July 26, 2024
Home » गॅलिलिओ गेला । तुकोबाच्या भेटी ।
मुक्त संवाद

गॅलिलिओ गेला । तुकोबाच्या भेटी ।

पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली.

दिलीप धोंडे

पौष शुद्ध ११, शके १९४२.
पुत्रदा एकादशी.

रामेश्वर भटांनी जेव्हा तुकोबांना काव्य बुडवायला सांगितले तेव्हा रूढीने पहिल्याने स्फूर्तीवर जय मिळविला. पुढे रामेश्वर भट तुकोबांचे भक्त झाले, त्यांच्या प्रीतीतले १४ टाळकरी पैकी एक होते. भटांनी कवित्वावर वार केला होता, कवित्वाची जलपरीक्षा घेतली होती. तीच गोष्ट आघातासारखी न होता कवित्वाची कीर्ती सर्वत्र पसरविण्यास कारण झाली.

या पूर्वी धर्ममार्तंडांकडून इटली मध्ये गॅललीयो(१५६४-१६४२), पोलंड मध्ये कोपर्नकस (१४७३-१५४३) यांना रूढी विरुद्ध सिद्धांत मांडल्याने त्रास झाला होता.

सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा

गॅलिलिओ गॅलिली, हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता. त्या काळात अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धान्त मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा अशी परंपरा तोपर्यंत होती. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धान्त प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पाडला. पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा बत्तीस पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणीमुळे लागले.


गॅलिलिओ गेला । तुकोबाच्या भेटी ।

गॅलिलिलोने ‘पृथ्वीमध्य सिद्धांत’ नाकारुन सप्रमाण दाखवून दिले की,’सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वीच सूर्याभोवती फिरते..!’ त्याने केलेल्या सत्यशोधनाला ख्रिश्चन धर्मपीठाने बायबलद्रोही ठरवून त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला कठोर शासन केले होते…गॅलिलिओने भीतिपोटी आपले संशोधन मागे घेऊन ख्रिश्चन धर्मपिठाची माफी मागितली होती…! त्यानंतर या चुकीच्या शिक्षेबद्दल त्याच्या मृत्यूनंतर ३५० वर्षांनी ख्रिश्चन धर्मपीठांनी गॅलिलिओची माफी मागितली आहे.

तुकोबा आणि गॅलिलिओ हे समकालीन होते. दोघांनीही धर्मव्यवस्थेला दिलेल आव्हान सर्वश्रुत आहे. विंदा करंदीकर यांच्या ‘शेक्सपिअर भेटी आला’ या रचनेवरून प्रेरित ही नवी रचना…

गॅलिलिओ गेला । तुकोबाच्या भेटी ।
इंद्रायणी काठी । भेट झाली ॥

जाहली दोघांची । उराउरी भेट ।
उरातले थेट । उरामध्ये ॥

तुका म्हणे गॅली । थोर तुझे शोध ।
आकाशाचे बोध । त्वां घेतले ॥

दुर्बीण ती हाती । पृथ्वीवरी उभा ।
ठाव घेई नभा । दूरवर ॥

सूर्य तो स्थिर । पृथ्वीच चंचल ।
खोडी बायबल । धैर्य किती ॥

गॅली म्हणे तुका । झाला रे बेरंग ।
नाही पांडुरंग । दुर्बिणीत ॥

बायबलद्रोही । दिले ठरवून ।
शासन भोगून । त्रासलो ब्वा ॥

तुका म्हणे छे छे । कसा रे तू गॅल्या ।
लगेच मानला । पराभव ॥

नको सोडू मध्ये । साथ ती सत्याची।
हमी विजयाची । तुका देई ॥

कुठून आणावी । निडर ती जिद्द ।
ध्येय ते अभेद्य । सत्याप्रती ॥

बुडवली जरी । तुझी ती गाथा ।
परी ताठ माथा । विवेकाचा ॥

पाय धरी गॅली । तुझा तो व्यासंग ।
वीणेचा हा दंग । आकाशव्यापी ॥

फुकाचे कौतुक । पुरे म्हणे तुका ।
सत्याचा तो ठेका । नको सोडू ॥

मागे नको हटू । दिले प्रोत्साहन ।
पुष्पक विमान । जरी आले ॥

वीणेत तुकाच्या । गॅलीही रंगला ।
अभंगी गुंगला । विद्रोहाच्या ॥

नभा पाही तुका । डोळा ती दुर्बीण ।
वीणा सोपवून । गॅलीकडे ॥

गेले निघोनिया । दोघे दोन दिशा ।
कौतुक आकाशा । आवरेना ॥

  • विनायक होगाडे
    9511661381/9011560460

(साैजन्य – http://tukaram.com/marathi/kavita/kavita_index.htm)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात…

तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हो कोवळा॥

सावध रे सावध…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading