अमर मुसळे यांच्या ‘अमरवेल’ या ललितलेख संग्रहास “शब्दांगण- उल्लेखनीय ललित साहित्यकृती” राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
अमर मुसळे यांच्या ‘अमरवेल’ या ललितलेख संग्रहास चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशिय ज्ञानप्रबोधिनी संस्थेतर्फे देण्यात येणारा शब्दांगण पुरस्कार जाहीर झाला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ अनंता सूर यांनी दिली आहे. अमरवेल या ललितलेख संग्रहास मिळालेला हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार असून यापूर्वी गारगोटी (कोल्हापूर) येथील अक्षरसागर साहित्य पुरस्कार – २०२० ने देखील गौरविण्यात आले आहे.
कोल्हापूर येथील विनय पब्लिकेशन्स या संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘अमरवेल’ या पुस्तकात ३१ ललित लेख समाविष्ट केले आहेत. जेष्ठ सिने पत्रकार राजन कुलकर्णी, पुणे यांनी भारदस्त लेखनशैलीत प्रस्तावना लिहिली आहे. लेखकांनी आपल्या ग्रामीण भागातील लहानपणीच्या अनेक सुंदर आठवणी पासून ते नोकरीपर्यंतच्या अनेक अनुभवांचे वर्णन आपल्या ओघवत्या शैलीमध्ये केलेले आहे. बालपणीचे निरागस आयुष्य, ग्रामीण संस्कृती, निसर्ग, गड-किल्ले भ्रमंती, ग्रामीण सण-उत्सव, ऋतू, व्यक्तिविशेष या सर्वांची मानवी भाव-भावनांशी घातलेली सांगड खूप भाव खाऊन जाते. शाळा, कॉलेज नोकरी निमित्ताने घर व गावापासून दूर राहिल्यानंतर आलेले अनुभव वाचताना वाचक ते स्वतःच अनुभवत असल्याची भावनाच या पुस्तकाचे यश आहे.
कॉलेज व नोकरी निमित्य काही वर्षे कारवार व गोवा याठिकाणी वास्तव्यास असल्याने येथील कोकण, समुद्र, निसर्ग, संस्कृती, स्वभाव यावर देखील काही ललितलेख समाविष्ट केले आहेत.
अमर मुसळे हे मूळचे आकुर्डे, ता. भुदरगड (कोल्हापूर) या गावचे रहिवासी असून सध्या ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या ठिकाणी वरीष्ठ संशोधक या पदावर कार्यरत आहेत.