October 15, 2024
Wari For awaking spirituality rajendra ghorpade article
Home » Privacy Policy » सावध रे सावध…
विश्वाचे आर्त

सावध रे सावध…

उर्जेचा गुणधर्म आहे. उर्जा उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. उर्जा एका स्थितीतून दुसऱ्यास्थितीत जाऊ शकते. वारीतील उर्जा वर्षभर पुरावी यासाठी ती दुसऱ्यास्थितीत साठवायला हवी. ती आपल्या शरीरात साठवायला हवी.
-राजेंद्र कृष्णराव घोरपडे

तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती ।
एकमेकांते म्हणती । सावध रे सावध ।। 163 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय १ ला

ओवीचा अर्थ – तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हां त्यांच्या कानांवर आला. तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला. ( त्यांतल्या त्यांत) ते एकमेकांना अरे सावध राहा, सावध राहा असे म्हणू लागले.

संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपुरकडे रवाना होत आहेत. ग्यानबा तुकारामाच्या गजराने परिसर दुमदुमुन निघतो आहे. अध्यात्माच्या प्रगतीसाठी निघालेले वारकरी एकमेकाला सावध करत पुढे चालत असतात. जा मार्गावरुन ही दिंडी निघते त्या मार्गावर येणारे जाणारेही या अध्यात्माच्या गजराने सावध होतात. पालखीचा हा सोहळा पाहून रस्त्याने जाणारा वाटसरूही त्याचे दुःख विसरतो. त्याच्यातील दुष्टभाव नाहीसा होऊन त्याच्या विचारात चांगुलपणाचा अंकुर फुटतो. इतके सामर्थ या पालखीच्या दर्शनाने होते. सर्वत्र प्रसन्नता, आनंद या वारी मार्गावर ओसंडून वाहात असतो. या प्रसन्नतेला येणारा-जाणारा वाटसरुही सावध होतो. त्याच्या मनालाही प्रसन्नता लाभते. नकळत त्याच्यातही बदल होतो. हा बदल त्याला जरी जाणवत नसला तरी त्याचे महत्त्व तो अनुभवत असतो. ही अनुभूती त्याला येत असते. फक्त त्याचे अवधान त्याने जागृत ठेवायला हवे. वारीची दृष्ये पाहणारेही या जयघोषाने प्रसन्न होऊन जातात. संतांच्या या आनंदाच्या डोहात आपणही डुंबायला हवे. वारीच्या या निमित्ताने आता आपणही सावध होऊ या.

अध्यात्मात सावधानतेला महत्त्व आहे. युद्धाच्याक्षणी सैनिक एकमेकाला सावध करतात. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी एकमेक सावध होत पुढे वाटचाल करतात. तसे आपणही सावध होत आपल्या शरीरातील अवयवांना सावध करत साधनेसाठी सज्ज व्हायला हवे. तन-मनास सावध करुन साधनेवर लक्ष केंद्रित करायला हवे. वारीतून तनाला आणि मनाला मिळणारी प्रसन्नता साठवून त्याचा वर्षभर उपयोग करायला हवा.

पावसाळा चारच महिन्यांचा असतो. पावसाळ्यात पडणारे पाणी उन्हाळ्यात आपणास उपयोगी पडावे यासाठी आपण ते साठवून ठेवतो. धरणे, तलाव, पाणलोट विकास हा यासाठीच केला आहे. भूजलाच्या पातळीतही वाढ व्हावी यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. भूगर्भाचे पुर्नभरण आपण करत आहोत. जणेकरुन उन्हाळ्यातही आपणस पाणी कमी पडू नये. तसे वारीचे हे दहा-बारा दिवस आनंद-प्रसन्नतेचे असतात. ही प्रसन्नता आपण साठवून ठेवायला हवी. याचा वापर वर्षभर करायला हवा.

उर्जेचा गुणधर्म आहे. उर्जा उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. उर्जा एका स्थितीतून दुसऱ्यास्थितीत जाऊ शकते. वारीतील उर्जा वर्षभर पुरावी यासाठी ती दुसऱ्यास्थितीत साठवायला हवी. ती आपल्या शरीरात साठवायला हवी. तनात मनात ती उर्जा कायम राहायला हवी. ही उर्जा साठवण्यासाठी आपण सावध व्हायला हवे. तनाला मनाला सावध करायला हवे. वर्षभर येणाऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी मनाला खंबीरपणे उभे राहण्याचे सामर्थ मिळावे यासाठी ही उर्जा साठवायला हवी. यासाठीच वारीच्या प्रसन्न वातावरणात डुंबायला हवे. मन मोकळेपणाने त्यात सहभागी व्हायला हवे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading