‘रथ मांगल्याचा’ हे पुस्तक प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजे – डॉ. सदानंद मोरे
‘रथ मांगल्याचा’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे एक पती आपल्या पत्नीबद्दल लिहितो आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत गृहिणीला कधी बरोबरीचा सन्मान दिला जात नाही. किंबहुना गृहिणी या नात्याने तिच्या संसारातील योगदानाबद्दल हेटाळणीच केली जाते. लेखक डॉ. दशरथ भोसले यांनी आपल्या पत्नीने संसारात पार पाडलेल्या जबाबदाऱ्या, मुलांच्यावर केलेले संस्कार, नातेवाईक, सासरची, माहेरची, सारी कुटुंबे आपल्या प्रेमळ वागणुकीने एक संध ठेवली पत्नीने केलेले संस्कार पतीच्या उच्च शिक्षणासाठी केलेले समर्पण वाखाणण्यासारखे आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी डॉ. भोसले हे पुस्तक लिहितात ही बाब कौतुकास्पद आहे. हे पुस्तक संस्कारांचा ठेवा म्हणून प्रत्येक घरात वाचले गेले पाहिजे, असे उदगार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी स्नेहवर्धन प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘रथ मांगल्याचा’ या पुस्तक प्रकाशन करताना काढले.
डॉ. सदानंद मोरे यांनी पुस्तकाचे लेखक डॉ. दशरथ भोसले यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी मराठी विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली ही बाब खरोखरीत कौतुकास्पद आहे. त्यांनी पीएच. डी. साठी निवडलेला शेतकऱ्यांचे विस्थापन हा विषय समाजाच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा आहे. डॉ. भोसले यांनी सादर केलेल्या प्रबंधावर एखादे पुस्तक तयार होणे गरजेचे आहे. असे विचार त्यांनी व्यक्त केले.
डॉ. दशरथ भोसले यांचे पीएच. डी. चे मार्गदर्शक, लातूर साहित्य संघाचे अध्यक्ष, लेखक, प्राध्यापक, डॉ. जयद्रथ जाधव मनोगतात म्हणाले की, रथ मांगल्याचा हे पुस्तक लग्नात प्रत्येक नववधूला द्यावे. हल्लीच्या टीव्ही सिरीयलमधील सासु सुनेचे भांडण, घरातील हेवेदावे, घरे विभक्त करणाऱ्या कजाग स्त्रिया, असल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर नाते सांभाळणारी, संस्कार सांभाळणारी, संस्कारक्षम स्त्रीचे हे चरित्र आहे. घराचे घरपण टिकवायचे असेल तर रथ मांगल्याचा हे पुस्तक प्रत्येक सासुने, प्रत्येक सुनेने, प्रत्येक नणंदेने वाचावयास हवे.
डॉ. जयद्रथ जाधव पुढे म्हणाले की, डॉ. दशरथ भोसले यांनी माझ्याकडे पीएच.डी. केली. वयाच्या पंच्याहत्तरीत त्यांनी चिकाटीने आणि उत्साहाने सर्व काम केले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, मराठी पत्रकार संघ किरण जोशी यांनी रथ मांगल्याचा या पुस्तकाबाबत सांगितले की, हे पुस्तक वेगळ्याच संस्काराच्या उच्च पातळीवर जाणारे आहे. ओघवत्या भाषेतील भावनेला हात घालणारे हे पुस्तक आहे. प्रत्येकाने हे पुस्तक अवश्य वाचायला हवे वाचायला.
अमोलिका मगर या छोट्या मुलीने डॉ. भोसले यांचे काढलेले सुंदर पोट्रेट अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते डॉ. भोसले यांना प्रदान केले. स्नेहवर्धनच्या प्रकाशिका, लेखिका, प्रा. डॉ. स्नेहल तावरे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन करणाऱ्या सौ. शिल्पा शिंदे भोसले यांचा सत्कार केला.
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार मोहन दादा जोशी यांनी प्रसंगोपात विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, डॉ. अरविंद सावंत, डॉ. विजय मेहता, डॉ. शंकरराव मगर या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.