September 8, 2024
village-in-konkan-tourism-spot-article-by-hema-velankar
Home » माझं गाव …माझं घर…” गोकुळ “
पर्यटन

माझं गाव …माझं घर…” गोकुळ “

कोकणातल्या लोकांना जगाच्या पाठीवर कुठे ही नेलं तरी फार काही विशेष वाटत नाही. माझं कोकणातील कुडबुड गाव ही असंच किंबहुना ह्या ही पेक्षा भारी आहे असं त्यांना वाटत हे सांगणारा विनोदी अंगाने लिहिलेला हा लेख. ह्यातला विनोदाचा भाग वगळला तरी कोकणी माणसांना त्यांचं गाव हेच जगात सर्वात सुंदर ठिकाण वाटत असतं ही वस्तुस्थिती आहे. आम्ही स्वित्झर्लंड ला गेलो होतो तेव्हा माझ्या यजमानांना ही ते साधारण त्यांच्या कोकणातल्या गावासारखच दिसलं होतं. आज मी तुम्हाला माझ्या कोकणातल्या गावी घेऊन जातेय. चला तर मग … कशाला हवंय काश्मीर नी महाबळेश्वर.

हेमा वेलणकर

एका बाजूला सह्याद्रीच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यांच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या भूप्रदेशावर म्हणजेच कोकणावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. त्यातल्या त्यात तळकोकण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा तर निसर्ग सौंदर्याची खाणच आहे. या जिल्ह्यातील देवगड तालुक्यात … हो हो तोच.. हापूस साठी प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यात नाडण हे अगदी रुक्ष नाव असलेलं एक छोटसं गाव आहे . जगाचा नकाशा बघितला तर हे गाव म्हणजे एक अति सूक्ष्म टिंब . कोणाच्या खिजगणतीतही नसलेलं. अर्थात ते जगासाठी, आमच्या साठी ते सर्वस्व आहे . कारण ते आमचं गाव आहे . ” जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरियसी” हे अगदी खरं आहे.

आता कोकण रेल्वे ने आरामात झोपून किंवा स्वतःच्या मोटारीने ही नऊ दहा तासात गावाला पोचता येते. पण साठ सत्तर वर्षांपूर्वी कोकणात जाणे म्हणजे दिव्य असे. माझे सासरे मुंबईहून गावाला पोचत दुसऱ्या दिवशी दिवेलागणीला. ते नेहमी पावसाळ्यातच गावाला जात असत. संध्याकाळची वेळ, दुशीकडे कमरे एवढ वाढलेलं गवत , लाईट नाही, मुंबईहून घरी न्यायला म्हणून कौतुकाने घेतलेल्या अनेक वस्तूमुळे वाढलेलं सामान अशा स्थितीत घर गाठणे म्हणजे कठीणच असे. बस स्टॉप वर दोन गडी कंदिल घेऊन हजर असत. तिथून पुढे दोन मैल चालत जावं लागे तेव्हा घर दिसत असे. माझ्या तिकडे राहणाऱ्या सासऱ्यांनी पूर्ण वाटभर कोणी रस्ता चुकू नये म्हणून खुणेचे दगड रचून ठेवले होते. त्यांच्या आधाराने गेलं तरच चकवा न लागता घरी पोचता येत असे.

मुंबई गोवा हायवे तळेऱ्याला सोडून मग पाटगाव फणसगव गाव मार्गे पन्नास एक किलोमीटर अंतरावर नाडण गाव आहे . किंवा कोकण रेल्वे ने वैभववाडी स्टेशनला उतरून ही नाडणला जाता येतं. गाडीने गोवा महामार्ग सोडला की लगेच ती प्राणवायूने पुरेपूर भरलेली ताजी हवा आपलं मन प्रसन्न करते. मे महिना असेल तर वाटेतल्या आंब्याच्या बागा, काजूची झाडं, करवंदाच्या जाळ्या, बहरलेली उक्षी, फुललेला पळस पांगारा, मंजुळ शीळ घालून आपलं स्वागत करणारे पण क्षणार्धातच दृष्टी आड होणारे अनेक प्रकारचे चिमुकले पक्षी , दोन बागांमध्ये आणि रस्त्याच्या कडेला एका सरळ रेषेत घातलेले गडगे , आसमंतात भरून राहिलेला रानाचा म्हणून असतो तो खास वास हे सगळ आपल्याला आपण आता थोड्याच वेळात घरी पोचणार हे सारखं सांगत असतात तरी ही मन अधीर झाल्याने तो शेवटचा टप्पा संपता संपत नाहीये अस वाटत राहतं. पडेल, वाडा ही गाव मागे टाकत आपण अखेर नाडणात येऊन पोचतो.

गाडी थोडी उंचावर थांबते पण त्यामुळे उतरल्या उतरल्या आपल्याला परिसराचा एरियल व्ह्यू घेता येतो. आजूबाजूच्या हिरवाईत लपलेलं ते आमचं कौलारू घर कौतुकाने बघताना प्रवासाचा सगळा शिणवटा क्षणात नाहीसा होतो. “ काकू आली …… काकू आली” म्हणत मुलं घाटी चढून बॅग घ्यायला येतात. त्यांच्याबरोबर नवीन माणसाचं स्वागत करायला जॉनी असतोच. तो एकदा आपल्याला हुंगतो आणि मग आपल्या मागेपुढे करत राहतो … आपलं स्वागत म्हणून. गोठ्यातून गाईचं हंबरण ऐकू येत. तिथे धार काढणारा गडी ” वैनीनू , इलासा ” म्हणून आपलं स्वागत करतो. अंगणात आलं की स्वयंपाकघरात रटरटणाऱ्या कुळथाच्या पिठल्याचा घमघमाट आपल्या नाकात शिरतो तेंव्हा मात्र खरचं आलो आपण घरी ही भावना मनाच्या तळापर्यंत झिरपत जाते.

आमचं नाडण हे एक अगदी लहान जेमतेम दोन अडीच हजार वस्ती असलेलं खेडं आहे. गावात दुकान म्हणाल तर चहा पावडर, साखर, तेल अशाच गोष्टी मिळतील एवढच मोठं. शाळा आहे फक्त सातवी पर्यंत . परंतु अलीकडे झालेल्या वाडातर पुलामुळे ते देवगडशी जोडलं गेलं आहे. डॉक्टर, शाळा कॉलेज, दुकान, खरेदी सगळ्यासाठी देवगड.

दोन टेकड्यांच्या उतारावर ते वसलं आहे. आणि मधून वहातो एक व्हाळ म्हणजे ओढा. घरं सगळी व्हाळाच्या जवळ पासच आहेत .याचे कारण व्हाळाच्या जवळच्या विहिरीनाच पाणी लागतं . जस जसे वर जाल तसं पाणी दुर्मिळ होत जातं आणि त्यामुळे साहजिकच तिथे मनुष्य वस्ती ही नाही . त्यातल्या त्यात सधन लोकांची घरं नॅचरली व्हाळापासून थोडी वर पण फार वर ही नाही अशा लोकेशन ला आहेत. गरीब वस्ती सहाजिकच व्हाळापासून अगदी जवळ आहे. पावसाळ्यात अशा घरांना कायमच पुराचा धोका असतो.

गाव टेकडीच्या उतारावर असल्याने गावात सगळीकडेच खाली गेलं की व्हाळ आणि वर गेलं की टेकडी माथा असं चित्र आहे. खालती व्हाळाजवळ माड पोफळी आणि वरती आंब्या फणसाची झाडं असं प्रत्येकाच्याच आवारात असल्याने चारी बाजूने फक्त हिरवाईच दिसते आम्हाला. कोकणात टेकड्या चढण्यासाठी दगडाच्या पायऱ्यांचा जिना केलेला असतो. ह्याच त्या कोकणातल्या घाट्या. एकदा खाली किंवा वर जाणं ही आपल्या फिटनेस ची टेस्टच असते. मे महिन्यात कामवाल्या बायका आंब्यांची भली मोठी ओझी एक घाटी चढून आणि एक उतरून रस्त्यापर्यंत आणतात तेव्हा त्यांच्या बद्दल खूप वाईट वाटत. श्रमपरिहर म्हणून त्यांना ताक, सरबत, गूळ – पाणी असं दिलं जात . पण आमच्या काही बागा इतक्या आडनीड्या ठिकाणी आहेत की तिथे गाडी जाणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. बाजारात आपण तयार आंबे विकत घेतो तेव्हा अशा गोष्टींची कल्पना ही नसते आपल्याला.

माझे आजे सासरे नाडणालाच माती विकण्याचा व्यवसाय करीत असत. तिथे त्या काळी तो कितीसा चालत असेल ही शंकाच आहे . पण त्यांच्याकडे दूरदृष्टी होती आणि ते प्रयोगशील ही होते. आमच्याच पडीक असलेल्या जमिनीत त्यांनी काबाडकष्ट करून आंब्याची कलमं लावली . त्यांच्या हयातीत त्यांना जरी फळ चाखायला मिळाली नाहीत तरी आज त्यांची पंतवंड त्याची फळ चाखत आहेत. शंभर सव्वाशे वर्षापूर्वी लावलेली ती कलम आज ही भरपूर धरतात. काही कलमं इतकी विस्तारली आहेत की मूळ झाड शोधावं लागतं आणि काही इतकी उंच झाली आहेत की उंच शिडी लावल्या शिवाय त्यावर चढताच येत नाही.

आमच्या वठारात म्हणजे वाडीत चार पाच घरं जवळ जवळ आहेत. त्यामुळे शेजाऱ्यांची सोबत आम्हाला सगळ्यानाच मिळते जी गावाकडे आवश्यकच असते. पूर्वेकडे ज्यांचं घर आहे ते उगवते म्हणून आणि आमचं घर पश्चिमेला असल्याने सहाजिकच आम्ही मावळते म्हणून ओळखले जातो. आमचं हे घर ही माझ्या आजे सासऱ्यांनी स्वतःच्या हातानी बांधलं आहे, कोणा ही गवंड्याची किंवा सुताराची मदत न घेता. आमच्या घराजवळची घाटी ही त्यांनी स्वतःच बांधली आहे . त्यामुळे त्या घाटीचं आम्हाला जरा जास्तच कौतुक. आज शंभर सव्व्वाशे वर्ष झाली तरी तशीच मजबूत आहे . एक दगड हलला नाहीये. असो. घराची रचना ओटी, पडवी, माजघर, सैपाकघर आणि परसदार अशी आहे. आता मातीच्या भिंती जाऊन सिमेंटच्या आल्या आहेत, जमिनीला ही फरशा बसवल्या गेल्या आहेत . घराचं पाखं थोडं अधिक उंच केलं गेलं आहे . नळीची कौलं जाऊन मंगलोरी कौलं घातली गेली आहेत. कालानुरूप गरजेचे असणारे इतर ही अनेक बदल झाले आहेत. पण ते सगळे मूळ घर आहे तसेच ठेऊन .

वाढणाऱ्या कुटुंबाला रहातं मूळ घर कमी पडत होतं म्हणून मूळ घराच्या खालच्या लेव्हलला एक माडी बांधली आहे . मूळ घराची लेव्हल आणि खालच्या माडीची लेव्हल एकच असल्याने मूळ घर आणि माडी याना जोडणारा एक छोटासा पूल बांधला आहे. त्यामुळे माडी मूळ घरा पासून वेगळी न राहता मूळ घराचाच एक भाग बनली आहे.

घर किती ही चांगलं असलं तरी घराला शोभा येते ती माणसांमुळे. आज त्या घरात पंधरा माणसं अगदी गुण्या गोविंदाने राहत आहेत. कोकणात खरं तर घरांना नावं बिव नसतात शहरात बंगल्याना असतात तशी. परंतु मध्यंतरी आमच्याच घरातल्या एक शाळकरी मुलाने शाळेतल्या हस्तव्यवसायाचा भाग म्हणून घराची पाटी तयार केली होती. आमच्या घराचं ” गोकुळ ” हे नाव सर्वार्थाने सार्थ करणारी ती पाटी आम्ही अभिमानाने घरावर लावली आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्रावणात फुलतो साडवलीच्या माळावर दीपकाडीचा शुभ्र सडा !

येवा कोकण आपलाच असां…!

अनोखे नागा नृत्य संगीत

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading