३००० वर मराठी कवितासंग्रह संकलनाची लिम्का रेकॉर्डसकडून दखल
केवळ एक छंद म्हणून केलेल्या कवितासंग्रहाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्सने घेतली आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी डॉ. सुनील दादा पाटील यांनी सुरु केलेला हा उपक्रम दखलपात्र असाच आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल ९०११०८७४०६
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वेगवेगळ्यापातळीवर अनेकजण काम करत आहेत. भाषेचे संवर्धन व्हावे ही तळमळ त्यांच्यामध्ये आहे. याच तळमळीतून अनेकांनी वेगवेगळे उपक्रमही सुरु केले आहेत. काहीजण नवोदित लेखक, कवींना शोधून त्यांना व्यासपीठ देण्याचे काम करतात. तर काहीजण बोलींच्या संवर्धनासाठी लोकगीतांचा शोध घेऊन त्यावर काम करत आहेत. काही व्यक्तींनी वाचनसंस्कृती टिकावी, वाढावी या उद्देशाने छोटी छोटी ग्रंथालये सुरु केली आहेत. तेथे वाचनाचे उपक्रमही राबवितात. अशा व्यक्तींची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तरच भावीकाळात वाचनसंस्कृती टिकेल अन् मराठी भाषेचेही संवर्धन होईल. मराठी भाषा सुद्धा काही वर्षात लुप्त होईल अशी भीती भाषातज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यासाठी आत्ताच जागरूक होऊन काम करायला हवे. भाषा मरता संस्कृती अन् देशही मरतो असे कवी कुसुमाग्रजांनी सांगितले आहे. याची जाणीव ठेऊन कार्य करायला हवे.
मराठी भाषेत संवर्धनाच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने हा आमचा लेख प्रपंच सुरु आहे. जयसिंगपूर येथील ग्रंथमित्र आणि युवा प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी केवळ एक छंद म्हणून मराठी कवितासंग्रहाचे संकलन केले आहे. आज त्यांच्याकडे सुमारे तीन हजारावर कवितासंग्रह आहेत. त्यांच्या वैयक्तिक आंतरराष्ट्रीय कवितासंग्रह ग्रंथालयात त्याचे संवर्धन करून त्यांनी ठेवले आहे. त्यांच्या या कार्याची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे. या संदर्भातील सर्टिफिकेटली त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडून देण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्समध्ये लवकरच नोंदविली जाणार आहे.
लहानपणापासूनच डॉ. सुनील पाटील यांना कवितेची आवड आहे. स्वतःही ते कविता करतात. कवितेकडे वाचकांचे दुर्लक्ष होते. ग्रंथालयामध्येही कवितासंग्रहांना फारशी मागणी नाही. पुस्तक विक्रेतेही कविता संग्रह विक्रीस ठेवण्यावर नाराजी दर्शिवतात. अशामुळे नवोदित कवींना फारशी संधी उपलब्ध होताना दिसत नाही. कविता संग्रहांची खरेदीही केवळ प्रेमापोटी केली जाते. अशाने नवोंदित कवी हे दुर्लक्षित राहत आहेत. त्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशांनी त्यांनी अन्य कविंचे सुमारे १५० च्यावर कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत. यातूनच कवितेबाबत काहीतरी करावे या उद्देशाने त्यांनी कविता संग्रहाचे संकलन सुरु केले. आज त्यांच्याकडे मराठीतील तीन हजारावर कविता संग्रह आहेत. यामध्ये सुमारे ६० टक्के कवितासंग्रह हे नवोदित कवींचे आहेत.
लेखकांच्या स्वाक्षर्यांचा संग्रह सुद्धा त्यांनी केला आहे. लेखकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी घ्यायची. असा हा त्यांचा छंद एक दोन नव्हे तर तब्बल १०-१५ वर्षापासून अविरत सुरु आहे. लेखकांची स्वाक्षरी असलेली सुमारे १३८१ पुस्तके आज यांच्या संग्रहात आहेत. ‘बुके नव्हे बुक द्या’ असा उपक्रमही राबवून समाजात पुस्तकाबाबत जागृती करण्याचेही ते काम करतात. कवितासागर प्रकाशन नावाने त्यांनी प्रकाशन संस्थाही सुरु केली असून त्यातून त्यांनी नवोदित लेखक-कवींना व्यासपीठ दिले आहे. भाषेच्या संवर्धनाच्या उद्देशाने त्यांनी राबवलेले उपक्रम हे निश्चितच प्रशंसनिय आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.