प्रत्येक गोष्टीत आत्मसंतुष्ट राहायचे. यातून समाधान मिळते. समाधानाने मनाला शांती मिळते. जीवन हे पुढे पुढे जातच असते. वेळ कोणासाठीही थांबत नाही. अशा या संसारात कधी सुख मिळते कधी दुःख. दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःख मनाला झोंबतं. यासाठी दुःखाच्या विचारात मन गुंतवायचे नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
कां झाडाची साउली । वाटे जातां मीनली ।
घरावरी तेतुली । आस्था नाहीं ।। 594।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – अथवा वाटेने जात असता मध्येच प्राप्त झालेल्या सावलीवर ज्याप्रमाणे (वाटसरुची) आस्था नसते. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे स्वतःच्या घरावर किंचितही ममत्व नसते.
झाड कोणतीही अपेक्षा न ठेवता फळे देते. मग आपण त्या झाडाकडून अपेक्षा का ठेवायची ? अशामुळे आपल्या मनामध्ये निराशा उत्पन्न होते. वाटेने जाणाऱ्या वाटसरूची झाडाच्या सावलीवर आस्था नसते. तसे आपणही पिके घेताना त्या पिकावर आस्था ठेवायची नाही. उत्पन्न आले नाही म्हणून निराश व्हायचे नाही. नैराश्य हा सर्वात मोठा शत्रू आहे. नैराश्य वाढत गेले तर ते माणसाला खाते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अशा नैराश्यातूनच होत आहेत. नुकसान झाल्याने नैराश्य, समाधानकारक उत्पन्न मिळाले नाही म्हणून नैराश्य. यासाठी अपेक्षा न ठेवताच उत्पन्न घेण्याची सवय मनाला लावायला हवी.
प्रयत्न हे करायला हवेत. उत्पन्नवाढीसाठी उपाय योजायला हवेत. येणारे उत्पन्न हे निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग आपल्या हातात नाही. मोहोर चांगला लागला होता, पण वादळी पाऊस आला. सर्व मोहोर गळाला. याला आपण काय करणार ? हे काही दरवर्षी घडते असे नाही. कधीतरी एकदाच घडते. नेहमी नुकसान होत नाही, पण प्रयत्न सोडायचे नाहीत. आज तोटा झाला उद्या नफा होईल, या आशेने प्रयत्न करायचे.
प्रत्येक गोष्टीत आत्मसंतुष्ट राहायचे. यातून समाधान मिळते. समाधानाने मनाला शांती मिळते. जीवन हे पुढे पुढे जातच असते. वेळ कोणासाठीही थांबत नाही. अशा या संसारात कधी सुख मिळते कधी दुःख. दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दुःख मनाला झोंबतं. यासाठी दुःखाच्या विचारात मन गुंतवायचे नाही. त्यातून लगेचच बाहेर कसे पडता येईल किंवा त्या वातावरणातून दूर जाण्याचा प्रयत्न करायचा. वातावरण बदलानेही दुःखी विचारांना विश्रांती मिळते. विसर पडतो.
बदल हा सकारात्मक असावा. वाईट संगत, व्यसन लागणार नाही याची काळजी हवी. बऱ्याचदा दुःख विसरण्यासाठी वाईटाची संगत, व्यसनाची साथ केली जाते. अशाने दुःख नाहीसे होत नाही. वाढतच जाते. कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. मग व्यसन करून पुन्हा कर्ज का वाढवायचे ? कर्ज कसे कमी करता येईल. पैसा कसा वाचवता येईल. असा सकारात्मक विचार करायला हवा. चुकीच्या वाटेने जाऊन पुन्हा निराशाच पदरी पडते. निराशा दूर करण्यासाठी सदैव आशावादी राहायला हवे.
मनात धैर्य उभे करायला हवे. आत्महत्या करून कधी प्रश्न संपत नसतो. आत्महत्या हा काही प्रश्नावरचा उपाय नाही. ती पळवाट आहे. भित्रे लोक आत्महत्या करतात. शुरासारखे जीवन जगायला शिकायला हवे. यासाठी शुरांसारखे विचार मनात जोपासायला हवेत. शूर व्यक्ती मृत्यूला कधीही घाबरत नाहीत. कठीण प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला हवे. प्रयत्न सोडायचे नाहीत. शेती करताना पिकाच्या उत्पादनावर कधीही आस्था ठेवायची नाही. उत्पन्न मिळो न मिळो श्रम करत राहायचे. चालत राहायचे. सावलीची अपेक्षा ठेवायची नाही. उन्ह लागतंय म्हणून चालणे सोडायचे नाही.