December 6, 2022
Summer Chilies Plantation article by Krushisamrpan
Home » उन्हाळी मिरचीमधील फुलगळ अशी रोखा…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उन्हाळी मिरचीमधील फुलगळ अशी रोखा…

उन्हाळी मिरचीची लागवडीसाठी कोणत्या जातींची निवड करावी ? लागवडीसाठी कोणता कालावधी योग्य आहे ? लागवड कशी करावी ? खते कोणती द्यावीत ? उत्पादन वाढीसाठी पिकांना आलेली फुलगळ कशी रोखायची ? या संदर्भातील हा लेख कृषिसमर्पणच्या सौजन्याने…

🌶 उन्हाळी मिरची लागवड 🌶

उन्हाळी मिरची लागवडीसाठी पुसा ज्वाला, अग्निरेखा, पुसा सदाबहार, फुले प्रगती, परभणी तेजस, संकेश्‍वरी, कोकण कीर्ती, सूर्यमुखी, पंत सी-1, गुंटूर-4 यापैकी जातींचा वापर करावा. तसेच कमी तिखट जातीच्या लागवडीसाठी सितारा या जातीची लागवड करावी. यासह बाजारपेठेमध्ये खाजगी कंपन्यांच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या, विषाणूजन्य रोगाला कमी प्रमाणात बळी पडणाऱ्या जाती उपलब्ध आहेत.

🌶 लागवडीसाठी कालावधी

15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळामध्ये पुनर्लागवड करावी. रोपे लागवडीअगोदर कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 2 ग्रॅम प्रति लिटर द्रावणात बुडवून लागवड करावी. 6 मी लांब, 1 मी रुंद आणि 20 सेंमी उंचीचे गादीवाफे तयार करावेत. एक एकरसाठी 200 ते 600 ग्राम बियाण्यास 5 ग्रॅम थायरम चोळून बियांची पेरणी करावी. एक एकर क्षेत्र लागवडीसाठी एका गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्रातील रोपे पुरेशी होतात.

🌶 लागवडीची पद्धत

जातीनुसार व जमिनीच्या प्रतीनुसार 60 ते 75 सेंमी अंतरावर सरी-वरंबे तयार करून घ्यावेत व त्यानंतर वरंब्याच्या बगलेत 45 ते 60 सेंमी अंतर ठेवून रोपांची लागवड करावी. ठिबक सिंचनावर लागवड करावयाची असल्यास जमिनीच्या प्रकारानुसार 60 बाय 60 सेंमी किंवा 60 बाय 45 सें.मी. अंतर ठेवावे. 10-15 दिवासांनी मर झालेल्या रोपांच्या जागी दुसरी रोपे लावावीत.

🌶 खते आणि पाणी

उन्हाळी मिरचीसाठी माती परीक्षणानुसार एकरी 50 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश द्यावे. यापैंकी अर्धे नत्र लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी द्यावे. मिरचीस उन्हाळ्यात जमिनीच्या प्रतीनुसार व पिकाच्या आवश्‍यकतेनुसार एक ते दोन आठवड्यांच्या अंतराने पाणी द्यावे.

🌶 अशी रोखा फुलगळ

उन्हाळी मिरचीची फूलगळ ही मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे मिरचीचे तोडे कमी मिळून उत्पादन कमी मिळते. फुलांची गळ कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी एनएए हे संजीवक वापरावे. यासाठी मिरचीची झाडे फुलावर आल्याबरोबर एनएए (50 पीपीएम) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारावे. त्यानंतर दुसरी फवारणी 20 ते 25 दिवसांनी करावी.

मिरची हे 150 ते 170 दिवसांचे पीक असून जातीनिहाय एकरी उत्पादनामध्ये फरक असतो.

Related posts

लसणात तामस गुण, पण तो विकार घालवण्यासाठी उपकारक

आंबीलमधून ग्रामीण भागातील वैविध्यतेचे दर्शन

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी गोव्यात गोलमेज

Leave a Comment