सद्गुरु आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सांगतात. पण हे ऐकण्याच्या मनस्थितीत आपण असायला हवे, तरच ते आपणास आत्मसात होऊ शकते. या खऱ्या अर्थाचा बोध आपणास जेंव्हा होतो तेंव्हा आपण सुखी होतो. समस्यांनी वेढलेल्या संसाराच्या पुरात आपण अडकलेले असतो तेंव्हा आपणास वाचवण्यासाठी कोणी तरी यावे अशी मनोमन इच्छा असते. या समस्यातून सद्गुरु आपणास बाहेर काढतात अन् आपले जीवन आनंदाने भरतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
मज हृदयी सद्गुरू । तेणे तारिलों हा संसारपूरू ।
म्हणऊनि विशेषे अत्यादरू । विवेकावरी ।। २१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १
ओवीचा अर्थ – ज्यांनी मला या संसारपुरातून तारिले, ते सद्गुरू माझ्या हृदयांत आहेत, म्हणून माझे विवेकावर फार प्रेम आहे.
पुरामध्ये मोठे नुकसान होते. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात, तर काहींचे जगणेही मुश्किल होते. पुराच्या पाण्याला अडवणेही कठीण असते. त्याचे रौद्ररुप मनाचा थरकाप उडवणारे असते. या प्रवाहात कोण सापडला, तर त्याचे काय होईल हे सांगता येत नाही. पट्टीचा पोहणारा असला तरीही तो यात तरेल याची शाश्वती देता येत नाही. पुराच्या पाण्याच्या प्रवाहात अनेक भोवरे तयार होत असतात. यात अडकला तर त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही. कोणती दुर्घटना ओढवेल हे सांगता येत नाही. पुरस्थितीत चौहोबाजूंनी समस्याच समस्या उत्पन्न होत असतात. कोठे पाण्याने जमीन खचते तर कोठे मोठ मोठ्याल्या इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात. पाण्यात वाहून आलेले प्राणीही हिंस्र झालेले असतात. ते कधी व कसा हल्ला करतील हेही सांगता येत नाही. अशा पुरातून जो बाहेर काढतो तो आपल्यासाठी देवदूतच असतो. एखाद्या झाडाचा, ओंडक्याचा आधार मिळाला तर आपण आपला जीव वाचवू शकतो. असा या समस्येतून वाचवणारा कोणी असतो त्याला आपल्या हृदयात सदैव स्थान असते.
संसारामध्येही असेच समस्यांचे पुर येत असतात. कधी आजारपण सतावते तर कधी घरच्या रोजरोजच्या कटकटींनी मन सुन्न होऊन जाते. श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला संसारात समस्या ह्या असतातच. फक्त त्याचे स्वरूप वेगळे असते. पैसेवाला असला तरी हाव काही सुटलेली नसते. या हावेनेच तो अनेक समस्यात गुरफटत जातो. गरीबाचे जीवनच चिंताग्रस्त असते. जीवनाच्या संसारात प्रत्येकालाच या समस्यांचा सामना करावा लागत असतो. विद्यार्थ्याला अभ्यासाची चिंता असते. परीक्षेत यशस्वी होण्याची चिंता असते. खेळाडूला चांगला खेळ करण्याची चिंता असते. स्वतःच्या करिअरची चिंता सर्वांनाच असते. अशा या चिंताग्रस्त जीवनात आनंद आणणारा कोणी भेटला तर ? रोजचे जीवन आनंदी करणारा मंत्र कोणी दिला तर ? त्याचे उपकार आपण आयुष्यभर विसरू शकत नाही. सद्गुरू जीवनात आनंद देण्याचे कार्य करतात. संसाराच्या या समस्यातून जीवन सुसह्य कसे होईल हे पाहातात. अशा या सद्गुरुंना मग निश्चितच आपल्या हृदयात स्थान मिळते.
सद्गुरु आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सांगतात. पण हे ऐकण्याच्या मनस्थितीत आपण असायला हवे, तरच ते आपणास आत्मसात होऊ शकते. या खऱ्या अर्थाचा बोध आपणास जेंव्हा होतो तेंव्हा आपण सुखी होतो. समस्यांनी वेढलेल्या संसाराच्या पुरात आपण अडकलेले असतो तेंव्हा आपणास वाचवण्यासाठी कोणी तरी यावे अशी मनोमन इच्छा असते. या समस्यातून सद्गुरु आपणास बाहेर काढतात अन् आपले जीवन आनंदाने भरतात. यातूनच मग आपल्या जीवनात विवेक जागृत होतो. सर्वांशी आनंदाने वागण्याचा, राहाण्याचा विचार मनात डोकावतो. आपल्या आसपास आनंदी वातावरण असेल तर आपले जीवनही आनंदाने भरून जाते. विवेकी विचार आपल्या जीवनात आनंद आणतो म्हणूनच विवेकावर आपले प्रेम जडते. जीवनात असा बदल आपण करू शकलो तर आपले जीवन निश्चितच आनंदाने भरून जाईल. हा प्रयत्न करून पाहायला काहीच हरकत नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.