June 6, 2023
dr-v-n-shinde-article-on-road-traffic-and-environment
Home » रस्ते, रहदारी आणि पर्यावरण !
विशेष संपादकीय

रस्ते, रहदारी आणि पर्यावरण !

वाहतूक खोळंबण्याचे एकमेव कारण वाहन चालकांनी लेनची शिस्त न पाळणे आहे. वाहने आपल्या लेनमधून चालवली तर निश्चितच वेळ, इंधन वाचेल, पर्यावरणाचे नुकसान टळेल. नाही पाळली तर रस्ता सहाच काय दहा लेनचा केला, तरी हाच अनुभव काही वर्षांत येईल! प्रत्येकाने रस्त्यावर शिस्त पाळून पर्यावरण वाचवले पाहिजे.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

भारत विकसनशील देश आहे. भारतात मोठी बाजारपेठ आहे. ‘खाऊजा’ म्हणजेच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा स्वीकार केल्यानंतर देशातील सर्वसामान्यांकडे पैसा खेळू लागला. ‘खाऊजा’ संस्कृतीपूर्वी लुनासारखी दुचाकी घेण्यासाठी काही महिने प्रतिक्षा करावी लागायची. मात्र खाऊजानंतर लोकांच्या हाती पैसा येऊ लागला. लोकांना हवे ते, हवे तेथे, हवे तसे मिळू लागले. त्यामुळे देशाची वाटचाल निसर्गस्नेही चित्र बदलून, तंत्रस्नेही चित्राकडे सुरू झाली. इतकेच नाही तर आपण मिळवलेला पैसा आपणच खर्च करण्याची प्रवृत्ती वाढू लागली. आजचा विचार, जीवन महत्त्वाचे ठरू लागले. त्यामुळे भौतिक सुखासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून घेणे, त्यांचा वापर करणे ही संस्कृती बनली. हा बदल इतक्या झपाट्याने झाला की याचे काय परिणाम होणार आहेत, याचा विचार कोणीच केला नाही. नव्या संस्कृतीच्या उदयाचे दिवस इतके झगमगाटी होते की लोकांना दुसरे काही दिसतच नव्हते. ज्यांना जाणवत होते, त्यांनी बोलायचा प्रयत्नही केला. मात्र त्यांचा आवाज क्षीण होता.

याच नव्या संस्कृतीत वाहनांची संख्या झपाट्याने वाढली. देशाच्या एका कोपऱ्यात होणारे उत्पादन दुसऱ्या भागात पोहोचवण्यासाठी वाहने रस्त्यावर धावू लागली. पर्यटन वाढले. प्रवास आणि पर्यायाने प्रवासी वाढले. त्याचा ताण सार्वजनीक व्यवस्थेवर पडू लागला. लोकांहाती पैसा असल्याने वेळ, गर्दी टाळण्यासाठी खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. अर्थात वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनीक व्यवस्थेवरचा ताण काही कमी झाला नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी खाजगी वाहतुक यंत्रणा निर्माण झाल्या आणि रस्त्यावर वाहनेच वाहने दिसू लागली.

वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुक खोळंबा नित्याचे झाले. त्यासाठी रस्ते मोठे करणे अपरिहार्य असल्याचे तज्ज्ञांचे मत झाले. अर्थात खाऊजापूर्वी रस्ते एकेरी किंवा दुहेरी होते. ते चार लेनचे किंवा सहा लेनचे बनवण्यात आले. त्यासाठी शेती होत असलेल्या जमिनी पण वापरण्यात आल्या. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बनला. इतरही रस्ते मोठे झाले. रस्ता पूर्ण झाला की पुणे-मुंबई प्रवास केवळ तीन तासात, दोन किंवा अडीच तासात अशा घोषणा झाल्या. रस्ते तयार होताना जूनी झाडे तोडण्यात आली. त्याची भरपाई म्हणून नवीन झाडे लावली. वड, पिंपळ, पिंपरण, चिंच गेली आणि ॲकेशिया, पितमोहोर, गुलमोहोर, नीलमोहोर यांची गर्दी वाढली. झाडे लावली ती अशी मोठी होऊन फुलणार तोपर्यंत रस्ता आणखी मोठा करण्याची गरज भासू लागली. पुन्हा जमिनीचे संपादन आले. रस्त्याकडेची झाडे तुटू लागली. रस्ता मोठा झाला. शेतीचे क्षेत्र कमी झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून दुप्पट-तिप्पट किंमतही देण्यात आली.

मात्र शेतीचे क्षेत्र कमी झाले. हंगामी का होईना हिरवे रान ऑक्सिजन तयार करायचे ते थांबले आणि तेथे डांबर किंवा कॉंक्रिटचे रस्ते बनले. ते उन्हाची तिव्रता वाढवू लागले. रस्तेही ग्लोबल वॉर्मिंगला साथ देऊ लागले. हे सर्व अनावश्यक आहे का? तर, ‘विकास आणि देशहितासाठी आवश्यक’, असेच उत्तर द्यावे लागेल. तरिही या विषयावर लेख लिहिण्याचे कारण म्हणजे परवाचा मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास ! २००७ साली याच रस्त्यावरून पहाटे पाच वाजता निघाल्यानंतर अकरा वाजता कोल्हापूरमध्ये ऑफिसमध्ये येऊन काम केले होते. रस्ता तोच आहे. उलट मुंबई-पुणे रस्ता आणखी मोठा झाला. तेवढेच अंतर कापण्यास आज लागणारा वेळ मात्र सहा तासांऐवजी नऊ तास लागला. हा प्रवास करताना पुणे बायपासवर एका ठिकाणी दोन किेलामीटरचे अंतर कापण्यास दोन तासांचा वेळ लागला. रस्ता वाहतुक कुर्मगतीने सुरू होती. एकूण चित्राचे अवलोकन केले आणि अत्यंत विदारक चित्र दिसले.

रस्त्यावर जागोजागी अवजड वाहने तिसऱ्या लेनमधून चालवावीत असे फलक लावले आहेत. पहिले लेन केवळ आपले वाहन पुढे नेण्यासाठी वापरावे असेही लिहिले आहे. राहवले नाही आणि सूक्ष्म निरीक्षण सुरू केले. आजूबाजूला नजर जाईल तेथपर्यंतचे चित्र पाहताना, तेथे असणाऱ्या वाहनांत, पहिल्या लेनमध्ये जास्त संख्या अवजड वाहनांची होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या लेनमध्येही अवजड वाहने होतीच. त्यांचा वेग कमी होता. आजूबाजूच्या वाहनात पन्नास टक्के छोटी वाहने होती. मधूनच दुचाकीस्वार फट मिळेल तेथून आपले वाहन पुढे दामटवत होते. त्यांचा यामध्ये समावेश नाही. शून्य ते पाच किलोमीटर प्रतीतास वेगाने ही चारचाकी वाहने रांगत होती. तेथे असणाऱ्या वाहनांची सरासरी लांबी ही चार मीटर धरली, तर, त्या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर तीन लेनमध्ये मिळून एकावेळी, एका बाजूला दीड हजार वाहने होती. पुढचा कधी पुढे जाईल ते माहीत नसल्याने प्रत्येक वाहनाचे यंत्र सुरू होते. हा रस्ता कापण्यासाठी लागलेला वेळ हा दोन तास आठ मिनीटे होता.

यातील केवळ छोट्या वाहनांचे यंत्र सुरू असले तरी, तासाला दीड ते दोन लिटर इंधन लागते. मोठ्या वाहनाला चार ते पाच लिटर इंधन लागते. मोठे टँकर किंवा बारा चाकांपेक्षा जास्त्‍ा चाकाचे वाहन आणखी इंधन जास्त वापरते. त्यातही गाडी गिअरवर असेल तर आणखी जास्त इंधन लागते. त्यामुळे सरासरी प्रत्येक तासाला एका वाहनाला एका तासाला लागणारे इंधन तीन लिटर पकडले तर दिड हजार वाहनांचे दोन तासात नऊ हजार लिटर इंधन केवळ दोन किलोमीटरच्या रस्त्यावर जळले. त्यामुळे तयार होणारी ऊष्णता त्याच भागात राहते. हवेबरोबर आजूबाजूच्या भागावर परिणाम करते. इंधन जळताना तयार होणारी प्रदुषके त्याच भागात जास्त तिव्रतेने असतात.

जर लेनची शिस्त पाळली असती, तर वाहने खोळंबली नसती. ती त्यांच्या नियमीत वेगाने गेली असती, तर त्यादिवशी जेवढे इंधन जळाले त्याच्या एक विसांश इंधनाची गरज भासली असती. छोट्या वाहनांची वीस किलोमीटर प्रतीलिटर सरासरी मिळते. वाहनाच्या यंत्राची ताकत जितकी जास्त तितके जास्त इंधन जळते. प्रदूषण, तापमान वाढ, लोकांचे आरोग्य, वाहनाची कार्यक्षमता, वेळ या सर्वांवर इंधन जास्त जळाल्याने परिणाम होतो. आपण मात्र वाहतूक खोळंबण्याचे मुख्य कारण दूर न करता, रस्ता मोठा करतो.

वाहतूक खोळंबण्याचे एकमेव कारण वाहन चालकांनी लेनची शिस्त न पाळणे आहे. वाहने आपल्या लेनमधून चालवली तर निश्चितच वेळ, इंधन वाचेल, पर्यावरणाचे नुकसान टळेल. नाही पाळली तर रस्ता सहाच काय दहा लेनचा केला, तरी हाच अनुभव काही वर्षांत येईल! प्रत्येकाने रस्त्यावर शिस्त पाळून पर्यावरण वाचवले पाहिजे.

Related posts

पृथ्वीवर असा आघात होऊ नये यासाठी एक उठाठेव

बोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो

जलटंचाईचे  संकट गांभीर्याने घेण्याची गरज

Leave a Comment