July 27, 2024
Home » समाधीपाद : चित्त स्थिर कसे होते ?
विश्वाचे आर्त

समाधीपाद : चित्त स्थिर कसे होते ?

समाधिपाद सूत्र-३९ यथाभिमतध्यानाद्वहष

ज्याला जे आवडते, त्यात त्यांचे मन रमले की चित्त स्थिर होते. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी जो जे वांछील तो ते राहो… असे म्हटले असावे. म्हणूनच सगळे जाणकार, मुलांना ज्यात आवड आहे, त्यात त्यांना करियर करायला प्रोत्साहन द्या, असे मुलांच्या आई-वडिलांना सांगत असतात.

माणसाच्या ठिकाणी वेगवेगळ्या आवडीनिवडी असतात. त्यामुळे ज्याच्या ठिकाणी शास्रीय मर्यादांच्या चौकटीत ज्याच्यावर श्रद्धा असते, त्यात रस घेत राहिले की चित्त एकाग्र होण्यास मदत होते. एकदा का चित्त स्थैर्य प्राप्त झाले, की मग ते हवे तिथे केंद्रित करता येऊ शकते.

समाधिपाद

सूत्र-४० परमाणुपरममहत्त्वांतोअस्य वशीकार:

आतापर्यंत सांगितलेल्या उपायांनी स्थिर झालेले चित्त सगळ्यात सूक्ष्म आणि सगळ्यात महान अशा ठिकाणी  पोचू शकते. या सगळ्यांना ते चित्त वश करू शकते.

समापत्ती कशास म्हणतात?

समाधिपाद सूत्र-४१

क्षीणवृत्तेरभिजातस्येव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु  तत्स्थतदञ्जनता समापत्ति:

याआधी सांगितलेल्या उपायांनी ज्याच्या राजस आणि तामस वृत्ती क्षीण झालेल्या आहेत, त्याचे चित्त स्फटिकासमान स्वच्छ होते. ज्याप्रमाणे, अत्यंत शुद्ध अशा स्फटिकासमोर एखादी निळी, पिवळी किंवा लाल रंगाची वस्तु ठेवली असता, जसे दिसते, तसे सारे स्वच्छ दिसू लागते.

सत्वाच्या प्रकाशामुळे आणि सात्विकता वाढल्यामुळे, चित्त इतके स्वच्छ झालेले असते की, ते ज्या वस्तूशी एकरूप होईल, त्या वस्तूशी तदाकार होऊन जाते. ती वस्तु स्थूल असो, अगर सूक्ष्म असो. इंद्रिये असोत किंवा अहंकार असो. या सगळ्यांशी ते एकरूप होऊन तिथले सर्व ज्ञान ग्रहण करू शकते. याला समापत्ती म्हणतात.

समाधी पाद – चित्त स्थिर करण्याचा आणखी एक मार्ग

सूत्र – ३६ विशोका वा ज्योतिष्मती

या सूत्रात चित्त स्थिर करण्याचा आणखी एक मार्ग सांगितला आहे.

विशोका = शोकरहित वा = किंवा ज्योतिष्मती = प्रकाशमय प्रवृत्ती मनाच्या स्थितीला ताब्यात ठेवते. मनाची चंचलता रोखून धरते.

ज्याप्रमाणे याआधीच्या सूत्रात गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द ही ध्यानाची ठिकाणे सांगितली, त्याप्रमाणे विशोका ज्योतिष्मती या प्रवृत्तीचीही विशेष ठिकाणे आहेत. ती ठिकाणे सुषुम्नेच्या मार्गात असलेल्या मणिपूरक ((नाभी), अनाहत (हृदय) आणि आज्ञा (भ्रूमध्य) या चक्रांच्या ठिकाणी चित्त स्थिर करायला हवे. यामुळे सुद्धा चित्त स्थिर होण्यास मदत होते.

समाधिपाद सूत्र – ३७ वीतरागविषयं वा चित्तम्

या सूत्रात चित्त स्थिर करण्याचा आणखी एक (चौथा) उपाय सांगण्यात आला आहे.

ज्या मोठमोठ्या योग्यांनी विषयांचा संपूर्णपणे त्याग केला आहे, ज्यामुळे त्यांच्या चित्तातले अविद्यादी संस्कार पूर्णपणे नष्ट झाले आहेत, अशा योग्यांच्या चित्ताचे ध्यान केले तर साधकाचे चित्त एकाग्र होऊ शकते.

   लेखन – प्रा. अ. रा. यार्दी, धारवाड.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कोरोनामुक्तीत अध्यात्माचे महत्त्व…

अध्यात्म हा ऐच्छिक विषय

सबीज समाधी कशास म्हणतात ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading