September 25, 2023
Home » बहिणाबाई चौधरी यांची कविता- “सृजनगंध”
मुक्त संवाद

बहिणाबाई चौधरी यांची कविता- “सृजनगंध”

अतिशय वाचनीय आणि अभ्यासपूर्ण साहित्यकृती!

डॉ. चंद्रकांत पोतदार यांचा बहिणाबाई चौधरी यांची कविता ‘सृजनगंध’ हा समीक्षाग्रंथ  बहिणाबाईंच्या एकूण कवितेची उकल करणारा ग्रंथ असून सामान्य माणसाची जगण्याची व्यापकता सांगणारा आहे.

प्रा. निर्मला चव्हाण-शेवाळे

डॉ. चंद्रकांत पोतदार हे मराठी साहित्यात सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि समीक्षक म्हणून सुपरिचित आहेत. “बहिणाबाई चौधरी कविता – सृजनगंध” हा पुस्तकरूपी छोटेखानी ग्रंथ साकारला तो त्यांच्या शोधक आणि चिकित्सक अभ्यासातून याची प्रचिती हा ग्रंथ वाचताना येते. डाॅ. पोतदार यांनी आपले अर्धवट काम लाॅकडाऊनच्या काळात पूर्ण केले. त्यांनी बहिणाईंच्या कवितांचे भावविश्व उलगडत अत्यंत सुंदर शब्दांत रसग्रहण केले आहे. त्यांच्या अविरत व्यासंगाचे फळ म्हणजेच हे अत्यंत सुंदर आणि दर्जेदार पुस्तक होय. हे पुस्तक हातात पडल्यानंतर काही कारणाने वाचायला विलंब झाला तरीही..एक हाती हे पुस्तक अगदी दीड दोन तासात न थांबता वाचून काढले आणि फार मोठा सकारात्मक ऊर्जा स्त्रोत बहिणाईंच्या कवितांमधून मला गवसल्याची भावना निर्माण झाली. बहिणाबाईंना एकसंध वाचणं म्हणजे अवर्णनीय अनुभव. डाॅ. पोतदार यांचे बहिणाबाईंच्या कवितांचे रसग्रहण म्हणजे वाचक, अभ्यासकांना एक पर्वणीच आहे.

मराठी साहित्यातल साधं, सोपं, सुंदर काव्य म्हणजे बहिणाबाई चौधरी. बहिणाबाईंनी आपल्या दैनंदिन जीवनातील आपले अनुभव विश्व अहिराणी भाषेत साकारून जगण्यातलं तत्वज्ञान मानवजातीसमोर मांडले. त्यांच्या कवितेतलं समृद्ध भावविश्व सृजनगंध या पुस्तकात वाचकांच्या समोर उलगडले आहेच शिवाय कवितेतील प्रापंचिकता, अध्यात्म, निसर्ग, लोकसंस्कृती, ग्रामीण जीवन, कृषीजाणीव, समाजप्रबोधन, स्त्रीचित्रण, इत्यादी बाबींचा परार्मश उत्कटतेनं व्यक्त केला आहे. बहिणाबाईंच्या कवितेच आकलन आपल्या या पुस्तकात त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या करून दिले आहे. आपणा सर्व वाचक आणि अभ्यासकांना हा छोटेखानी सुंदर-सुलभ ग्रंथ आवडेल याची खात्रीच आहे.

प्रकाशनः ऋतू प्रकाशन, अहमदनगर

पृष्ठसंख्या: 76

मूल्य:100

पुस्तकांसाठी संपर्क: 94 23 28 64 79

Related posts

मुलीच्या शिक्षणाच्या प्रश्नाला वाचा फोडणारी कादंबरी

माझी माय मराठी..

Neettu Talks : कोलेस्टेरॉलवर कसे नियंत्रण मिळवायचे ?

Leave a Comment