July 27, 2024
big-demand-for-cereal-crops-in-future
Home » भरडधान्य पिकांना भविष्यात मोठी मागणी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भरडधान्य पिकांना भविष्यात मोठी मागणी

भरडधान्य पिकांबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढविणे गरजेचे आहे. जागरूकता वाढल्याने या पिकांची मागणी वाढेल आणि परिणामी भरडधान्य पिके मुख्य पिके म्हणून नावारूपाला येतील. तसेच ‘ग्राहक’ या नात्याने आपल्या दैनंदिन आहारात या पौष्टिक धान्याचा वापर केल्यास येणाऱ्या अनेक पिढ्या निरोगी आणि सामर्थ्यवान घडविण्यासाठी ‘पौष्टिक सुरक्षे’ करिता भरडधान्य पिके (पौष्टिक तृणधान्य) वरदान ठरतील.

डॉ. योगेश बन

मानवी शेती संस्कृतीमध्ये शेती विकास होत असताना दैनंदिन अन्न पिकांची लागवड सर्व प्रथम केली गेली. भरडधान्य पिकांची शेती पद्धती ही ग्रामीण भारतीय जीवनशैलीच्या मुख्य स्थानी होती. आजच्या काळात भरडधान्य म्हटलं की समोर येते ती फक्त ज्वारी.. परंतु या पिकांमध्ये ज्वारी सोबत बाजरी, नाचणी, राळा, सावा, कुटकी, कोडो, बर्टी आणि वरी यासारख्या एकूण आठ पिकांचा समावेश होतो.

गेली अनेक वर्षे, आपल्या देशात पारंपरिक पद्धतीने भरडधान्य पिकांची मुख्य अन्नधान्य पिक म्हणून लागवड केली जाते. या पिकांचे उगमस्थान आफ्रिका आणि आशिया या खंडामध्ये असणाऱ्या कमी पावसाच्या व दुष्काळसदृश भौगोलिक परिस्थितीत आहे. या पिकांचे आजच्या सतत बदलत असणाऱ्या हवामान परिस्थितीमध्ये लागवडीच्या दृष्टीने खूप महत्व आहे. लागवडीच्या दृष्टीने विचार केल्यास या पिकांची कमी पक्वता कालावधी, इतर पिकांच्या तुलनेत पेरणीपासून मळणीपर्यंत विविध वाढीच्या अवस्थेत पाण्याची कमी गरज, वेळेवर निविष्ठा व सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड केल्यास उत्तम प्रतिसाद देणारी क्षमता आणि किड व रोगाचा कमी प्रादुर्भाव अशी अनेक वैशिष्ट्ये यात आहेत. यामुळेच लागवड खर्च आणि मिळणारे उत्पादन या बाबतीत सद्य स्थितीतील पिकपद्धतीत भरडधान्य फायदेशीर व अधिक उत्पादन देणारी आहेत.

मागणीच्या बाजूने विचार केल्यास भात आणि गहू या मुख्य अन्नधान्यापेक्षा भरडधान्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि जीवनसत्त्वे यासारख्या अनेक पौष्टिक घटकांचे प्रमाण अनेक पटीने जास्त आहे. वेगाने बदलत असलेल्या माहिती तंत्रज्ञान युगात मानवी जीवन सुविधा संपन्न जारी झाले असले तरी आरोग्य संपन्नता कमी होत आहे, कारण जागतिक दृष्ट्या आपण हृदयरोग, मधुमेह, पचनाचे विकार आणि कुपोषण अशा दुर्धर आजारांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळे पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या धान्यास शहरी भागातून मूल्यवर्धित पदार्थ व अनेक उपपदार्थ यांची मागणी वाढत आहे. सारासार विचार केल्यास शेतीसाठी, पौष्टिक आहार आणि पर्यावरण या सर्व बाबी मुळे भरडधान्य पिकांचा भविष्यात मागणीचा आलेख हा वाढत राहणार आहे.

भरडधान्य पिकांचे पारंपरिक पिक पद्धतीत असलेले महत्व, बदलत्या वातावरणातील पिक लागवाढीच्या दृष्टीने असलेले महत्व आणि मानवी आहाराच्या दृष्टीने असलेले महत्व लक्षात घेता भारत सरकार मार्फत सन २०१८ हे वर्ष ‘राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-२०१८’ म्हणून साजरे केले गेले. या पिकांचे सर्वदूर व जागतिक पातळीवर महत्व पोहचण्यासाठी भारत सरकार मार्फत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सभेत सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’ साजरे करण्यासाठी मांडलेल्या ठरावास जवळपास ७० देशांनी पाठिंबा दिला. एक मोहीम म्हणून अनेक शासकीय व निमशासकीय सर्व पातळीवर यासाठी कार्य सुरू आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन कृषि विभाग आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अनेक उपक्रमातून या पिकाना मुख्य प्रवाहात येण्यासाठी कार्य सुरू आहे. या दृष्टीने प्रादेशिक कृषी प्रशिक्षण संस्था (रामेती), कोल्हापूर या संस्थेचे प्राचार्य उमेश पाटील यांनी भरडधान्य पिकांवरील हे विविधांगी पुस्तक संपादित करण्याचा निर्णय घेतला.

या पुस्तकात ज्येष्ठ अर्थतज्ञ वसंतराव जुगळे यांनी “भारतीय सुपरफुडस या लेखात खऱ्या अर्थाने ‘सुपरफुडस’ असलेल्या भरडधान्य पिकांच्या लागवडीचे आणि आहारले महत्व विषद करत या पिकांचे भारतातील लागवड क्षेत्र, उत्पादकता आणि याबाबतची परिस्थिति सांगितली आहे. तसेच शासकीय पातळीवर कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम आणि भरडधान्य पिकांचे शासकीय पातळीवरील विपणन या बाबत माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागात कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) या पदावर कार्यरत असलेले विकास पाटील यांनी ‘पौष्टिक तृणधान्याची क्रांति’ या लेखात ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’ साजरे करण्यामागचे उद्देश विषद केले आहे. पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार सुधीर भोंगळे यांनी तुषार सिंचन वापरातून उत्पादकता वाढ’ या लेखात शेती करताना पाण्याचे अनन्यसाधारण महत्व मांडले आहे. बदलत्या पाऊसमानानुसार शेतीसाठी पाण्याची गरज भागविताना कमी पाण्यावर लागवड करता येऊ शकणारे भरडधान्य पिकांबद्दल पारंपरिक ग्रामीण भागातील सद्यस्थिती व अडचणी मांडताना त्यावर बहुविध पिक पद्धती, तुषार सिंचन आणि शेतीपूरक उद्योग अशा अनेक बाबीबद्दल माहिती दिली आहे. प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी ‘भरडधान्याचे आरोग्यविश्व लेखामध्ये भरडधान्यातील पौष्टिक घटकांची माहिती विस्तृत स्वरूपात आणि जैवरासायनिक प्रक्रियेद्वारे आरोग्यासाठी असेलेले महत्व सांगितले आहे. तसेच या धान्यावर प्रक्रिया करून पौष्टिक घटकांची उपलब्धता याबद्दल सखोल माहिती दिली आहे.

डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी ‘जंक फूड ते भरडधान्य’ हा प्रवास करणे कसे आवश्यक आहे हे सांगताना भरडधान्य शेतीबद्दलचे अधिक उत्पादन आणि आर्थिक फायदा समजून सांगितला आहे. एकूणच या पिकांचे कमी होत असलेले क्षेत्र, भात आणि गहू पिकांचे क्षेत्रवाढ, उपलब्धता याबाबत योग्य विवेचन केले आहे. सोलापूर येथील राजाराम कानमोडे यांनी ज्वारी, भाकरी आणि जीवन; या लेखात ज्वारीचा गोडवा संपूर्ण राज्याला देणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पारंपरिक ज्वारी शेतीचे अस्सल चित्र त्यांच्या लेखणीतून डोळ्यासमोर उभे केले आहे.

कृषितज्ञ प्रताप चिपळूणकर यांनी आरोग्यासाठी भरडधान्य उत्पादन घेताना या लेखात या पिकांचे रोजच्या आहारात असलेले महत्व सांगितले आहे. डॉ. बी. पी. पाटील यांनी सुपरफूड-डोंगरी नाचणी या लेखात डोगराळ भागात व मुख्यत्वे कोकणात लागवड केल्या जाणाऱ्या नाचणी शेतीबद्दल सुधारित तंत्रज्ञान, बियाणे, खत व्यवस्थापन असे अनेक बाबीवर सखोल माहिती दिली आहे. ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांनी शेती, आहारातील बदल आणि मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीसाठी असलेला उत्तम पर्याय सांगितला आहे. शासकीय पातळीवर केले जाणारे अनेक प्रयत्न, भारतीय श्रीअन्न संशोधन संस्थान, हैदराबाद या संस्थेचेभरडधान्य पिकाच्या बाबतीतले योगदान सविस्तर मांडले आहे. रावसाहेब पुजारी यांनी शेतीसाठी पाण्याची बचत याबद्दलची गरज समजून सांगताना भरडधान्य लागवडीचे आणि खाण्याचे महत्व विषाद केले आहे. सध्य परिस्थितीत शेतीच्या अडचणी आणि भरडधान्य एक अनुकूल पर्याय सुचविला आहे.

भरडधान्य पिकांबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढविणे गरजेचे आहे. जागरूकता वाढल्याने या पिकांची मागणी वाढेल आणि परिणामी भरडधान्य पिके मुख्य पिके म्हणून नावारूपाला येतील. तसेच ‘ग्राहक’ या नात्याने आपल्या दैनंदिन आहारात या पौष्टिक धान्याचा वापर केल्यास येणाऱ्या अनेक पिढ्या निरोगी आणि सामर्थ्यवान घडविण्यासाठी ‘पौष्टिक सुरक्षे’ करिता भरडधान्य पिके (पौष्टिक तृणधान्य) वरदान ठरतील.

पुस्तकाचे नाव – भरडधान्य पौष्टिक तृणधान्य
संपादन – डॉ. योगेश बन, उमेश पाटील, रावसाहेब पुजारी
प्रकाशक – तेजस प्रकाशन, कोल्हापूर
किंमत – २०० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

‘स्व”च्या विकासात जगाचा उद्धार

समकालीन सामाजिक वास्तवाचं सजग भान देणाऱ्या कविता

देहविक्रीचं जग

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading