हा आत्मा सर्वांच्यामध्ये आहे. तो येतो आणि जातो. तो आला म्हणजे प्रकट झाला असे आपण समजतो. तो गेला म्हणजे मृत झाला असे आपणास वाटते. पण प्रत्यक्षात तो प्रकटही होत नाही आणि मृतही होत नाही. तो अविनाशी आहे. तो अमर आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
या उपाधिमाजी गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ।। 126 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा
ओवीचा अर्थ – या देहादी प्रपंचामध्ये सर्वत्र चैतन्य गुप्त रुपाने आहे. तत्त्व जाणणारे संत ते ओळखून त्याचेंच ग्रहण करतात.
तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे. माणसाप्रमाणे काम करणारा संगणक केव्हाच संशोधकांनी शोधला आहे. आता तर त्याही पुढे जाऊन तो माणसाशी संवाद करत आहे. माणसाला तो प्रत्येक कार्यात सल्लामसलत करत आहे. माणसाच्या वेदना तो जाणू लागला आहे. नाडी तपासून रोग निदान करणारे वैद्य आहेत. पण आता संगणकही हे काम करू लागला आहे.
शरीर पंचमहाभूतांपासून तयार झाले आहे. संगणकही अशाच पंचमहाभूतापासून तयार झाला आहे. शरीरात जसा आत्मा आला आहे तसा संगणकात आपण प्रोग्रॅम भरला आहे. माणसाला हे दाखवून देत आहे की देहात जसे चैतन्य घातले आहे. तसे ते इतर निर्जीव वस्तूतही घालून त्याला सजीव करता येते. पण हे चैतन्य हा आत्मा हा या देहापासून वेगळा आहे. तो काढला की तो देह निर्जीव होतो. संगणकातील प्रोग्रॅम काढला की संगणकही निर्जीव होतो. तसे हे आहे.
देहात आलेले हे चैतन्य ओळखायचे आहे. हे चैतन्य जो जाणतो तो संतपदाला पोहोचतो. संत हे चैतन्यच तेवढे स्वीकारतात. एखाद्याचे हृद्य खराब झाले असेल तर दुसऱ्याचे हृद्यही त्या शरीरात बसविता येते. ठराविक कालावधीत हा बदल करता येऊ शकतो. तंत्रज्ञानाने ते शक्य झाले आहे. पण हे करताना ज्याचे हृद्य बसविले जाते त्याचा जीव तो वैद्य वाचवू शकतो का? त्याचा कार्यकाल कायम ठेवू शकतो का? तसे तो करू शकत नाही. कारण जीव शरीरात येणे आणि जाणे हे त्याच्या हातात नाही.
हा आत्मा सर्वांच्यामध्ये आहे. तो येतो आणि जातो. तो आला म्हणजे प्रकट झाला असे आपण समजतो. तो गेला म्हणजे मृत झाला असे आपणास वाटते. पण प्रत्यक्षात तो प्रकटही होत नाही आणि मृतही होत नाही. तो अविनाशी आहे. तो अमर आहे. ती जी वस्तू आहे. ते जे चैतन्य आहे. तेच तर आपणास ओळखायचे आहे. त्याच्यावरच तर नियंत्रण मिळवायचे आहे. साधनाही त्याचसाठी करायची आहे. एकदा का आपण त्याला ओळखलं. त्याच्यावर नियंत्रण मिळवले. तर आपण आत्मज्ञानी होतो. ते ज्ञान आपल्या सदैव सोबत असते. आपण त्या संतत्वाला पोहोचतो. जीवनात येऊन हेच मुख्य कार्य करायचे आहे. जीवनाचा अर्थ यामध्ये दडला आहे. जीवनाचे हेच मुख्य कार्य आहे. यासाठी आपला जन्म आहे. तो सार्थकी लावण्यासाठी ही साधना आवश्यक आहे. चैतन्य ओळखा आणि जीवन समृद्ध करा.
।। ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.