May 23, 2024
Kateri Paywat Ananta Soor Book Review by rajendra khandare
मुक्त संवाद

‘काटेरी पायवाट’ : एक प्रेरणादायी दस्तऐवज

मानव जातीत जन्म घेऊन मानव होता आलं तरी पुरे झालं केवळ मानव धर्म महत्वाचा आहे. उज्वल भवितव्यासाठी मानव धर्माशिवाय पर्याय नाही. सर्व संत असो वा विचारवंत असो सर्वांनी म्हटल्याप्रमाणे माणसापेक्षा आणि मानवतेपेक्षा या जगात कुणीच श्रेष्ठ नाही.

डॉ. राजेंद्र खंदारे
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते.
ई-मेल rajkhandare2012@gmail.com
संपर्क : ९४२३३२८७१८

नवोदित साहित्य आणि साहित्यिक यांची मराठी साहित्य प्रांतात भर पडत आहे. या आत्मकथनाचे लगेच मनावर ठसणारे असे मुखपृष्ठ होय. ते अति लक्षणीय आहे. काही वर्षापूर्वी ना.सी. फडके यांनी ‘व्यासपीठावरील तीन असे भयंकर पाणी’ (प्रास्ताविक करणारा, परिचय करून देणारा, आणि अध्यक्ष) शीर्षकाचा मार्मिक लेख लिहिला होता. बऱ्याच पुस्तकाच्या बाबतीत असे शत्रू असतात. एक त्यांचे आकर्षक व खपावर किंवा विक्रीवर नजर ठेवून पुस्तकाच्या आशयाशी संबंध नसलेले कव्हर, दोन त्याची प्रस्तावना आणि तीन’ लेखकाचा परिचय. वास्तविक पुस्तक हे त्याच्या ओळखीचे आणि प्रेरणादायी दस्तावेज असते. या प्रत्यय आणून देणारे आत्मकथन म्हणजे अनंता सूर यांचे ‘काटेरी पायवाट’.

‘काटेरी पायवाट’ आत्मकथनाचे मुखपृष्ठावरील चित्र आत्मकथनाचा जो गाभा व मर्म आहे. आशयाशी विलक्षण आत्मीयतेने संवादी आणि अन्वयर्थक आहे. ‘काटेरी पायवाट’ या शीर्षकामध्ये व मुखपृष्टातून आत्मकथनाचा आशय सूचित होतो. साधारण वीस-बावीस वर्षाचा मध्यमवर्गीय तरुण आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी पाऊल उचलू पाहतोय पण वाटेत रक्तबंबाळ करू पाहणारी काटेरी कुंपणाने मात्र त्याला व त्याच्या स्वप्नाला रक्तबंबाळ केले आहे. जीवन म्हणजे संघर्षाची, संकटाची अमाप गर्दी. संकटामागून संकटे चालून आली आलेल्या संकटावर मात करीत असह्य जखमा अंगावर मनावर झेलत त्याला पुढे जायचे आहे त्याला कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही, काटेरी पायवाटेवरून त्याला जिद्दीने पुढे जायचे आहे. काटेरी वाट तुडवत गेल्याशिवाय जीवन समृद्धी महामार्गावर येऊ शकत नाही या विचाराने प्रेरित होऊन शिक्षणाची वाटचाल करू पाहणारा हा तरुण आहे.

गरिबी ही कधीच जात वा धर्म पाहून जन्म घेत नाही. संधी मिळेल तेथे ती आपले हातपाय पसरते दारिद्र्यात गारठून गेलेल्या कुटुंबात ती मुक्काम वाढवून पायरस्ता असो वा पायवाट अधिकच काटेरी बनविते. शिवाय पूर्वी कधीच या वाटेवरून कुणाचे पावले पडलीच नाहीत त्यामुळे ती पायवाट अडचणीची आणि काटेरीच राहिली आहे. सातत्याने संघर्ष करीत मागच्या पिढीसाठी निर्माण केलेली वाट ही वहिवाटीने पायवाट बनत असते. आपल्या वाटेने यापूर्वी अनेकजन गेले जसे की शिक्षणासाठी सतत झोंबाझोंबी करणारे आनंद यादव, शिक्षणासाठी भूक दारिद्र्य आणि उपासमार शिवाय घरातल्याच कुटुंबप्रमुखाकडून होणारा अपमान सहन करीत शिक्षण घेणारे कन्नड साहित्यिक तत्त्वत्ते डॉ एस. एल. भैरप्पा यांचाही प्रवास अनेक यातनांनी नी संकटाने व्यापलेला आहे. किंचित त्याच वाटेकडे जाणारी पण थोडीशी नवी पण ‘मळवाट’ आहे हे मात्र निश्चित.

वहिवाटीचा रस्ता न होता ती पायवाट ‘काटेरीच’ राहिली. आपली वाट वहिवाट बनली असती तर कदाचित ती काटेरी राहिली नसती. अनुभवारूपी काट्यांचे टोकदार टोक आपल्या शैक्षणिक वाटचालीमध्ये सतत बोचत राहिले कधी मित्र बनून तर कधी शत्रू बनून ! सतत पाठशिवणीचा खेळ खेळणाऱ्या काट्यांनी संधी मिळेल तेंव्हा रक्तबंबाळ करणे हा काट्यांचा नित्य गुण, हाच त्यांचा धर्म ! आपल्या वाटेवर आपले कर्तव्य करीत राहिला.

आपल्या वाट्याला आलेली ‘काटेरी पायवाट’ अनेक संकटांनी, अनंत यातनांनी भरलेली आहे. दहावीमध्ये दोनवेळा अपयश पदरी पडल्याने नैराश्यतेच्या गर्तेत आयुष्य ढकलले जाणार याची जाणीव मनाला घेरून टाकणारी होती. जसे पुरात मिळेल त्या लाटेच्या दिशेने ओंडक्याने वाहात जावे तसे जगणे चाललेलं. अंधारातील जगण्याची वाट दिवसेंदिवस अस्पष्ट होत चाललेली अशावेळी प्रा. दहाडे सरांच्या भेटीने जगण्याचा प्रकाश मार्ग गवसला. खऱ्या अर्थाने आपण काटेरी पायवाटेवरून विद्यावाचस्पतीच्या समृद्धीच्या महामार्गापर्यंत आपला जीवन प्रवास थक्क करणारा आहे. पण एक मात्र निश्चित आपली पायवाट ही असंख्य होतकरू ज्ञानार्जन करू पाहणाऱ्याना द्वीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल यात तिळमात्र शंका नाही.

आपण मनोगतात अधोरेखित केल्या प्रमाणे मानव जातीत जन्म घेऊन मानव होता आलं तरी पुरे झालं केवळ मानव धर्म महत्वाचा आहे. उज्वल भवितव्यासाठी मानव धर्माशिवाय पर्याय नाही. सर्व संत असो वा विचारवंत असो सर्वांनी म्हटल्याप्रमाणे माणसापेक्षा आणि मानवतेपेक्षा या जगात कुणीच श्रेष्ठ नाही. त्यांची ही हाक आपल्या हृदयापर्यंत पोहचली ही खरोखरच आनंदाची बाब आहे.
सतत मानवहिताचा, मानवी कल्याणाचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला आनंदाने स्वातंत्र्यात राहण्याचा अधिकार आहे त्या अधिकाराने प्रत्येकाला जगता आले पाहिजे. भागो नही बदलो या विचाराने पछाडलेल्या कविवर्यांचा आणि अभ्यासकांच्या सहवासात आपले साहित्यिक आणि वैचारिक भरणपोषण झाले. डॉ. यशवंत मनोहर, डॉ. प्रकाश खरात, कवी वामन निंबाळकर यासारख्या दिग्गजाच्याबरोबर चर्चा करीत राहिल्याने आपल्यातला माणूस आणि त्याच्यातले माणूसपण समजून घेतल्याने आपल्या विचारांच्या, भावनेच्या आणि संवेदानांच्या जाणीवा अधिकच रुंदावल्या.

आपणही बोलले पाहिजे, आपणही व्यक्त झाले पाहिजे ही अनावर इच्छा निर्माण होऊन आपल्यातला संवेदन लेखक जागा झाला. नारायण सुर्वे यांच्याशी आपले कौटुंबिक संबंध राहिले खरोखरच आपण भाग्यवंत आहात. ज्यां नारायण सुर्वेंनी ‘कविते ऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते निदान देणेकऱ्यांचे तकादे तरी चुकविता आले असते ’ अशा आक्रंदन पूर्ण वाटेवरील प्रवासात रक्तबंबाळ करणाऱ्या टोकदारपणालाही आपण अधिकच हिम्मतवान बनविले. प्रवासात कितीही संकटे चालून आली तरी आपले धैर्य ढळू दिले नाही. कधी दोन देत तर कधी दोन घेत आयुष्य जगणाऱ्या नारयण सुर्वेंचे खरे वारसदार आपण आहात.

दु:खांनी अतिश्रीमंत झालेल्या कवी ग्रेस ज्यांच्या वाट्याला दु:खांनी भरलेली परडीच आली त्या महाकवींच्या विचार-जाणीवेने प्रगल्भ झालेल्या मातीच्या कुशीतून आपली जडणघडण होत आहे याचा मला अभिमान आहे. ही काटेरी पायवाट आपण म्हणता तसं स्वत:ची स्वतंत्र नाही कारण याच काटेरी पायवाटेवरून आपल्या सर्व श्रद्धास्थानांनी आपण काटेरी पायवाट तुडविली संयत व संयमाने आणि जिद्दीने जोमाने त्यांचे पाय याच वाटेवरून पडत राहिली आपणही याच विचारकुळातील आहात असे मला वाटते.

गणित विषयात दोनवेळा नापास झाल्याने कुळाले कलंक लावला असा बोल आपणास लावला गेला पण भाषा साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रातील गणित मात्र कधी चुकू दिले नाही हे विशेष म्हणावे लागेल. झाडे गुरुजी, इंदिरा गांधी यांच्या हत्येचा काळ, बापानं मनाचा मोठेपणा घेऊन जे आपल्या वाट्याला येईल ते दोन एकर कमी जमीन असो वा राहण्यासाठी वाट्याला आलेला जनावरांचा गोठा असो ते समाधानानं कोणतीही कुजबुज न करता राहिलेला हिस्सा घेणारे वडील जनावरावरही माणसाप्रमाणे प्रेम करतात. खरोखरच काळ्या मातीचे भक्त वाटतात. शेणामातीच्या सहवासाने त्यांच्यातही काळ्या मातीचे गुण आईवडिलांमध्ये जाणवतात. मनाला चटका लावणारा मायचा मृत्यू आपणास अस्वस्थ करतो दु:खातून बाहेर पडण्यासाठी आपण ‘आया’ नावाची कविता लिहून आपल्या दु:खाला वाट मिळवून दिला. ‘आई-बापात देव पाहणे आणि देवात आई-बाप पाहणे’ अशीच आपली धारणा आणि भावना या प्रतीची आहे.

रानामध्ये बैलांना चारताना रेडिओवरची गाणी ऐकून, विविध निबंध लेखन व काव्यवाचन स्पर्धेत सहभागी झाल्याने आपले मन सर्जनशील बनले. या कलासक्त बनलेल्या मनामुळेच आपल्यातल्या साहित्यिक व्यक्तित्वाला आकार मिळत राहिला. त्यातूनच ‘पारधी’ कादंबरीचे लेखन आपण करू शकला. बी.ए. भाग एकमध्ये असताना आपण व्यंकटेश माडगुळकर यांची ‘बनगरवाडी’ दु:खाने श्रीमंत झालेल्या महाकवी ग्रेसच्या ‘संध्याकाळच्या कविता’, ‘भागो नही बदलो’ची भूमिका घेणारे तिसरे केशवसुत कवी नारायण सुर्वे यांची ‘तेव्हा एक कर’ कविता, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. आशाताई सावदेकर, डॉ. मदन कुलकर्णी, कवी वामन निंबाळकर, डॉ. प्रकाश खरात, अर्वाचीन मराठी काव्यदर्शन या ग्रंथाचे कर्ते डॉ. अक्षयकुमार, मुक्तिबोध, विंदा करंदीकरांचा सहवासाचा अलभ्य लाभ या सारख्या कवीच्या सहवासातून आणि त्यांच्या कविता आपल्या वाचनातून आपल्यातला साहित्यिक जागा झाला.

‘निषेधनामा’ सरकारी अनुदानातून साकारलेला कवितासंग्रह आपल्या नावावर साकारला गेला.
आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये उपजीविका आणि शिक्षण, कुटुंब आणि आवड हे सारख्याच कौशल्याने सांभाळण्याकरिता अनेक ठिकाणी विना अनुदानित महाविद्यालयामध्ये तासिका तत्वावर कधी अर्धवेळ प्राध्यापक म्हणून नोकरी करताना पगारीसाठी भाकरीसाठी संघर्ष करावा लागला. पोटाचा खड्डा भरण्यासाठी मित्रासमवेत अनोळख्या लग्नाच्या जेवणावळीच्या पंगतीतून अपमानित होऊन रिकाम्या पोटी परत फिरावे लागले. वा पीएच.डीच्या संशोधन कार्यातला अनुभव असे असंख्य आलेले बरे-वाईट अनुभव वेगळ्या पठडीतले आहेत. हा सारा जगण्याचा प्रवास आत्मकथनातून नितळपणे आलेला आहे. तो जितका प्रांजल आहे तितकाच अस्वस्थ करणारा आहे.
काटेरी आयुष्य ज्यांच्या वाट्याला येते आणि खडतर आयुष्यातून मनुष्य जेव्हा ते अडसर स्वत:च्या जिद्दीने पार करतो आणि काटेरी पायवाटेचे महामार्गात रुपांतर होते तेव्हा बऱ्याच वेळा असे दिसते की, आत्मगत आविष्काराला फुशारकी मारण्याचा मोह होतो पण आपण अशा मोहाला बळी पडलेले नाहीत हे विशेष.

उलट संयम, विनय, सौजन्य आणि विकारवशाला बळी न पडणारी लेखनशैली हे आपल्या व्यक्तिमत्वाचे विशेष गुण ‘काटेरी पायवाटेचे’ही आहेत असे म्हणता येईल. आपण आपल्या कुटुंबाबद्दल सगे-सोयरे व मित्र परिवारावर अतिशय शुद्ध व प्रामाणिकपणे ममत्वाने जी लिहिले आहे ते विसरता येणार नाही इतके अनुपम आहे. जीवन वाटेवरून प्रवास करताना असंख्य वेदनादायी काटे आपणास रक्तबंबाळ जरी केले तरी आपण लेखन शैलीने वाचकांना हरवतही नाही वा त्यांना वशही करत नाही अत्यंत प्रामाणिकपणे सहज ओघवत्या भाषेतून हृदय संवाद साधणारी शैलीचा अवलंब हे महत्वाचे विशेष. दिशाहीन युवकांना दिशा आणि आशय मिळवून देणारे एक प्रेरणादायी दस्तऐवज आहे.

पुस्तकाचे नावः काटेरी पायवाट
लेखकः अनंता सूर मोबाईल – 94217 75488
प्रकाशनः अथर्व पब्लिकेशन, धुळे

Related posts

दगडातले देवपण समजून घेऊन व्हा आत्मज्ञानी

आम्ही सारेच सह्याजी राव…

शेवंता पारधीण

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406