March 25, 2023
Spirituality Optional Subject article by Rajendra Ghorpade
Home » अध्यात्म हा ऐच्छिक विषय
विश्वाचे आर्त

अध्यात्म हा ऐच्छिक विषय

अध्यात्म हा ऐच्छिक विषय आहे हे लक्षात घ्यायला हवे. अध्यात्म जबरदस्ती करून शिकवता येत नाही. ते अनुभुतीतूनच शिकता येते. यासाठी ते शास्त्र शिकण्याची आपली इच्छा असायला हवी तरच ते समजणार आहे. अनुभुतीशिवाय आध्यात्मिक विकासही अशक्यच आहे. तुम्हाला त्या शास्त्राचा अनुभव आला नसेल तर ते कधीच समजणार नाही किंवा पटणारही नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

तूं जया प्रति लपसी । तया जग हे दाविसी ।
प्रकटु तै करिसी । आघवेंचि तूं ।। ४।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा

ओवीचा अर्थ – तूं ज्यांना लपतोस, त्यांना हे जग दाखवितोस. (म्हणजे ज्यांच्यामध्ये तुझ्या संबंधाने अज्ञान असते त्यांना तुझे स्वरुप न दिसता जग दिसते) व तूं ज्यांना प्रकट होतोस, त्यावेळी त्यांना सर्व तूच करतोस ( म्हणजे ज्यांच्यामध्ये तुझ्यासंबंधाने ज्ञान असते त्यांना जग न दिसतां सर्व तूच दिसतोस.)

देवत्व ज्याला पटते त्यालाच अनुभुती येते. तुम्हाला अध्यात्म पटत नाही तुम्हाला अनुभुती येणार नाही. यासाठी अध्यात्माचा अनुभव होणे गरजेचे आहे. आपल्या आसपासच्या घटनातून आपली मनशांती विचलित होते. धक्कादायक प्रसंगानी आपणाला भिती येते. अशावेळी आपणास देवाचा धावा सुचतो. पण आपला देवावर विश्वास नसेल तर देवाची अनुभुती होणार नाही. ज्यांना एखादी गोष्ट पटत नाही त्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्नही करू नये. देवही असाच आहे. ज्याला पटत नाही त्याला तो आपली अनुभूती कधीच करून देत नाही. किंवा त्या फंदातही पडत नाही. यावरून आपल्याकडे एक म्हण प्रचलित झाली असावी. गाढवा समोर वाचली गीता, अन् कालचा गोंधळ बरा होता. ज्यांना या गोष्टी पटत नाहीत त्यांना सांगण्यात वेळ व्यर्थ घालवण्यात काहीच अर्थ नाही.

अध्यात्म हा ऐच्छिक विषय आहे हे लक्षात घ्यायला हवे. अध्यात्म जबरदस्ती करून शिकवता येत नाही. ते अनुभुतीतूनच शिकता येते. यासाठी ते शास्त्र शिकण्याची आपली इच्छा असायला हवी तरच ते समजणार आहे. अनुभुतीशिवाय आध्यात्मिक विकासही अशक्यच आहे. तुम्हाला त्या शास्त्राचा अनुभव आला नसेल तर ते कधीच समजणार नाही किंवा पटणारही नाही. आधुनिक जगाला तर हे थोतांड वाटेल. कारण आधुनिक विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की त्यापुढे हे शास्त्र त्यांना तुच्छ वाटते. मुळात हे शास्त्र त्या जगाच्या पलिकडचे आहे. त्या जगाच्या पलिकडे जाऊन जेव्हा विचार सुरु होईल तेव्हा हे शास्त्र आत्मसात होते. अन्यथा त्या आधुनिक जगातच आपण गुरफुटून राहातो.

जबरदस्ती करून कोणाला अध्यात्म शिकवण्याच्या पंदात पडू नये. समस्त मानव जातीचे कल्याण करणारा हा विषय असला तरी हा ऐच्छिक विषय आहे. तो केवळ अनुभुतीतूनच समजतो. सक्ती करून कोणालाही कधीही अनुभुती येणार नाही. त्याला कधीही देवत्व समजणार नाही. तो त्यांच्यामध्येच आहे. पण त्याचा विसर त्यालाच पडला आहे. त्याला जगच दिसते. पण स्वतःतील देवत्व कधीच दिसत नाही. यासाठी तो ते समजण्याच्या मनस्थितीत असायला हवा.

अध्यात्म हा विषय आवडीने शिकण्याचा आहे. येथे सक्ती नाही. सक्ती करूनही येथे काहीच मिळत नाही. हिमालयात जाऊन साधना करणाऱ्या प्रत्येकालाच आत्मज्ञान प्राप्त झाले का ? सक्तीने शरीराला पिडा करून साधना केली तरीही काहीच प्राप्त होत नाही. यासाठी त्या शास्त्रातील मर्म जाणून घ्यायला हवे. ते समजून घेण्यासाठी साधना करावी. तशी आपली मानसिकता हवी. तरच अनुभुती येईल. या अनुभुतीतूनच साधनेला गती मिळते. यासाठी आवश्यक असणारे अवधान आपणाला राखता यायला हवे. कारण अनुभुती कधी कोणाला येईल हे सांगता येत नाही.

इच्छा नसेल तर त्यांनी अध्यात्माची पायरी कधीच चढू नये. यातून काहीच प्राप्त होत नाही. विश्वास नसेल तर अनुभुती येणार नाही. अनुभुती म्हणजे काय तर आपणाला झालेली आत्म्याची जाणीव. आत्म्याचा अनुभव. मी आत्मा आहे याची आलेली प्रचिती. ही जाणीव सदैव आपल्यात राहील्यास आपण आत्मज्ञानी होतो. सर्व विश्वात तो व्यापला आहे याची अनुभुती आपणास येते. प्रत्येक गोष्टीत त्याचा वास असल्याची अनुभुती आपणास येते. अनुभुतीतून शिकण्याचे अध्यात्म हे शास्त्र आहे. तरच ते आपणास समजू शकते.

Related posts

आत्मज्ञानाची लढाई हा योगायोगच

सतविचार अन् आचरण हाच विकारांवर उपाय

म्हणोनि यावया शांती । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । (एकतरी ओवी अनुभवावी)

Leave a Comment