October 9, 2024
Rajendra Ghorpade Dnyneshwari article on Fight against Ego
Home » Privacy Policy » मीपणाच्या अहंकारावर मात…
विश्वाचे आर्त

मीपणाच्या अहंकारावर मात…

अध्यात्म हे अनुभवाने अनुभुतीने शिकण्याचे शास्त्र आहे. अनुभवाशिवाय अनुभुतीशिवाय ते समजणे कठीण आहे. ती अनुभुती घेण्यासाठी राजालाही सन्यास घ्यावा लागतो. कारण मी पणाचा अंहकार  गेल्याशिवाय अनुभुती आणि अनुभव येतच नाही. त्याशिवाय अध्यात्मात प्रगतीही होत नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

परि हे मियां केलें । कीं हे माझेंनि जालें ।
ऐसें नाही ठेविलें । वासनेमाजीं ।। 526 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – परंतु हे कर्म मी केले अथवा माझ्याने सिद्धीला गेले, असा अहंकार वासनेमध्यें ठेवलेला नाही.

अर्जुनाला कृष्णाने लढायला प्रोत्साहीत करण्यासाठी गीता सांगितली. या सर्व घटनेत भगवंतांनी अर्जुनाला निमित्त मात्र कसा आहे हे समजावून सांगितले. हे समजावण्यासाठी त्यांनी विश्वरुपदर्शनही घडविले. जीवनाकडे प्रत्येकाने अशा प्रकारे पाहायला हवे. जीवनात चढ उतार हे येत असतात. पण या गोष्टीत आपण निमित्तमात्र असतो, ही अनुभुती घ्यायला हवी. न्याय व्यवस्था किंवा दंडविधान हे जसे सर्वांसाठी सारखे असते. तसे अध्यात्मात सर्वजण निमित्तमात्र असतात. अध्यात्मात सर्वांनी निमित्तमात्र व्हायचे असते. कोणत्याही गोष्टीत ही अनुभुती यायला हवी. मीपणा गेल्याशिवाय ही अनुभुती येत नाही.

एखादी कलाकृती आपणाकडून घडली. तरी ती कलाकृती आपणाकडून करवून घेण्यात आली अशी अनुभुती यायला हवी. म्हणजेच त्याचा कर्ता करविता कोणी दुसरा आहे. हा अनुभव यायला हवा. म्हणजेच ते माझ्यामुळे घडले किंवा ते मीच केले हा मीपणाचा अहंकार त्यामध्ये असता कामा नये. हे माझे, हे मी केले हा अहंपणा आपणामध्ये असायला नको. म्हणजेच आपण त्या गोष्टीत निमित्तमात्र आहोत ही अनुभुती नित्य असायला हवी. म्हणजेच त्या गोष्टीच्या मी पणाचा अहंकार आपणाला बाधत नाही.

स्वराज्य उभा करणारा राजाही निमित्त मात्र असतो. जरी त्याने स्वतःचे राज्य उभे केलेले असले तरीही तो त्यात निमित्तमात्र असतो. एकदा एक राजा राज्याभिषेकानंतर काही दिवसांनी वन पर्यटनासाठी गेला. त्याच्या राज्यात सुराज्य होते. त्यामुळे त्याने शांतीच्या शोधात वन पर्यटनाचा निर्णय घेतला. त्या जंगलामध्ये फिरता फिरता त्याची भेट एका संत महात्माशी झाली. राजा साध्या वेशात वन पर्यटनासाठी बाहेर पडला होता. त्यामुळे तो राजा आहे, असे कोणास वाटणारेही नव्हते. तसे साधूंचे नाव राजा ऐकून होता. पण राजाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. पाहू हे संत महात्मे मला कसे ओळखतात.

राजा एका सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे त्या साधू जवळ गेला. राजाने नमस्कारासाठी डोके केले तोच त्या संत महात्मानेही राजाला नमस्कार केला. राजा बावरला. तो संत म्हणाला या राजे या, माझा नमस्कार स्वीकार करा. आपले या साधूच्या कुटीत स्वागत आहे. साधुने आपणाला कधीही पाहीले नाही. तसे या जंगलात आपणाला कोणीही ओळखत नाही. पण या साधुंनी मला कसे ओळखले या विचाराने राजा चक्रावून गेला. राजा या साधूजवळ नतमस्तक झाला.

राजाने नम्रपणे विचारले आपण मला कसे ओळखले. ते सांगा? तेव्हा राजाला साधूने आत्मज्ञानाबद्दल सांगितले. तेव्हा राजाने या आत्मज्ञानाचा आग्रह साधूजवळ धरला. तेव्हा तो साधू म्हणाला. सध्या तरी तुला हे शक्य नाही. कारण तुला ते तत्वज्ञान पटकण मान्य होणार नाही. साधू म्हणाला तु म्हणतोस की तू स्वराज्य उभे केले आहे. पण प्रत्यक्षात तु स्वराज्य उभे केलेही नाहीस. तसेच जी संपत्ती तु कमविली आहेत त्यावर सुद्धा तुझा हक्क नाही. ती तुझी नाही. साधुच्या या वाक्याने राजा आश्चर्यचकीत झाला. ते कसे काय असा प्रश्न त्याने केला. राजाने या साधूला आपण स्वराज्य उभे केले आहे असे स्वाभीमानाने सांगितले.

तेव्हा साधू म्हणाला हीच तर खरी गंमत आहे. सध्या तु हे ज्ञान समजून घेण्याच्या स्थितीत नाहीस. कारण तु जे कर्म केले आहेस किंवा जे तु कमावले आहेस. प्रत्यक्षात ते तुझे नाही. तु केवळ त्यामध्ये निमित्तमात्र आहेस. राजा हे ऐकूण आश्चर्यचकीत झाला. तेव्हा साधुने राजाला कसे निमित्तमात्र आहेस हे सर्व समजावून सांगितले. राजाला ती गोष्ट पटली पण पटकण रुचली नाही. ती रुजण्यासाठी राजाने सन्यास घेण्याचा विचार केला.

अध्यात्म हे अनुभवाने अनुभुतीने शिकण्याचे शास्त्र आहे. अनुभवाशिवाय अनुभुतीशिवाय ते समजणे कठीण आहे. ती अनुभुती घेण्यासाठी राजालाही सन्यास घ्यावा लागतो. कारण मी पणाचा अंहकार गेल्याशिवाय अनुभुती आणि अनुभव येतच नाही. त्याशिवाय अध्यात्मात प्रगतीही होत नाही. यासाठी समर्पणाची भावना नित्य ठेवून अंहकाराचा वाराही आपल्या मनाला लागू द्यायचा नाही.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading