नवे संस्कृत शब्द कसे तयार होतात ? आज जगात अनेक नवे पदार्थ तयार होत आहेत. या सर्व पदार्थांचे संस्कृतमध्ये शब्द तयार केले जाऊ शकतात. ते कसे केले जातात ? या शब्दांची निर्मिती कशी होते ? या सह संस्कृत संदर्भात शीतल महाजनी यांनी तयार केलेल्या शब्दकोशाची पुस्तिका याबद्दल त्यांच्याशी केलेल्या गप्पाटप्पा…
शीतल महाजनी
मोबाईल – 9881129267
संस्कृत विषयी आपणास कशी आवड निर्माण झाली ? त्याचे महत्त्व आपणास का वाटू लागले ?
शीतल महाजनी – वयाची ४० उटल्यानंतर काही कारणाने संस्कृत बोलणाऱ्या व्यक्तींशी माझा संपर्क आला. पत्रकारिता या क्षेत्रात असल्याने सवयीप्रमाणे या विषयाची माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. यातूनच संस्कृत शिकण्याची ओढ लागली. प्रथम मी संस्कृत बोलायला शिकले. त्यानंतर मला संस्कृतचा अभ्यास करावा असे वाटू लागले. यातूनच मी या विषयातील विविध पदव्या मिळवल्या. संस्कृतचा प्रसार प्रचार होणे किती गरजेचे आहे हे अभ्यास करताना मला जाणवू लागले. मुलांमध्ये चांगले संस्कार करायचे असतील तर त्यांना संस्कृत शिकवणे गरजेचे आहे अशी माझी धारणा आहे. संस्कृत शिकणे किती सोपे आहे हे लहान वयातच मुलांच्यावर बिंबवले गेले तर त्याची भिती नंतर वाटणार नाही. त्यांना या विषयाची गोडी लागेल. यासाठी आम्ही या विषयावरील पुस्तके काढण्याचे ठरवले.
आपण प्रकाशित केलेल्या संस्कृतमधील पुस्तकाचे महत्त्व किंवा पुस्तकाबद्दल थोडक्यात काय सांगाल ?
शीतल महाजनी – पुस्तके लहान मुलांसाठी तसेच संस्कृतची तोंड ओळख करू इच्छिणाऱ्यांसाठी आहेत. त्यामुळे पुस्तकाचा विषयही तसाच आहे. मुलांना किंवा संस्कृत शिकू इच्छिणाऱ्यांना संस्कृत शब्दांची तोंड ओळख करून देण्यासाठी ही पुस्तके उपयुक्त आहेत. संस्कृत शब्दांची ओळख करून देताना चार प्रकारचे विषय निवडले आहेत. प्राणी, फळे, पक्षी, खाद्य पदार्थ या विषयांच्या शब्दांची ओळख व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. फळे म्हणजे फलानि, पशु म्हणजे पशवः, पक्षी म्हणजे खगा हे विषय घेऊन पुस्तक प्रकाशित केले आहे. संस्कृत, मराठी बरोबरच इंग्रजी शब्दही दिल्याने इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठीही हे पुस्तक उपयुक्त असे आहे. फलानिमध्ये विविध फळांची संस्कृत नावे दिली आहेत. पपई म्हणजे मधुकर्कटी, केळी म्हणजे कदलीफलम् तर पशवःमध्ये म्हैस म्हणजे महिषी, बोकड म्हणजे अजः अशा विविध प्राण्यांची संस्कृत नावे दिली आहेत. सोबत त्या पक्षांची चित्रेही दिल्याने मुलांना चित्रावरूनही या प्राण्यांची ओळख व्हावी हा उद्देश आहे.
खाद्यपदार्थ हा विषय निवडण्यामागे कोणता उद्देश होता ?
शीतल महाजनी – मुलांच्या आवडीनिवडी आता बदलल्या आहेत. तसेच आता नवेपदार्थही अनेक आले आहेत. याचा विचार करून खाद्यपदार्थांतून मुलांना संस्कृतची आवड निर्माण व्हावी. तसेच या नव्या पदार्थांनाही संस्कृतमध्ये नावे आहेत याची माहिती व्हावी या उद्देशाने हा विषय निवडला. यातून संस्कृत भाषेची वैशिष्ट्येही मुलांना माहीत व्हावीत. संस्कृत भाषेत नवे शब्द तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. नवनिर्मितीच्या युगात संस्कृतमध्ये नवे शब्दही तयार केले जाऊ शकतात हे संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. नव्या पदार्थाच्या गुणधर्मानुसार शब्द तयार करता येतात आणि ते मान्यही होतात. पूर्वीच्या काळी आईस्क्रीम नव्हते. त्यामुळे आईस्क्रीमला शब्द संस्कृतमध्ये असणेच शक्य नाही. मग आपण इंग्रजी शब्द आहे तसा वापरणार का ? आपण पाहातो मराठीत आता इंग्रजी शब्दाचा वापर वाढला आहे. पण संस्कृतचे वैशिष्ट्य म्हणजे या नव्या पदार्थाला संस्कृतमध्ये शब्द तयार करता येतो. आईस्क्रिममध्ये काय असते तर त्यात बर्फ असतो. दुध असते. साखर असते. यावरून पयोहिमम् हा शब्द संस्कृतमध्ये तयार करण्यात आला आहे. आता पिझ्झा, मॅगी, बर्गर आले आहेत त्यांनाही संस्कृतमध्ये शब्द आहेत. पिझ्झामध्ये पीठ आणि मैदा असतो, पीठापासून तयार केलेले पिष्ठमय म्हणून पिष्ठजा. ब्रेड हा मऊ असतो मग ब्रेडला संस्कृतमध्ये मृदुरोटिका असा शब्द आहे. केक गोड असतो म्हणून त्याला स्निग्धपिष्टकम् असा शब्द आहे. मॅगीला त्याच्या गुणधर्मानुसार नलिकापूपः असा शब्द आहे. नवे शब्द निर्मिती हे संस्कृतचे उद्दिष्ट मुलांना समजावे या उद्देशाने खाद्यपदार्थ हा विषय आम्ही निवडला. मुलांच्या आवडीनिवडीतून हा विषय त्यांना अधिक सोपा वाटावा हा त्यामागचा आमचा उद्देश होता. तसेच ही पुस्तके मुलांना वाढदिवसाला भेट म्हणून देता यावीत याचा विचार करून पुस्तकाची रचना आणि विषयांची निवड आम्ही केली.
पुस्तकांसाठी संपर्क – शीतल महाजनी 98811 29267
