October 15, 2024
Photo Feature and article by Amar Musale
Home » Privacy Policy » निर्भेळ…श्रावण.!!
फोटो फिचर

निर्भेळ…श्रावण.!!

प्रत्येक लहान थोरांकडून, निसर्गातील प्रत्येक घटकां मधून आपल्याला खूप गोष्टी शिकता येतात, त्यातून खूप निर्भेळ आनंद मिळतो, फक्त तो आपण कसा घेता किंवा देता येईल हे समजले व जमले की बस..!!

अमर शामराव मुसळे,
आकुर्डे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

श्रावण म्हणजे भुरभुरणारा पाऊस, मध्येच उन्हाची किरणे, क्षितिजावर झळकणारा इंद्रधनुष्य, दुथडी वाहणारे पाण्याचे झरे, नद्या व आजुबाजूला फक्त आणि फक्त पोपटी रंगाची उधळण….!! येणार्‍या गौरी गणपती व इतर सणांची चाहूल अणि बरेच काही.

भूतलावावरील प्रत्येक घटक हा या निसर्गाचाच भाग आहे. जो इथे जन्मला, तो इथेच याठिकाणी मिसळणार हा एक निसर्गनियम आहे. निसर्ग हा निर्भेळ आहे. त्याच्याशी समरस झाल्यावर तो देखील आपल्याशी हितगुज करतो, इतके साधे व सोपे गणित आहे. त्या संवादात आपल्याला देखील तितकेच निर्भेळ व समरस व्हावे लागते इतकेच..!

भौतिक व निसर्ग निर्मित आनंदाची सांगड कधीच व कुठेही बसू शकत नाही. ते समजण्यात गफलत झाली तर निर्भेळ आनंद हा शोधून देखील सापडणार नाही. श्रावणात पोपटी रंगांनी नटलेल्या डोंगर दऱ्या, भुरभुरणारा पाऊस, हळुवार वारा जो आत्मिक आनंद आपल्या आयुष्यात भरतो त्याचे मोजमाप कधीच होऊ शकत नाही. अर्थात त्यासाठी निर्भेळ व विकार विरहित मन सोबत असणे गरजेचे आहे.

माणसाचे वय, जबाबदार्‍या, प्राधान्य हे प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर बदलत असते. हेच आयुष्य आहे जे नाकारता देखील येत नाही पण, आपण या आयुष्याच्या व्यवहारात दिलखुलास, समरसून जगायचे मात्र विसरून जातो किंवा गेलो आहे…! भौतिक सुख म्हणजेच सुख हे समीकरण कुठेतरी चुकते आहे.

एक खूप वास्तववादी व सुंदर पुस्तक आहे “Top five regrets of the dying” जे Bronnie Ware या हॉस्पिटल मध्ये शुश्रूषा करण्याऱ्या एका नर्सने (Paliative care) तिच्या हॉस्पिटल मध्ये शेवटच्या घटका मोजणाऱ्या रुग्णाच्या शेवटच्या क्षणातील आठवणी वर लिहिले आहे. ज्यामध्ये प्रत्येक रुग्णाला त्यांच्या शेवटच्या क्षणी काही गोष्टींची खंत होती ती म्हणजे आपण आपले आयुष्य आपल्या अमुक अमुक पद्धतीने का जगले नाही…? ना की कुणाचीही ही ईच्छा नव्हती की मी अजून गाडी, बंगला, पैसे इत्यादी कमावले असते तर…? अर्थात भौतिक सुखाच्या मागे धावत असताना खर आयुष्यच जगायचे राहिले ही भावना त्या प्रत्येक रुग्णाच्या बोलण्यात होती.

असे म्हणतात की लहानपण व म्हातारपण हे दोन्ही अपेक्षाविरहित जीवनाच्या दोन अवस्था आहेत. लहानपण निष्पाप बाल्यावस्थेत असते तर म्हातारपण हे आयुष्य काय आहे हे समजल्यामुळे पुन्हा ते अपेक्षा विरहित बाल्यावस्थेकडे झुकते. तारुण्य हे संघर्ष, अस्तित्व, अपेक्षा, चढाओढ यामध्ये अक्षरशः अस्थिर, घायाळ होऊन जाते अनपेक्षितपणे, जाणते-अजानते पणे ते होरपळून निघते जे आपल्याला समजत देखील नाही.

कविवर्य सुधीर मोघे व हृदयनाथ मंगेशकर यांनी देखील त्यांच्या एका अजरामर गीतामध्ये खूप छान ओळी लिहिल्या आहेत….

बालपण उतू गेले,
अन् तारुण्य नासले…
वार्धक्य साचलेे
उरलो… बंदी पुन्हा..
दयाघना….!!!

माणूस हा नेहमीच ज्या त्या अवस्थेचा बंदिवान आहे हे सत्य नाकारता येत नाही आणि हेच वास्तव आहे..!!

जरी तारुण्यातील अपेक्षेच्या गर्तेत प्रत्येक जण सापडलेला असला तरी कधी कधी स्वतःच्या व इतरांच्या आनंदासाठी लहान व्हायला जमले पाहिजे. प्रत्येक लहान थोरांकडून, निसर्गातील प्रत्येक घटकां मधून आपल्याला खूप गोष्टी शिकता येतात, त्यातून खूप निर्भेळ आनंद मिळतो, फक्त तो आपण कसा घेता किंवा देता येईल हे समजले व जमले की बस..!!


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading