श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी कोल्हापूर येथे सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम सुरू
दिवसेंदिवस भारतामध्ये सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत आहे, परंतु अपेक्षित उत्पादन मिळत नाही, त्यासाठी वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे शेतकऱ्यांना चांगले बियाणे वेळेवर उपलब्ध न होणे हे आहे. यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावरील श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केद्रात सोयाबिन बिजोत्पादन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अंतर्गत इंदौर येथील भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्थान यांच्यामार्फत हा प्रकल्प आहे. एका वर्षात तीन टप्प्यातील (3S1Y/थ्री स्टेज वन इयर) सोयाबीन बिजोत्पादन प्रकल्प असून याची मंजूरी श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्रास मिळाली आहे. या अंतर्गत उन्हाळी हंगामासाठी 85 एकरावर मठाने सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविला आहे. त्यासाठी NRC-130 हे कमी दिवसात परिपक्व होणारे वाण घेतले आहे. तसेच येथे उत्पादित केलेले बियाणे पूर्ण भारतात विक्रीसाठी पाठविले जाणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी महत्त्वाचा ठरला जाणारा घटक म्हणजे उच्च प्रतीचे बियाणे होय. त्याच अनुषंगाने सोयाबीनचे जास्त उत्पादन देणारे वाण, नुकतेच प्रसारित झालेले सुधारित वाण व कमी दिवसाचे वाण शेतकऱ्यांपर्यंत लवकर पोहोचावे या उद्देशाने या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच ह्या प्रकल्पाअंतर्गत सोयाबीन प्रोसेसिंग युनिटही सुरू केले जाणार आहे. त्यासाठी के.व्ही.के, कणेरी येथे श्री. बी. के. श्रीवास्तव, डेप्युटी कमिशनर (तेल बियाणे) कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, भारतीय सोयाबीन अनुसंधान संस्थानचे डायरेक्टर नीता खांडेकर, प्रधान शास्त्रज्ञ डॉ. संजय गुप्ता, धारवाड कृषि विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. आर. हंचनाळ, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र सिंह या सर्वांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
एनआरसी -१३० या सोयाबिनच्या वाणाची वैशिष्ट्ये
- अवघ्या 92 दिवसात परिपक्व होणारे वाण
- मध्य भारतात सध्या जेएस95-60 आणि जेएस 20-34 हे वाण घेतले जाते. त्यातील जेएस 95-60 हे वाण १५ वर्षे जुणे असून अनेक रोगांना ते बळी पडते. तर जेएस 20-34 या वाणाची उंची अवघी 35 सेटीमीटर आहे यामुळे यंत्राच्या सहाय्याने त्याची कापणी करणे अवघड जाते. या दोन्ही वाणांना एनआरसी 130 हे वाण पर्याय ठरू शकणार आहे.
- एनआरसी 130 या वाणाची उंची 48 सेटीमीटर आहे
- हे वाण चारकोट रॉट, पॉड ब्लाईट आणि टारगेट लिफ स्पॉट या रोगास प्रतिकारक आहे
- स्टेम फ्लाय, बिटल या किडींनी प्रतिकार करण्याची क्षमता या वाणामध्ये आहे.
- बिया आकाराने मोठ्या असून 100 बियांचे वजन 12.5 ग्रॅम इतके भरते तर 17.8 टक्के तेलाचे प्रमाण यामध्ये आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.