March 29, 2024
Home » ज्ञानेश्वरीतील कृषिदर्शन
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीतील कृषिदर्शन

कीटकांचे जीवनचक्र कसे आहे याचा अभ्यास केल्यानंतर या ओवीचा अर्थ बोध होतो. किटकाच्या चार अवस्था असतात. या चार अवस्थामध्ये किटक काय खातो याचा अभ्यास त्याकाळात केला गेला होता हे स्पष्ट होते. आपल्या साधुसंतांनी या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला होता. ते सर्व टिपूण ठेवले होते.
–  राजेंद्र कृष्णराव घोरपडे, 
मोबाईल – 8999732685

संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माची गुपिते उलगडताना विविध उदाहरणे सांगितली आहेत. यात अनेक गोष्टींचा आधार घेतला आहे. विज्ञानातील काही उदाहरणे तर दिली आहेतच त्याबरोबर शेतीशी निगडीतही काही उदाहरणे सांगितली आहेत. अध्यात्म सांगताना समाज प्रबोधनाचेही महान कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे. सध्या भारतीय संस्कृतीला, परंपरेला नावे ठेवण्यात येतात. झपाट्याने बदलत चाललेल्या जगाचा वेग ही संस्कृती घेऊ शकत नाही असा अशी मतेही अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत. या संस्कृतीचा विचार आता सोडून दिला तरच आपण जगासोबत स्पर्धा करु शकू अन्यथा आपले भवितव्यही बिकट होईल अशी भीती दाखवली जात आहे. या अशा विचारांमुळे आपण आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहोत. पाश्चात संस्कृतीचे अनुकरण आपण करत आहोत. पण प्रत्यक्षात पाहिले तर आपण आपली संस्कृतीच योग्य प्रकारे अभ्यासत नसल्याचे दिसून येते. आपल्या संत महापूरषांनी सांगितलेली वचनेच आपण योग्य प्रकारे आत्मसात केलेली नसल्याने आपली पिछेहाट होताना दिसत आहे. 

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून अध्यात्मासह शेतीतील तंत्रज्ञानाबाबतही प्रबोधन केले आहे. आपल्या देशात बाराव्या शतकात ठिबक सिंचन होते. हे ज्ञानेश्वरीतील ओवीतून स्पष्ट होते. 
म्हणोनी जाण तेन गुरू भजिजे । तेणें कृतकार्या होईजे ।
जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।। २५ ।। अध्याय १ ला 

आपले जीव प्रफुल्लीत करण्यासाठी सद् गुरुंची उपासना करावी, सद् गुरुच अद्यात्मिक प्रगतीचे मुळ आहे.  यासाठी त्यांच्याच भक्तीची गरज आहे. तरच हा आत्मज्ञानाचा, परमार्थाचा वटवृक्ष जोमात वाढेल. हे सांगताना ज्ञानेश्वरांनी येथे झाडाला पाणी देताना ते त्याच्या मुळाशी द्यावे म्हणजे त्याची वाढ उत्तमप्रकारे होते असे उदाहरण दिले आहे. ठिबक सिंचनामध्ये आपण हेच तर करतो. म्हणजे त्या काळात हे ज्ञान अवगत होते. ठिबक सिंचनाच्या पद्धती त्या काळात वेगळ्या होत्या. मडक्याला छोटेसे छिद्र पाडून ते मडके झाडाच्या मुळा शेजारी पुरले जायचे. त्या मडक्यात पाणी घालून ते झाडाच्या मुळाशी देण्याची पद्धत त्या काळात होती. हा ठिबक सिंचनाचाच प्रकार आहे. म्हणजे हे तंत्र भारतात होते. या तंत्रज्ञानाबाबत संतांनी प्रबोधन केल्याचेही दिसून येते. 

पशू, पक्षी, किटक आदींचा बारकाईने अभ्यासही भारतीय संस्कृतीत केला गेलेला आढळतो. ज्ञानेश्वरांनी दिलेल्या विविध उदाहरणातून हेही स्पष्ट होते. 
देखे उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासिं झोंबे जैसा । 
सांगे नरू केवीं तैसा । पावे वेगां ।। 41 ।। अध्याय 1 ला

पक्षी फळ दिसले तर लगेच ते खाण्यासाठी जात नाही. प्रथम तो त्याचे निरिक्षण करतो. आसपासचा परिसर पाहातो. कोणी आहे का नाही याची खात्री करून घेतो. त्यापासून कोणता धोका आहे का हे ही पाहातो मगच तो खाण्यासाठी धावतो. या उदाहरणातून आपल्या संस्कृतीमध्ये पक्षांची निरिक्षणेही केली जात होती. त्याच्या प्रत्येक हालचालींचा अभ्यास केला जात होता. हे यातून स्पष्ट होते. 

पैं आघविया जगा जें विख । तें विख कीडिया पीयूख । 
आणि जगा गुळ तें देंख । मरण तया ।। 930 ।। अध्याय 18 वा

इतर जीवांसाठी जे विष आहे ते कीटकांचे खाद्य आहे. अशा किटकांना गुळा सारखे गोड पदार्थ हे विष ठरतात. कलमथ नावचे एक तण आहे. ते खाल्ल्याने जनावरे दगावतात. हे तण मेंढ्यांनी खाल्यास त्यांची लोकर गळते. या तणामुळे दुग्ध जनावरांची दुध उत्पादनाची क्षमता घटते. जनावरांचे वजन झपाट्याने कमी होते. 1944 मध्ये या तणाचा 30 देशामध्ये मोठ्या प्रमाणात प्राद्रुर्भाव झाला होता. त्यावेळी त्याचे नियंत्रण जैविक पद्धतीने करण्यात आले. हे तण इतरांसाठी विष जरी ठरत असले तरी त्यावर काही किटक जगत होते. त्या किटकांनी हे तण नष्ट केले. संशोधकांनी 1950 मध्ये हे तण खाणारे बिट्टल्स सोडून हे तण नष्ट केले. हे आत्ताच्या अलिकडच्या 19 व्या शतकातील उदाहरण आहे. पण पूर्वीच्या काळी आपल्या भारतदेशात असे प्रयोग आपल्या सांधुसंतांनी केले आहेत. ज्ञानेश्वरांनी 12 व्या शतकात लिहिलेल्या या उदाहरणावरून स्पष्ट होते. 

एके पवनेंची पिती । एकें तृणास्तव जिती । 
एकें अन्नाधारें राहती । जळें एकें ।। 38 ।। अध्याय 7 वा

कीटकांचे जीवनचक्र कसे आहे याचा अभ्यास केल्यानंतर या ओवीचा अर्थ बोध होतो. किटकाच्या चार अवस्था असतात. या चार अवस्थामध्ये किटक काय खातो याचा अभ्यास त्याकाळात केला गेला होता हे स्पष्ट होते. आपल्या साधुसंतांनी या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला होता. ते सर्व टिपूण ठेवले होते. सर्व अंगानी दूरदुष्टीने आपली विधाने मांडली होती. याचे फायदे तोटे अभ्यासले होते. त्यातून कशा प्रकारे प्रबोधन करायला हवे याचाही अभ्यास केला होता. ज्ञानेश्वरांनी दिलेल्या अशा अनेक उदाहणातून हे स्पष्ट होते. आपले साधूसंत हे खरे संशोधक होते. त्यांनी केलेला अभ्यास आपल्यासाठी आजही उपयुक्त आहे. आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. याचा विचार करून आपण आपल्या संस्कृतीला नावे न ठेवता त्याचा बारकाईने अभ्यास करायला हवा. आजच्या बदलत्या युगातही हे तत्त्वज्ञान आपल्यासाठी मार्गदर्शकच ठरणारे आहे. विकासाने वेग जरी पकडला असला तरी साधुसंतांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा बोधच या विकासाला चालना देऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे. 

बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामायें ।
ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाती न नशे ।। 59 ।। अध्याय 17 वा

माणसाचे त्रिगुण ही अनंत जन्मे जन्मांतरे झाली तरीही बदलत नाहीत हे सांगण्यासाठी माऊलीने बीजाचे उदाहरण दिले आहे. बीजापासून झाड होते त्या झाडापासूनच पुन्हा बीज मिळते. हे चक्र कोट्यावधी वर्षे चालत आले आहे.  यात पारंपारिक जातीच्या बीजाचा नाश कधीच होत नाही. पिकाच्या पारंपारिक जाती आता कालबाह्य होत आहेत. कारण त्याची लागवडही आता कमी झाली आहे या बरोबरच त्याचे बीजही आता साठवले जात नाही. पारंपारिक जातीच्या बीज संवर्धनाची गरज आहे. कारण संकरित बियाणे हे एकदाच उगवते. त्यापासून उत्पादित धान्य हे बीज नसते. त्याची लागवड करता येत नाही. पण पारंपारिक जातींमध्ये हे नसते, पण आता अशी बियाणे दुर्मिळ होऊ लागली आहेत. पारंपारिक जातीच्या संवर्धनासाठी गरज आहे.  संकर झाल्याने जाती नष्ट होत आहेत. पण या संकरित बियाण्याची चव, गुणवत्ता आणि पारंपरिक चव आणि गुणवत्ता यामध्ये मोठा फरक आहे. संरकित बियाण्यास आता चवच राहीली नाही संकरित बियाण्याची गुणवत्ताही थोड्या कालवधीने कमी होते. यातून देशी बियाण्यांचे संवर्धन का गरजेचे आहे हे ही स्पष्ट होते. 

नाना उंसाची कणसें । कां नपुंसके माणुसें ।
वन लागलें जैसें । साबरीचें ।। 576 ।। अध्याय 18 वा

उसाला तुरे लागायला सुरवात झाली तर त्या उसापासून साखर फारशी  मिळत नाही. तो ऊस निरपयोगी असतो. असे माऊलीने बाराव्या शकतात सांगितले आहे. नपुसक माणसे आणि वनात सांबरिचे झाडे हे बिनकामाचे आहे. तसे उसाला कणसे आल्यानंतर त्यातील साखरेचे प्रमाण घटते यासाठी उसाचे गाळप योग्य वेळी होण्याची गरज आहे. हे शेतीतील प्रबोधनचे आहे ना. संत ज्ञानेश्वरांनी त्या काळात प्रबोधनाचे मोठे काम केले. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत उदाहरणे देऊन अध्यात्माचे बीज रोवले. प्रबोधनही केले. 

Related posts

साहित्य सोनियाचिया खाणी । उघडवी देशियेचिया आक्षोणी । विवेकवेलीची लावणी । हों देई सैंधा ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

सद्गुरु अवधान पाहून मार्गदर्शन करतात

पिके, झाडांशी मैत्री केल्यास त्यांचीही भाषा समजते

Leave a Comment