March 19, 2024
concept of sustainable development needs to be considered article by Dr V N Shinde
Home » शाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा
विशेष संपादकीय

शाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा

निसर्गाचाच ठेवा उध्वस्त करायला संपवायला सुरुवात केली. यातून प्रदूषण आणि तापमानवाढ अटळ बनली. हे साठे सर्वत्र नसल्याने ते ज्या राष्ट्रात ती राष्ट्रे महत्त्वाची ठरली. त्यांच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. त्यासाठीच युद्धे सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाचा जागर करण्याचे आवाहन सर्वांपुढे आहे.

डॉ. व्ही एन शिंदे

उप कुलसचिव,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

युक्रेन आणि रशियातील युद्धाचा भडका उडाला. भारतापासून हजारो किलोमीटरवर युद्ध सुरू आहे. युद्धाचा फटका जगातील प्रत्येक देशाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बसत असतो. युद्ध चांगले नाही, असे सर्वजण सांगत असतो. मात्र स्वार्थापोटी युद्ध, बहुतांश देश करत असतात. काही महिन्यापूर्वी ‘इंटरगव्हर्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’चा (IPCC) यांचा अहवाल आला. या अहवालाला गांभिर्याने घेत युनोने शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी भुमिका घेत, शाश्वत विकासासाठी मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या. त्यांना लक्षात घेऊन या वर्षी भारतात २८ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान’ अशी मध्यवर्ती संकल्पना जाहीर केली आहे.

दिल्लीपासून युनोपर्यंत, शाश्वत विकास या संकल्पनेचा विचार करण्याची गरज का निर्माण झाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवाने आपले जीवन सुखासीन बनवण्यासाठी सुरुवातीपासून सूचतील ते मार्ग अवलंबले. पृथ्वीवरील असंख्य प्राणीमात्राप्रमाणे असणारा मानवही एक जीव. सुरुवातीला इतर प्राण्यांप्रमाणेच राहणारा, जगणारा, निसर्गातील एक घटक. पुढे आपल्या बुद्धीचा वापर करत निसर्गाच्या केंद्रस्थानी आला. गौतम बुद्धांसारख्या महामानवाने त्यावर असणारी जबाबदारी सांगीतली. महात्मा गांधीनी ‘भूमी, पाणी आणि हवा ही आपली जहागिरी नसून पुढच्या पिढीला जशीच्या तशी सोपवण्याची जबाबदारी’ असे सांगितले. मात्र यांचे ऐकणार कोण ? स्वार्थापुढे ही शिकवण विसरली जाते आणि निसर्गावर अन्याय, अत्याचार करत कथीत प्रगती केली जाते. युरोपियन लोकांनी भारतात आक्रमण करेपर्यंत परिस्थिती योग्य आणि निसर्गस्नेही होती. मात्र पाश्चात्यांनी भारतियांना मागास ठरवले. शिक्षण, आरोग्य, स्वच्छतेबाबत सर्वसामान्य जनता मागासही होती. मात्र जगणे निसर्गस्नेही होते.  

शिक्षण घेतलेल्या लोकांना पाश्चात्यांच्या जीवनशैलीमध्ये आधुनिकता दिसली आणि तीच त्यांच्यासाठी जगभर अनुकरणीय ठरली. चकचकीत, गुळगुळीत जीवनशैली आपलीही असावी याचे स्वप्न प्रत्येकाला पडू लागले. यातून अहर्निष स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेचा वेग वाढत राहिला. अत्याधुनिक उपकरणे, वेगवान वाहने या सर्व गोष्टींसाठी ऊर्जा ही गरजेची. याचा परिमाण म्हणून राष्ट्राची प्रगती ही दरडोई ऊर्जेचा वापरावर ठरवली जाऊ लागली. हे परिमाण ठरताच ऊर्जा मिळवण्यासाठी अमर्याद प्रमाणात खनिज तेल आणि कोळशाचा वापर सुरू केला.

निसर्गाचाच ठेवा उध्वस्त करायला संपवायला सुरुवात केली. यातून प्रदूषण आणि तापमानवाढ अटळ बनली. हे साठे सर्वत्र नसल्याने ते ज्या राष्ट्रात ती राष्ट्रे महत्त्वाची ठरली. त्यांच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. त्यासाठीच युद्धे सुरू आहेत. अशा पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाचा जागर करण्याचे आवाहन सर्वांपुढे आहे. सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात हजारो लिटर इंधन जाळले जात आहे. त्यातून दोन्ही बाजूंची हानीच होते. मालमत्तेचे नुकसान होते. दोन्ही राष्ट्रांशी कसलाही संबंध नसलेले अब्जावधी जीव मात्र याचे दुष्परिणाम सहन करत राहणार आहेत. जे प्रदूषण होत आहे, कचऱ्याचे ढिग तयार होत आहेत. इमारती पडल्यानंतर तयार होणारा कचरा असंख्य प्रश्न युद्ध निर्माण करतात. तरीही आम्ही प्रगती करत आहोत आणि शाश्वत विकासाची चर्चा करत आहोत. पूर्वजांनी केलेली नैसर्गिक संसाधानांची लूट थांबवायला हवी. उलट आपण ती वाढवत आहोत. आणखी वेगाने निसर्गाची हानीच करत आहोत.    

युद्धाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या विज्ञान दिनाची संकल्पना आणखी विचार करायला भाग पाडते. वेगाने जाता यावे म्हणून रस्ते बांधायचे. रस्त्यासाठी डोंगर पोखरून भराव घालायचे. भराव घालताना पूराचा विचार न केल्याने पावसाळ्यात पूरपिरस्थिती बिकट होते. वेळ कमी लागावा म्हणून सहा-सहा मार्गिकांचे रस्ते तयार होतात. त्या रस्त्यावर पाळायचे नियम कोणीच पाळत नसल्याने पुन्हा परिस्थतीत काहीच बदल नाही. तेवढाच वेळ लागतो. वाहनांना इंधन जास्त लागते. टोलचा भुर्दंड आहेच. इकडे डोगर सपाट केल्याने त्याचा पावसावर आणि पिकपाण्यावर अनिष्ट परिणाम स्वाभाविक. आपण विकासाच्या नावाखाली जे गुंते निर्माण करत आहोत ते कमी करणे महत्त्वाचे आहे.

कोणताही प्रकल्प उभारताना भविष्यात होणाऱ्या परिणामांचा विचार करायला हवा. तो आज होताना दिसत नाही. हरित क्रांतीचा दुष्परिणाम आज पन्नास वर्षांनंतर दिसू लागले आहेत. अर्थात हरित क्रांती अपरिहार्यता होती. त्या काळात अन्नधान्याचे उत्पादन वाढले नसते तर यादवीची स्थिती अनेक राष्ट्रांनी अनुभवली असती. शाश्वत विकास म्हणजे विज्ञानातून निर्माण होणाऱ्या तंत्रज्ञानाचा अविचारी वापर नसून, निसर्गातील अन्य घटकांवर परिणाम न करता होणारा विकास. सुखसीन आयुष्यासाठी प्रकल्प उभारताना, याचा विचार व्हायलाच हवा.  

Related posts

आत्म्याला जाणण्यासाठीच सोsहम साधना

विश्वासास पात्र होण्यासाठी ‘सेबी’ची आता परीक्षा !

संघर्षातूनच खरी प्रगती साधली जाते

Leave a Comment