September 22, 2023
Matrumandir Sant Literature Awards DE cleared
Home » मातृमंदिर संस्थेचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

मातृमंदिर संस्थेचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर

  • चिंतनपर, विवेचनपर व संत जीवन ललीत वाङ्मय प्रकारातील पुस्तकांना पुरस्कार
  • परीक्षणासाठी २४ पुस्तके आल्याची माहीती
  • कल्पनाताई काशीद व विश्वासराव मोरे यांच्याकडून परीक्षण
  • पुरस्काराची रक्कम लेखकास ६० टक्के तर प्रकाशकास ४० टक्के

पुणेः निगडी येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्यावतीने संत वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. चिंतनपर, विवेचनपर, संत जीवन ललीत वाङ्मय प्रकारातील पुस्तकांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत. पुरस्कार देण्याचे संस्थेचे हे तेविसावे वर्ष आहे. त्यासाठी एकूण २४ पुस्तके यावर्षी परीक्षणासाठी आली होती. याचे परीक्षण कल्पनाताई काशीद व विश्वासराव मोरे या दोन परीक्षकांनी केले, अशी माहिती कार्यवाह य. ल. लिमये यांनी दिली आहे.

चिंतनपर, विवेचनपर प्रकारामध्ये पहिला पुरस्कार स्नेहवर्धन प्रकाशनाच्या सद्गुरू अच्युताश्रम स्वामी कृत अभंगगाथा या डॉ. मेघा इंद्रकांतराव गोसावी (बीड) यांच्या पुस्तकास देण्यात आला आहे. सात हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर द्वितीय क्रमांक मधुश्री प्रकाशनाच्या श्री नाथ भागवत या गोविंद दत्तात्रेय खिरे (पुणे) व मंदाकिनी खिरे (पुणे) यांच्या पुस्तकास देण्यात आला आहे. पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

गोविंद खिरे यांनी नाथ भागवत या पुस्तकाच्या लेखनासाठी केलेला अभ्यास, संशोधन, खिरे दाम्पत्याने या कामी घेतलेले अतोनात कष्ट मी स्वत: पाहिलेले आहेत. त्यांच्या या साधनेस पुस्तकाचे साकार रूप देण्यासाठी त्यांनी मधुश्री प्रकाशनास दिलेली संधी आणि आमच्यावर टाकलेला विश्वास आमच्यासाठी बहुमूल्य होता. मातृमंदिर विश्वस्त संस्थेने या पुस्तकास जाहीर केलेला पुरस्कार ही या साऱ्या परिश्रमास या मान्यवर संस्थेने दिलेली पावती, पाठीवर मारलेली शाबासकीची थाप आणि संस्थेच्या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींनी दिलेले आशीर्वाद आहेत.

पराग र लोणकर

मधुश्री प्रकाशन, पुणे

विशेष पुरस्काराममध्ये ज्ञानज्योती…ओवी पुन्हा नव्यानी या डॉ. ज्योती जयेश रहाळकर (पुणे) यांच्या पुस्तकाचा तसेच दशग्रीव रावण एकादशमुखी हनुमान भाग – १ व चिरंजीव अंजनीसुत हनुमान व रामायण भाग-२ या डॉ. दिलीप मेघ:श्याम साठे यांच्या पुस्तकाचा व जो संती वसविला ठावो या शिरीष शांताराम कवडे (पुणे) यांच्या पुस्तकाचा समावेश आहे. अडीच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

संत जीवन ललित वाङ्मय प्रकारामध्ये प्रकाशक चंद्रकांत जोशी (अहमदनगर) यांच्या तर्फे प्रकाशित सृजनगंध या डॉ. चंद्रकांत पोतदार (कोल्हापूर) यांच्या पुस्तकास प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे. दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार चपराक प्रकाशनाच्या महाराष्ट्राचे विचारदुर्ग या रमेश मच्छिंद्र वाघ (अहमदनगर) यांच्या पुस्तकास जाहीर झाला आहे. दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार वेदान्तश्री: प्रकाशनाच्या ओळख वेदांची या प्रा. डॉ. शरद कुळकर्णी (अकोला) यांच्या पुस्तकास देण्यात आला आहे. दोन हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कार वितरण सोमवारी (ता. २२) सकाळी १०:३० ते १२:०० या वेळेत मनोहर सभागृह, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी , पुणे ४४ येथे होणार आहे. असे सुधीर कुलकर्णी यांनी कळविले आहे.

Related posts

सुधारित नागरिकत्व कायद्याबाबतच्या शंकाचे निरसर करणारे पुस्तक

दमसाचे साहित्य पुरस्कार जाहीर

ऑनलाईन सेवा घेत आहात, तर मग हे आवश्यकच…

Leave a Comment