July 27, 2024
Raju Shetti Comment on Co operative Minister Balasaheb Patil
Home » राजू शेट्टींचा सहकारमंत्र्यांना घरात बसण्याचा सल्ला
काय चाललयं अवतीभवती

राजू शेट्टींचा सहकारमंत्र्यांना घरात बसण्याचा सल्ला

स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या तुकड्यात एफआरपी देण्याच्या निर्णयावर कडाडून टिका केली आहे. यावरू शेट्टी यांनी थेट बाळासाहेब पाटील यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. शेट्टी यांचे हे निषेधाचे पत्र खास आपणासाठी

व्वा !! बाळासाहेब……..
आपण बलिप्रतिपदे दिवशीच पुन्हा एकदा बळीराजाला पाताळात गाडले !

ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी उसाची एफआरपी 14 दिवसाच्या आत विनाकपात एकरकमी द्यावी असा कायदा असताना त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून एफआरपी वर्षभरामध्ये तुकड्या-तुकड्याने देण्याचा घाट केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घातलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्याला विरोध केला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या पर्यंत सगळ्याच नेत्यांना एफ आर पी चे तुकडे पाडण्याची घाई झालेली आहे. 19 ऑक्टोंबरच्या जयसिंगपूर येथील २० व्या ऊस परिषदेमध्ये किमान लाखभर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन एक रकमी एफ आर पी पाहिजे असा ठराव केलेला आहे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील या ठरावाचा आदर करणार आहात की नाही ? जोपर्यंत कायद्यात दुरुस्ती होत नाही तोपर्यंत एफ आर पी एक रक्कमी दिली पाहिजे हे सहकार मंत्री असून तुम्हाला कळत नाही का ? सहकार मंत्री या नात्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे न्याय मिळवून देणं ही तुमची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे मात्र तुम्ही सहकारमंत्री असल्याचे विसरलात आणि सह्याद्री कारखान्याचे चेअरमन या नात्याने तुम्ही तीन तुकड्यांमध्ये एफआरपी देण्याचं जाहीर सूतोवाच केलं हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? आणि हा अधिकार तुम्हाला पाहिजे असेल तर पहिल्यांदा सहकारमंत्री पद सोडा.

तुम्ही शपथ घेत असताना कायद्याप्रमाणे राज्य करण्याचे दिलेले वचन आणि घेतलेली शपथ विसरलात का ? कर्नाटक सीमाभागातील ८ कोल्हापूर जिल्ह्यातील 24 सांगली जिल्ह्यातील ३ आणि सातारा जिल्ह्यातील २ साखर कारखान्यांनी एक रक्कमी एफ आर पी देण्याचे जाहीर केले आहे म्हणजेच जवळपास ४० – ४२ साखर कारखाने आज एक रकमी एफ आर पी देण्याचे जाहीर केले आहे. यंदा साखरेलाही चांगला भाव आहे. सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार उघड उघड म्हणतायेत आम्ही देणार आहे पण बाळासाहेब देऊ देत नाहीत, मग बाळासाहेब तुम्हालाच अडचण काय ? काय थोरल्या साहेबांचा आदेश आला आहे ? “तुम्हाला सहकार मंत्री केलेले आहे आता आमचं मुकाट्याने ऐका”. तुम्ही तुमच्या मुलाबाळांसहीत दिवाळी साजरी केली शेतकऱ्यावर शिमगा करण्याची वेळ आली. ऐन दिवाळीत शेतकऱ्याची पोर आंदोलन करत असताना तुम्हाला त्याच काही देणंघेणं नाही. बलिप्रतिपदेला आमच्या शेतकऱ्यांचा राजा “ बळी “ हाच दिवस बटु वामनाने विश्वासघाताने बळीराजाला पाताळात गाडलं. तेव्हापासून आम्ही बळीच्या राज्याची वाट बघतोय आणि याच दिवशी तुम्ही मात्र कायदेशीर रित्या उसाचा दर मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना पोलिसांकरवी भल्या पहाटे ताब्यात घेऊन त्यांना तुरुंगात डांबलं.

“व्वाह बाळासाहेब चांगलच पांग फेडलं”. याच शेतकऱ्यांनी तुम्हाला मत देऊन अनेक वेळा आमदार केलं, मंत्री केलं त्याच्या उपकाराची अशी परतफेड कराल असं वाटलं नव्हतं. तुमच्या या कृत्यावरून तुम्ही बटु वामनाचेच वारसदार असल्याचेच सिद्ध केले आहे. ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकार रुजवला आणि वाढवला त्यांचेच कट्टर अनुयायी तुमचे वडील स्वर्गीय पी डी पाटील ह्या दोघांच्या आत्म्याला स्वर्गामध्ये किती यातना होत असतील ? तुमच्या मनाला काहीच कसं वाटलं नाही. अजूनही वेळ गेलेली नाही जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा आणि तुमच्या कारखान्याची एक रकमी एफआरपी जाहीर करा ते जमत नसेल तर सहकारमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि घरात बसा..


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मोदींविरुद्ध आहेच कोण ?

धनेश पक्ष्याचे वैशिष्ट्यपूर्ण आवाज…

कायद्याचा शेतकऱ्यांवर असा झाला परिणाम…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading