June 25, 2024
Memories of Ramchandra Karkhanis article by Nirmal Rajadnya
Home » त्या दिवशी सर गाडी घेऊन आले नसते तर…
मुक्त संवाद

त्या दिवशी सर गाडी घेऊन आले नसते तर…

गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे माजी संचालक, श्री शाहु कुमार भवनचे माजी मुख्याध्यापक व राष्ट्रीय आदर्श शिक्षक, जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र नारायण कारखानीस व त्यांच्या पत्नी शैलजादेवी यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले. नेहमीच मदतीसाठी तत्पर असणारे हे दांम्पत्य अनेक आठवणी ठेवून आपल्यातून निघून गेले आहे. यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या आठवणी सांगणारा निर्मला राजाज्ञा यांचा हा लेख…

रामचंद्र कारखानीस यांच्या पत्नी शैलजादेवी आणि मी ( निर्मला राजाज्ञा ) 1973 मध्ये गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील आचार्य जावडेकर महाविद्यालयात बी. एड. च्या शिक्षणासाठी एकत्र होतो. तेव्हापासून आमची ओळख आणि मैत्री ! त्या शाहु कुमार भवनमध्ये नोकरी करत होत्या. शाळेतून प्रतिनियुक्तीवर त्या आल्या होत्या. बी.एड. झाल्यावर मलाही गारगोटी येथील शाहु कुमार भवन मध्ये नोकरी लागली.

रामचंद्र कारखानीस सर गणित तर शैलजादेवी इंग्रजीच्या अध्यापिका होत्या. लग्नाआधी पुण्यातील सेंट हेलेना स्कुलमध्ये त्यांचे शिक्षण झाल्याने इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते. दोघेही अध्यापनात कुशल, वागणे अत्यंत नम्र, खानदानी होते. शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मेहनत घेऊन त्यांचा उत्कर्ष कसा होईल यासाठी सदैव त्यांची धडपड असे. आमचे आणि त्या कुटुंबाचे घरगुती संबंध होते. माझ्या कौटुंबिक सुख दुःखाच्या प्रसंगी त्यांची सदैव मदत होत असे.

असाच एक प्रसंग मला इथे सांगावासा वाटतो. माझा मुलगा अमरदिप कोल्हापूर शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी राहात होता. तेथे तो तापाने आजारी पडला. त्याने किरकोळ औषधे घेऊन तो अंगावर काढला, पण बरे न वाटल्याने तो गारगोटीस घरी आला. गारगोटी येथे डॉ. देशपांडे ह्यांच्याकडे दोनचार दिवस औषधोपचार करण्यात आले पण त्याचा ताप काही कमी होत नव्हता.

घरी, मी, सासूबाई दोघीच. पण अमरदीपचा ताप काही उतरत नव्हता. पाण्याची पट्टी कपाळावर ठेवून ही पाहीले. पण उपयोग झाला नाही. आता काय करू असे झाले. त्यामुळे डॉ. देशपांडे यांनीच अधिक उपचारासाठी कोल्हापूरातील रुग्णालयात दाखवण्याचा सल्ला दिला. अशा परिस्थितीत काहीच सुचत नव्हते. माझ्या सासूबाईंनी सल्ला दिला की, कारखानीस सरांना फोन करून सांगा. रात्रीची वेळ होती. परिस्थिती कठीण होती. अखेर मी पहाटे पाच वाजता सरांना फोन केला.

त्यांनी लगेच सांगितले, मॅडम काहीही काळजी करू नका. मी लगेच येतो. तुम्ही तयार राहा. अवघ्या पंधरा मिनिटात सर आणि बाई गाडी घेऊन आमच्या दारात आले. मी मुलाला घेऊन गाडीत बसले. माझ्या डोळ्यातून तर पाण्याचा धारा लागल्या होत्या. वाटेतही माझा मुलगा हे कोण आहेत असे बोलायला लागला. सर मॅडमनाही त्याने ओळखले नाही. यामुळे अधिकच धाकधुक वाटत होती.

उजाडताच आम्ही कोल्हापूरात आलो. सरळ बेलबागेतील प्रेरणा रुग्णालयात गेलो. तेथे डॉ अजित कुलकर्णी आमचे नातेवाईकच असल्याने काही अडचण वाटली नाही. त्यांच्या औषधोपचाराने त्याला चांगले बरे वाटले. पण त्यावेळी सर आणि बाई गाडी घेऊन आले नसते तर मी काय केले असते. त्यांच्यामुळेच माझा मुलगा वाचला, असेच मी म्हणते कायम म्हणते. या त्यांच्या सहकार्याबद्दल कायम मी त्यांची ऋणी आहे.

Related posts

मुलांचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या कविता

शाहु कुमार भवनच्या दहावीच्या ८६ च्या बॅचचे स्नेहसंमेलन

गावोगावी ज्ञान वाटत फिरणारा शिक्षणप्रेमी…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406