ऐतिहासिक, साक्षेपी, व्यापक, वाड्मयेतिहास: “मराठवाड्यातील मराठी वाड:मयाचा इतिहास
परिवर्तनवादी भूमिका पोटतिडतिने डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी सतत आपल्या साहित्यातून मांडली आहे. मराठवाडा आणि मराठवाड्याचे साहित्य हा त्यांच्या चिंतनाचा सतत विषय राहिले आहेत. त्याला एक व्यापक रूप या ग्रंथाने प्राप्त केले झाले आहे. मराठवाडा साहित्यसंस्कृतीच्या दृष्टीने समृद्ध आहे. इथे अनेक साहित्य प्रकारात लिहीले गेले. त्याची एकत्रीत समीक्षणात्मक नोंद कोणीतरी घेणे गरजेेचे होते.
प्रा डॉ बाळासाहेब लबडे,
मु. पो. शृंगारतळी .ता .गुहागर. जि रत्नागिरी. मो ९१४५४७३३७८
“मराठवाड्यातील मराठी वाङ्मयाचा इतिहास” हे वाङ्मय इतिहासाचे पुस्तक मराठी साहित्याचे ज्येष्ठ साक्षेपी समीक्षक, अभ्यासक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी लिहिलेले व कैलाश पब्लिकेशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेले आहे. हा एकूण चारशे त्र्याऐंशी पृष्ठांचा समीक्षाग्रंथ आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या प्रकल्पातून हा वाङ्मय इतिहास आकारास आला आहे. हा विषय डॉ. लुलेकर यांच्या मनात अनुभवातून कसा मुरला याबद्दल ते म्हणतात, “, मराठवाडा विकास आंदोलनापासून म्हणजेच १९७४ पासून मराठवाडा आणि मराठवाड्याच्या स्थितीविषयी सतत विचार करण्याची सवयच झाली. त्या आंदोलनात उतरलो. पहिल्यांदाच आंदोलनाचा व्यापक अर्थ समजला. परभणी जिल्ह्यातून हे आंदोलन सुरू झाले. पहिले दोन दिवस परभणी जिल्हा आंदोलनात होता. नंतर हे आंदोलन मराठवाडाभर पोहोचले. केवळ विद्यार्थ्यांनी चालवलेले आणि स्थिर – भक्कम सरकारला हादरे देणारे हे आंदोलन ऐतिहासिक ठरले. परभणी जिल्ह्यातील पाचशे विद्यार्थी औरंगाबादच्या हर्सल तुरुंगात तीन दिवस डांबले गेले. तत्पूर्वी , औरंगाबदच्या विक्रम स्टेडियमवर ( आताचे औरंगाबादचे पोलीस आयुक्तालय ) डांबलेल्या विद्यार्थ्यांना राज्य राखीव पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यात मलाही मार खावा लागला. मराठवाड्याच्या विकासाच्या मागण्या घेऊन आंदोलन सुरू झाले. हे आंदोलन तीन महिने चालले. तत्कालीन सरकारमधील मंत्री, नंतरचे राज्याचे मुख्यमंत्री आणि मराठवाड्याचे नेते कै. शंकरराव चव्हाण यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. मागण्या मान्य झाल्या. मराठवाड्याच्या मागण्या मान्य झाल्याचा आनंद झाला. आंदोलन थांबले. पुढे काहीच पदरात पडले नाही. “
लेखक हा प्रत्यक्ष चळवळीत उतरून लेखन करणारा असल्यामुळे त्याच्या लेखणीला धार आहे. मराठवाड्यातील साहित्याचा इतिहास लिहिला गेला नाही ही खंत त्यांच्या मनात होती ती खंत मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख असताना त्यांनी चर्चासत्र घेऊन पुर्ण केली.
या दृष्टीने पाहता त्यांनी हे केलेले काम ऐतिहासिक आहे. या लेखनावर ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन योग्य ते संस्कार केले आहेत. अनेकांचे संशोधन कार्य, सहकार्य, प्राप्त झाल्यामुळे हा वाड्मयेतिहास अधिक मूलगामी चिकित्सेचा करता आला. मराठवाड्यातील शक्य तितक्या अधिक लेखनाच्या नोंदी लेखकाने घेतल्या आहेत. मराठवाडा प्रदेशाच्या विकासाचा विधायक दृष्टीने सतत विचार करणारे आणि त्यासाठी संघर्ष करणारे नेते दिवंगत स्वामी रामानंद तीर्थ दिवंगत शंकरराव चव्हाण, दिवंगत विलासराव देशमुख , दिवंगत गोपीनाथराव मुंडे आणि दिवंगत बाळासाहेब पवार त्यांच्या जडणघडणीत मोठा वाटा असणारे दिवंगत अंकुशराव टोपे यांना हे लेखन अर्पण केले आहे. जे लेखकाच्या दृष्टीने राजकारणाकडेही सकारात्मक पाहण्याची दृष्टी दाखविते. लेखकाची वाड्मयेतिहासा विषयीची, बांधीलकी, तन्मयता दाखविते.
मराठवाड्याकडे पाहण्याची दृष्टी “आद्य महाराष्ट्र” अशी आहे याविषयी ते म्हणतात”, उभय गंगातीर किंवा गंगथडी म्हणजेच गोदावरी खोऱ्यात मराठी समाज आणि मराठी संस्कृती निर्माणाचे, संवर्धनाचे कार्य अनेक शतके झाले. हे अनेक संशोधकांचे संशोधन आता मान्य झाले आहे. म्हणूनच ‘ आद्य महाराष्ट्र ‘ असा मराठवाड्याचा गौरवाने उल्लेख केला जातो. मराठवाडा हाच आद्य महाराष्ट्र असल्यानेच मराठवाड्याच्या म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेस उत्तर महाराष्ट्र दक्षिणेस दक्षिण महाराष्ट्र, पश्चिमेस पश्चिम महाराष्ट्र असे आजही संबोधले जाते.
परिवर्तनवादी भूमिका पोटतिडतिने त्यांनी सतत आपल्या साहित्यातून मांडली आहे. मराठवाडा आणि मराठवाड्याचे साहित्य हा त्यांच्या चिंतनाचा सतत विषय राहिले आहेत. त्याला एक व्यापक रूप या ग्रंथाने प्राप्त केले झाले आहे. मराठवाडा साहित्यसंस्कृतीच्या दृष्टीने समृद्ध आहे. इथे अनेक साहित्य प्रकारात लिहीले गेले. त्याची एकत्रीत समीक्षणात्मक नोंद कोणीतरी घेणे गरजेेचे होते.
एकूण मराठी साहित्याला मराठवाडा साहित्याचे मोठे योगदान आहे ते लुलेकरांनी या वाङ्मय इतिहासाद्वारे अधोरेखित केले आहे. मराठवाड्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, पार्श्वभूमीसह इतिहासाची मांडणी नव्याने केली आहे. एकूण आठ प्रकरणांमध्ये या वाड्मयेतिहासाची विभागणी आहे.
प्रकरण एकमध्ये मराठवाड्याचा भूगोल आणि इतिहास, मराठवाड्याचा प्रदेश नामकरण, संस्कृतीची जडणघडण, औद्योगिकीकरण व व्यापार, इतिहास काळाचा आरंभ, सातवाहन : वैभवशाली राजवट, वाकाटक, पुन्हा चालुक्य, यादवांची वैभवशाली राजवट, मराठवाडा आणि मोगल, मराठा राज्यकर्ते आणि मराठवाडा, शिवाजीराजे आणि मराठवाडा, निजामी राजवट आणि मराठवाडा, जुलमी राजवट : मीर उस्मान अली, इ. स. १८५७ नंतरचे उठाव, पहिला हुतात्मा अनंत कान्हेरे, हैदराबाद मुक्तिसंग्राम, स्टेट काँग्रेस, वंदे मातरम् आंदोलन, मराठी भाषा आणि संस्कृती, निजामाची अत्याचारी प्रवृत्ती, दलितांचा लढ्यातील सहभाग, स्वातंत्र्यानंतरचा इतिहास, आयोगाची स्थापना, १९६० नंतरचा मराठवाडा, कृषी विद्यापीठ आंदोलन, विकास आंदोलन, नामांतर आंदोलन. प्राचीन ते अर्वाचीन असा मोठा कालखंड त्यांनी कवेत घेतला आहे. धावते आणि महत्वपुर्ण नेमके मांडणे अवघड असते ते काम त्यांनी केले आहे. मराठवाड्यातील या साऱ्या पार्श्वभुमीला चिकित्सकपणे, अभ्यासक वृत्तीने मांडले आहे.
प्रकरण दोन हे “मराठवाडा : साहित्य आणि संस्कृती” असे आहे त्यात समूह संस्कृतीचे सार्वभौम तत्त्व, भौतिक संस्कृती, अभौतिक संस्कृती, धर्म, विविध धर्मसंप्रदाय, नाथ संप्रदाय, वीरशैव संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, रामदासी संप्रदाय, सूफी संप्रदाय, मराठवाड्यातील स्थापत्य आणि कला, लेणी स्थापत्य, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, औरंगाबादची लेणी, मराठवाड्यातील अन्य लेणी, मराठवाडा सामाजिक स्थितिगती, ग्रामसंस्था, गावगाडा, वर्णव्यवस्था, स्त्री जीवन, सण व उत्सव, जीवनशैली, मराठवाड्यातील कलाविष्कार अशी विस्तृत आणि व्यापक संस्कृती मीमांसा आली आहे. यावरून त्यांनी या वाड्मयेतिहासासाठी किती कष्ट घेतले आहेत, हे लक्षात येते. तात्विक व मूलगामी अशा दोन्ही स्वरूपाचे विवेचन यात येते.
प्रकरण तीनमध्ये मध्ययुगीन साहित्य मराठी साहित्याचा आरंभ विविध पंथ आणि मराठी वाङ्मय, नाथ पंथ, महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय, वारकरी संप्रदायाचे साहित्य, संत नामदेव, संत एकनाथ, मराठवाड्यातील अन्य कवी, दासोपंत, संत रामदास, पंडिती काव्यपरंपरा, वामन पंडित, वीरशैवांचे मराठी साहित्य • सूफी सांप्रदायिकांचे साहित्य यावर निष्कर्षणात्मक भाष्य आले आहे. मध्ययुगीन मराठी साहित्याचा चांगला धांडोळा डॉ. लुलेकर यांनी विविध संप्रदाय संतांच्या योगदानासहित घेतला आहे.
प्रकरण चारमध्ये आधुनिक साहित्याचा धांडोळा घेतला आहे. इ. स.१९०० ते १९ ६० या काळातील वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांचे योगदान स्पष्ट केले आहे. (औरंगाबाद समाचार ते निजामविजय) त्याबरोबरच नव्या – जुन्यांचा सांधा सांधणारी कविता कशी वेगळी आहे. ते मांडले आहे. नवी कविता : नवे भान व्यक्त केले आहे. यात वा. रा. कांत, बी. रघुनाथ अन्य कवी यांचा धांडोळा घेतला आहे. तसेच गद्यसाहित्य, कथात्म लेखन, नवकथेचा ( १९१३ – १९५३ ), प्रारंभ, नाट्य वाङ्मय या सर्वांनी कशी मोलाची भर टाकली ते मांडले आहे.
या काळातील नावीण्य वेगळेपण या बद्दल ते म्हणतात, “बी. रघुनाथ यांच्या ललितनिबंध म्हणजे शब्दांच्या पलीकडे फुलून हे वासंतिक वैभव एखाद्या लघुनिबंधाचा विषय करावा, त्याचे ललित निबंध काव्यात्म पातळीवर आपली अनुभूती साकार करीत जातात. प्रतिमा प्रतीकांमधून हे ललितलेखन सरस – सकस झाले आहेत. कथात्म लेखन : नवकथेचा प्रारंभ कथा – कादंबरी या वाङ्मय प्रकारातील लेखन अन्य लेखनाच्या तुलनेने अधिक झाले आहे आणि त्यातील लेखनाची दखल मराठी सारस्वतास घ्यावी लागली. कथात्म लेखक प्रयोगशील तर आहेच. सोबतच समकालीन मराठी लेखनापेक्षा वेगळे आणि मराठी लेखनाची उंची वाढविण्याची क्षमता असलेले आहे. मराठवाड्यातील कथात्म लेखनात दिवाकर कृष्ण केळकर, बी. रघुनाथ, सेतू माधवराव पगडी, उषा पगडी, दत्तो आप्पाजी तुळजापूरकर, वा. दा. गाडगीळ, गो. प्र. ब्रह्मपूरकर, चारुलता जतकर, यशवंत कोरेकल, वसंत शहाणे, सुशीलाबाई फाटक, भगवान देशमुख, बी. चौधरी, दि. ना. पळशीकर, गोपाळ वांगीकर, भालचंद्र महाराज कहाळेकर, ना. रा. जोशी, रत्नप्रभा शहाणे, बालशंकर देशपांडे, द. कृ. देशमुख, डॉ. भाले, व्यंकटेश बापूजी जोशी, रामराव वैद्य, दि. ल. औंढेकर, जगन्नाथ कुलकर्णी, खु. शा. घोरपडे, वसंत कृष्णा सरदेशपांडे यांनी लेखन केले आहे.
कथा – कादंबरी या वाङ्मय प्रकारात महत्त्वाचे लेखन दिवाकर कृष्ण आणि बी. रघुनाथ यांनी केले आहे. हा कालखंड कथेचा कालखंड आहे. कथेचे स्वरूप याच काळात बदलले. लघुकथा हे नाव प्राप्त झालेले कथेचे तंत्र, विकास आणि कथेतील नव्या प्रवृत्तीची चर्चा याच काळात झाली. अद्भुतता, कल्पनारम्यता याऐवजी वास्तवाचा कलात्मक आविष्कार प्रारंभित झाला. कथेतील पाल्हाळाऐवजी रेखीव स्वरूप, निवेदनात वैविध्य आले. “त्यांची निरीक्षणे आणि नोंदी अचूक आहेत. कालभान लेखकांनी कसे पकडले आहे ते निष्कर्षात्मक त्यांनी मांडले आहे.
प्रकरण पाचमध्ये साठोत्तरी साहित्य अंतर्गत आढावा आला आहे. “मराठवाड्यातील कविता” यात कवितेवर प्रकाश टाकला आहे. १९९० नंतरची कविता : अनुभूतीचे निराळे आविष्करण यात दीर्घ कविता बा . भो . शास्त्री : वेगळ्या लेखनाचा धांडोळा घेतला आहे. डॉ लुलेकर म्हणतात, “लघुनियतकालिक चळवळीला साहित्यात महत्त्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठवाड्यातील विशुद्ध भावकवितेचा अथवा व्यक्तिस्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या कवितेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे स्पष्टपणे जाणवते की, या कवितेवर मर्ढेकर युगाचा आणि लघुनियतकालिक चळवळीचा प्रभाव पडलेला आहे. लघुअनियतकालिक चळवळ ही मुख्यतः पुणे मुंबई या महानगरात स्थिर अथवा गतिमान झालेली असली तरी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना येथूनही लघुनियतकालिकाचे प्रकाशन नित्य होत असे. प्रस्थापित वाङ्मयीन व्यवहार, जगण्यातला बेदरकारपणा , परात्मता , निराशा याविषयीचे रोखठोक लेखन या नियतकालिकातून होत असे.”
मराठवाड्यातील कथात्म लेखन, मराठवाड्यातील आत्मचरित्रपर लेखन, मराठवाड्यातील नाट्यसंपदा, यांची चिकित्सा करून बहुचर्चित नाटकांची चर्ची केली आहे. रा. रं. बोराडे ते नरेंद्र मारवाडेंपर्यंत योगदानाची समीक्षा आली आहे. ग्रामीण कवितेत फ. मु. शिंदे, इंद्रजीत भालेराव यांच्यापासून डॉ अर्जुन व्हटकरांपर्यंत धांडोळा आला आहे. कथेत श्रीराम गुंदेकरांपासून ते दिगंबर कदमांपर्यंत परंपरा आलेली आहे. कादंबरीत रा. रं. बोराडे, नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलाटे, बाबा भांड ते भाऊराव सोमवंशींपर्यंत आढावा आला आहे. दलित मराठी साहित्यावर भाष्य केले आहे. मराठीतील विविध प्रवाहातील समग्र साहित्याची योगदानासह चांगली मांडणी डॉ लुलेकर यांनी केली आहे, असे वाटत राहते. याचे अजुन विस्तृत खंड हवे होते. एवढा हा मोठा विषय आहे. तरी त्याला चांगल्यापैकी न्याय देण्याचा प्रयत्न डॉ लुलेकर यांनी केला आहे.
एकूण मराठी साहित्याच्या संदर्भात मराठवाड्याचे साहित्य कुठे आहे ? याची परंपरेनुसार व तौलणिक चिकित्सा त्यांनी केली आहे. प्रकरण सातमध्ये मराठवाड्यातील बालसाहित्य, अनुवादित साहित्य, विज्ञान साहित्य, वैचारिक साहित्य, ललित गद्य, व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णन या प्रकारातील साहित्याची मूलगामी चिकित्सा केली आहे. महावीर जोंधळे, दत्ता ससे, त्र्यंबक वसेकर, रेणू पाचपोर, उमेश मोहिते, उद्धव भयवाळ, प्रशांत गौतम, पृथ्वीराज तौर यांच्यापर्यंत ही परंपरा आहे. त्यावर भाष्य केले आहे. अनुवादात सूर्यनारायन रणसुभे, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ संजय नवले, प्रदीप म्हैसेकर, डॉ सुधाकर शेंडगेंपासून डॉ निलेश लोंढेंपर्यंत योगदानावर भाष्य केले आहे.
प्रकरण आठमध्ये “साहित्यसमीक्षा” यात मराठी साहित्यसमीक्षा पार्श्वभूमी व्यक्त केली आहे. मराठवाड्यातील साहित्यसमीक्षा म्हणजे समीक्षेची समीक्षा केली आहे. यात ,साठोत्तरी साहित्यसमीक्षा, सत्यशोधकी साहित्यभूमिका काही महत्त्वाचे समीक्षक सांगीतले आहेत. बालसाहित्यसमीक्षा, लोकसाहित्य : संशोधन आणि समीक्षा यावर १९३० ते आजपर्यंतच्या ना. गो. नांदापूरकर, भालचंद्र कहाळेकर, श्री. रं. कुलकर्णी, रा. ब. माढेकर, देवीसिंग चव्हाण, सेतुमाधव पगडी, वा. ल. कुलकर्णी, डॉ सरा गाडगीळ, स. मा. गर्गै, डॉ. सुहासिनी इर्लेकर, नरहर कुरूंदकर, डॉ. जनार्दन वाघमारे, के. रं. शिरवाडकर, कौतीकराव ठाले पाटील, डॉ. दादा गोरे ते डॉ चंद्रकांत पाटलांपर्यत योगदानाचा आढावा आला आहे. साठोत्तरीमध्ये म. भि. चिटणिस, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ मुलाटे, भास्कर चंदनशीव, डॉ. देवकर्ण मदन, डॉ श्रीपाल सबनिस, डॉ लुलेकर, डॉ. केशव देशमुख, केदार काळवणे, डॉ. गंगाधर पानतावने, डॉ. ऋषिकेश कांबळेंपर्यंत विविध समीक्षकांवर भाष्य आले आहे.
हा वाड्मयेतिहास म्हणजे अभिनव मराठवाड्यातील मराठी वाडमयाचा इतिहास आहे. हा ग्रंथ म्हणजे समीक्षेतील सांगोपांग केलेली सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय, आर्थिक घटकांची पार्श्र्वभुमी नसुन तो एकात्म साहित्य आणि समाजाचा अनुबंध सांगणारा ऐतिहासिक दस्ताऐवज आहे जो मौलिक आहे. धर्म, जात ,पंथ ,लिंग, भेद ,याच्यापलिकडे जाऊन सर्वसमावेशक सत्याचा घेतलेला हा शोध आहे. त्यांनी यात नुसत्या नोंदी घेतल्या नाहीत तर सर्वसमावेशक अशी चिकित्सक दृष्टी असल्यामुळे या ग्रंथाला वाड्मयीन धार प्राप्त झाली आहे. अशी उदारता, व्यापकता, क्वचितच आढळते. यातील समीक्षेची समीक्षा कसोटीस उतरली आहे.
पुस्तकाचे नाव :मराठवाड्यातील मराठी वाड्मयाचा इतिहास
लेखक :डॉ. प्रल्हाद लुलेकर
प्रकाशक: कैलाश प्रकाशन औरंगाबाद
पृष्ठे – 483
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.