September 9, 2024
politics behind language decline article by ramesh salunkhe
Home » भाषेच्या ऱ्हासाचं राजकारण…
विशेष संपादकीय

भाषेच्या ऱ्हासाचं राजकारण…

भाषा ऱ्हास पावत चालल्यामुळे माणसामाणसांमधील संवाद हरवत चालला आहे. समूहाशी परंपरेतून चालत आलेले नाते संपत चालले असून सामूहिक संघर्षही संपत चालला असल्याचे दिसते आहे. माणसांचे रोबो होऊ लागले असून संवेदना हरपत चालल्या असून माणसामाणसांमधील संबंधांना यांत्रिकता आली आहे. हे सारे काही विसंवाद पसरविणाऱ्यांच्या पथ्यावरच पडत चालले आहे.

रमेश साळुंखे,

मोबाईल – 94035725219

कोणतीही भाषा इतिहास, परंपरा आणि संस्कृतीतून घडत असते. त्यामुळे भाषेचा इतिहास म्हणजे संस्कृती, परंपरा आणि संघर्ष यांचा इतिहास असतो. माणसाच्या सर्वांगीण विकासाला भाषा उपकारक ठरत असते. मनुष्य अथवा मनुष्येतर प्राणी हे सारे काही संवादातून विकसित झाले आहेत. अर्थातच संवाद म्हणजे केवळ स्वर आणि व्यंजनांच्या मदतीने बोलणे नव्हे. वेगवेगळे ध्वनी, देहबोली, शारीरिक अवयवांचा वापर अशा असंख्य बाबींचा वापर करून मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी व्यवहाराचे आदानप्रदान करीत असतात. म्हणूनच कोणत्याही सजीवाला- त्याच्या विकासाला अशाप्रकारच्या संवादी भाषेची अत्यंत गरज असते. त्यामुळे संवादाचे स्थान एकूणच सर्वांच्या विकासात अत्यंत महत्त्वाचे आहे.

संवादी नाते ऱ्हास पावतेय

केवळ माणसाच्या संदर्भात भाषेच्या दृष्टिकोणातून आजचे वर्तमान पाहता आपले समाजाशी, कुटुंबाशी इतकेच नव्हे तर स्वत:शीही संवादी नाते ऱ्हास पावत चालेले आहे. माणसामाणसांमधील सुसंवाद विसंवादीच कसा राहील याचे जाणीवपूर्वक आणि शिस्तबद्ध नियोजन केले जात आहे. स्वभाषेविषयीचा न्यूनगंड, इंग्रजी भाषेचा अंधपणाने स्वीकार, प्रबोधनाच्या चळवळींचा ऱ्हास शिवाय समाजमाध्यमांची झपाट्याने वाढत चाललेली चित्रभाषा, लिपिबद्ध भाषेऐवजी चित्रभाषेवर, प्रतिमांवर मोठ्याप्रमाणात अवलंबून राहिलेली तरूण पिढी. या साऱ्यांच्या परिणामातून भाषा संपत चालल्याची जाणीव प्रकर्षाने होते आहे. अशा व्यवस्थेला थोपविणे कठीण बनत चालले असून बिनसांस्कृतिक वातावरणाने मोठी गती पकडलेली आहे. भाषा ऱ्हास पावत चालल्यामुळे माणसामाणसांमधील संवाद हरवत चालला आहे. समूहाशी परंपरेतून चालत आलेले नाते संपत चालले असून सामूहिक संघर्षही संपत चालला असल्याचे दिसते आहे. माणसांचे रोबो होऊ लागले असून संवेदना हरपत चालल्या असून माणसामाणसांमधील संबंधांना यांत्रिकता आली आहे. हे सारे काही विसंवाद पसरविणाऱ्यांच्या पथ्यावरच पडत चालले आहे.

एकाच भाषेसाठी प्रादेशिक भाषांचा बळी

भाषा प्रगल्भ होण्यात, भाषेचा विस्तार होण्यात इतर भाषांचाही निश्चितच हातभार लागत असतो. पण हे असे प्रगल्भ होण्याकरिता इतर भाषेचा पुरस्कार करणे, ती जाणीवपूर्वक शिकणे निराळे आणि भाषेला क्रयविक्रयाचे साधन मानून आधुनिकतेच्या खोट्या कल्पना उराशी बाळगून ती इतर समाजावर लादणे निराळे हे आपण समजून घेतले पाहिजे. माणसाच्या सर्वच भावभावना त्याच्या मातृभाषेतून प्रभावीपणे व्यक्त होत असतात. सहाजिकच ज्याच्या विरोधात संघर्ष करावयाचा आहे तो संघर्षही इतर भाषांपेक्षा आपण आपल्या भाषेतच चांगल्या प्रकारे व्यक्त करत असतो. पण आपल्याच भाषेचा वापर आपल्याला परिणामकारकपणे करता येत नसेल; तर संघर्ष परिणामकारक होऊ शकत नाही. संघर्ष करण्याची आपली शक्ती अशाप्रकारे क्षीण होणे हे स्वत:च्या पर्यायाने समाजाच्या विकासाला मारक ठरत असते. आपला बहुसंख्य समाज हा प्रादेशिक अथवा बोलीभाषेत नित्याचे व्यवहार करत असतो. सहाजिकच बाजारू व्यवस्थेला हे परवडणारे नसते. आपले उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत सहजपणे जाऊन खूप सारा ना मिळवायचा असेल; तर एकच एक भाषा सर्वत्र वापरली जाणे हे भांडवली व्यवस्थेकरिता अडचणीचे असते. त्यामुळे प्रादेशिक भाषांचा पद्धतशीर ऱ्हास करून जगात एकच एक भाषा कशी वापरली जाईल; याचा विचार जागतिक राजकारण करत असते. अशाप्रकारचे राजकारण दुर्देवाने यशस्वी ठरू लागले आहे.

मातृभाषेतूनच मूल्ययुक्त जगण्याचे संस्कार

प्रश्न फक्त एका भाषेचे जाणे आणि नवीन कोणतीतरी भाषा समाजात प्रस्थापित होणे इतकाच मर्यादित नाही. भाषेमुळे माणसाचे भौतिक व्यवहार सुखकर होत असतात. तथापि केवळ भौतिक व्यवहार म्हणजे माणसाचे समग्र जगणे नसते. माणसाच्या मूल्यात्मक जगण्यासाठी मातृभाषा ही अत्यंत भरीव योगदान देत असते. पण भौतिक जगणे आणि मूल्यात्मक जगणे यांचीच फारकत मोठ्या प्रमाणावर होत असून यासंदर्भात दिवसेंदिवस आपण अनभिज्ञ बनत चाललो आहोत. मूल्यांशी अत्यंत सवंगपणाने तडजोड करीत आपण आपले आणि पुढील पिढ्याचे कमालीचे नुकसान करीत आहोत. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने मूल्ययुक्त जगण्याचे संस्कार मोठ्याप्रमाणत मिळत असतात; हे विचारवंतांनी, समाजसुधारकांनी, देशविदेशातील भाषातज्ञांनी आवर्जून सांगितलेले आहे. पण इंग्रजीसारख्या भाषेच्या अंधभक्तीमुळे मूल्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान काय? सामाजिक विकासात मूल्ययुक्त जगणे किती गरजेचे आहे? याचा विचार आपल्या समाजात पुरेशा गांभिर्याने होताना दिसत नाही. परिणामी ‘मजेत मश्गुल आम्ही’ हेच चित्र सार्वत्रिक दिसते आहे. प्रादेशिक भाषांचा ऱ्हास आणि भांडवलशाहीच्या अनुषंगाने जाणीवपूर्वक केला जाणारा इंग्रजी भाषेचा स्वीकार म्हणजे माणसाचा केवळ बाजारमूल्यांच्या संदर्भात विचार करणे होय.

…तर भाषेचा ऱ्हास अटळ

आजकाल जवळपास सर्वच क्षेत्रांना उपयुक्ततावादाने ग्रासले असल्याने भाषेकडेही केवळ संवादाचे माध्यम म्हणूनच आपला समाज पाहू लागला आहे. आपल्या कला, साहित्य, संस्कृती, परपंरा यांचा गेल्या वीस-पंचवीस वर्षातील ऱ्हास झपाट्याने होतो आहे. केवळ वाचन संस्कृतीचा विचार केला तर आपल्या समाजातील ही वाचनसंस्कृती कमी होऊ लागलेली आहे; हे कोणीही मान्य करेल. ललित साहित्याच्या वाचनातून जीवन आकळते, आनंदासोबतच विचारांची देवाण-घेवाण होऊन जीवनाच्या कक्षा रूंदावतात, मूल्यात्मक भान जागे होते. हे वास्तव असले तरी अशाप्रकारच्या ललित कलाकृतींकडे वाचकांचा ओढा कमालीचा आक्रसतो आहे. वाचकांची संख्या वाढली आहे; पुस्तकांचा खप वाढला आहे पण तो माहितीपर पुस्तकांचा. साहित्य मानवी मन सुसंस्कृत करीत असते. त्याकडेच जर समाज पाठ फिरवत असेल; तर भाषेचा ऱ्हास अटळ आहेच; पर्यायाने समाजाचे भवितव्यही कठीण आहे. लिहित्या लेखकांची संख्या कमी झालेली नाही; ती दिवसागणिक वाढतेच आहे. काळाशी सुसंगत आशय-विषय घेऊन साहित्य, कला यांची निर्मिती होतेच आहे. पण या साऱ्यांना आपला समाज प्रतिसाद किती आणि कसा देतो; हा मूळ प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तरही दुर्दैवाने नकारार्थीच देता येते. भाषा, साहित्य टिकविणे म्हणजे माणूस-माणसाचे अस्तित्व टिकविणे. माणसाचा माणूस म्हणून विचार करणे. इतक्या व्यापक परिप्रेक्षात भाषेचा विचार होणे अपेक्षित आहे.

भाषांच्या ऱ्हासास भांडवलशाही स्पर्धा कारणीभूत

‘स्व’ बरोबरच स्वेतरांच्या कल्याणाचा विचारही भाषेच्या माध्यमातून होत असतो. हे माणसाच्या सहजासहजी नजरेला जरी येत नसले तरी सूक्ष्मपणे जाणीव-नेणीवेच्या पातळीवर हे काम सतत सुरू असते. भाषा जाणिवेच्या कक्षेत जशी काम करीत असते; तशीच ती नेणिवेतही कार्यरत असते. एकूणात समाजाच्या विकासात भाषा हा घटक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मातृभाषेचे हे असे महत्त्व सर्वमान्य असले तरी मातृभाषेचे अथवा प्रादेशिक भाषेचे क्षेत्र सातत्याने का आक्रसते आहे? हा मोठा गंभीर प्रश्न साऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये निर्माण झाला आहे. देश विदेशातील अनेक भाषा झपाट्याने ऱ्हास पावत आहेत. अनेक भाषा तर नष्टच झालेल्या आहेत. भाषांच्या नष्ट होण्याला इतर अनेक कारणांपैकी जीवघेणी भांडवलशाही स्पर्धा मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते आहे. भाषेचा मूळ उद्देश आणि वापर यांच्यात संवादाऐवजी विसंवादी नाते निर्माण होऊ लागले; की माणसाच्या अस्तित्त्वाचेच प्रश्न निर्माण होऊ लागतात. त्यामुळे आधुनिक भांडवलशाही व्यवस्था आणि देशातील जातीय राजकारणाचे प्रादेशिक भाषांकडे होत असलेले दुर्लक्ष, वंचितांच्या भाषांचा जाणीवपूर्वक केला जाणारा ऱ्हास आणि त्या अनुषंगाने येणारा संघर्षाचा ऱ्हास असा व्यापक पट माणसामाणसांमधील नातेसंबंधांच्या पातळीवर आपण समजून घेतला पाहिजे. भाषेच्या वापराला माणसाच्या निर्मितीचा, विचाराचा इतकेच नव्हे तर समूहाने जगण्याचाही संदर्भ असतो. भाषेच्या आधाराने एकत्र आलेली माणसे संघर्ष करण्याला प्रवृत्त होत असतात. अन्यायाच्या विरोधातील कृती करण्याचा प्रयत्न करीत असतात. मानवाच्या इतिहासाकडे पाहिले तर हेच चित्र स्पष्ट दिसते. त्यामुळे माणसाच्या एकूणच विकासात भाषा हे खूप मोठे सामर्थ्य असल्याचे दिसते. पण माणसाच्या विकासातील हेच बलस्थान निकामी करण्याच्या प्रयत्नांमुळे माणसाचे अस्तित्त्व कमालीचे पराधीन बनत चालले आहे.

विचारधारा आणि कृतीतील दरी वाढतेय

माणसाच्या अशाप्रकारे पराधीन होण्यापाठची कारणमीमांसाही आपणास अधोरेखित करता येते. आपल्या अवतीभवतीचे राजकीय – सामाजिक वर्तमान कमालीचे स्वार्थी, सत्ताकारणी आणि हिंसक बनत चाललेले आहे. कुणीच कुणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत राहिल्याचे दिसत नाही. समाजाचा समग्रतेने विचार करणारी विचारधारा आणि कृती यांच्यातील अंतर दिवसेंदिवस वाढतेच आहे. या अशा राजकारणामुळेच आमुलाग्र बदलत चाललेले आपले सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण कडेलोटाच्या सीमेवर येऊन उभे राहिलेले आहे. पण या समस्यांचे आणि आपले काही नाते आहे. हा प्रश्नच आपल्या विचारांच्या कक्षेपल्याड गेला आहे.

असुरक्षितता अन् भयग्रस्तता

राजकारणाचा आणि सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणाचा अगदी निकटचा संबंध असतो. राजकारणच माणसाचे जगणे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत असते. कारण नियंत्रित माणसाला आपल्या मनाबरहुकूम राबविणे सोपे असते. माणसांवर नियंत्रण आणावयाचे तर प्रथम त्याच्या भाषेवर नियंत्रण आणले पाहिजे. म्हणून राजकारणाचा आणि भाषेचा हा असा संबंध ध्यानात घेतल्याशिवाय भाषेच्या ऱ्हासाचा आपणास अदमास घेता येणार नाही. जागतिकीकरण आणि उत्तरभांडवलशाही यांच्या अनुषंगाने आपण अपरिहार्यपणे स्वीकारलेली आधुनिकता ही मानवी समूहावर त्यांच्या आचार, विचार, संस्कृती, परंपरा आणि भाषा यावर फार मोठा परिणाम करणारी ठरली आहे. त्यामुळे आधुनिकपूर्व कालखंडातली सामूहिकता संपत जाऊन आपल्या समाजात व्यक्तिकेंद्रितता, परात्मता आली आहे. आपले इतिहासाच्या, परंपरांच्या भानाकडे सोयिस्कर दुर्लक्ष होऊन साऱ्या समाजाला भरकटलेपण आले आहे. हे भरकटलेपण जाणवू नये यासाठी भासमान बाजारू चित्र तयार केले गेले असून यातूनच वैफल्यग्रस्त सुखासीन हतबलता वाढू लागलेली आहे. व्यक्तीकडे केवळ बाजारमूल्य म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. माणसाच्या भावभावना, संवेदना, नातेसंबंध यांचा ऱ्हास होत जाऊन असुरक्षितता आणि भयग्रस्तता निर्माण झाली आहे. अशा अवस्थेत भाषेच्या पातळीवर गरजेचा असलेला संवाद महत्त्वाचा असतो. तो संवादही भाषेचा पद्धशीर ऱ्हास करून माणसांमधील संवादच संपविण्याचे प्रयत्न जोरकसपणे सुरू झालेले आहेत.

गुलाम बणविण्याचे षडयंत्र

विचार आणि आधुनिकता केवळ इंग्रजीतूनच कशी व्यक्त होऊ शकते; हे समाजाच्या गळी उतरविण्याचे उद्योग सर्रास सुरू झालेले आहेत. सगळा समाजच कसा गुलाम होईल, त्याची विचार करण्याची क्षमताच कशी खंडित होईल; हे पाहिले जाऊ लागले आहे. अत्यंत निर्दयपणे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय राजकीय/सांस्कृतिक खेळात आपण कसेबसे आपले अस्तित्व टिकवून ठेवत आहाेत हे वास्तव आहे. तथापि अशा अवस्थेत आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर मातृभाषेशिवाय – या भाषेतील साहित्य, कला, संस्कृती यांच्याशिवाय पर्याय नाही. कारण भाषेतील शब्दांपाठी संकल्पना असतात. या संकल्पना आपल्या साहित्य, समाज आणि संस्कृतीतून अवतरलेल्या असतात. अर्थातच शब्द हे संस्कृतीचे वाहक असतात. माणसांचे जगणे-भोगणे समृद्ध करण्यात भाषा हे माध्यम फार मोठे काम करीत असते; हे मान्यच करावे लागेल. दुदैवाने याकडेच आपल्या समाजाचे अक्षम्य दुर्लक्ष होते आहे. केवळ मराठीच नव्हे; तर सर्वच भारतीच भाषांसमोरच हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषांची ताकद आज खूप मोठ्या प्रमाणात आपण हरवून बसलेलो आहोत.

भाषेच्या प्रचार-प्रसारात उदासीनता

भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यात, भाषेचा प्रचार-प्रसार नेमकेपणाने करण्यातही आपली प्रचंड उदासीनता दिसते आहे. आपल्या भाषिक परंपरा, इतिहास यातून निर्माण झालेली आपली संस्कृती, साहित्य, कला यांची जाणीव समाजात मोठ्याप्रमाणात झाली; की आपल्या भाषेपासून तुटू लागलेला समाज परत भाषेकडे निश्चितच वळू शकतो. तथापि यासाठीचे प्रयत्नही तोकडे पडताना दिसत आहेत. कारण परिवर्तनाच्या, प्रबोधनाच्या चळवळींच्या केंद्रस्थानी समाजाच्या उद्धाराची इतिहासदृष्टी असते. अशाप्रकारच्या इतिहासदृष्टीकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करणे अथवा ती नियोजनबद्दपणे नष्ट करणे याचा अर्थ जनसामान्यांचे अस्तित्व निष्प्रभ करणे होय. आजच्या पैसा हाच परमेश्वर मानणाऱ्या मानसिकतेला हेच हवे आहे. भाषेचा ऱ्हास करून एकसंघ समाज विखंडित करणे आणि वंचितांना कायमचे आचार आणि विचारांनी परावलंबी करणे हे एकप्रकारचे भांडवली षडयंत्रच आहे. या षडयंत्राच्या माध्यमातून येत असलेले परावलंबित्व आपल्या सर्वांच्याच दृष्टिने आत्मघातकी ठरणारे आहे.

भाषेची हेळसांड न परवडणारी

आजच्या भाषिक पर्यावरणाकडे डोळेझाक करणे, भाषेचा वृथा अभिमान आणि भाषेच्या गौरवशाली इतिहासाचे उदात्तीकरण करणे, भाषेचे वार्षिक ‘इव्हेंट’ साजरे करणे म्हणजे वास्तव नजरेआड करणे आहे. शब्दप्रधान भाषेऐवजी अथवा लिपिबद्ध भाषेच्या वापराऐवजी चित्रभाषेवर – इमोजीवर अवलंबून राहणे समाजमाध्यमांवर तिचा बेफिकीरपणे वापर करणे यात काहीच गैर नाही; असे वाटत असले तरी अशा प्रकारच्या सवयी माणसाच्या सर्जनशीलतेवर, संवादात्मकतेवर, संघर्ष करण्याच्या शक्तीवरच छुपा हल्ला करीत असतात. चित्रांच्या-प्रतिमांच्या भाषेचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर आकाशवाणी, दूरदर्शन, मोबाईल, इंटरनेट अशा माध्यमांवर मोठ्याप्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे शब्दांची गरज मागे पडत जाऊन प्रतिमाच मनाचा ताबा घेऊ लागल्या आहेत. शब्दांच्या-वाक्यरचनेच्या जागा आता इमोजी घेऊ लागले आहेत. अर्थातच संवादासाठी शब्दांचा विसर अथवा शब्दांच्या वापराविषयीची उदासीनता हे संस्कृतीचे हरवत जाणे असते. ही एका शेवटाची सुरूवात असून भाषेची ही अशी हेळसांड आपल्या समाजाला परवडणारी नाही. त्यामुळे या अशाप्रकारच्या ‘सावध हाका’ ऐकून आपण भाषेच्या उदासीनतेला योग्य तो नकारात्मक आणि कृतीशील प्रतिसाद दिला पाहिजे. अन्यथा या इमोजीला आपण आपली ओसरी दिली आहेच; मग त्याला आपल्या अस्तित्वाच्या ओसरीवर हातपाय पसरायला वेळ लागणार नाही.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

योगाभ्यास, आयुर्वेद आता आधुनिक युगातल्या चाचण्या अन् कसोट्यांवर यशस्वी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

गोविंद पाटील यांचा बालकवितासंग्रह शिवाजी विद्यापीठ अभ्यासक्रमात

अंतस्थ अनुभवांचे चित्रण

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading