September 9, 2024
Shivaji Maharaj close relationship with books and literature
Home » शिवरायांचे ग्रंथ अन् साहित्याशी जिव्हाळ्याचे नाते
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिवरायांचे ग्रंथ अन् साहित्याशी जिव्हाळ्याचे नाते

पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयात ३५१ व्या शिवराज्याभिषेकदिनानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या इतिहास विभागप्रमुख डॉ. भावना पाटोळे मांडलेले विचार…

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक संघर्षांचा सामना करत स्वराज्य उभे केले. ते केवळ स्वराज्य नव्हते तर ते सुराज्यही होते. आपल्या अलौकिक दुरदृष्टीने स्वराज्यावर येणाऱ्या संकटांना कसे सामोरे जाता येईल याचे आराखडे राजे बांधत अन् त्यानुसार आवश्यक त्या योजना आखत. अभ्यासू अन् संशोधकवृत्तीच्या शिवरायांनी उत्तम संघटन कौशल्य व धिरोदत्त नेतृत्त्वाने विरोधकांना पराभूत केले. स्वराज्य निर्मितीकरिता त्यांनी सह्याद्री व समुद्राला कवेत घेतले. शिवकालात भारतात आलेल्या अॅबेकॅरे या फ्रेंच प्रवाशाने शिवरायांच्या उदात्त ध्येय व विशाल महत्त्वाकांक्षेची नोंद करताना त्यांच्यातील कुशल राजनीतित्व, खडतर कामगिरी यशस्वीरित्या पार पाडण्याची अद्वितीय क्षमता व कौशल्याचा वेध घेतला आहे.

सन १६४९ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी पुरंदर किल्ल्यावरील सैनिकांना लढाईच्या योजनेसाठी एकत्र आणले होते. यावेळी शिवरायांनी या सैन्यांला केलेले प्रेरणादायी मार्गदर्शन उल्लेखनीय ठरते. आदिलशहाच्या कैदेत असणाऱ्या शहाजीराजाची सुटका करून स्वराज्यावर आलेल्या संकंटांला ते निधड्या छातीने सामोरे गेले होते. फत्तेखानाचा पुरंदरवर केलेला पाडाव, मोगलांशी केलेले संगनमत, आदिलशहाशी केलेला तह या घटनातून त्यांचे शौर्य व मुसद्देगिरी दिसून येते. माझ्या भूमीचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे अशी ठाम धारण त्यांची होती. स्वराज्यावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने येणारा कोणीही असो त्याची इच्छा कधीही फळाला येणार नाही असा इशारा विरोधकांनी त्यांनी दिला.

विवेकी दृष्टिकोन असलेल्या शिवरायांनी भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेतला नाही. प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार केलेला दिसतो. स्वराज्याबरोबरच सुव्यवस्थेवरही त्यांचा भर होता. लोककल्याणकारी कार्यातून प्रजेचा विश्वास त्यांनी संपादन केला. त्यांनी जनतेमध्ये गाढ विश्वास रुजविला. याचमुळे त्यांच्या पश्चातही स्वराज्याकरिता जनता लढत राहीली. असे उदाहरण इतिहासात फार क्वचितच पाहायला मिळते.

आरमाराची उभारणी, दुर्गनिर्मिती, आरमार, दक्षिण भारतातील साम्राज्यविस्तार व प्रसंगी मोगलांशी लढा देतानाच पातशाह्यांचे एकीकरण अशा विशाल दुरदृष्टीतून त्यांनी कार्य केले. या राजाने महाल बांधले नाहीत तर स्वराज्याच्या संरक्षणाकरिता किल्ल्यांची मालिका तयार केली. शिवरायांच्या दुरदृष्टीमुळेच व कार्यकर्तृत्वामुळे त्यांच्या पश्चातही स्वराज्य सुरक्षित राहिले. आरमाराची उभारणी हा तर हिंदुस्थानच्या इतिहासातील नव्या पर्वाचा प्रारंभ होता. डच, पोर्तुगीज, इंग्रज या परकिय सत्तांवर त्यांनी नियंत्रण मिळविले.

मानवतावादाची कास धरणाऱ्या या राजकर्त्याने आपल्या राज्यात स्त्री-पुरूष गुलामांचा व्यापार चालणार नाही असे सुनावले. गुलामांची सवलत तात्काळ बंद केली. औरगजेबला लिहिलेल्या पत्रात जिशिया कराचा निषेध केला. हा अखिल भारतीयांच्या नेतृत्त्वाचा बुलंद आवाज नव्हे काय ? आदर्श राज्यकारभार करणाऱ्या शिवरायांच्या यशस्वी नेतृत्त्वाचा आलेख उंचावत गेला. अखंड कार्यमग्न असतानाही ग्रंथ व साहित्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. स्वराज्यात त्यांनी ग्रंथनिर्मितीला प्रोत्साहन दिले. दैनंदिन व्यवहारातील अन्य भाषिक शब्द असताना प्रति मराठी शब्दांचा राज्य व्यवहार कोश त्यांनी करून घेतला. तंजावरच्या सरस्वती महालातील ग्रंथालयाच्या हस्तलिखित वहीत महाराजांनी रचलेला अभंग हा मौलीक ऐतिहासिक दस्तऐवज आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

साखराळे येथे ६ऑगस्टला रंग पावसाचे खुले कविसंमेलन

बांधकाम शास्त्राचे द्रोणाचार्य – प्रा. डी. पी. सखदेव

एककांचे मानकरी…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading