जीवनाचा कार्यभाग साधताना कोणत्या गोष्टी योग्य आहेत कोणत्या अयोग्य आहेत हे जाणून घ्यायला हवे. यासाठी अवधान हे महत्त्वाचे आहे. दक्ष राहून आमिष कोणते आहे हे ओळखता यायला हवे. म्हणजे आपण त्याच्या गळाला लागणार नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
जैसा मीनाच्या तोंडी । पडेना जंव उडी ।
तंव गळ आसुडी । जळपारधी ।। १४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे माशाच्या तोंडात आमिष पडल्यावर लगेच धीवर गळास हिसका देतो.
जीवनात आपणास अनेक आमिषे दाखवली जातात. पण हे आमिष आहे असे कोणी सांगत नाही. आमिष दाखवून आपला कार्यभाग साधला जातो. सध्या तर जाहीरातदारांचा हाच सर्वात मोठा फंडा आहे. हे आमिष आहे असे कोणी सांगत नाही. कारण आपण त्यात गुंतावे असा त्यांचा हेतू असतो. आपण त्यात गुरफटलो गेलो की आपोआपच त्यांचा कार्यभाग त्यांना साधता येतो. मासा पकडण्यासाठी गळाला खाद्य बांधले जाते व ते पाण्यात सोडले जाते. मासा ते खाद्य खाण्यासाठी येतो अन् गळात अडकतो. मासा जाळ्यात सापडल्यावर लगेच तो पारधी गळाला हिसका मारतो. माशाला हे खाद्य नसून हा गळ आहे याची जाणिवही नसते.
दैनंदिन जीवनात दाखवली जाणारी अशी आमिषे ओळखायला हवीत. या आमिषात आपण गुरफटणार नाही याची काळजी घ्यायला हवी. म्हणजेच संसार करताना आपण त्यात गुरफटायचे नसते. त्यात गुरफटलो तर आपण त्यातून कधीच बाहेर पडू शकत नाही हे लक्षात घ्यायला हवे. यासाठी संसारातील आमिषे ओळखूण जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच आपण जीवनात यशस्वी होऊ. आमिषे दाखवून मते मागणारेही आता गल्लोगल्ली पाहायला मिळत आहेत. अशाने आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो. वाटते काय होते मिळते ते खा. कशाला सोडायचे ते.? पण हेच आमिष आपली फसवणूक करते हेच मुळी लक्षात येत नाही. अशाने लोकशाहीची काय अवस्था झाली आहे हे वेगळे सागण्याची गरज नाही.
देहात आत्मा गुरफटला आहे. तो देहाच्या गळाला लागला आहे. त्यातून तो बाहेर कसा काढायचा यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. तरच आपण जीवनात यशस्वी होऊ. मन, बुद्धी ही यासाठी आत्म्यावर केंद्रीत करायला हवी. मी देह आहे ही अनुभूती न घेता मी आत्मा आहे याचा अनुभव घ्यायला शिकायला हवे. म्हणजे देहाच्या जाळ्यात अडकलेला आत्मा बाहेर पडेल. मी देह आहे या आमिषात गुरफटून जाऊ तर त्यातच आपण मरून जाऊ. यासाठी देहाचे आमिष दूर करून आत्म्यावर दृष्टी केंद्रीत करायला हवी.
जीवनाचा कार्यभाग साधताना कोणत्या गोष्टी योग्य आहेत कोणत्या अयोग्य आहेत हे जाणून घ्यायला हवे. यासाठी अवधान हे महत्त्वाचे आहे. दक्ष राहून आमिष कोणते आहे हे ओळखता यायला हवे. म्हणजे आपण त्याच्या गळाला लागणार नाही. आमिष ओळखण्याची दृष्टी सद्गुरुंच्यामुळे प्राप्त होते. यासाठी हा मार्ग निवडायचा असतो. यासाठी त्यांनी सांगितलेल्या साधनेने मन स्थिर करून आमिषे ओळखायला शिकावे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.