March 29, 2024
Rajendra Ghorpade article on Dnyneshwari
Home » नाशवंत शरीर ओळखा अन् लढा
विश्वाचे आर्त

नाशवंत शरीर ओळखा अन् लढा

देहाचा जन्म कशासाठी ? या प्रश्नातच सर्व प्रश्नांची उत्तरे दडली आहेत. देह नाशवंत आहे यासाठीच ही लढाई लढायची आहे. ही लढाई स्वतःच स्वतःशी लढायची आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

आणि शरीरजात आघवें । हें नाशवंत स्वभावें ।
म्हणोनि तुवा झुंजावें । पंडुकुमरा ।।136।। ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा

ओवीचा अर्थ ः आणि शरीर म्हणून जेवढे आहे. तेवढे सगळे स्वभावतः नाशवंत आहे. म्हणून अर्जुना तू लढावेस हे योग्य आहे.

फळे नाशवंत असतात म्हणून त्याची विक्री वेळेवर करावी लागते. तरच पैसा मिळतो. तसेच ती नासकी होण्या अगोदरच खावी लागतात. तरच त्याची गोडी मिळते. अन्यथा ती फेकून द्यावी लागतात. शरीराचेही असेच आहे. हा देह नाशवंत आहे. तो नष्ट होण्याअगोदरच या देहाचे कार्य समजून घ्यायला हवे. हा जन्म कशासाठी आहे, हे जाणून घ्यायला हवे. या जन्माचा अर्थ समजून घ्यायला हवा. आपण कोण आहोत ? आपली ओळख काय ? आपले कार्य काय ? हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची इच्छा मनात उत्पन्न व्हायला हवी. तरच आपणास जीवनाचा खरा अर्थ समजू शकेल.

जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा लागतो. पण आता या मुख्य गरजा मिळविण्यासाठीच अनेक गोष्टींची गरज लागत आहे. पाणी, वीज तर अत्यावश्यक गरज झाली आहे. काही वर्षांनी जगात पाण्यासाठी युद्ध होईल अशी भाकिते वर्तविली जात आहेत. इतकी परिस्थिती बिकट होणार आहे. अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण तेही वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडणार आहे. निवाराचा प्रश्न तर आजच गंभीर झाला आहे. अशाने हा देह जगणेही मुश्किल होणार आहे. यासाठी मानवाने प्रथम हा देह कशासाठी मिळाला आहे, याचा विचार करून जगायला शिकण्याची गरज आहे.

युद्धाने प्रश्न सुटत नाहीत. कोणाला ठार मारून, हत्या करून विचार मारता येत नाही. हे प्रश्न सोडवायचे असतील तर शांत विचारांची गरज आहे. मने भडकवून प्रश्न वाढतच जाणार आहेत. यासाठी शांत मनाने विचार करून प्रश्न सोडवायला हवेत. देहाचा जन्म कशासाठी ? या प्रश्नातच सर्व प्रश्नांची उत्तरे दडली आहेत. देह नाशवंत आहे यासाठीच ही लढाई लढायची आहे. ही लढाई स्वतःच स्वतःशी लढायची आहे. आत्मा आणि देह हे वेगळे आहेत हे ओळखायचे आहे. त्यानुसार कृती करायची आहे.

हा आत्मा देहात आला आहे. हे जाणून त्यातून मुक्त व्हायचे आहे. आत्मज्ञानी व्हायचे आहे. यासाठीच हा आपला जन्म आहे. मी आत्मा आहे. ही आपली ओळख आहे. तो आत्मा चराचरात आहे. प्रत्येक सजिवात आहे. हे जाणण्यासाठी करावे लागणारे कार्य आपणास या जन्मात करायचे आहे. तरच जन्म सार्थकी लागेल. हीच साधना आपणास करायची आहे. श्वासावर नियंत्रण मिळवायचे आहे. सदैव आत्मभाव मनात साठवायचा आहे. या आत्मभावात रममान व्यायचे आहे. आत्मज्ञानातूनच जगाला आत्मज्ञानी करायचे आहे. हेच आले कार्य आहे. नाशवंत देहातील आत्मा असा अमर करायचा आहे. हीच संजिवन समाधी साधायची आहे.

।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Related posts

हिमालयातील अतिउंचावरच्या गावावर हवामान बदलाचा झालेला परिणाम दाखवणारा चित्रपट

देव तारी त्याला कोण मारी…

वडणगेचा शिवपार्वती तलाव

Leave a Comment