September 15, 2024
Concept of Primary Education Teachers Opinion
Home » प्राथमिक शिक्षणक्षेत्राची उंची वाढवू पाहणारे पुस्तक
काय चाललयं अवतीभवती

प्राथमिक शिक्षणक्षेत्राची उंची वाढवू पाहणारे पुस्तक


अल्प शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारऱ्या काही शिक्षकांचे विचारही या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. उत्तम बांधणी, आकर्षकपणा, सचित्रपणा यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे शिवाय हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या मेंदूत परिवर्तनाचा डोस पेरल्याशिवाय राहणार नाही.

समीक्षक – बा. स.जठार

गारगोटी
मोबाईल – 9850393996

पंचायत समिती भुदरगडचे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक मेंगाणे यांनी आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण हे संपादित केलेले पुस्तक निवडक प्राथमिक शिक्षकांच्या उद्बोधक विचारांचा लेखाजोखा मांडणारे आहे. पहिल्याच निबंधाच्या श्रीगणेशापूर्वी पुस्तकातील विचारांची उंची वाढवणाऱ्या आणि डोक्यात बऱ्याच कल्पनांचा गदारोळ उठवणाऱ्या प्रा. सुधीर गुरव यांच्या बोलक्या चित्राकडे लक्ष वेधले जाते. या चित्रातून वाचकाला सारं अंतरंगच समजाऊन देण्याचा संपादकांचा प्रयत्न इथेच सफल झाला असल्याचे जाणवते.

शैक्षणिक क्रांतीसाठी हवा तज्ज्ञ शिक्षक

प्रेमरूपी पायावर उभारणारी शाळा, तिच्यासमोरची बाग, वाचनालय, क्रीडांगण, प्रयोगशाळा, यांच्या परीपूर्णतेतून विवेकी, चिकित्सक व विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडतील पण परिपूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी अन्न, पर्यावरण, लैंगिक साक्षरता त्यांच्या मनात रूजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला पाहीजे. अशा सखोल विचारातून अशोक कौलवकर तंत्रज्ञानाच्या साथीने आणि पालकांच्या मदतीने कल्पनेतील प्राथमिक शिक्षण समृद्ध करण्यासाठी शैक्षणिक क्रांती घडवून आणणारा तज्ञ शिक्षक नेमण्यास संबोधित करतात.

शिक्षकांनाच योग प्रशिक्षण देण्याची आवश्यकता

प्रौढांच्या मनाचा समतोल बिघडणारे ताण, नैराश्य, चिंता हे घटक मुलांच्या मनात कधीच डोकावलेले आहेत. या जीवघेण्या घटकातून सुटका करून घ्यायची असेल तर योगा हाच पर्याय असल्याचे सांगणारे एस. पी. पाटील शिक्षकांनाच योग प्रशिक्षण देण्याची आवश्यकता मांडतात. कच्या आणि पक्कया मुलांच्यातील दरी संपवून टाकायची असेल तर सकारात्मक, प्रशिक्षित, शिक्षकांनी समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी परिपाठ, शिक्षकांची गटपद्धत, व्यवहारज्ञान यांचा नियमित आधार घेण्याचा आशावाद व्यक्त करतात.

आनंददायी शिक्षणाची गरज

मुलामुलातील तुलनेला फाटा देत त्यांच्यातील कला जोपासणे, निसर्ग निरीक्षण करायला लावणे, वाचनगोडी वाढवणे, शाळांमध्ये सुसज्ज ग्रंथालये उभारणे, आनंद मेळाव्याचे आयोजन करणे, यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्वाबरोबर मानसिकताही विकासित होईल. असा विश्वास व्यक्त करणारे आनंदा आरेकर मुलांच्या अंगभूत गुणविकासासाठी पालक, शिक्षक व तज्ञ यांच्यातील एकवाक्यतेला अधोरेखीत करतात. आनंददायी शिक्षणाचे महत्त्व मांडताना ते मुलांच्या मनावरचा लगाम मुक्त केल्यास जीवनातील पोकळी आणि निराशा त्यांच्या जवळही फिरकणार नसल्याचे खात्रीदायक जाणवून देतात.

मुलांच्या कल्पकतेला चालना हवी

शिक्षणाबाबतच्या मनातील अस्वस्थतेला मोकळी वाट करुन देताना संध्या वास्कर प्रश्नार्थक मुलांच्या स्वमतावर, समस्या निराकरणावर, गुणग्राहकतेवर, मतांतरावर भर देऊन आत्मविश्वास वाढीबाबत मोजकेपणाने विचार व्यक्त करतात. मुलांच्या कल्पकतेला चालना देत निसर्गाची साथ न सोडणाऱ्या विषयांचे शिक्षण देण्याची गरज त्या आपल्या विचारातून मांडतात. शिक्षकांचा मुलांसोबतचा नाजूकसा संपर्कधागा कोणत्याही कारणाने तुटू देऊ नये अशी खंतही त्या व्यक्त करत भविष्यातील मुलामुलींबाबत एक आश्वासक चित्र आपल्या विचारातून त्या उभे करतात.

शिक्षकांच्या ढासळत्या प्रतिमेतील दोष दूर करा

शिक्षण व्यवस्थेचा सातत्याने आढावा घेणे, त्यात कालानुरूप बदल करणे, शिक्षकांची क्रियाशीलता टिकवणे, शिक्षकांनी स्वतःमध्ये डोकावणे, त्यांची प्रवृती व मानसिक सकारात्मकतेबाबत प्रशिक्षण देणे या मौलिक विचारांबरोबर शिक्षकांच्या ढासळत्या प्रतिमेविषयीचे काही दोष दूर करण्याबाबतच्या विचारांनी प्रेरित झालेले बाजीराव नामदेव पाटील ग्लोबल हिंदुस्तानच्या शिक्षणपुर्तीची संधी अनुभवास येईल असा खात्रीशीर अंदाज वर्तवतात.

शैक्षणिक प्रगतीला मारक बाबींवर प्रकाश

गुणांच्या फुगवट्यावर भाष्य करत त्याच्या दोन्ही बाजूंचा समतोल राखताना श्रीकांत माणगांवकर पारदर्शक कसोटीवर आधारीत निवडप्रक्रियेची मागणी करतात. मुलांच्या आवडीनिवडीला दाद देणे, अपेक्षानिहाय सोयीसुविधायुक्त शाळा, प्रतिवर्ग शिक्षक उपलब्धता, पात्रतायुक्त मार्गदर्शक, बाह्ययंत्रणांची घुसखोरी, पालकांचे स्थलांतर, सर्वसमावेशकता, अशा शैक्षणिक प्रगतीला मारक बाबींवर ते प्रकाश टाकत आपल्या मनातील वैचारिक वाटांना धुंडाळत असल्याचे जाणवतात.

शिक्षकांतील नकारात्मकता दूर सारून प्रोत्साहन

दिव्यांग मुलांची अवस्था पाहून हळवे होणारे राजेंद्र शिंदे आपल्या विचारातून दिव्यांगांच्या शैक्षणिक विकासातील अडथळे नोंदवतात. दिव्यांग मुलांच्या गरजा, त्याच्याविषयीचा दृष्टीकोन, सहका-यांकडून होणारे मानसिक आघात, त्यांच्याप्रती पालकांच्या चिंता याबरोबर त्यांच्या कृतीचे कौतुक करणे, त्यांच्याशी गोड संभाषण करणे, सांकेतिक भाषेचा वापर, संवाद साधणेची कला अवगत करणे, या बाबींवर प्रकाश टाकताना ते स्वअनुभवातून शिक्षकांतील नकारात्मकतेला दूर सारत त्यांचं बळ वाढवण्याचे कार्य करत आहेत याची खात्री पटते.

ध्येयवादी शिक्षण देण्याची अपेक्षा

हल्ली शिक्षणामुळे अहंकार वाढत चाललाय पण विनम्रता व संवेदनशीलता हे दोन पैलू वाढत नाहीत. हीच खंत मनात बाळगून संवेदनशील मनाच्या संजय नानंग यांनी शिक्षणाच्या मजबुतीकरणावर भर दिलाय. कृषिप्रधानतेवर भर देत खेळकर मुलांच्या प्रवृतीनुरूप अभ्यासक्रमाची रचना असावी आणि मिळवलेल्या ज्ञानाची सांगड राष्ट्रउभारणीत घालावी असे मत ते व्यक्त करतात. सुसज्ज इमारती, पालक प्रबोधन, संस्काराचे रोपण, शिक्षकांवरचा अतिरिक्त भार कमी करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे याबरोबरच कृत्रिमपणे शिकवणाऱ्या शिक्षणाऐवजी ध्येयवादी शिक्षण देण्याची अपेक्षा बाळगतात.

शासन, शिक्षक, पालक यांचा मेळ बसणे गरजेचे

पुस्तकी ज्ञानाबरोबर शिक्षणात वर्गाबाहेरील घडामोडींचा समावेश करून मुलांचे अनुभवविश्व समृद्ध करू पाहणारे सचिन देसाई मातृभाषेतील शिक्षणावर भर देतात. विद्यार्थीकेंद्रीत शिक्षण, मुख्याध्यापक स्वायतत्ता, स्थानिकांचे सहाय्य, वास्तवतेची मांडणी, व्यापक दृष्टीकोन, भावनिकता, आवश्यक सुविधा याद्वारे कल्पनेतील शिक्षण स्पष्ट करताना शासन, शिक्षक व पालक या तिहेरी युतीचा मेळ बसणे त्यांना गरजेचे वाटते.

स्वयंशिक्षणावर भर देण्याची आवश्यकता

जागतिकीकरणानंतरच्या शैक्षणिक धोरणातील नेमकेपणावर लक्ष्य वेधत शाळा व शिक्षकाविना व्यकिगत स्वयंशिक्षणावर भर देण्याची आवश्यकता मांडणारे सागर मोरे लक्ष्य निश्चिती, समस्यांचे निराकरण, उपक्रम व प्रकल्पांचे समावेशन यांच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत. जीवनाबद्दलच्या संकल्पना शिक्षणात समाविष्ट करण्यापासून ते आव्हानात्मक, चिकित्सक आकलनाला प्राधान्य देत आपल्या कल्पनेतील शिक्षण हे भूत, वर्तमान व भविष्य यांचा वेध घेणारे असले पाहीजे असे ते ठामपणे सांगतात.

शैक्षणिक दर्जावर बोट

इंग्रजी माध्यम आणि खाजगी क्लास यांचे शाळावर होणारे अतिक्रमण दूर करायचे झाल्यास आत्ताच्या ज्ञानरचनावादी शिक्षणाचा विश्वासरूपी पाया मजबूत करावयास हवा. असे मत मांडताना ज्योती चौगले शैक्षणिक दर्जावर बोट ठेवतात. कृतीयुक्त शिक्षण, समाजजीवन अनुभवणे, शिक्षणव्यवस्थेतील प्रश्न, प्रभावी नेतृत्व, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा, स्त्रीशिक्षणाबद्दलचा संकुचितपणा, स्त्री शिक्षिकांचा अभाव, संस्कारक्षम वयातील शिक्षण या विविध वैचारिक पैलूतून त्यांनी सुरेख चिंतन मांडले आहे.

आनंददायी शिक्षणाचा आग्रह

पुस्तकी शिक्षणाला दुय्यम स्थान देत, रोडावत चाललेल्या प्राथमिक शिक्षणाची अवस्था मांडताना भगवान मुंढे ज्ञानभाषा व व्यवहारभाषा शिकवण्याचे महत्व सांगतात. पालकांनी रुची नसलेल्या शिक्षणाचा आग्रह न धरता आनंददायी शिक्षणाचा आग्रह धरल्यास मुलांचा भविष्यकाळ सुकर होईल. हे त्यांचे मत अगदी वास्तवतेशी निगडीत आहे. उत्तम शिक्षणाच्या तीन गोष्टी नमूद करून सरांनी विचारातील सत्यता पटवून दिली आहे.

बालकांची प्रसन्नता हेच शैक्षणिक मुल्यमापन

बालकांची प्रसन्नता हेच शैक्षणिक मुल्यमापनाचे मानक ठरवून भाषिक अनुभवाद्वारे विकसित शिक्षणाचा टप्पा गाठता येतो. त्यासाठी शिक्षकाच्या बांधिलकीला महत्त्व असल्याचे विचार नितीन बागुल मांडतात. शिक्षक समृद्धीकरण, शिक्षणाविषयीची अनास्था, पालक समुपदेशन, बोलीभाषेचा स्वीकार, आत्मियता फुलवणारा अधिकारी वर्ग यांचे योग्य उदाहरणाद्वारे केलेले त्यांचे उद्बोधन लाखमोलाचे वाटते.

आदर्शवादी शिक्षणाचं महत्व

वेगळेपणाच्या भावनेतून शिक्षणाला आकार देऊन पाहणारे संजय शिंदे आदर्शवादी शिक्षणाचं महत्व पटवून देतात. वाचन, मनन, लेखन या त्रिसूत्रीची अंमलबजावणी , शिक्षणाचे उपयोजन, वाचनगोडी वाढवणे, कल्पनाचे महत्व, एक महिना एक पुस्तक ही संकल्पना या सर्वांचा अंतर्भाव शिक्षणात व्हावा यासाठी ते आग्रही आहेत.

देखरेख यंत्रणा सक्रिय होणे गरजेचे

कायद्यातील निर्णयांची अंमलबजावणी योग्य रितीने होणेसाठी देखरेख यंत्रणा सक्रिय होणे गरजेचे आहे. शिक्षकपात्रता परीक्षा, संदर्भ साहित्याची उपलब्धता, अद्ययावत व सुरक्षित वाहतूक, प्रयोगशीलता, कौन्सिलिंग व्यवस्था, गुणांचा फुगवटा, कलेची कदर, आकलनावर भर, शिक्षकाचे वाचनालय, समुहवाचन संकल्पना, गुणी व उपक्रमशील शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण, सुलभ अद्यापन पद्धती या सर्वांवर नेमकेपणाची झालर लावत दशरथ कोटकर यांनी आपले अमूल्य विचार मांडलेले आहेत.

आनंददायी विद्यार्थी घडवण्याची गरज

जीवन कौशल्ये, शिक्षणातून विकास, मेंदूशी मैत्री, उत्तम मार्गदर्शक, या सर्वांचा कल्पनेतील शिक्षणात समावेश करणारे विठ्ठल कोळी आनंददायी विद्यार्थी घडवण्याची इच्छा व्यक्त करतात. याबरोबरच अल्प शब्दांत मोठा आशय व्यक्त करणारऱ्या काही शिक्षकांचे विचारही या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. उत्तम बांधणी, आकर्षकपणा, सचित्रपणा यामुळे हे पुस्तक वाचनीय झाले आहे शिवाय हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या मेंदूत परिवर्तनाचा डोस पेरल्याशिवाय राहणार नाही.

पुस्तकाचे नाव – आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण
प्रकाशन – दर्या प्रकाशन पुणे.
पृष्ठे – 155
किंमत – 250 रु.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ऊसतोडणी कामगार अन् म्हंकाळीच्या संघर्षाची माणदेशी कथा

प्राथमिक शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निर्मिलेला ग्रंथ

शेतकऱ्यांच्या वहिवाटीची आणि अंतर्गत संघर्षाची कहाणी म्हवटी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading