिंसेच्या विचाराने याकडे पाहून विरोध न करता सहनशिलता ठेवून या त्रासाचा अनुभव घेऊन मन पुढे चालते ठेवावे. अशा अनुभुतीने मनात अहिंसेचा सात्विक विचार वाढून अध्यात्मिक प्रगती होत राहाते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.