परिसरातील मूर्त्याविषयी लोकांमध्ये प्रचंड श्रद्धाभाव दिसुन येतो. यावरून हा भाग प्राचीन काळी वैभवशाली आणि श्रीमंत संस्कृतीचा असावा असे प्रकर्षाने जाणवते. इंग्रजकालीन अनेक लढाया याठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आढळते.
बंडोपंत बोढेकर
गडचिरोली
नववर्षाच्या पहिल्या दिवशीच मी मित्रवर्य लक्ष्मण खोब्रागडे यांचे सोबत जूनासुर्ला आणि गडीसुर्ला या दोन गावाला भेटी दिल्या. या दोन्ही गावाचे नाव खूप वर्षापासून ऐकत होतो पण काल येथे जाण्याचा योग आला. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्याच्या ठिकाणांपासून पूर्वेस अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या दोन्ही गावाचे महत्व भौगोलिकदृष्ट्या आणि प्राचीन वास्तुकलांचे दृष्टीने मोठे आहे.
गडीसुर्ला हे गाव नावाप्रमाणेच वस्तुतः उंच टेकडीवर वसलेले आहे. गावालगतच्या या टेकडीवर जलशुद्धीकरण केंद्र स्थापन केलेले आहे, तर पायथ्याशी इंग्रज कालीन विश्रामगृह, चर्च आणि एक मोठा तलाव दिसतो. तलाव भारताच्या नकाशाच्या आकारासारखा दिसतो तर त्या तलावाला लागून असलेल्या गर्द झाडीत ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेची इमारत लपलेली दिसते.
शंकरगडासारखा भासणारा हा भाग येथील तरुणाईचे आकर्षणाचे केंद्र आहे. दुसऱ्या गोसाई टेकडीवर शंकराचे मंदिर असून त्याखाली इतिहासकालीन भुयार आहे. तिथे सुट्टीच्या दिवशी गाव परिसरातील लोक येथे आवर्जून फिरायला येतात. तिथे नवीन जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी सुरू आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय धान शेतीचा आहे. अलिकडे भाजीपाला, कापूस, लाखोरी, तीळ आदी कठाणी पिके येथील शेतकरी घेऊ लागले आहेत. येथील लोक नाट्य, दंडार कला प्रेमी आहेत. गावाच्या मधोमध नाटकाच्या मंडपाचे उभे असलेले खांब दिसून येतात.
गडीसुर्लाच्या गडी वरून सभोवतालच्या जुनासुर्ला, विरई, चांदपूर, भेजगाव , नवेगाव या पाच गावाचे सुरेख दर्शन घडून येते. या भागाचे शासकीय दप्तरात चूरूळ अशी नोंद आहे. चूरूळ चे सुरला असे पुढे नाव झाले असावे आणि हा गडीचा भाग असल्यामुळे गडीसुर्ला आणि जुने गाव आहे म्हणून त्यास जुनासुर्ला असे नाव पडले असावे, असे येथील जाणकार सांगतात.
या दोन्ही गावाची लोकसंख्या प्रत्येकी पाच हजाराच्या जवळपास आहे. येथे मराळ, तेली, कुणबी, गोंड, कुरमार, प्रधान, बेलदार आदी समाजाचे लोक वास्तव्याला आहे. तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्त्वाचे हे गाव आहे.
गडीसुरल्याच्या जवळच केवळ दोन किलोमीटर अंतरावर वैनगंगेच्या काठावर जुनासुर्ला हे ऐतिहासिक असे गाव आहे. मेंढीच्या केसांपासून हातमागावर घोंगडी तयार करण्याचे काम या गावात होते. या कामासाठी हे गाव जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. येथे धान संग्रह करून ठेवण्याची व्यवस्था पारंपरिक पद्धतीची आहे. धानाची ढोली बांबू पासून केलेली असते तसेच आतून-बाहेरून ती शेणाने सारवलेली असते. जेवढा धान त्या ढोलीत भरला जातो तेवढाच धान त्या ढोलीच्या वरच्या तनसित ठेवला असतो. आणि हे धान भरण्याचे कौशल्य फक्त येथील लोकांनीच अभ्यासांनी प्राप्त केले आहे.
जवळपासच्या कुठल्याही गावांमध्ये या पद्धतीने धान भरायचा असेल तर त्याकरता जुना सूर्लाच्या गावांमधील अश्या तज्ञाला बोलवावे लागते. या धानाच्या ढोलीत ओलावा पकडत नाही, आतील धान दमट येत नाही .तसेच धान बिजाई संग्रहित करून ठेवण्याच्या दृष्टीने ही ढोली महत्त्वाची भूमिका बजावते. घराच्या अंगणात ही ढोली स्थित असते. पावसाळ्यात कितीही पाऊस पडला तरी पावसाचे पाणी ढोलीत प्रवेश करू शकत नाही, कारण ही ढोली आतून-बाहेरून शेणाने सारवलेली असते. ढोलीचा वरचा भाग धानाच्या तनसी पासून पिरॅमिडच्या आकाराप्रमाणे बनवलेला असतो. त्यावर शेणपाणी सिंपल्यामुळे आत मध्ये पावसाचे पाणी जात नाही.
या गावाला लागूनच एक प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे. श्रीविष्णू चे हे मंदिर “केशवनाथ मंदिर” म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराचा समोरील भाग बराच मोडतोड झालेला असून अलीकडे हे मंदिर परिसर आता पुरातत्व विभागाने संरक्षित केलेले आहे आणि शासनाचा एक अधिकृत कर्मचारी त्याची देखरेख करतो आहे. या गाव परिसरात अनेक ठिकाणी प्राचीन मुर्त्यांचे भग्नावशेष आढळून येतात.
तलावाच्या पाळीवर एक सुंदर मूर्ती दिसते. ती मूर्ती अशी आहे की, एका बाईच्या डोक्यावरचे मुरमु-याचे लाडू खाण्याचा प्रयत्न नंदी बैल करतो आहे – अशी ही मूर्ती आहे . यासंबंधीची दंतकथा इकडे प्रसिद्ध आहे ती अशी, मुरमुऱ्याचे लाडू विकणारी एक बाई गावात आली असता तिच्या डोक्यावरील टोपल्यात असलेले लाडू खाण्याचा प्रयत्न नंदिने केला असता, त्या नंदीचे दगडात रूपांतर झाले. त्या कथेचे हुबेहूब शिल्प या तळ्याच्या पाळीवर दिसून येते.
तळ्याच्या दुसऱ्या भागाकडे शक्तीमाईचे मंदिर दिसून येते. या मंदिरात चंद्रपूर , वणी ( जि. यवतमाळ) येथून लोक दर्शनाला येतात. ही देवी नवसाला पावते, असे येथील लोक मानतात तर वैनगंगा ते जुनासुर्ला मार्गावर ‘ वाघढोडा’ आहे. त्या वाघढोड्याजवळ माराईचे मंदिर दिसून येते. या मंदिराला गाव देवीचे मंदिर म्हणतात. जुनासुर्ला गावातील लोक या देवीची पूजा करतात. सुप्रसिद्ध मार्कंडा देवस्थान समकालीन या भागातील मंदिराचे बांधकाम झाले असावे. सध्या येथे वास्तव्यास असलेले कापेवार समाजाचे लोक हे पूर्वी मंदिराच्या दगडांना कोरीव आकार देण्याचे काम करीत असत. त्याच्यांमुळेच या भागात ही कोरीव शिल्प कला मंदिराच्या रूपात आपल्याला दिसून येते, असे अभ्यासकांचे मत आहे. परिसरातील मूर्त्याविषयी लोकांमध्ये प्रचंड श्रद्धाभाव दिसुन येतो. यावरून हा भाग प्राचीन काळी वैभवशाली आणि श्रीमंत संस्कृतीचा असावा असे प्रकर्षाने जाणवते. इंग्रजकालीन अनेक लढाया याठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आढळते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
झाडीपट्टीला मी महाराष्ट्राचे काश्मीर म्हणतो. याची खात्री होण्यासाठी कोणीही किमान पंधरा दिवस झाडीपट्टीत व्यतीत करावे, आणि खात्री पटल्याची खात्री करावी. अनाघ्रात असे घनदाट अरण्य, डोंगरदऱ्या, नद्या, तलाव, बांध, अभयारण्ये, …. वगैरेचा अनुभव अवश्य घ्यावा.