April 1, 2023
Home » काय प्रकल्प प्रकल्प करत बसलाय ! पर्यटन एके पर्यटन करा !
पर्यटन

काय प्रकल्प प्रकल्प करत बसलाय ! पर्यटन एके पर्यटन करा !

रायगडमधील सर्व नद्यांतून काळं पाणी वाहतंय. ट्रेनमधून जाताना डोकावून चुकचुकता ना ? मग असाच विकास अपेक्षित असेल तर मग काय बोलणार ? विकास म्हणजे नेमका कसा हवाय ? याचा विचार करा एकदा !

अभिजीत नांदगावकर

आपल्याकडे आहे त्याला खतपाणी घालून न वाढवता, विकासाच्या नावावर नको ते स्वीकारून आहे ती संपन्नताही भविष्यात धोक्यात आणण्याची किंवा नष्ट करण्याची तयारीच सध्या कोंकणात विशेषतः रत्नागिरीत सुरू आहे. फक्त “पर्यटन” हा एकच विषय हाती घ्या आणि प्रत्येकाला विविध अंगाने उद्योग प्राप्त होईल. पण “नोकरी म्हणजे विकास” हा मूर्खपणाचा समज आपल्या डोक्यात बसला आहे किंवा बसवला गेला आहे. स्वतःचा विचार करण्याची क्षमता आपण गमावून बसल्यासारखे आहे किंबहुना तुम्हाला विचार करायलाच दिला जात नाहीये.

रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दान दिलेय. संपन्न बनवलेय. पण कस्तुरी मृगाला स्वतःकडील कस्तुरी समजत नाही, तशी रत्नागिरीकरांची अवस्था आहे. तो एक प्राणी आहे पण तुम्ही तर माणसे आहात ना? तुम्हाला ही संपन्नता दिसत नाही?

“पर्यटन आणि फक्त पर्यटन” इतकाच विषय हाती घेऊन त्यानुसार रत्नागिरीचा विकास करा. पिढ्यानपिढ्या पोसल्या जातील आणि आहे ती संपन्नता भविष्यात शेकडो पटीने वाढेल. जी पुन्हा पर्यटन वाढीसाठी उपयुक्तच ! अनेक देश आहेत जे केवळ पर्यटनावरच आपली उपजीविका करतायत आणि जगभर प्रसिद्ध आहेत. इंटरनेटवर याचा शोध घेतला तर एका क्षणात तुम्हाला सगळी माहिती धाडधाड उपलब्ध होईल. पण आपण आपल्याला फक्त काहींना नोकऱ्या मिळाल्या की विकास असेच डोक्यात बसलेय. 

रिफायनरी आली की त्यासोबत इतर प्रकल्प येतील अशी भाबडी आशा सर्वांना आहे. पण त्यासोबत येणारे प्रकल्प कसे असणार याचा कुणीही विचार करत नाही. रायगडमधील सर्व नद्यांतून काळं पाणी वाहतंय. ट्रेनमधून जाताना डोकावून चुकचुकता ना ? मग असाच विकास अपेक्षित असेल तर मग काय बोलणार ? विकास म्हणजे नेमका कसा हवाय ? याचा विचार करा एकदा !

पर्यटन विकासाद्वारे तुम्हाला आहे ते टिकवून, उलट अधिक संपन्न करून प्रत्येक घर संपन्न होईल. काय नाहीये रत्नागिरीत ? सर्वांग सुंदर समुद्रकिनारे ! अगदी मोजक्या अंतरावर ! ऐतिहासिक वास्तू, धार्मिक वास्तू, जागतिक स्तरावर अनन्य साधारण महत्व असणारी कातळशिल्पे, काजू, आंबा, मासे, वैविध्यपूर्ण – वैशिष्ट्यपूर्ण कोंकणी मेवा, विस्मयकारक जैवविविधता, जीवसंपन्नता, पशुपक्ष्यांची मांदियाळी, चैतन्यपूर्ण ग्रामीण जीवन…एक ना अनेक ! पावसाळी, हिवाळी व उन्हाळ्यात असे तिन्ही हंगामातील पर्यटन विकसित करता येईल. फक्त हे आपल्याला दिसत असून आपण आंधळे असल्यासारखे आहोत. हे कळण्यासाठी डोक्याला विशेष ताण देण्याची किंवा तुम्ही यातील तज्ञ असण्याची गरज नाही. मीही कुणी तज्ञ नाही किंवा या गोष्टी लक्षात येण्यासाठी प्रगल्भ विचारांचा व्यक्ती नाही. आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हे, फक्त आपल्याला दिसायला हवेय. ती दृष्टी येण्याची गरज आहे. 

विकासाच्या नावाखाली येणारे आणि आहे ती संपन्नता नष्ट करणारे प्रकल्प येऊन काहीही विकास होणार नाही. त्यापेक्षा आहे ते तसंच राहिले तरी चालेल! काहीही करू नका..हळूहळू सोशल मिडियावरून, तसेच आपल्याकडील युवावर्ग यांना हळूहळू ही दृष्टी येऊ लागलेय. ते याचं महत्त्व अधिक जाणतील, यातून रोजगार उपलब्ध करतील. पर्यटकांना आकर्षित करतील. तसेही आता महामार्गाचे चौपदरीकरण होतेयच. ते पूर्ण झाल्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक आपोआप इथं येईल. 

इतकी वर्ष गणपतीपुळे येथे लाखोंच्या संख्येने येणारा पर्यटक आपण साधा रत्नागिरी शहरात वळवू शकलो नाही, 70 टक्के पर्यटक शहरात न येता गणपतीपुळेतून माघारी जातो. त्याला तिथं रत्नागिरीतील पर्यटनस्थळांविषयी आपण माहिती देऊ शकलो नाहीत किंवा गणपतीपुळेतीलही व्यावसायिकता देऊ शकत नाहीत, ही उदासीनता आहे ! गोवा अगदी तीन चार तासांवर आहे. येथे येणारा पर्यटकही आपण आपल्याकडे आणू शकत नाही !!! यासारखी खेदाची बाब नाही ! हा परदेशी पर्यटक आला तर परदेशी चलनही येईल. या परदेशी पर्यटकांना जशा सुविधा द्याल त्याच दर्जाचा पर्यटक इथे येईल, त्यामुळे त्यानुसार निर्बंध हवेतच !

काय म्हणून आपण प्रकल्प, प्रकल्प करत बसलोय कळत नाही ! पर्यटन, इथल्या फळप्रक्रियांशी संबंधित प्रकल्प आपण अद्याप उभारू शकलो नाहीत, मत्स्य विषयक, कृषी विषयक…किती प्रकारे विकास करता येईल, किती विविध व्यवसाय, उद्योगांची, त्याला पूरक उद्योग-व्यवसायांची दारे युवा, ज्येष्ठ वर्गाला त्याच्याच गावात उघडतील. हे कुणी तज्ञांनी सांगण्याची गरज नाही. पण आपण कर्मदरिद्री आहोत, असं म्हणावं लागेल. आपल्याला यातील काही करायचे नाहीये, फक्त काही मोजक्याना दहा बारा हजाराच्या नोकऱ्या मिळाल्या की आपला विकास झाला, असं समजतोय. झटका डोळ्यावर आणलेली झापड आणि यादृष्टीने विचार व्हायला सुरुवात होऊदे.

याचबरोबर तज्ञ व्यक्ती सुद्धा विनाशकारी प्रकल्पांच्या बाजूने उभे राहतात तेव्हा आश्चर्य वाटते. या प्रकल्पांमुळे आपल्या हाती काही लागणार नाही, तुमच्या जीवावर इतर पोसले जाणार आहेत. जे कोंकण रेल्वेचे झालेय. त्यामुळे तज्ञांनी आपल्या पुढ्यात परमेश्वराने वाडलेले पंचपक्वान्नाचे ताट आपल्या लोकांना दाखवावे, इतकीच अपेक्षा !

Related posts

आयुर्वेदातील वैद्यांना वनसंवर्धनाची सक्ती करण्याची गरज

जमिनीची जलसंधारण क्षमता वाढवण्यासाठी…

गाईच्या शेणापासून उत्पादित विषाणूरोधी घटक रोखते वस्त्रावर विषाणूंची वाढ

Leave a Comment