संत गोरा कुंभार मडकी वळत वळतच आत्मज्ञानी झाले. त्यांनी त्यांचे कर्म सोडले नाही. सर्व संत पोटा पाण्यासाठी आवश्यक कर्म करतच होते. शांततेच्या शोधात सर्व संसाराचा त्याग करून हिमालयात गेले तरी पोटासाठी कर्म करावेच लागणार. पोटातील अग्नी थंड केल्याशिवाय मनाला शांती मिळणार नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
वांचूनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक ।
एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ।। ७३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा
ओवीचा अर्थ – कर्मावाचून फल देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीचे कोणीही नाही, या मनुष्यलोकामध्ये फक्त कर्मच फल देणारे आहे.
वास्तवाला धरून तत्त्वज्ञान असावे. तरच ते मनाला भावेल. अन्यथा ते निष्क्रिय ठरेल. आत्मज्ञान हे अमरत्वाकडे नेणारे ज्ञान आहे. पण हे सांगताना वास्तवाचे भान ठेवायला हवे. तरच ते या नव्या पिढीला समजेल. कर्माचा त्याग करा असे कोठेही सांगितलेले नाही. जगात वावरायचे असेल तर कर्म हे केलेच पाहिजे. पोटापाण्याचा व्यवसाय सोडून जपमाळा ओढून कोणी जेवणााचे ताट दारात आणून ठेवणार नाही. जो व्यवसाय आहे तो करावाच लागतो.
संत गोरा कुंभार मडकी वळत वळतच आत्मज्ञानी झाले. त्यांनी त्यांचे कर्म सोडले नाही. सर्व संत पोटा पाण्यासाठी आवश्यक कर्म करतच होते. शांततेच्या शोधात सर्व संसाराचा त्याग करून हिमालयात गेले तरी पोटासाठी कर्म करावेच लागणार. पोटातील अग्नी थंड केल्याशिवाय मनाला शांती मिळणार नाही. मारून मुटकून कोणी साधना करू शकत नाही. साधनेची सक्ती करूनही साधना होत नाही. त्यासाठी मनाची तयारी असावी लागते. मनात नसेल तर प्रत्यक्षात कधीच प्रकट होणार नाही. यासाठी कर्म हे मनात यावे लागते. वास्तवात पुढे आलेले कर्म हे टाळता येणारे नाही. ते करावेच लागणार. हे कर्मच फळ देणार आहे. अशी भावना प्रकट व्हायला हवी.
गोरा कुंभार माती मळत होते. माती पायाने मळली जात होती. पण मनात विठ्ठलाचे ध्यान सुरू होते. कर्म होत होते. येथे दोन्ही कामे सुरू होती. रोजचा पोटापाण्याचा व्यवसाय सुरू होताच आणि दुसरीकडे विठ्ठलाची आराधनाही सुरू होती. भक्ती अशी करायची असते. नित्यकर्म सुरू असतानाही भक्ती करता येते. सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचे फक्त ध्यान करायचे असते. कर्मातही ते आहेत हा भाव मनात प्रकट झाला की ते कर्म सहज होते.
भक्तीत मन रमले की ज्ञान प्रकट होते. हे कर्मच फळसूचक आहे. रोज कामावर जाणे आहेच. नेमून दिलेले काम करणे आहेच. हे कर्म करताना मनाची एकाग्रता वाढावी यासाठी सद्गुरूंचे स्मरण आवश्यक आहे. कर्मावर मन एकाग्र व्हावे. सद्गुरू स्मरणाने ही एकाग्रता येते. हे कर्म सहज होत राहते. हे कर्मच मनामध्ये एकाग्रता उत्पन्न करते आणि वाढवते. मन विचलित न झाल्याने योग्य फळ आत्मसात होते. यासाठीच नित्य कर्मावर मनाची एकाग्रता वाढवायला हवी. त्यातच रममाण व्हायला हवे. तेच आपणास आत्मज्ञानाचे फळ देणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.